सूय्रे अधिष्ठिली प्राचीही आपल्या पारंपरिक दिवाळीची खरी ओळख.. पण यंदा मात्र, ‘नभ मेघांनी आक्रमिले,’ अशा ओळी सुचाव्यात..

यंदाची दिवाळी काहीशी वेगळीच आहे. दर वर्षी नव्या दमाने येणारी दिवाळी नवी असल्यासारखी भासत असली तरी ती नेहमीचीच, जुनीच दिवाळी आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत असते. त्याच दिव्यांच्या माळा, तेच आकाशकंदील, तीच रोषणाई, तोच दिवाळीचा फराळ, तोच बाजारहाट, तेच पहिल्या पहाटेचे गुलाबी थंडीत सुगंधी तेलाचा आणि उटण्याचा लेप लेवून केलेले अभ्यंगस्नान, तोच तो साबण, तोच पाडवा, तीच भाऊबीज आणि त्याच भेटी, तेच पाहुणे.. दर वर्षीच हे सारे तेच ते असते, तरी ती जुनी दिवाळी नेहमी नवी, वेगळी वाटत असते. तरीही यंदाची दिवाळी मात्र त्याहूनही वेगळी आहे. कारण यंदाच्या दिवाळीवर शब्दश: पाणी पडले आहे. उटणे लावून अभ्यंगस्नानानंतर बाहेर आले की कदाचित आकाशातून कोसळणाऱ्या निसर्गधारांचे अवचित स्नान घडेल आणि ही दिवाळी नेहमीसारखी नव्या दमाने आलेली जुनी दिवाळी नाही, याची खात्री पहिल्या दिवसापासूनच पटावयास लागेल. ही वेगळी दिवाळी आपण नेहमीच्याच जुन्या उत्साहाने, नेहमीच्याच उत्सवी थाटात साजरी करणार असलो, तरी या वेगळेपणाचे नीरस सावट कदाचित दिवाळीवर दाटलेलेच राहणार अशीच चिन्हे आहेत. पण यंदाची दिवाळी अशी वेगळी दिवाळी आहे हे माहीत असूनही, नेहमीच्याच दिवाळीला होतो, तो शुभेच्छांचा वर्षांव या दिवाळीतही परस्परांवर होणार आहेच. आणि त्या नेहमीच्याच वर्षांवातील नवेपणा हाच यंदाच्या दिवाळीच्या माफक आनंदातील मोजका वेगळेपणा ठरणार आहे. दिवाळी म्हणून उगवणाऱ्या दिवसाला तो नेहमीचा थंडगार पहाटस्पर्श असेलच असे नाही. पूर्वेचे आकाश नेहमीसारखे सोनेरी झालरीने सजलेले दिसेलच असे नाही. कदाचित तेथे काळ्या ढगांची दाटी झालेली असेल आणि त्याकडे पाहून पुढच्या दिवसांच्या आनंदावर पडणाऱ्या संभाव्य विरजणाच्या कल्पनेने उत्सवाच्या आनंदाने मोहरलेली मने काहीशी हिरमुसलीही होतील. तरीदेखील, हा आनंदाचा सण आहे, अशी आपली परंपरागत समजूत आहे या जाणिवेने आणि ती काळोखी आपल्या घरापर्यंत पोहोचू नये, या जिद्दीने घराघरांतील दिवे थोडे अधिकच उजळतील.. म्हणून यंदाची दिवाळी काहीशी वेगळीच आहे!

आजवर कधी नव्हे एवढे, काळ्या ढगांचे खरेखुरे सावट आपल्या दिवाळीवर दाटले आहे. हे शब्दश: दाटलेले सावट, खऱ्याखुऱ्या काळजीला आमंत्रण देणारे आहे. कोणत्याही क्षणी आकाशातील काळ्याकुट्ट ढगांची दाटी अधिक गच्च होईल, विजांचा लखलखाट सुरू होईल, आकाशात चहूबाजूंनी सुरू होणारी आक्रित रोषणाई आणि मनाचा थरकाप करून सोडणारा ढगांचा गडगडाट घराघरांत उजळणाऱ्या दीपमाळांच्या प्रभेला आणि अंगणातील फटाके-फुलबाज्यांच्या रोषणाईलाही झाकोळून टाकेल, तेव्हा चिंतेचा एक विचार मनात दाटू लागेल. अशाही स्थितीत दिवाळी तर अवतरणारच आहे. या वेगळ्या दिवाळीचा आनंद उपभोगण्यासाठी आपणही वेगळ्या रीतीने सज्ज होतच आहोत, ही त्यातल्या त्यात बरे वाटावे अशी बाब! बाहेर परतीच्या पावसाचा अवेळी धिंगाणा सुरू असतानादेखील कविता सुचाव्यात आणि ही प्रतिभेची फुले परस्परांवर उधळून ‘वाहवा’चा वर्षांव झेलत स्वत:शीच सुखावण्याचा आपला स्वभाव कायम असावा, हेच त्या बरे वाटण्याचे कारण! आता तर दिवाळीच्या स्वागतासाठी घराबाहेर टांगलेल्या रंगीबेरंगी आकाशकंदिलातून उजळणाऱ्या रंगोत्सवावर पाणी पडू नये यासाठी आकाशकंदिलावर छत्री टांगण्याचे विनोदी कवित्वही याच निमित्ताने बहरू पाहात आहे. ‘सूय्रे अधिष्ठिली प्राची’ ही आपल्या पारंपरिक दिवाळीची खरी ओळख.. पण यंदा मात्र, ‘नभ मेघांनी आक्रमिले,’ अशा ओळी सुचाव्यात. पहाटेच पूर्वेच्या आकाशात उसळणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पाहून, दिवाळीचा चमचमीत फराळ चापावा की संध्याकाळी आकाशातील विजांची रोषणाई न्याहाळत आणि ढगांतून फुटणारे वेगवेगळ्या फटाक्यांचे आवाज ऐकत, वाफाळलेल्या चहाच्या घुटक्यांसोबत गरम गरम कांदाभजी रिचवावीत, असा संभ्रम अनेक मनांमध्ये अगोदरपासूनच डोकावू लागला असेल. ऐन दिवाळीत असे विचार सुचण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असणार आहे, म्हणून यंदाची दिवाळी काहीशी वेगळीच आहे!

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा, जगण्याची नवी उभारी देण्याचा सण! दर वर्षी तो आपण तसाच साजरा करतो. आनंदाचा, उत्साहाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवतो आणि परस्परांना सदिच्छांचे बळ देत सरलेल्या काळातील वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो. हे आपण उत्साहाने साजरे करीत असलो, तरी सारे काही तितके सुरळीत नाही, हेही आपल्याला माहीत असते. पण तेदेखील या उत्साहाच्या आवरणाखाली दाबून टाकण्याचाच हा आभासी सोहळा असतो आणि आभासीपणाने का होईना, आपण खरोखरीच ते सारे क्षणकाळासाठी विसरून गेलेलो असतो. यंदाही दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावोगावीच्या बाजारपेठा गर्दीने गजबजून गेल्या, पण दुकानदारांच्या मनातील नेहमीची ती दिवाळी त्यांना दिसलीच नाही. बदलत्या वस्तू-सेवाकराची दिवाळी भेट आणि पुढच्या काही दिवसांतच वर्षपूर्ती साजरी करणारी नोटाबंदीची नकोशी आठवण दुकानांच्या गल्ल्यावर बसलेल्या प्रत्येकाच्याच मनातून हळुवारपणे जागी होऊ लागली आहे. राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविण्याचा चंग बांधलेल्यांचे बंध झुगारून रोषणाईच्या चिनी माळांचा झगमगाट रस्त्यांवर दिसू लागला असला, तरी त्या दीपमाळा घरांवर नीट उजळून आनंदाची रोषणाई करतीलच याची खात्री नाही. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना डोळ्यांसमोर उमलू पाहणारी भविष्याची नवी स्वप्ने साकारणार, निसर्गराजाने केलेल्या कृपेमुळे शेतात सोने पिकणार या आनंदाचे शिंपण कुटुंबांवर करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे दिवाळीची पहाट दिसलीच नाही आणि त्या घरांवरील रोषणाईची स्वप्नेच काळवंडून गेली. कर्जमाफीमुळे हाती चार पैसे पडतील आणि दिवाळीनंतर तरी घर उजळेल अशा आशेने मायबाप सरकारकडे डोळे लावून बसलेली असंख्य कुटुंबे आजच्या दिवशी रीतभातीला धक्का नको म्हणून उंबरठय़ावर दिव्यांच्या मिणमिणत्या पणत्या लावून दिवाळीच्या पहाटेचे स्वागत करतील. मुंबईच्या एल्फिन्स्टन रोड पुलावरूनही दिसेल तो दिवाळीचा झगमगाटच. आप्तस्वकीय गमावलेले, शहरावरला विश्वासच उडालेले लोक रीतीनुसार परस्परांना त्याच, नेहमीच्याच जुन्या शुभेच्छाही देऊन पुन्हा त्याच, जुन्या दु:खावर आभासी सुखाचे शिंपणही करू पाहतील, पण सभोवती दाटलेल्या काजळीचे सावट पुसण्याची शक्ती यात असेलच असे नाही. म्हणून यंदाची दिवाळी काहीशी वेगळीच आहे.

ही दिवाळी नवखी आहे. दर वर्षी, नव्या दमाने येणाऱ्या जुन्या दिवाळीचा तोंडवळा या दिवाळीला नाही. नाइलाजाने असले तरी हे वास्तव आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. तरीही या नव्या दिवाळीचे स्वागत जुन्या उत्साहाने आपण करणारच आहोत. एकमेकांना शुभेच्छा देणार आहोत, कारण या शुभेच्छा हे आपल्या भविष्यातील आश्वस्ततेचे बळ आहे. या जुन्याच शुभेच्छा नव्या दमाने देऊन समोर येऊ पाहणाऱ्या नव्या भविष्याला सामोरे जाण्याची नवी उमेद आपण मनामनांत नव्याने जागविणार आहोत. प्रत्येक दिवाळीत आपण हेच करीत असतो. म्हणून तर दिवाळी हा नव्या जाणिवा, नवी स्वप्ने, नवा उत्साह जागविण्याचा सोहळा असतो. यंदाची दिवाळी जरी वेगळी असली, तरी जगण्यात नवी उमेद रुजविण्याची तिची परंपरा मात्र जुनीच आहे. यंदा पुन्हा बोनससाठी, पगारवाढीसाठी, जुन्या मागण्यांसाठी आणि जुन्या अपेक्षांसाठी संप, आंदोलनांचे वारे वाहू लागले आहेत. भविष्यात ज्याला सामोरे जावे लागेल, त्या अदृश्य संभाव्याला तोंड देण्याची तयारीच या सिद्धतेमधून स्पष्ट दिसते आहे. यंदाच्या वेगळ्या दिवाळीने ही वेगळी उमेद जागविली आहे. या उमेदीची शिदोरी भविष्यातील साऱ्या वेगळेपणास सामोरे जाण्यासाठी पुरून उरेल यात शंका नाही. ही शिदोरी सर्वाच्या पोतडीत पुरेपूर भरलेली राहो, हीच या वेगळ्या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा!