News Flash

जेआरडींचा कोप

केवळ नफ्यातोटय़ाचे समीकरण बिघडले म्हणून मिस्त्री यांना पदच्युत केले असण्याची शक्यता नाही.

टाटा समूहातील बडय़ा कंपन्यांना तोटा सहन करावा लागला म्हणून सायरस मिस्त्री यांना जावे लागले असे मानले जात असेल तर ते खरे नाही..

नीतिमूल्यांवर, कंपनीच्या ध्येयधोरणांवर टाटा समूह प्रमुखांकडून अव्यभिचारी निष्ठेची अपेक्षा ठेवली जाते. सायरस मिस्त्री कमी पडले ते याबाबत. आपल्या मूल्याधारित परंपरेचा आदर राखण्यासाठी टाटा समूहाने एक करावे. मिस्त्री यांना निरोप देण्यामागील कारणे अधिकृतपणे सांगावीत..

भारतातील फक्त उद्योग क्षेत्रासच नव्हे तर समस्त भारतास ललामभूत असलेल्या टाटा समूहाच्या प्रमुख पदावरून सायरस मिस्त्री यांची झालेली उचलबांगडी धक्कादायक आहे खरी. परंतु त्यामागे टाटा समूहातील कंपन्यांची अलीकडच्या काळातील निराशाजनक कामगिरी हे कारण निश्चितच नाही. याचे कारण बाजारपेठेतील कामगिरी, नफ्यातोटय़ाच्या समीकरणांतील चढउतार हे जीवनचक्राप्रमाणेच सतत वरखाली होतच असतात. आज गडगंज नफा कमावणारी कंपनी उद्या तोटय़ात असू शकते. जगात याची अनेक उदाहरणे आहेत आणि टाटा समूहासदेखील हा अनुभव नाही असे नाही. तेव्हा केवळ नफ्यातोटय़ाचे समीकरण बिघडले म्हणून मिस्त्री यांना पदच्युत केले असण्याची शक्यता नाही. या समूहाचे आदरणीय जेआरडी टाटा हयात असताना त्यांच्या नेतृत्वाखालीही टाटा समूहास तोटा सहन करावा लागलेला आहे. त्या वेळी या संदर्भात त्यांना एकदा विचारले असता, जेआरडी म्हणाले : Cycle is temporary, class is permanent. म्हणजे नफ्यातोटय़ाची गणिते वरखाली होतील, पण अभिजातता कायमची असते. याच तत्त्वाने या कंपनीची वाटचाल सुरू होती आणि आहेदेखील. त्यामुळे टाटा स्टील, टाटा मोटर्स अशा समूहातील बडय़ा कंपन्यांना तोटा सहन करावा लागला म्हणून सायरस मिस्त्री यांना जावे लागले असे मानले जात असेल तर ते खरे नाही. या समूहाच्या साधारण १४८ वर्षांच्या इतिहासात उच्च पदांवरील अधिकाऱ्यास नारळ दिला जाण्याचा प्रकार फक्त तीन वेळा घडलेला आहे. या तीनही प्रकरणांत कंपन्यांचा ताळेबंद हे कारण नव्हते. रुसी मोदी, अजित केरकर आणि दिलीप पेंडसे या तिघांनाही पदावरून दूर करावयाची वेळ टाटा समूहावर आली.

रुसी मोदी हे टाटा स्टील, म्हणजे तेव्हाची टिस्को, या कंपनीचे सर्वेसर्वा होते, अजित केरकर हे ताज हॉटेल मालिकेची ओळख होते आणि दिलीप पेंडसे यांनी टाटा फायनान्स या त्या वेळी झपाटय़ाने वाढणाऱ्या कंपनीची धुरा सांभाळली होती. या तिघांच्या गच्छंतीत एक साम्य आहे. ते म्हणजे हे तिघेही आपले पद गृहीत धरून चालले आणि या स्वकेंद्रित गृहीतकानंतर स्वत:चे स्थान बळकट करण्यासाठी या तिघांनी करू नये ते उद्योग केले. मोदी यांना टाटा समूहाचीच धुरा वाहायची होती. त्यासाठी ते प्रसंगी जेआरडी यांना आव्हान देऊ पाहात होते. इतकेच नव्हे तर राजकीय मुखंडांनी आपल्या पारडय़ात सरकारी वजन टाकावे यासाठी त्यांनी थेट लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या गणंगाची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तीस दूर करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय टाटांसमोर राहिला नसणार हे उघड आहे. केरकर यांनीही आपल्या पदाच्या मर्यादा ओलांडल्या. मोदी यांच्याप्रमाणे कोणा राजकारण्याची मदत आदी उद्योग त्यांनी केले नाहीत. परंतु टाटा समूहाचे हितसंबंध आणि आपल्या खासगी कंपनीचे हितसंबंध यांच्यात गल्लत करण्याचे पाप त्यांच्या हातून घडले. टाटा समूहातील ताज हॉटेलांचा व्यवसाय स्वत:च्या कंपनीमार्फत आणणे, समूहाची कामे आपल्या कंपनीस देणे आदी प्रकार त्यांनी केले. तेव्हा त्यांनाही घालवण्याची वेळ टाटा समूहावर आली. या दोघांच्या तुलनेत दिलीप पेंडसे तसे कनिष्ठ होते. परंतु या कंपनीत खुद्द रतन टाटा यांचा जीव होता. तेव्हा पेंडसे यांनी अधिक सजगपणे काम करणे अपेक्षित होते. ते राहिले बाजूलाच. पेंडसे आर्थिक गैरव्यवहार करू लागले. केरकर यांच्याप्रमाणेच आपला वैयक्तिक नफा आणि कंपनीचे हितसंबंध यांच्यातील सीमारेषा त्यांनाही पाळता आली नाही. त्यात पुन्हा भांडवली बाजारातील गुंतवणूक. त्यातही पेंडसे यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे उपद्व्याप केले. तेव्हा अत्यंत अशोभनीय पद्धतीने त्यांना जावे लागणे अनिवार्य होते. या शेवटच्या गच्छंतीनंतर सुमारे तीन दशके उलटली. त्यानंतर एकदम मिस्त्री यांच्या रूपाने कंपनीच्या प्रमुखालाच घरचा रस्ता दाखवण्याची वेळ या समूहावर आली. या पाश्र्वभूमीवर आधीच्या तीन अशा कारवायांप्रमाणे मिस्त्री यांची गच्छंतीदेखील नफ्यातोटय़ाच्या बाजारपेठीय समीकरणांपेक्षा टाटा समूहातील मूल्यांच्या तडजोडीमुळेच झाली असणार असा निष्कर्ष निघाल्यास तो अस्थानी असणार नाही. नफ्यातोटय़ापेक्षाही टाटा समूहास नैतिकता अधिक प्रिय असते. त्याचमुळे मिस्त्री यांच्या गच्छंतीचा या नैतिकतेशी संबंध आहे. असे मानण्याचे आणखी एक कारण म्हणजे मिस्त्री यांच्या गेल्या चार वर्षांच्या नेतृत्वात टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांना तोटा सहन करावा लागला तरी त्यामागील कारणे जागतिक आहेत. पोलाद, मोटार आदी उत्पादनांबाबत एक प्रकारची जागतिक मंदी सुरू असल्याने त्यास उठाव नाही. त्यामुळे या नफ्यातोटय़ाच्या हिशेबांत मिस्त्री यांना कोणीही दोष देणार नाही. नैतिक कारणांबाबत मात्र असे नाही.

मिस्त्री यांची नैतिकता टाटा समूहाचे प्रमुखपद आणि स्वत:चे बांधकाम उद्योजक घराणे यांच्यातील कात्रीत सापडली. टाटा समूहाची धुरा सांभाळतानाच मिस्त्री हे शापुरजी पालनजी अँड कं. या आपल्या कुटुंबसंबंधित कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करताना आढळले असे या कंपनीतील धुरीण सांगतात. त्यात तथ्य असेलच. त्याचप्रमाणे शापुरजी पालनजी या कंपनीने मुंबईतील काही अत्यंत महत्त्वाकांक्षी सरकारी घरबांधणी प्रकल्पाच्या कंत्राटासाठी प्रयत्न चालवले होते, असे म्हणतात. या प्रयत्नांत कंपनीस सायरस मिस्त्री यांची साथ होती, असे बोलले जाते. म्हणजे पाहणाऱ्यास वरकरणी मिस्त्री यांचे प्रयत्न टाटा समूहासाठीच सुरू आहेत असे भासत होते. तरी प्रत्यक्षात मात्र ते शापुरजी कंपनीच्या हितसंबंधांसाठी केले जात होते. हे असे करणे टाटा समूहात अक्षम्य मानले जाते. नीतिमूल्यांवर, कंपनीच्या ध्येयधोरणांवर टाटा समूह प्रमुखांकडून अव्यभिचारी निष्ठेची अपेक्षा ठेवली जाते. सायरस मिस्त्री कमी पडले ते याबाबत. याच निष्ठेचा एक भाग असतो टाटा ट्रस्टतर्फे हाती घेतले जाणारे समाजोपयोगी उपक्रम. या टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची सर्वात मोठी मालकी आहे आणि टाटा सन्सतर्फे टाटा समूहातील विविध कंपन्यांचे नियंत्रण केले जाते. त्यामुळे टाटा सन्सच्या प्रमुखपदावरील व्यक्ती ही टाटा कंपन्यांची प्रमुख बनते. याचा अर्थ टाटा समूहातील उच्चपदस्थांना टाटा ट्रस्टच्या ध्येयधोरणांचा आदर करावा लागतो. या ट्रस्टतर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात. टाटा समूहासाठी या न्यासाचे कार्यक्रम हे अतिशय महत्त्वाचे. याचे कारण या समूहाने पाळलेल्या नीतिमूल्यांचे भौतिक दर्शन या न्यासाच्या कार्यक्रमांतून होत असते. सध्या रतन टाटा हे जातीने या न्यासाचे कार्यक्रम हाताळत असतात. मिस्त्री यांनी या न्यासाच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष केले. हेदेखील अक्षम्य पाप. याचे कारण टाटा समूहाची ओळखच मुळी हे नफ्यातील रकमेच्या संख्येपेक्षा अशा सामाजिक उपक्रमांत आहे. मग ते टाटा कर्करोग रुग्णालय असो की हाफकिन संस्था असो किंवा बंगलोरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स असो की टाटा मूलभूत संशोधन संस्था असो. अशा सर्व समाजोपयोगी उपक्रमांचे नियंत्रण अलीकडे टाटा ट्रस्टकडून होत असते. तेव्हा टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळणाऱ्यास या न्यासाच्या कार्यक्रमांबाबत संवेदनशील असावेच लागते.

ती अपेक्षित संवेदनशीलता मिस्त्री यांच्याकडे नव्हती. तेव्हा आपल्या मूल्यांसाठी आग्रही नसलेल्याकडे कंपनीचे प्रमुखपद देऊन आपला चेहरा बदलावयाचा की आपल्या मूल्याधारित चेहऱ्याचा मान ठेवेल अशाच व्यक्तीकडे कंपनीची सूत्रे द्यावयाची हा प्रश्न टाटा संचालकांसमोर होता. त्यांनी अपेक्षेप्रमाणे दुसरा पर्याय निवडला. म्हणूनच मिस्त्री यांना जावे लागले. आता आपल्या मूल्याधारित परंपरेचा आदर राखण्यासाठी टाटा समूहाने एक करावे. मिस्त्री यांना निरोप देण्यामागील कारणे अधिकृतपणे सांगावीत. उत्तराधिकाऱ्याची आपली निवड चुकली हे मिस्त्री यांना हटवून एवीतेवी टाटा कंपनीने मान्य केलेच आहे. आता कारणेही द्यावीत. त्यामुळे हा निर्णय हा कटू असला तरी अंतिमत: किती आवश्यक आहे, हे जनतेस कळेल. शापुरजी पालनजी यांच्याकडे टाटा समूहाच्या मालकीतील मोठा वाटा आहे, हे जेआरडींना मंजूर नव्हते. जेआरडींच्या सख्ख्या भावाने नाजूक मानसिक अवस्थेत मालकीतला आपला वाटा शापुरजी कुटुंबीयांहाती दिल्याने जेआरडी तेव्हा संतापले होते, हा इतिहास आहे. आज त्याच शापुरजी कुटुंबीयांतील सायरस यांच्या हाती दिलेली टाटा समूहाची सूत्रे काढून पुन्हा ती रतन टाटा यांच्या हाती द्यायची वेळ संचालकांवर आली. जे झाले त्यास जेआरडींचा कोप असे म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:54 am

Web Title: cyrus mistry removed from tata sons chairman 2
Next Stories
1 खांब पिचू लागला की..
2 आयुक्तांची म्हातारी, सेवकांचा काळ!
3 स्वप्नाचा चुराडा होण्यापूर्वी..
Just Now!
X