रांगेचे महत्त्व आपण ओळखलेले असले, तरी रांग हा काही सदासर्वकाळ आवडणारा प्रकार नाही..

रांग हे केवळ शिस्तीचे प्रतीकच नव्हे, तर ती एक संस्कृतीही असते. कधी कधी ही शिस्त स्वेच्छेने पाळलीही जाते, तेव्हा माणसाच्या आत दडलेल्या माणुसकीचे दर्शन घडविते आणि जेव्हा बेमुर्वतपणे ही शिस्त मोडायचे ठरवूनच झुंडशाही सुरू होते, तेव्हा माणुसकीलाही लाज वाटू लागते.

अत्यंत शांतपणे, कोणताही बडेजाव न मिरवता, एका लग्नसमारंभातील जेवणावळीच्या रांगेत शांतपणे उभे असलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे कधी तरी काढले गेलेले आणि समाजमाध्यमांवर कौतुकाच्या वर्षांवासह प्रचंड प्रमाणात पसरलेले ते छायाचित्र आठवतेय? मंत्री असूनही, केवळ सामान्यांच्या रांगेत उभे राहिले, म्हणून पर्रिकर यांचे त्यानंतर समाजमाध्यमांवर वारेमाप कौतुक झाले आणि, ‘रांग हे शिस्तीचे प्रतीक आहे’, हे सत्यही पुन्हा अधोरेखित झाले. रांगेत उभे राहणे म्हणजे शिस्तीचे पालन करणे, ही जगन्मान्य संस्कृती आहे. मुंबईकरांना तर, जन्मानंतर घराबाहेर पडण्याच्या पहिल्या दिवसापासूनच रांगेची सवय असते. रांग नसेल, तर सारीच घडी विस्कळीत होईल याचा साक्षात्कार खरे तर माणसाला काहीसा उशिराच झाला आहे आणि तो तसा झाल्यानंतरही, रांगेची संस्कृती स्वीकारण्याची मानसिकता अजूनही सर्वदूर पसरलेली नाही. रांगेची शिस्त निसर्गाने मात्र कायमच पाळली आहे. म्हणूनच, एवढीशी मुंगीदेखील तिच्या कळपातून चालताना रांगेबाहेर भरकटत नाही. अगदीच खोडकरपणा करावासा वाटलाच, तर रांगेबाहेर काहीशी घुटमळते आणि पुन्हा शिस्तीत रांगेत सामील होते. तिन्हीसांजा झाल्या, सूर्य मावळतीकडे कलला, म्हणजे रानावनात भटकणारे पक्षी घराकडे वळू लागतात. तेव्हा सहज आकाशात नजर फिरवावी. एका शिस्तबद्ध लयीत, निळ्या आभाळाला पाठीवर घेऊन घरटय़ांची वाट धरणाऱ्या बगळ्यांच्या माळा पाहताना भान हरपून जाते. कारण त्या लयीतही रांगेची शिस्त भिनलेली असते. ‘रांगेचा फायदा सर्वाना’ हे सत्य माणसाला माहीत असले, तरी ते काहीसे उशिराच उमगले आणि त्याचे पालन करणे अगदीच अपरिहार्यच झाले, तेव्हाच रांगेत उभे राहण्याची, रांग लावण्याची आणि रांगेची शिस्त पाळण्याची सवय नाइलाजाने अंगवळणी पडू लागली. तरीही अजून रांग ही सवय झालेलीच नाही. जीवघेण्या गर्दीच्या ठिकाणी घुसून पहिली संधी पटकावण्यासाठी किंवा पहिला फायदा मिळविण्यासाठी जेव्हा जिकिरीची स्पर्धा लागते, तेव्हा रांगेच्या शिस्तीचा विसरच पडतो आणि पहिल्यापासून अंगवळणी पडलेली, झुंडीची सवयच डोके वर काढते.

खरे म्हणजे, रांग हे केवळ शिस्तीचे प्रतीकच नव्हे, तर ती एक संस्कृतीही असते. स्वार्थापलीकडे पाहण्याची आणि परस्पर सहकार्याची प्रवृत्ती जोपासण्याचे ते एक साधनही असते. कधी कधी ही शिस्त स्वेच्छेने पाळलीही जाते, तेव्हा माणसाच्या आत दडलेल्या माणुसकीचे दर्शन घडविते आणि जेव्हा बेमुर्वतपणे ही शिस्त मोडायचे ठरवूनच झुंडशाही सुरू होते, तेव्हा माणुसकीलाही लाज वाटू लागते. रांगेच्या शिस्तपालनातील समाधानाचे असंख्य अनुभव वारंवार, जागोजागी घेतलेले असतानाही, शक्यतो रांग मोडून किंवा रांगेची शिस्त न पाळण्याची मानसिकता मात्र मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी कायमचीच दडलेली असते. गर्दीचे मानसशास्त्र अशा शिस्तीचे नियम सहसा पाळतच नसते. रांग आणि अलोट गर्दी यांचे फारसे सख्य नसते. म्हणूनच, प्रचंड, अनावर गर्दीत मात्र, पहिला नंबर पटकावण्यासाठी शिस्तीचा हा दंडक धाब्यावर बसविला जातो, तर जेथे सहजपणे सर्वानाच सारखाच फायदा मिळणे शक्य असते, तेथे मात्र रांगेच्या शिस्तीचे सुलभ पालन केले जाते. ग्रामीण भागात व्यवस्थेतील ढिसाळपणाचा एक फायदा पूर्वीच कधी तरी दिसू लागला आणि रांगेची शिस्त सर्वानी तात्पुरती का होईना स्वीकारली गेली. रेशनच्या दुकानात केरोसीन दाखल होताच पत्रा-प्लास्टिकची निर्जीव भांडीदेखील स्थितप्रज्ञभावाने पुढे सरकू लागली. असे केले की, भांडय़ाला भांडे लागत नाही आणि प्रत्येक भांडे त्याच्या त्याच्या कुवतीनुसार भरले जाते, याची जाणीव त्यामागच्या माणसांना झाली तेव्हा रांगेची महती उमगली आणि त्या वेळेच्या गरजेपुरती रांगेची शिस्त स्वीकारली गेली. दुष्काळाचे चटके बसू लागले, पाण्याच्या थेंबाथेंबासाठी प्रतीक्षा सुरू झाली, तेव्हा सरकारी टँकरच्या प्रतीक्षेतही असेच तासन्तास ताटकळणारी माणसे भांडय़ांच्या रांगा लावून आपल्या अंगी मुरलेल्या विस्कळीत सवयीनुसार बाजूच्या सावलीत बसू लागली आणि भांडय़ात पाणी पडताच रांगा मोडल्या जाऊ लागल्या. रांगेचा फायदा सर्वाना हा नियम असला, तरी रांगेचा फायदा आपल्याला अगोदर मिळाला पाहिजे, असाही अनेकांचा आग्रह असतो. त्यामुळे, केवळ रांगेत उभे राहण्याची शिस्त पाळतानादेखील, रांगेत आपला नंबर पहिला असावा किंवा इतरांना मागे टाकून पुढे सरकावे असेही प्रयत्न होतातच. मग परस्परांच्या फायद्याचे हे सूत्र विसरून कुणी हमरीतुमरीवर येतो आणि ही परिस्थिती अगदीच विकोपाला गेली, तर शांतपणे पुढे सरकणाऱ्या रांगादेखील क्षणात विस्कटून जातात आणि नाइलाजाने स्वीकारलेल्या या शिस्तीच्या सूत्राचे तीनतेरा वाजतात.

शिस्तीचे हे प्रतीक कधी कधी मात्र नकोसे होऊ लागते. रांगेत उभे राहणे हे ताटकळत वाट पाहणेच असते. रेल्वेच्या तिकिटासाठी लागलेल्या लांब रांगेत उभे राहून एक एक पाऊल पुढे सरकत असताना समोरच्या फलाटावरून एकामागोमाग एक गाडय़ा सुटून जात असतात आणि क्षणाक्षणाला फलाटावर गर्दीचे लोंढे वाढत असतात, अशा वेळी रांगेत उभे राहणे ही सहनशीलतेची परीक्षा असते. त्यातही, अगदी तिकीट खिडकीसमोर दाखल होण्याचा क्षण गाठावा आणि कामाची वेळ संपली असे जाहीर करून डोळ्यांदेखत खिडकीचे दरवाजे पलीकडून धाडकन बंद व्हावेत हा अनुभव तर मनाचा चरफडाट करणारा असतो. रांगेची शिस्त पाळण्याच्या प्रामाणिकपणाशी एकनिष्ठ राहण्याची मानसिकता अशा क्षणाला ढळू लागते आणि मूळ सवयच सोयीची असेही वाटू लागते. तरीही चरफडत दुसऱ्या बाजूच्या खिडकीसमोर रांग लावून नव्याने आपल्या नंबरची प्रतीक्षा करीत एक एक पाऊल पुढे सरकणेच भाग पडते, अशाच गर्दीत दुसराच कुणी रांग मोडू पाहात असेल तर मात्र, रांगेच्या शिस्तीचे महत्त्व पटविण्यासाठी अनेक जण पुढे होतात आणि तरीही कुणी घुसखोरी केलीच, तर रांगेची शिस्त प्रामाणिकपणे पाळणाऱ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेला न्यूनगंड डोके बाहेर काढू लागतो. आणीबाणीच्या किंवा अत्यंत तातडीच्या क्षणी रांगेतील ते ताटकळणे तर अक्षरश: जीवघेणे होऊन जाते. आपल्यासारखेच दीर्घकाळ रांगेत ताटकळल्यानंतर काम संपवून रांगेबाहेर पडणाऱ्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद आपल्याला वाकुल्या दाखवतो असे उगीचच भासू लागते.

रांगेत उभे राहणे, पुढे सरकणे आणि काम संपवून रांगेबाहेर पडणे या खरे तर बदलत्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन छटा असतात. लांबलचक रांगेत शेवटच्या क्रमांकावर उभे राहण्याची वेळ आल्यावर आपोआपच चेहरा पडतो. मागची रांग वाढत गेली, की त्या अनुभवाच्या आडून डोकावणारी निराशा हळूहळू कमी होत जाते आणि पावलापावलाने का होईना, पुढे सरकण्याची संधी मिळू लागताच, निराश चेहऱ्यावर हलक्या आनंदछटा उमटूही लागतात. मग देहबोलीतही आत्मविश्वासाचा संचार सुरू होतो आणि अखेर रांग संपवून बाहेर पडताच, प्रचंड विजय मिळाल्याचा आनंद लपविण्याचेही भान राहात नाही.

अशा या रांगेचे महत्त्व आपण ओळखलेले असले, तरी रांग हा काही सदासर्वकाळ आवडणारा प्रकार नाही. काही वेळा व्यवस्थेच्या ढिसाळपणाची शिक्षा म्हणूनही रांगेची शिस्त स्वीकारावी लागते. अशाच एखाद्या रांगेत तासन्तास तिन्हीसांजांपर्यंत ताटकळलेले असताना, सहज आकाशाकडे नजर गेली, शिस्तीत सरकणारी बगळ्यांची रांग दिसली, की रांगेचे कौतुक वाटेनासेच होते. ते तर मूळ स्वभावाचे लक्षणच असते.