नको त्या विषयावर आपली ऊर्जा व क्षमता अनुत्पादक उचापतींत वाया घालवणे मुख्यमंत्री फडणवीस यांना जसे परवडणारे नाही, तसेच ते राज्यालाही झेपणारे नाही.

कोणा चित्रकारास भारतमाता गोरीपान, केस मोकळे सोडलेली, प्रसन्न सुस्नात आणि दागिन्यांनी मढलेली, हातात भागवत धर्माची पताका असलेला भगवा झेंडाधारी आणि सिंहावर बसलेली अशीच का दिसली हा प्रश्न विचारणे जसे निर्थक आहे तसे इतरांना ती तशी का दिसत नाही, हे विचारणेही मूर्खपणाचे आहे.. घटनाकारांच्या दृष्टिकोनातून हा देश ना कोणाची मातृभूमी आहे ना पितृभूमी.

गणित, विज्ञान अशा महत्त्वाच्या विषयात भोपळा मिळवणारा शारीरिक शिक्षण वा हस्तकला अशा विषयातील यश मिरवतो तसे हे भारतमाता की जय प्रकरण आहे. ते केंद्रीय पातळीवर ठीक. म्हणजे जे काही साध्य करावयाचे त्याचा प्रारंभही करण्यात अपयश आलेल्या नरेंद्र मोदी सरकारातील साजिंद्यांनी ही भारतमाता की जयची टूम काढली. रक्तबंबाळ झालेल्या बँका, ढिम्म असलेली निर्यात आणि यथातथाच रोजगारनिर्मिती या महत्त्वाच्या विषयांतील अपयशाकडे फार कोणाचे लक्ष जाऊ नये या चतुर विचाराने लक्ष्यांतर करण्यासाठी भारतमातेचा मुद्दा पुढे रेटला गेला. हे कटू असले तरी सत्य आहे. परंतु जे झाले त्यात नवीन काहीही नाही. इतिहासापासून ते जागतिक वर्तमानापर्यंत हे असेच होत आले आहे. यामागील कारण सॅम्युएल जॉन्सन या विख्यात ब्रिटिश लेखकाने नमूद करून ठेवले आहे. देशभक्ती हा बदमाशांचा शेवटचा आसरा असतो असे सॅम्युएल जॉन्सन म्हणतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की अडचणीत आलेले वा अपयशी होत असलेले प्रत्येक सरकार राष्ट्रवादी भावनेचा अंगार फुलवण्याचा प्रयत्न करते. तो एकदा फुलला की त्यात तर्काची राखरांगोळी होते आणि सत्ताधीशांना त्यावर आपली पोळी विनासायास भाजून घेता येते. तेव्हा जॉन्सन यांचे विधान किती दूरगामी सत्य सांगणारे आहे, याचे दाखले देण्याची गरज नाही. त्याचमुळे मुद्दा असा की या भारतमाता की जयचा आसरा घेण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना का वाटली असावी?

त्याची कारणमीमांसा करण्याआधी या भारतमाता वादाचे तर्काधारित विवेचन करावयास हवे. मनातील विचार वा भावनेस शारीर रूप देण्याचा प्रयत्न झाला की जो गोंधळ उडतो.. आणि उडवला जातो.. तो या भारतमाता वादाच्या मुळाशी आहे. भारतमाता ही भावना आहे. इंग्रजीतील होमलँड आणि नंतर मदरलँड या संकल्पनांवरून मातृभूमी ही संज्ञा जन्मास आली. परंतु ती मायदेशात वापरली जात नाही. याचा अर्थ असा की परदेशातील स्थलांतरितास तुझी मातृभूमी वा गृहभूमी कोणती, असा प्रश्न विचारला जातो. स्थानिकांना स्थानिक प्रदेशात तुमची मातृभूमी कोणती, हे विचारावयाचे नसते. म्हणूनच भारतीयांना.. यात सर्वधर्मीय, सर्वभाषिक आणि सर्व वांशिक आले.. भारतात तुमची मातृभूमी कोणती हे विचारणे हे औद्धत्य ठरते. हे असे करणे म्हणजे सख्ख्या भावांनी एकमेकांस तुझी आई कोण, हे विचारणे. भारतमातेच्या संदर्भात नेमके हेच घडत आहे. त्यामुळे अन्य धर्मीयांच्या मातृभूमीच्या निष्ठांवर संशय घेणे हीच मुळात क्षुद्र मानसिकता आहे.

दुसरा मुद्दा या भारतमातेच्याच जन्माचाच. भारतमाता हा एक विचार आहे. एखाद्या विचारास एखाद्याने शारीर स्वरूप दिले तर तयार झालेला आकार हा तसे रूप देणाऱ्याचा कल्पनाविस्तार असतो. याचा अर्थ असा की सध्या भाजपवासीय आदींना भारतमाता म्हटल्यावर जी काही आकृती डोळ्यासमोर दिसते ती त्यांच्या परिवारातील कोण्या कलाकाराचा भावाविष्कार आहे. इतरांना त्यांच्या मनातील भारतमाता चितारण्यास सांगितले तर त्यांची भारतमाता अशीच दिसेल असे नाही. त्यामुळे भाजपचा, आणि त्याहीपेक्षा, त्यांचे कुलदैवत असलेल्या रा. स्व. संघाचा जो कोणी चित्रकार होता त्याला भारतमाता अशी गोरी गोरी पान, केस मोकळे सोडलेली, प्रसन्न सुस्नात आणि दागिन्यांनी मढलेली, हातात भागवत धर्माची पताका असलेला भगवा झेंडाधारी आणि सिंहावर बसलेली दिसली. ती त्याला तशीच का दिसली हा प्रश्न विचारणे जसे निर्थक आहे तसे इतरांना ती तशी का दिसत नाही, हे विचारणेही मूर्खपणाचे आहे. देशातील दलित, आदिवासींना, घाम गाळणे आणि मरेपर्यंत कष्ट करणे हेच प्राक्तन असलेल्या कोटय़वधी भारतीयांना त्यांची भारतमाता ही अशी दागिन्यांनी मढलेली आणि मोकळे केस सोडलेली वगरे कशी दिसेल? त्यामुळे हे सर्व िहदू आहेत असे मान्य केले तरी त्यांना भारतमातेची ही प्रतिमा आपली वाटणार नाही. जी गोष्ट कधी अनुभवलेलीच नसेल तर ती आपलीशी वाटत नाही. तसेच हे. इतकेच काय दक्षिणेकडील िहदूंनाही ही भारतमाता आपली वाटली नाही तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. याचे कारण या भाजपवासीयांच्या भारतमातेने नेसलेले लुगडे हे उत्तर भारतीय आहे. दाक्षिणात्य महिला ते तसे नेसत नाहीत. त्यामुळे त्यांतील काहींनी उद्या या भारतमातेच्या नावे जय म्हणावयास नकार दिला, तर आपण त्यांचे काय करणार? खेरीज, अन्य धर्मीयांचे काय? मुसलमान, शीख आदींनाही ही भारतमाता परकीय वाटू शकते. त्यांच्यातील काहींनी या भारतमातेसमोर डोके टेकवण्यास नकार दिला तर काय? तेव्हा या सगळ्याचा अर्थ इतकाच की विविध जाती, धर्म आणि संस्कृती यांनी भरलेल्या आणि भारलेल्या या देशावर कोणा एका समूहाच्या मनास पटणारी प्रतिमा माता म्हणून लादणे अन्यायकारक आहे. खेरीज, ते बेकायदादेखील ठरते. याचे कारण घटनाकारांच्या दृष्टिकोनातून हा देश ना कोणाची मातृभूमी आहे ना पितृभूमी. त्यामुळे जे मुळातच नाही ते उगाच नव्याने तयार करण्याची काहीही गरज नाही. ज्यांना ती वाटत असेल त्यांनी ती आपल्यापुरती भागवावी. इतरांच्या डोक्यावर लादण्याचे काहीच कारण नाही.

याचा अर्थ इतकाच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वष्रे पुरतील इतकी पुरेशी आव्हाने आहेत. त्यांचा मुकाबला कसा करावयाचा आणि तरीही प्रगती कशी साधावयाची हे त्यांनी पाहावे. ते जास्त उपयुक्त आणि आवश्यक आहे. विनाकारण नको त्या विषयाला तोंड फोडून आपली ऊर्जा आणि क्षमता अनुत्पादक उचापतींत वाया घालवणे त्यांना जसे परवडणारे नाही, तसेच ते राज्यालाही झेपणारे नाही. हे असले उद्योग सरकारी आश्रयाचे सर्व फायदे घेत गबर झाल्यानंतर फुकाचे शहाणपण सांगत िहडणाऱ्या बाबा रामदेव यांच्यासाठी ठीक आहेत. भारतमाता की म्हटल्यानंतर जे जय म्हणणार नाहीत त्यांची गर्दनच या सरकारी बाबास मारावयाची आहे. त्यांनीच तसे दोन दिवसांपूर्वी बोलून दाखवले. रामदेव स्वत:ला योगी म्हणवतात. षड्रिपुंवर विजय मिळवतो त्यास योगी म्हणावे अशी आपली संस्कृती सांगते. या रामदेवाने कोणत्या रिपुंवर विजय मिळवला आहे हे त्यांचे ‘जवळचे’ सहकारी बाळकृष्ण यांनाच ठाऊक. परंतु कोणत्या रिपुंवर त्यांना अद्याप विजय मिळवावयाचा आहे हे मात्र अलीकडे वारंवार दिसू लागले आहे. त्यातीलच एकाचे दर्शन या गर्दन मारण्याच्या भाषेतून झाले. बाबा रामदेव यांचे या भारतमातेवर इतकेच जर प्रेम असेल तर सरकारने मागितला होता तितका कर भरून त्यांनी भारतमातेची सेवा करावी. तेवढे तरी पुण्य त्यांच्या गाठीस लागेल. ते न करता उगाच कोणाचा शिरच्छेद करण्याची भाषा करणे हा त्यांच्या भगव्या वस्त्रांचा अपमान आहे. तेव्हा भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांनी देशत्याग करावा असे म्हणून फडणवीस यांनी बाबांच्या पंगतीत स्वत:चा पाट मांडायची काहीही गरज नाही. ती त्यांना वाटत असेल तर त्यांची प्रशासनावरील पकड निसटत चालल्याचे ते चिन्ह ठरेल. मुख्य विषयात बरे गुण मिळवण्याची त्यांची क्षमता असताना उगाच शा. शि. आणि हस्तकला अशा विषयांवरच लक्ष केंद्रित करण्याचा करंटेपणा त्यांनी करू नये. त्यांच्या ताज्या वक्तव्याने तो होत असल्याची शंका येते. म्हणूनच त्यांना सावधानतेचा इशारा देणे आवश्यक ठरते.