18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

प्रेसिडेंट पॉटर

‘‘यांच्या नेतृत्वाखाली काम करावयास मिळणे, हे आमचे भाग्यच.’’

लोकसत्ता टीम | Updated: June 15, 2017 3:11 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

ट्रम्प यांनी मंत्रिमंडळ बठकीचे कामकाज थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जे झाले ते पाहून सारे बधिरावस्थेतच गेले..

‘‘यांच्या नेतृत्वाखाली काम करावयास मिळणे, हे आमचे भाग्यच.’’ ‘‘असा नेता देशाला मिळणे या इतकी मोठी बाब अन्य नाही.’’ ‘‘इतकी कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या देशाच्या इतिहासात फारच कमी प्रसंगी नेतृत्वस्थानी राहिली आहे.’’ ‘‘आपल्या देशाच्या इतिहासात इतका मोठा करकपातीचा निर्णय घेण्याचे धर्य अन्य कोणाही नेत्यांत नाही.’’ ‘‘आपल्या देशप्रमुखांनी इतक्या अल्प वेळात इतके निर्णय घेतले आहेत की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही’’. ‘‘अशा नेत्यांचा उपप्रमुख म्हणून माझी निवड होणे याइतके गौरवास्पद अन्य काही नाही.’’ ‘‘..’’ वगैरे वगैरे वगैरे.

वाचकहो! ही सारी विधाने आपणा सर्वास अतिपरिचयाची असली आणि ती आपले जनप्रिय नेते वेंकय्याजी नायडू यांच्या मुखातून निघालेली आहेत असा आपला भास होणे साहजिकच असले तरी गरसमज करून घेऊ नका. ती आपल्या देशातील नाहीत. अर्थात काही खवट वाचक यात एका वाक्याची भर घातली तर हे सारे आपलेच वाटेल असे म्हणतील. ते विधान म्हणजे आपल्या नेत्यांस थेट परमेश्वराचा अवतार ठरवणे. ते फक्त या विधानांत झाले नाही. असो. काय झाले नाही, हा काही येथील मुद्दा नाही. तर काय आणि कोठे झाले ते येथे महत्त्वाचे आहे. झाले ते असे की एकापाठोपाठ एक मंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळप्रमुखाची इतकी तारीफ केली की ती ऐकून सारा देश सुन्नच झाला. अनेकांना आपली श्रवणक्षमता कायमची गेली तर बरे, असे वाटोन गेले. नको नको.. हे असले ऐकणे नको, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. तर काही अति शहाणे होते ते स्वत:च्या मनास प्रश्नकत्रे झाले : आपल्या देशाचे नाव उत्तर कोरिया असे तर नाही वा आपण सारे अचानक प्याँगवाँग येथे स्थलांतरित झालो नाही. पण नाही ते खरे नव्हते. खरे होते ते हे असे एकापाठोपाठ मंत्र्यांचे आपल्या नेत्याचे आरती गाणे. पण हे वाचोन आपणास असा प्रश्न पडू शकेल की हे सारे देशवासीयांच्या कानावर पडलेच कसे?

या प्रश्नाच्या उत्तरात तर खरी मेख आहे. ती अशी की या साऱ्याचे थेट प्रक्षेपण की हो झाले. म्हणजे खासगी, सरकारी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्वच वाहिन्यांनी या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करीत तितकाच ऐतिहासिक प्रसंग घराघरांत पोहोचवला. त्यातील दोन वाहिन्या भलत्याच आगाऊ. त्यांना काही हे सहन होईना. देशाच्या इतिहासात असे काही झालेले नाही, असे त्यांचे म्हणणे. ते खरेच. परंतु तरीही समोर जे काही आरतीगान सुरू आहे त्यामुळे आपल्या तटस्थतेस मोठी बाधा पोहोचेल असे त्यांचे म्हणणे पडले आणि अखेर कानावर हात ठेवत या आरतीगान समारोहाचे थेट प्रक्षेपण त्यांनी बंदच केले. किती हा कर्मदरिद्रीपणा त्यांचा. प्रेस्टिटय़ूट्स कुठले. नेत्यांचे गुणगान इतक्या तगडय़ा वृत्तवाहिन्यांनादेखील झेपले नाही यावरून वाचकहो, कल्पना करता येईल की त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल.

तर असा प्रसंग घडला तो सांप्रत काळी जगात एकमेव असलेल्या महासत्तेच्या केंद्रस्थानी. म्हणजे व्हाइट हाऊसात. होय होय. तेच ते. अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान, कार्यालय इत्यादी. यात काहीही अतिशयोक्ती नाही. या महासत्तेचे प्रमुख जे की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्यावहिल्या संपूर्ण मंत्रिमंडळ बठकीचे कामकाज थेट प्रक्षेपित करावयाचा निर्णय घेतला आणि समस्त अमेरिका आणि सीएनएन, एनबीसी, फॉक्स अशा तगडय़ा वाहिन्यांच्या जगभरातील प्रेक्षकांचे डोळे, कान आदी सर्व जाणिवावयवांचे पारणेच की हो फिटले. ही घटना घडून २४ तासांहून अधिक काळ उलटला असला तरी अमेरिकी प्रशासनादी क्षेत्रांतील सर्व कर्मचारी तसेच नागरिक अजूनही बधिरावस्था अनुभवत असून या नागरिकांना बसलेला मानसिक धक्का इतका तीव्र आहे की अचानक देशभरातील सर्व मानसोपचारतज्ज्ञांकडे रांगा लागल्या आहेत. सर्व अमेरिकी वृत्तवाहिन्यांनीही आपल्या देशप्रमुखाच्या मानसिकतेचे विश्लेषण करण्याचे काम पुन्हा नव्याने सुरू केले असून असा कसा आपला अध्यक्ष या प्रश्नाने वार्ताहरविश्वाचे मस्तक अजूनही गरगरत आहे. ट्रम्प यांचे मंत्रिगणही असे थोर थोर की त्यांनी आपण जे काही बोललो ते परत बाहेर येऊन आपापल्या खात्यांतून ट्वीटदेखील केले आणि हे सर्व सुरू असताना ट्रम्प महाशयांना पाहणे म्हणजे कैवल्यानंदच. तो अनुभव एकदम आध्यात्मिकच तसा. मंत्रिगण एकापाठोपाठ एक आपले गुणगान करीत आहेत, आपल्यावर कौतुकफुलांचा वर्षांव करीत आहेत आणि गोरेगोमटे, श्वेतकेशधारी डोनाल्ड आपल्या चेहऱ्यावरील स्मित या कानापासून त्या कानापर्यंत पसरवीत या समूहगानाचा आनंद घेत आहेत, असे ते दृश्य. डोळ्यांचेच नव्हे तर बुद्धीचेही पारणे फेडणारे. समस्त जगाने ते याचि देही याचि डोळा पाहिले. हे येथेच संपत नाही बरे. व्हाइट हाऊसात असे समूह कौतुकगान सुरू असताना तिकडे बाहेर ट्रम्पभक्तांनीही आपापल्या परीने आपल्या नेत्याच्या ऐतिहासिक क्षमतेवर कौतुकाक्षतांचा वर्षांव केला. अशा तऱ्हेने समस्त अमेरिका ट्रम्प रंगी रंगलेली पाहायला मिळाली. दुर्मीळच क्षण तो.

त्याची झिंग उतरल्यावर अमेरिकेत आता चर्चा सुरू झाली असून मंत्रिमंडळाच्या बठकीचे असे थेट प्रक्षेपण करावे किंवा काय असा प्रश्न चíचला जात आहे. अमेरिकेतील तमाम प्रसारमाध्यमांनी या घटनेचे मिळेल तितके वर्णन केले असून त्यातून एक बाब तेवढी समोर येते. ती म्हणजे या प्रसारमाध्यमांना बसलेला धक्का. मंत्रिमंडळाच्या बठकीत अनेक महत्त्वाचे, देशहिताचे, परराष्ट्र संबंधांचे मुद्दे चर्चिले जातात. परंतु आपला अध्यक्ष मंत्रिमंडळ बठकीस असा चव्हाटय़ावर आणू लागला तर आपले कसे होणार, असा प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना पडलेला आहे आणि माध्यमांनीही तोच मुद्दा समोर मांडला आहे. परंतु वेगळे काही करून दाखवणे हेच ट्रम्प महाशयांचे मोठेपण असल्यामुळे त्यांना या प्रश्नांची जराही काळजी नाही. परत ते प्रश्न मांडणाऱ्यांना प्रेस्टिटय़ूट्स, फेक न्यूज आदी शेलक्या शब्दभूषणांनी घायाळ करण्यास स्वत: अध्यक्ष आणि त्यांचा भक्तगण असे दोन्हीही तयार असल्याने सगळ्यांचीच पंचाईत.

टाइम साप्ताहिकाच्या एडी गॉर या स्तंभलेखकाने ट्रम्प यांच्या या वर्तनाचे वर्णन थेट हॅरी पॉटर या बालनायकाशी केले. खरे तर एडी हे ट्रम्प यांच्या या वर्तनाच्या विश्लेषणासाठी महालेखक शेक्सपिअर याच्या ज्युलियस सीझर याचा आधार घेणार होते. परंतु हे सांस्कृतिक वजन अध्यक्षांना काही पेलवणार नाही, हे जाणवल्यामुळे त्यांनी चार पायऱ्या खाली येऊन पॉटर याचा आसरा घेतला. पॉटर याच्या कादंबरीतील लॉर्ड वोल्देमॉर्ट यांची व्यक्तिरेखा म्हणजे जणू ट्रम्पच असे त्यांचे म्हणणे. हा लॉर्ड कमालीचा आत्मकेंद्री असतो आणि शेवटी शेवटी तो आपण स्वत: सोडून अन्य कोणासही जगण्याचा अधिकार नाही, असे मानू लागतो. नंतर आपल्या या आरती गाणाऱ्या सहकाऱ्यांना ट्रम्प असेच म्हणणार आहेत असे या एडींचे भाकीत. असो. त्याच वेळी भारतात मात्र ट्रम्प यांच्या या वर्तनाने भाजपमध्ये वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. पारदर्शी कारभारासाठी मंत्रिमंडळ बठकीचे थेट प्रक्षेपण करा ही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली सूचना ट्रम्प यांच्यापर्यंत कशी पोहोचली ही ती चिंता. तिचे निराकरण करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी अमेरिकाभेटीत ट्रम्प यांच्याकडूनच करून घ्यावे असेही काही भाजप नेत्यांना वाटू लागले आहे. परंतु ते होईपर्यंत सर्वानी हॅरी पॉटर वाचावे असे फर्मान निघाल्याचे कळते.

First Published on June 15, 2017 3:11 am

Web Title: donald trump devendra fadnavis uddhav thackeray bjp shiv sena narendra modi