19 February 2019

News Flash

दोन चक्रमांची होते..

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन या दोघांचे वैशिष्टय़ म्हणजे बेभरवशी उत्स्फूर्तता..

डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन या दोघांचे वैशिष्टय़ म्हणजे बेभरवशी उत्स्फूर्तता..

व्यक्तीच्या कृतीस व्यवस्थेचे कोंदण नसेल तर होणारे बदल कितीही सकारात्मक असले तरी ते तात्कालिकच राहतात. परंतु अलीकडच्या काळात या पायाभूत तत्त्वासही हरताळ फासणाऱ्या नेत्यांचे पेव फुटले असून आपण काहीही करू शकतो आणि त्याचे हवे तसे परिणाम मिळवू शकतो, असे त्यांना वाटते. व्यक्तीच्या अंत:प्रेरणेस महत्त्व असते हे खरे. पण म्हणून ही अंत:प्रेरणा सक्षम व्यवस्थेस पर्याय असू शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्यातील कथित शिखर परिषदेसंदर्भात जे काही उलटसुलट घोषणापर्व सुरू आहे त्यातून या अंत:प्रेरणेच्या मर्यादाच दिसून येतात. ट्रम्प हे एका खऱ्या लोकशाही देशाचे नेते तर किम हे जातिवंत हुकूमशहा. किम यांना देशाचे प्रमुखपद वारसाहक्कातून मिळाले. ट्रम्प यांचे तसे नाही. रीतसर निवडणुकीच्या मार्गाने ते अध्यक्षपदी निवडून आले. ते जगातील सगळ्यात मोठय़ा, सक्षम आणि श्रीमंत लोकशाही देशाचे प्रमुख तर किम हे जगातील बेबंद, अकार्यक्षम आणि दरिद्री देशाचे प्रमुख. तसे पाहू गेल्यास या दोन्हींची तुलना करावी असे काही नाही. तथापि या दोन्ही नेत्यांची स्वभाववैशिष्टय़े मात्र निश्चित मिळतात. बेभरवशी उत्स्फूर्तता हे या दोघांचे वैशिष्टय़.

त्यातूनच किम यांनी अलीकडे आपला सहोदर आणि कडवा शत्रू दक्षिण कोरिया या देशाशी हातमिळवणी केली. त्यांचा उत्साह इतका दांडगा की ते दक्षिण आणि उत्तर यांना विभागणाऱ्या भूभागात जाऊन दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मुन जे ईन यांची गळामिठी घेऊन आले. या धक्क्यातून जग सावरते न सावरते तोच किम यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्रपल्लवीस प्रतिसाद दिला. या दोघांचे भेटायचेही ठरले. पुढील महिन्याच्या १२ तारखेस ही संभाव्य भेट होणार होती. सिंगापूर या एकशहरी देशाने या शिखर परिषदेचे यजमानपद स्वीकारले. या भेटीच्या घोषणेनंतर जगातील शांतताप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आणि आता एक तरी समस्या मिटणार असे संबंधितांना वाटू लागले. कारण या भेटीच्या निर्णयाआधी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले होते. वास्तविक उत्तर कोरियाचा जीव तो किती. परंतु तरीही हे वेडपट किम अमेरिका बेचिराख करण्याची भाषा करत होते. आपली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अमेरिकी शहरे उद्ध्वस्त करतील, असा त्यांचा दावा. वास्तविक अर्धवटरावांच्या चिथावणीकडे शहाण्यांनी दुर्लक्ष करायचे असते. परंतु ट्रम्प अशा शहाण्यांत मोडतात किंवा काय, हा प्रश्न असल्याने त्यांनी किम यांना प्रतिआव्हान देऊन अमेरिकेतर्फे शड्डू ठोकले. या अशा चिथावणीखोर भाषेमुळे एखादी हलकी व्यक्ती खरोखरच भडकून अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. पण याचा कोणताही विचार ट्रम्प यांनी केला नाही. त्यामुळे हे दोघे खरोखरच एकमेकांना भिडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.

त्या उत्कलन बिंदूपासून किम यांनी अचानक फारकत घेतली आणि थेट ट्रम्प यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली. त्यांच्या भावनेचा लंबक दुसऱ्या टोकास हेलकावताना पाहून जागतिक राजकारणाकडे लक्ष ठेवून असणाऱ्या अनेकांना सुखद धक्का बसला. याचे कारण आधीच ट्रम्प यांनी इराणबरोबरील अणुऊर्जा करार मोडीत काढून पश्चिम आशियाच्या आखातात अशांतता निर्माण केली. ट्रम्प यांचे पूर्वसुरी बराक ओबामा यांनी महत्प्रयासाने इराणला या करारासाठी तयार केले होते. परंतु ओबामा यांचे मीठ ट्रम्प यांच्यासाठी अळणी असल्याने त्यांनी हा करार रद्द केला. त्यामुळे अकारण अशांतता निर्माण झाली. त्या पाश्र्वभूमीवर उत्तर कोरियाशी चर्चा करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे चांगलेच स्वागत झाले. यातही ट्रम्प यांची घमेंडखोरी अशी की उत्तर कोरियाशी चर्चा करणारे आपण पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरू असे ते सांगू लागले. ही बाब खरी जरी असली तरी ही चर्चा प्रत्यक्षात होईपर्यंत धीर धरणे ट्रम्प यांना जमले नाही. आपल्या या संभाव्य शांतता चर्चेची झिंग त्यांना ही चर्चा होण्याआधीच इतकी चढली की शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांचे साजिंदे प्रयत्न करू लागले. वरवर पाहता ही बाब हास्यास्पद वाटू शकेल. जेमतेम काठावर पास होणारा असा लौकिक असलेल्यास अचानक आपण पहिल्या क्रमांकाचे आहोत असे वाटू लागले आणि त्याने आपण पहिले आलोच असे मानून निकालाच्या आधीच पेढे वाटण्याची तयारी चालवली तर ते जितके हास्यास्पद ठरेल तितकीच ट्रम्प यांची शांततेच्या नोबेल पारितोषिकाची तयारी हास्यास्पद होती. आपल्या दुसऱ्या आततायी कृतीने ट्रम्प यांनीच ती अधिक हास्यास्पद ठरवली.

ट्रम्प यांनी ही ऐतिहासिक चर्चाच रद्द केली. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा त्याग करण्यास नकार दिल्याचे कारण ट्रम्प यांनी पुढे केले. किम जोंग यांचे म्हणणे असे की चर्चेचा सर्व भर काही या अण्वस्त्रबंदी मुद्दय़ावरच नको. हाच मुद्दा अमेरिका पुढे करीत राहिली तर आपणास चर्चा करणे शक्य होणार नाही, असे किम यांनी स्पष्ट करताच ट्रम्प यांनी ही चर्चा रद्द करण्याची घोषणा केली. या संदर्भात त्यांनी जे पत्र प्रसृत केले ते उच्चपदस्थांच्या हुच्चपणाचा आदर्श नमुना ठरावे. उत्तर कोरिया अण्वस्त्रसज्ज आहे असे किम म्हणतात. पण अमेरिकेकडे इतकी अण्वस्त्रे आहेत की किम त्याची कल्पनाही करू शकणार नाहीत, असे ट्रम्प यांचे म्हणणे. जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखाने कोणाशी कोणत्या भाषेत कसे बोलू नये हेच यातून दिसते. हे सारे आपल्या देशातील राष्ट्रभक्तांना खूश करण्यासाठी. पण त्यांचा हा प्रयत्न केवळ केविलवाणा ठरतो. कारण अमेरिकेत काही प्रमाणात अल्पबुद्धीधारी रिपब्लिकन असतीलही. पण तीच काही अमेरिकेची ओळख नाही. जागतिक राजकारणात भरीव भूमिका असणारा तो देश. पण त्या देशप्रमुखाच्या भाषेत मुत्सद्देगिरीचा अंशदेखील नाही. आपल्या पदाचा, अधिकाराचा कोणताही पाचपोच न दाखवणाऱ्या ट्रम्प यांनी किम यांच्याबरोबरील ही चर्चा रद्द करण्याची एकतर्फी घोषणा केली खरी.

परंतु त्यास २४ तासदेखील उलटायच्या आत ही चर्चा कशी होऊ शकते, असेही ते पुन्हा सांगू लागले. आधी ठरल्यानुसार १२ जूनला सिंगापूरमध्येच ही चर्चा होणे शक्य आहे, असे ट्रम्प यांचे ताजे वक्तव्य. ते पुढील २४ तासांत बदलणारच नाही, याची हमी नाही. गंमत म्हणजे या त्यांच्या घूमजाव कृत्यास किम यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ट्रम्प यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना वाटत होते हा फेरचर्चेचा प्रस्ताव किम नाकारतील. पण तसे झाले नाही. अशा वेळी ही चर्चा खरोखरच होणार काय, झाली तर कशी, वगैरे प्रश्न निर्माण होतात.

त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अशा वातावरणात या अशा चक्रमांत झालेल्या चर्चेचे फलित काय आणि त्या फलिताची हमी काय? या दोघांच्याही कृतीस सक्षम व्यवस्थेचे पाठबळ नाही. आपण म्हणजेच व्यवस्था असेच या दोघांचे वर्तन. इराणबरोबरील करार रद्द करू नये, असे गृहमंत्र्यांस वाटते म्हणून ट्रम्प यांनी त्यास सरळ दूर केले. आताही अमेरिकी प्रशासनात उत्तर कोरियासंदर्भात एकवाक्यता नाही. म्हणून या चर्चेविषयी फार आशा बाळगणे अयोग्य ठरेल. दोन चक्रमांची भेट इतकेच काय ते तिचे महत्त्व. कोणती लाट त्यांना दूर करेल याचा नेम नाही.

 

 

First Published on May 28, 2018 12:29 am

Web Title: donald trump and kim jong un