धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडू नये असे सर्वव्यापी आणि म्हणून कोणालाच उद्देशून नसलेले विधान पंतप्रधान मोदींनी केले. हा सल्ला अर्धसत्य सांगतो. वास्तविक आजच्या घडीला गरज आहे ती धर्माचे अधिष्ठान (कोणास हवेच असेल तर) वैयक्तिक पातळीवर ठेवण्याची..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताज्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात धर्मास हिंसा आणि दहशतवादापासून तोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यास संदर्भ आहे तो पॅरिसमध्ये घडलेल्या बेधुंद िहसाचाराचा आणि त्या अनुषंगाने समोर आलेल्या आयसिस या कराल दहशतवादी संघटनेचा. पन्नासच्या दशकात अमेरिकेच्या मदतीने जन्माला आलेल्या इस्लामी दहशतवादाने गेल्या ७० वर्षांत अनेक अवतार घेतले. त्यातील पहिला आंतरराष्ट्रीय आविष्कार मुस्लीम ब्रदरहूड आणि तूर्त तरी शेवटचा आयसिस. या दरम्यान अल कईदा, तालिबान आदी अनेक रूपे या अतिरेकी धर्मवादाने धारण केली. आयसिस हे त्यातील अत्यंत जहाल रूप म्हणता येईल. कालानुरूप सर्वच क्षेत्रांत मानवी जीवनात बदल होत असताना दहशतवादात आणि क्रौर्य या क्षेत्रांत ते होऊ नयेत अशी अपेक्षा धरता येणार नाही. तेव्हा काळाप्रमाणे दहशतवादाचे रूपही बदलले आणि तो अधिकाधिक तीक्ष्ण, तीव्र होत गेला. सांप्रत काळात या दहशतवादामागील धर्म म्हणून इस्लामच समोर येत असल्याने इस्लाम म्हणजे दहशतवाद असे मानले जाऊ लागले. हा समज अर्धसत्य म्हणावा लागेल. खेरीज, सध्याच्या दहशतवादामागे आíथक कारणेही तितकीच प्रबळ आहेत, हे विसरता येणार नाही. सध्या इस्लामी दहशतवाद नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रौर्याच्या मुळाशी प्रगत पाश्चात्त्य जगाने पश्चिम आशिया आणि अन्य प्रदेशांतील तिसऱ्या जगाचे केलेले आर्थिक शोषण आहे, हे नाकारता येणार नाही. या शोषणाचा पहिला आविष्कार हा अिहसकच होता. तो म्हणजे ओपेक या संघटनेची स्थापना. ज्या खनिज तेलाच्या आधारे पाश्चात्त्य जगाने आपला विकास साधला, इतकेच नव्हे तर भविष्याची बेगमी केली, ते तेल हे पाश्चात्त्य देशांविरोधातील संघर्षांत पहिल्यांदा अस्त्र म्हणून वापरले गेले. तसे ते वापरता यावे म्हणूनच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज, म्हणजे ओपेक, ही संघटना जन्माला आली. १९७०च्या दशकात अमेरिकेवर घातलेले तेल र्निबध हा या संघटनेचा अमेरिका आणि पाश्चात्त्य जगाविरोधातील उद्गार होता. त्या वेळी तो हिंसकच मानला गेला. परंतु तो रक्तलांच्छित नव्हता. तसा तो होऊ लागला कारण पाश्चात्त्य जगाने पुढील काळात इस्लामी देशांतील तेलाच्या आधाराने इस्लामी देशांविरोधात उभ्या ठाकलेल्या यहुदी इस्रायलची धन करावयास सुरुवात केली, म्हणून. १९६७ साली इस्रायल आणि अरब देशांत लढले गेलेले सहा दिवसांचे युद्ध वा त्यानंतर सहा वर्षांनी याच दोघांमधली योम किप्पुरची लढाई यांतून इस्लाम आणि पाश्चात्त्य जग यांच्यातील संघर्ष वाढीस लागला. पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन, हमास, फताह आदी दहशतवादी संघटना जन्माला आल्या त्या याच काळात आणि याच उद्देशाने. पाश्चात्त्य जगाने आपल्या सोयी आणि गरजांप्रमाणे या संघटनांचा वापर केला वा त्यांना आश्रय दिला. १९८९ पर्यंत या सगळ्या संघटनांना वापरून घेणाऱ्यांचे ध्येय एकच होते. ते म्हणजे कागदोपत्री का असेना धर्मास नाकारणाऱ्या साम्यवादी सोविएत युनियन या घटकाचा पराभव करणे. ८९ साली बíलनची भिंत कोसळली आणि सोविएत रशियाचे साम्राज्यदेखील ढासळत गेले. त्यामुळे सोविएत रशियाविरोधात इतकी गुंतवणूक करण्याचे कारण पाश्चात्त्य देशांना राहिले नाही. परिणामी अमेरिका आणि या देशांच्या आधारांवर जगणाऱ्या या संघटनांची रसद आटत गेली. परंतु तोपर्यंत सोविएत रशियाचा बागुलबुवा उभा करून आपल्या तुंबडय़ा भरणाऱ्या गुंडपुंड, ठग आणि खंडणीखोर धर्मवीरांची अडचण होऊ लागली. तीमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून या बदमाशांनी मग इतके दिवस पोसणाऱ्या पाश्चात्त्यांविरोधात आपल्या बंदुका रोखल्या. तेव्हा मग या जगास जाग आली. परंतु तोपर्यंत हा भस्मासुर हाताबाहेर गेला होता. २००१ साली ९/११ घडल्यानंतर या भस्मासुराचा क्रूर चेहरा पाश्चात्त्यांना दिसला आणि अमेरिका, ब्रिटन यांच्या पुढाकाराने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध सुरू झाले. जगाने त्याचे सुलभीकरण दोन शब्दांत केले : इस्लामी दहशतवाद. आज दहशतवाद म्हटले की याच धर्माचे नाव जोडले जाते. त्यास त्या धर्मातील अतिरेकी, मूलतत्त्ववादी घटक जितके कारणीभूत आहेत तितकेच अन्य धर्मातील सोईस्कर भाष्यकारदेखील कारणीभूत आहेत. तेव्हा मोदी यांनी दहशतवादास धर्माशी न जोडण्याचे आवाहन करताना सर्वच धर्मानी सर्वच दहशतवादाचा त्याग करावयास हवा असे विधान केले असते तर ते अधिक सयुक्तिक आणि प्रामाणिक ठरले असते.

याचे कारण इस्लाम, जुडाइझम, बौद्ध आणि ख्रिस्ती या सर्व धर्माचा इतिहास हा रक्तलांच्छितच आहे. यात हिंदू धर्माचा उल्लेख नसल्याबद्दल काहींना हर्षांच्या उकळ्या फुटू शकतात. पण त्या अज्ञानमूलक असतील. यात हिंदू धर्माचा समावेश नाही याचे कारण अन्य धर्मीयांप्रमाणे हिंदू धर्मीयांत आपल्या धर्माचा प्रसार करणे हे जीवितकर्तव्य नाही. सारे जग इस्लामी व्हावे वा ख्रिस्ती व्हावे ही जशी त्या त्या धर्मातील ढुढ्ढाचार्याची मनीषा असते तसे हिंदू धर्मगुरूंचे नाही. ते तसे स्वान्तसुखाय असतात. त्यामुळे हिंदू धर्माने प्रसार आणि प्रचारासाठी रक्त आटवल्याची वा सांडल्याची उदाहरणे नाहीत. अलीकडच्या काळात या संदर्भात हिंदू धर्मगुरू आपला आळस झटकून कामाला लागलेले दिसतात. असे असले तरी हिंदू धर्मास हिंसा वज्र्य होती असे नाही. या धर्मातील वैष्णव आणि शैव पंथीयांतील संघर्ष हा अन्य कोणत्याही धार्मिक संघर्षांइतकाच हिंसक होता.

अर्थातच तो पंथीय होता. अन्य धर्मीयांशी नव्हे. त्या तुलनेत इस्लाम वा ख्रिस्ती धर्माचे तसे नाही. या धर्मीयांचा आधारस्तंभ असणाऱ्या कुराण वा बायबल या धर्मग्रंथांचा अर्थ लावण्यावरूनच मुदलात या िहसेस आरंभ होतो. बायबल हे लिहिले गेले हिब्रू आणि ग्रीक भाषेत तर कुराण अरेबिकमध्ये. बायबलच्या तुलनेत कुराण हे तरुण. पुढे या दोन्ही धर्मग्रंथांची अनेक भाषांतरे झाली. या दोन्ही धर्माचा उदय म्हणजे जुडाईझम. या तीनही धर्माचा संघर्ष एकमेकांशी सुरू असून त्याचा इतिहास अत्यंत हिंसक असाच आहे. इस्लामी धर्मीयांचा जिहाद, ख्रिस्ती धर्मीयांच्या क्रुसेड्स यांची वर्णने आजही विचारी मनांचा थरकाप उडवितात. त्याच वेळी शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मासही हिंसा वज्र्य नाही. श्रीलंका वा अलीकडे म्यानमारमध्ये बौद्ध भिख्खूंनी केलेले हिंसक आंदोलनांचे नेतृत्व हेच दर्शवते. याचा अर्थ इतकाच की कोणता एक धर्म हिंसक नाही वा शांतता आणि सलोख्याची मक्तेदारी ही कोणा एका धर्माकडे नाही. धर्म, त्यानिमित्ताने तयार होणारे त्या धर्मीयांचे आíथक हितसंबंध, त्यास प्रस्थापित राजकारणाचा आधार आणि त्या राजकारणाने सोयीसाठी केलेला या हितसंबंधांचा वापर ही धर्माधिष्ठित दहशतवादाची कारणे आहेत.
तेव्हा दहशतवादाचा संबंध धर्माशी जोडू नये हा सल्ला अर्धसत्य सांगतो. त्यातही परत लबाडी म्हणावी अशी बाब म्हणजे मोदी यांनी हे विधान करताना लक्ष्य केले ते सामूहिक धार्मिक िहसाचारास. परंतु वैयक्तिक पातळीवरील हिंसाचाराचे काय हा मुद्दा उरतोच. त्यास मोदी यांनी सोईस्करपणे बगल दिली. नपेक्षा त्यांना त्यांच्याच पक्षातील दादरी घटकांना स्पर्श करावा लागला असता. तसे करणे राजकीयदृष्टय़ा सोयीचे नाही. म्हणून त्यांनी सरसकटपणे धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडू नये असे सर्वव्यापी आणि म्हणून कोणालाच उद्देशून नसलेले विधान केले.

वास्तविक आजच्या घडीला गरज आहे ते धर्माचे अधिष्ठान.. तेदेखील कोणास हवेच असेल तर.. वैयक्तिक पातळीवर ठेवण्याची. स्वत:च्या अंगरख्यासारखा धर्म हा स्वत:पुरताच हवा. आपला अंगरखा इतरांच्या अंगावर जबरदस्तीने चढवणे जेवढे असंस्कृत तेवढेच धर्माला समाजात आणणे असभ्य आणि हिंसकही.