22 July 2019

News Flash

चरबी ते चामडी

कोण आपणास अडवणार, ही भावना बुलंदशहरातील हिंसाचारामागे ठसठशीतपणे आढळते..

कोण आपणास अडवणार, ही भावना बुलंदशहरातील हिंसाचारामागे ठसठशीतपणे आढळते..

समाज हिंसक केव्हा होतो? काही प्रमुख कारणे. समाजातील एका घटकाच्या मनात दुसरा घटक अन्याय करीत असल्याची भावना निर्माण होते तेव्हा. एखाद्या घटकास सातत्याने डावलले जात असल्याचे वाटू लागते तेव्हा. धार्मिक वा सामाजिक विद्वेष. या समाजाचे नियमन करणाऱ्या व्यवस्थेकडून, म्हणजे सरकारकडून, समाजातील एका घटकास सापत्नभावाची वागणूक दिली जात असेल तरीही समाज हिंसक होतो. सामाजिक हिंसाचारामागील ही काही महत्त्वाची कारणे. परंतु उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील हिंसाचारामागे यातील एकही कारण दिसत नाही. ज्या घटकाच्या मनात दुसऱ्या घटकास प्राधान्यक्रमाने वागवले जात असल्याबद्दलची नाराजी होती, तोच घटक सध्या त्या राज्यात सत्तेवर आहे. म्हणजे ते कारण दूर झाले. ज्या घटकाकडून हा हिंसाचार झाल्याचे दिसते त्या घटकास सातत्याने डावलले जात असल्याचे कारणही समर्थनार्थ पुढे करता येणार नाही. कारण हिंसाचाराचा आरोप असलेले आणि सत्ताधीश यांचे वैचारिक द्वंद्व नाही. तेव्हा हे कारणही निकालात निघाले. धार्मिक वा सामाजिक विद्वेष म्हणावा तर त्याबाबत नव्याने काही ठिणगी पडलेली नाही. उलट त्या प्रदेशातील बहुसंख्य ज्या धर्माचे अनुयायी आहेत त्या धर्मीयांना सुखावणाराच राम मंदिरासारखा निर्णय घेतला जात आहे. म्हणून हे कारणही येथे लागू पडणार नाही. त्या प्रदेशातील सरकार बहुसंख्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. तेव्हा त्यावर अन्याय केल्याचा आरोप असलाच तर तो अल्पसंख्याकांकडून झाला असता आणि तो समाज हिंसक झाला असे म्हणता आले असते. बुलंदशहराबाबत तसे झालेले नाही. म्हणजे हे कारणही येथे लागू पडत नाही. तेव्हा त्या हिंसाचाराचा अन्वयार्थ कसा लावायचा? आणि हा काही सामान्यांचे जीव घेणारा हिंसाचार नाही. यात गणवेशातील पोलीस अधिकारी मारला गेला. तेव्हा या हिंसाचाराचा अर्थ काय?

अधिकाराचा दर्प असे याचे विश्लेषण करता येईल. व्यवस्थाशून्य वातावरणात समाजातील एका घटकास सत्ता आपल्याच हाती असल्याचे वाटू लागते आणि काहीही केले तरी कोण आपणास हात लावणार असा त्याचा समज होतो. आपल्यासारख्या देशात दुर्दैवाने तो खराही असतो. या आणि अशा हिंसाचाराचा उपयोग सत्ताकारणासाठी झाल्याचा इतिहास असेल तर मग विचारायचीच सोय नाही. त्यातून हा समाज बेमुर्वतखोर होतो आणि विनाकारण हिंसाचार करू लागतो. बुलंदशहरात हे असे घडले. तेथे जमाव हाताबाहेर गेला कारण परिसरात गाईंची कत्तल होत असल्याचा त्याचा समज झाला. ही घटना जेथून घडली तेथून साधारण ४५-५० किमी अंतरावर इस्लामधर्मीयांचे संमेलन होते. आता गाई मारल्या जात असल्याची कोणाची तरी भावना होणे आणि इस्लामधर्मीयांचे हे संमेलन यांचा काही परस्परसंबंध नाही असे वास्तवाचे काहीही भान नसलेलेच मानू शकतील. आपल्या परिसरात गोमातांचे प्राणहरण होत असल्याच्या संशयावरून हा समाज संतापला. त्यास काही गाईंची कलेवरेही सापडली असे म्हणतात. सात्त्विक संतापाने रक्त खवळलेला हा जमाव प्रक्षुब्ध होऊन त्या गाईंची कलेवरे पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि त्यांनी महामार्गही बंद पाडला. त्या समुदायास शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच त्यानंतर उठलेल्या हिंसाचारात प्राण गमवावे लागले. हे भयानक म्हणावे लागेल.

ज्या प्रदेशात एखादा समुदाय जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनाच लक्ष्य करतो तेव्हा ते दिसते त्यापेक्षा अधिक गंभीर परिस्थितीचे निदर्शक असते. एकेकाळी अशी अवस्था बिहार या राज्यात सर्रास आढळे. ज्या जमातीच्या नेत्यांहाती सत्तेची दोरी त्या जमातीचे गुंडपुंड सर्रास सरकारी यंत्रणेस बटीक बनवीत. अशा ठिकाणी पोलिसांवरही सहज हात टाकला जात असे. कारण कोण आपणास अडवणार, ही भावना. बुलंदशहरातील हिंसाचारामागे ती ठसठशीतपणे आढळते. या हिंसाचारात प्राण गमावलेल्यांतील पोलीस अधिकारी हिंदू आहे आणि दुसरी व्यक्तीही अल्पसंख्य समाजातील नाही. तसेच ज्याने कायदा हाती घेतल्याचा आरोप आहे तो देखील याच हिंदू समाजाचा भाग आहे. किंबहुना सदर संबंधित आरोपी तर एका धर्माभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते. याचा अर्थ इतकाच की या हिंसाचारामागे उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम असा वाद नाही. हिंसाचाराचा आरोप असलेला आणि हिंसाचारात बळी पडलेला हे दोघेही हिंदूच. यात लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे मारल्या गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गोवंश हत्या प्रकरणातील भूमिका. तीन वर्षांपूर्वी, २०१५ साली, उत्तर प्रदेशातच घडलेल्या दादरी गोवंश हत्या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची तत्परता बुलंदशहरात बळी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवली होती. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून त्या वेळी दादरी गावातील महंमद अखलाख यास जमावाने ठेचून मारले. त्यातील आरोपींना ज्या पोलीस अधिकाऱ्याने कार्यक्षमता दाखवून जेरबंद केले तोच अधिकारी बुलंदशहरात मारला गेला यास केवळ योगायोग मानणे अगदीच भाबडेपणा ठरेल. या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने मंगळवारी केलेले भाष्य हेच दर्शवते. माझ्या वडिलांनी आम्हास सर्वधर्मसमभावाचीच शिकवण दिली, धर्माच्या नावावर आपण कधीही कोणाचा विद्वेष करू नये असे वडील सांगत, असे या अधिकाऱ्याचा बारावीत शिकणारा मुलगा म्हणतो. त्याचा पुढचा प्रश्न अधिक भेदक आहे. धार्मिक हिंसाचारात आज माझे वडील बळी पडले. उद्या कोणाचा क्रमांक, असा त्याचा प्रश्न.

प्रस्तुत वातावरणात तो अत्यंत रास्त म्हणावा लागेल. याचे कारण धार्मिक विद्वेष, पाठोपाठ येणारा हिंसाचार आणि त्याचा राजकीय परिणाम याचे म्हणून एक समीकरण उत्तर प्रदेशात दिसते. याच राज्यातील मुझफ्फरनगर येथे तरुणीच्या छेडछाडीच्या कारणावरून पसरलेल्या धार्मिक विद्वेषाचे लोण इतके पसरले की त्यात साठ जणांचे जीव गेले. ही घटना २०१३ सालातील. या कारणावरून इतक्या मोठय़ा प्रमाणावर या परिसरात हिंदू-मुस्लीम दंगे झाले की बराच काळ या प्रदेशात संचारबंदीचाच अंमल होता. त्या वेळी उत्तर प्रदेशात सरकार होते समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचे आणि केंद्रात मनमोहन सिंग यांचे. न्यायालयाने त्या वेळी यादव सरकारची निष्क्रियता यामागे असल्याची टीका केली. तसेच मनमोहन सिंग सरकारनेही यादव सरकारला योग्य ते साहाय्य न केल्याचा ठपका त्या वेळी ठेवला गेला. हे मुझफ्फरनगर येते पश्चिम उत्तर प्रदेशात. त्यानंतरच्या निवडणुकांत पश्चिम उत्तर प्रदेशने भाजपच्या पदरात मतांचे भरभरून दान घातले. या प्रदेशात जणू भाजप लाट असल्याचेच चित्र होते. या वातावरणनिर्मितीत मुझफ्फरनगर दंगलींचा वाटा नाही, असे म्हणता येणार नाही. तसेच देशातील सुरुवातीचा गोवंश हत्याबंदी हिंसाचार घडला ते दादरी देखील याच पश्चिम उत्तर प्रदेशाचा भाग आहे. ताजा हिंसाचार ज्या शहरात उसळला ते बुलंदशहर हे पश्चिम उत्तर प्रदेशातच येते या योगायोगाकडे कसा काणाडोळा करणार?

ब्रिटिशकालीन भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या पलटणीतील काडतुसांना गाईची चरबी लावली जाते या संशयावरून हिंदू शिपायांनी बंड केले. त्या वेळी त्यास काही ठाम अर्थ होता आणि त्या कृतीमागे देशप्रेम होते. आज गो-हत्येच्या संशयावरून प्राण घेतले जातात, यामागील अर्थ शोधणे अवघड नाही आणि त्यास देशप्रेम म्हणता येणार नाही. परंतु १८५७ ते २०१८ या काळात आपला प्रवास कोठून कुठपर्यंत झाला हे मात्र यातून दिसते आणि ते निश्चितच अभिमानास्पद नाही.

First Published on December 5, 2018 2:08 am

Web Title: culture of violence in india