प्रा जी डी अग्रवाल यांनी स्वामी सानंद म्हणून स्वीकारलेला आत्मक्लेषाचा मार्ग योग्य आहे असे विज्ञान म्हणेल का?

सत्यशोधाची आणि विश्वरहस्य समजून घेण्याची प्रेरणा म्हणजे धर्म; पण रहस्यांची उकल करण्याची दृष्टी म्हणजे विज्ञान-  अशा गृहीतकावर आधारित एक विधान या विश्वरहस्याविषयी तोवर झालेल्या संशोधनाला कलाटणी देणारे वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांनी केले. ‘धर्माविना विज्ञान पांगळे असते आणि विज्ञानाविना धर्म आंधळे असते.’ या विधानातील पांगळे, आंधळे हे शब्दप्रयोग आज आक्षेपार्ह ठरतात. पण या विधानाचे थिटेपण तेवढेच नव्हे. मुळात धर्म जी काही भावनिक प्रेरणा देतो, ती तर्कबुद्धी हाच पाया मानणाऱ्या विज्ञानासाठी कितपत ग्राह्य़ मानावी, हा आइनस्टाइनच्या या विधानावरील खरा आक्षेप. त्या आक्षेपावरचे सहज सुचणारे उत्तर म्हणजे भावनिक प्रेरणांवर किती विसंबून राहायचे याचे तारतम्य हवे. पण या तारतम्याची व्याख्या काय? त्याचे माप नेमके किती? या प्रश्नांची उत्तरे जटिल आहेत, तोवर आइनस्टाइनचे ते विधान सदासर्वदा वादग्रस्तच ठरणार. कानपूरच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेतील- म्हणजे आयआयटीतील- माजी प्राध्यापक जी डी अग्रवाल ऊर्फ स्वामी ग्यानस्वरूप सानंद यांच्या मृत्यूसंदर्भात ही चर्चा पुन्हा व्हायला हवी. मृत्यूकडे जाणारा मार्ग स्वीकारताना तर्कबुद्धी आणि भावना यांतील तारतम्य अग्रवाल यांनी पाळले की नाही हा प्रश्न आहे. तो कायम राहील. त्याची चर्चा होणे आणि होत राहणे हे केवळ बौद्धिक समाधान देणारे नसून देशहित साधणारेही ठरेल. परंतु प्रथम       प्रा अग्रवाल आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले उपोषण, या दोहोंबद्दल.

उपोषणाच्या १११व्या दिवशी प्रा अग्रवाल यांचा मृत्यू झाला. तो दु:खदच. गंगा नदी वाहती राहावी, ती ‘अविरल’ राहावी, यासाठी केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा निष्फळ ठरला म्हणून आमरण उपोषणाचे हत्यार अग्रवाल यांनी उपसले होते. खरोखरीच आमरण ठरणारी उपोषणे कमी. उपोषण प्राणांतिक ठरल्याने सरकारी पातळीवर धोरणात्मक बदल झाल्याचा इतिहास त्याहून दुर्मीळ. ऑक्टोबर १९५२ मध्ये आंध्रचे पोट्टिसीतारामुलु यांच्या उपोषणाने भाषावार प्रांतरचनेचा पाया रचला जाणे हा बहुधा एकमेव अपवाद. एरवी उपोषणकर्त्यांना- मग ते हजारे वा रामदेव असोत किंवा मणिपूरची इरोम शर्मिला असो- लोकांची भावनिक सहानुभूती काही काळ मिळते आणि उपोषण संपल्यावर कालांतराने विरते. प्रा अग्रवाल यांनीही यापूर्वी तीनचारदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. गंगा महासभा या पंडित मदनमोहन मालवीय यांनी स्थापलेल्या संस्थेला नवसंजीवनी देणारे स्वामी सानंद म्हणजे प्रा अग्रवाल. गंगा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे, ती माता आहे आणि ‘‘अन्य स्त्रियांशी मी भ्रष्टपणे वागलो म्हणून आईशीही भ्रष्टपणे वागेन का? तसेच अन्य नद्या आपण प्रदूषित केल्या म्हणून गंगाही प्रदूषित करायची का?’’ असे विचार जाहीरपणे मांडणारे स्वामी सानंद आणि अमेरिकेच्या बर्कले विद्यापीठातून पीएच.डी. घेऊन पुन्हा आयआयटीत १९६१ ते १९७६ असे दीड दशकभर सिव्हिल इंजिनीअरिंग शिकवणारे, तिथल्या विद्यार्थ्यांना पर्यावरणविज्ञानाची प्रेरणा देणारे प्रा अग्रवाल हे एकच व्यक्ती आहेत. हे विलक्षणच. काय असावीत या विलक्षणपणाची कारणे? सुंदरलाल बहुगुणा यांची चिपको चळवळ १९७४ची. भारतीय मूल्यव्यवस्थेशी प्रामाणिक राहणे आणि पर्यावरण राखणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे बहुगुणा हे प्रतीकच. बहुगुणांना प्रेरणा देणाऱ्या गांधीविचारांतही पर्यावरण रक्षण हे अंगभूत कर्तव्य. या विचारधारेच्या छायेत प्रा अग्रवाल यांना यावे लागले. भारत सरकारच्या अनेक पर्यावरणविषयक कामांशी सल्लागार म्हणून जोडले जाऊनही सरकारची निष्ठा पर्यावरणाशी नाही -कोणतेही सरकार पर्यावरणाची काळजी घेऊच शकत नाही- हे लक्षात आल्यामुळे प्रा अग्रवाल व्यथित झाले. अशा विद्ध भावनिक अवस्थेत ते चित्रकूटला एका कुटीत खादी लेवून राहू लागले आणि पुढे २०११ मध्ये संन्यासी झाले. व्यवस्थेवरचा अविश्वास घट्ट होत गेल्याने ते संन्यासाकडे ओढले गेले. परंतु प्रेरणा तीच राहिली. पर्यावरणाच्या रक्षणाची. गंगा नदीवर लक्ष केंद्रित करून, गंगा महासभा या संस्थेमार्फत उत्तराखंडात ठिकठिकाणी ग्रामसभा घेऊन अखेर एक मसुदा त्यांनी तयार केला. गंगेच्या पात्रात आणि लगतच्या प्रदेशात विकासाच्या नावाखाली जे काही होते आहे, त्यावर थेट नियंत्रण ठेवण्याचा अधिकार स्थानिकांना द्यावा ही या मसुद्यातील प्रमुख मागणी.

ती कोणतेही सरकार कधीही मान्य करणार नाही. अमुक औद्योगिक प्रकल्प हटवा, कालव्याचा मार्ग बदला किंवा काम रद्द करा, तमुक धरण बांधू नका.. हे सारे लोकच सांगणार. मग सरकार कशासाठी? गंगेच्या शुद्धीकरणासाठी पाण्यासारखा पैसा ओतणाऱ्या जागतिक बँक आदी आंतरराष्ट्रीय संस्था लोकाधारित देखरेखीचे तत्त्व मान्य करतात. पण तिचाही सांगाडाच सरकारे शाबूत ठेवतात.  स्वामी सानंद ऊर्फ प्रा अग्रवाल यांच्या काही मागण्या सरकारने -आधी मनमोहन सिंग यांच्या आणि गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदींच्या सरकारने- मान्यही केल्या. उदाहरणार्थ, सन २००९ मध्ये लोहारीनाग पाला धरण प्रकल्प रद्द करण्यात आला. शुद्धीकरण प्रकल्प वगैरे उभारण्याचे मान्य झाले, पण लोककेंद्री देखरेखीची मागणी अमान्यच राहिली.

ही मागणी लावून धरण्याचा स्वामी सानंद यांचा मार्ग आत्मक्लेषाचा होता. त्यातील आवाहन भावनिक होते. भावनेला हात घालून पर्यावरण राखू इच्छिणारे दुसरे संन्यासी म्हणजे स्वामी शिवानंद. हेही उत्तराखंडातले. या शिवानंदांचा अवघ्या ३४ वर्षांचा शिष्य ब्रह्मचारी निगमानंद यानेही गंगारक्षणाच्या मागणीसाठी जून २०११ मध्ये असेच उपोषण करून प्राण सोडले. प्रश्न हा आहे की, हाच मार्ग योग्य आहे असे विज्ञान म्हणेल का? मारी क्युरी या पहिल्या अणुवैज्ञानिकांपैकी. किरणोत्सार रासायनिक क्रियेमुळे नव्हे तर अणूतूनच होतो, हा शोध त्यांनी लावला. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशी दोन नोबेल पारितोषिके त्यांना मिळाली. याच मादाम क्युरींना किरणोत्सारामुळे झालेल्या रोगांची शिकार व्हावे लागले. विज्ञानाचा इतिहास याला काव्यगत न्याय म्हणत नाही. किरणोत्सार मानवी शरीरास कसा आणि किती घातक असतो याविषयी मादाम क्युरी अज्ञानी होत्या, हेच विज्ञान सांगते. हे उदाहरण स्वामी सानंद/ प्रा अग्रवाल यांच्याविषयी तंतोतंत लागू नाही हे खरे. पण धोके समजून घेणे, त्यांची शहानिशा करणे आणि त्यावर मात करणे ही अपेक्षा विज्ञान सर्वाकडून सारखीच बाळगत नाही काय? गंगेला असलेला धोका प्रा अग्रवाल यांना समजत होता. पण दुसरीकडे भारतातील साऱ्याच नद्या प्रदूषित आहेत हे त्यांना मान्य होते. तरीही बाकीच्या नद्या आणि गंगा यांत फरक असल्याची अवैज्ञानिक भावना ते जोपासत होते. गंगेचे महत्त्व राजीव गांधींपासून अनेक राज्यकर्त्यांनी मान्य केले. मोदींच्या सरकारात गंगेसाठी स्वतंत्र खाते उघडण्यात आले. हा हळूहळू झालेला बदल भले प्रतीकात्मक असेल, परंतु स्वामी सानंद ज्या लोकाधारित देखरेखीसाठी अडून बसले होते, त्या लोकांच्या आधारे या प्रतीकात्मकतेची किंमत सरकारला मोजायला लावण्याचा मार्ग त्यांना दिसत नव्हता का? की जनाधार वाढावा, टिकावा याचसाठी ते भावनिक मार्ग वापरत होते आणि उपोषण हाही पराकोटीचा भावनिक मार्गच होता?

लोकचळवळीला विज्ञाननिष्ठेचा आधार देण्याचे महत्कार्य प्रा जी डी अग्रवाल करू शकले असते. तसे झाले नाही. त्याऐवजी स्वामी सानंद होणे आणि आत्मक्लेषाने मिटून जाणे त्यांनी स्वीकारले. विज्ञाननिष्ठेतील हे भावनिक प्रदूषण मान्यच करायचे नसेल, तर झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणून उगी राहणे बरे.