सलग तीन निवडणुकांत आपचा पराभव झाला तरी अरविंद केजरीवाल आणि कंपनी यातून काही धडा शिकतील अशी शक्यता कमीच आहे.

आपचा कर्कशपणा, करदावणे, आरोपांचा तमाशा  एकीकडे आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशातील विजय ताजा असल्याने दिल्लीतील तीनही महापालिका निवडणुकीत मोदी यांचे पारडे खूपच जड होते. त्यामुळेच आजूबाजूला पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी करून ठेवलेली घाण दिसत असतानाही, मतदारांनी पुन्हा त्याच पक्षाला संधी दिली.

दिल्लीत हे होणारच होते. आम आदमी पार्टीनामक जो हुच्चपणा तेथे बळावला आहे, त्याला अखेर फटका बसणारच होता. तो दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकीने दिला. तेथे आपचे श्रीमुख व्यवस्थित फुटले. हे असे होणार याची चाहूल पंजाब आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकांनी दिली होतीच. पंजाबात तर आता आपचीच सत्ता असे माध्यमी-कथन तयार करण्यात आले होते. गोव्यातही आपने हवा तापविली होती. परंतु बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नसतो. त्या दोन्ही राज्यांत तेच झाले. त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही झाली. इजा आणि बिजा झाले होते. दिल्लीतील महापालिका निवडणुकांत तिजा झाले. यातून आपचे स्वमग्न नेते अरविंद केजरीवाल काही धडा शिकतील अशी शक्यता कमीच आहे. स्वत:स नैतिकतेचे अवतार मानणारे धडा वगैरे शिकण्याच्या भानगडीत कधी पडत नसतात. कारण त्यांचा अवतारच मुळात धडे देण्यासाठी झालेला असतो. देशातील संपूर्ण राजकीय-सामाजिक व्यवस्थेला आता एकदाचा धडा शिकवायचा या आविर्भावातच आपचा जन्म झाला होता. तेव्हा जित्याची ती खोड मेल्याशिवाय जाणार नाही, हे नक्की. राजकीय पक्ष पराभव झाला की आत्मपरीक्षणाची भाषा बोलू लागतात. काही नेते हीच संधी साधून राजीनामे देऊन जबाबदारीमुक्त होत असतात. काही जुने हिशेब चुकते करीत असतात. आपमध्ये सध्या तेच सुरू आहे. वस्तुत: आपच्या नेत्यांना पराभवाचे विश्लेषण वगैरे करण्याची काहीही आवश्यकता नाही, इतकी ती कारणे सुस्पष्ट आहेत. ती पाहण्यासाठी केजरीवाल आणि कंपूला डोळ्यांवरील नैतिकतेची झापडे मात्र बाजूला सारावी लागतील. त्यातील पहिले कारण आहे ते अर्थातच मतदान यंत्रे. दिल्ली पालिकेतील आपच्या पराजयाला खरोखरच ही मतदान यंत्रे कारणीभूत ठरली आहेत. मतदान यंत्रांमध्ये भाजपने घोळ केला असल्याच्या आरोपातील सत्यासत्यतेचा मुद्दा वेगळा. इंदिरा गांधी यांना देशात अशाच प्रकारे विजय मिळत असताना, ‘हा विजय बाईचा, गाईचा की शाईचा’ या कुजबुजीत भाजपही सहभागी असे. परंतु केजरीवाल यांनी ज्या कर्कशपणे हा मुद्दा लावून धरला त्याने मतदारांचे कान किटले. हा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचोटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि देशातील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अद्याप कायम आहे, ही नेमकी बाबच केजरीवाल विसरले आणि त्यातून त्यांच्यावर नकारात्मक राजकारण करीत असल्याचा शिक्का बसला. या अर्थाने त्यांच्या पराभवाला मतदान यंत्रे कारणीभूत ठरली. मात्र या अपेक्षित निकालामागे याहून महत्त्वाची कारणे आहेत. देशाच्या राजकारणातील भंपकांचा भांगडा समजून घेण्यासाठी त्यांचे परिशीलन आवश्यक आहे.

दिल्लीतील निकालाचे विश्लेषण करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. ही निवडणूक पालिकेची होती. पालिकेच्या कारभाराचा संबंध थेट शहराच्या जगण्या-मरण्याशी असतो. अशा वेळी या निवडणुकीत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्रचाराच्या अग्रस्थानी असायला हव्यात. परंतु व्यापक प्रचारात हे मुद्दे पुढे आलेच नाहीत. उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या तीनही पालिकांमध्ये गेली दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. या काळातील पालिकेच्या कारभाराचे वर्णन केवळ भ्रष्ट याच शब्दाने करता येते. या भ्रष्टाचाराने दिल्लीकरांचे जगणे अवघड करून टाकले आहे. परंतु पत्रके आणि समाजमाध्यमांतील फलकबाजी यांपलीकडे त्याबाबतचा प्रचार पुढे गेलाच नव्हता आणि निकालाने हे दाखवूनच दिले की त्याच्याशी मतदारांना काहीही देणेघेणेच नव्हते. तसे असते, तर मतदारांच्या नाराजीचा फटका भाजपला बसला असता. तो बसला नाही, याचा अर्थ मतदार भाजपवर नाराज नव्हते. आणि याचाच दुसरा अर्थ असा होतो, की सर्वसामान्य मतदारांना विकास, प्रगती, नागरी समस्यांची सोडवणूक अशा सकारात्मक बाबींवर चर्चा व्हावी असे वाटत असले, तरी प्रत्यक्ष मतदानात मात्र ते या गोष्टींना काडीमात्र किंमत देत नसतात. राजकीय पक्षांच्याही हे लक्षात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रचार हा भाजपच्या बाजूने नरेंद्र मोदी या चलनी नाण्यावर आधारलेला होता. त्याला अतिरेकी राष्ट्रवादाची, गोप्रतिपालक नवहिंदुत्वाची जोड होती. आपचा प्रचार अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिगत करिश्म्यावर आणि केवळ मोदीविरोधावर अवलंबून होता. आपच्या प्रचारयंत्रणेने गेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांची ‘मफलरमॅन’ अशी प्रतिमा तयार केली होती. या वेळी ‘झाडूमॅन’ अशी व्यंगचित्रे समाजमाध्यमांतून पसरविण्यात आली. त्यातून केजरीवाल यांचे ‘बालिश बहु’ हे रूपच अधिक ठसले. त्या तुलनेत मोदी यांच्या मागे लगतच्या उत्तर प्रदेशातील कोरा करकरीत विजय होता. ते अजूनही चांगले दिवस आणतील या लोकश्रद्धेचे बळ होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारला भाजपने सळो की पळो करून सोडले असले आणि त्या भांडणाचा परिणाम थेट कारभारावर होत असला, तरी केजरीवाल हेच कर्मदरिद्री आहेत, असे माध्यम-कथन तयार करण्यात भाजपला व्यवस्थित यश आले होते. एकूणच या निवडणुकीत मोदी यांचे पारडे खूपच जड होते. त्यामुळेच आजूबाजूला पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी करून ठेवलेली घाण दिसत असतानाही, मतदारांनी पुन्हा त्याच पक्षाला संधी दिली. हा झाला या निकालाचा एक अर्थ. मात्र त्याच्याही खाली आणखी एक अर्थ लपलेला आहे आणि तो अधिक गंभीर आहे.

ही निवडणूक प्रामुख्याने झाली ती दोन पक्षांतच. काँग्रेसला ३२ जागा मिळाल्या असल्या, तरी त्याचे अस्तित्व आताशा इत्यादीमध्येच जमा होते. तेव्हा द्वंद्व झाले ते भाजप आणि आप यांच्यातच. परंतु या दोन्ही पक्षांच्या भावनिक आवाहनात फारसा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या अण्णा आंदोलनातून आपचा जन्म झाला, ते आंदोलन हे प्रामुख्याने येथील नवमध्यमवर्गाचे होते. अभिजन विरुद्ध इतर असा त्याचा सूर होता. जागतिकीकरणाचे सर्व फायदे घेऊन झाल्यानंतर आर्थिक सुधारणांवर टीका करणारा हा वर्ग. स्वदेशीवादी, उजवा राष्ट्रवादी असा त्याचा चेहरा होता. तोच मेणबत्त्या हातात घेऊन, रस्त्यावरच न्याय झाला पाहिजे असे म्हणणारा होता. केजरीवाल यांचा साधेपणा, भ्रष्टाचार आणि उद्योगपतीविरोध, त्यांच्या हातातील तिरंगा आणि व्यासपीठावरील भारतमातेची प्रतिमा हे सारे त्याला भावले. तो आपच्या मागे गेला. भाजपने मोदींच्या रूपाने अतिव्यापक स्तरावर हेच सारे केल्यानंतर तो मोदींकडे आला. हे झाले नवमध्यमवर्गाचे. त्या इतरांतील बाकीच्यांना केजरीवाल यांचे आर्थिक धोरण आवडले. त्याहून अधिक गोड राष्ट्रवादी आर्थिक धोरण मोदींनी समोर ठेवल्यानंतर त्याला त्यात आपला उज्ज्वल भविष्यकाळ दिसू लागला. आपला भाजपच्या या आवाहनाचा मुकाबला करणे जसजसे कठीण जाऊ लागले, तसतसा त्यांच्या आवाहनातील रंगही फिका पडू लागला. लढाई केवळ मोदी सरकारशी सुरू झाली. आपचा कर्कशपणा, करदावणे, आरोपांचा तमाशा हे त्यातून सुरू झाले. त्यात मोदी सरकार पोलीस आणि सीबीआयच्या साह्य़ाने तेल ओतत होतेच. या सगळ्यांतून आपने धोका दिला ही दिल्लीकरांची भावना जन्मास आली. पराभव केला तो त्या भावनेने. राजकारणाच्या मंचावर फार काळ भंपक भांगडा चालत नाही. तेथे मतदार नेहमीच अधिक नृत्यकौशल्याच्या शोधात असतात. दिल्लीतील निकालाचा एवढाच काय तो अर्थ.