रशियाप्रकरणी आपली चौकशी होऊ नये म्हणूनच ट्रम्प यांनी एफबीआयच्या प्रमुखांना दूर केले, असा समज तेथील जनतेचा झाला असून तो अनाठायी म्हणता येणार नाही.

धडाडी म्हणजे पुढचा-मागचा विचार न करता वाटेल ती कृती करणे असे वाटणाऱ्या जगभरातील नेत्यांचे डोनाल्ड ट्रम्प हे मुकुटमणी. त्यांनी आपल्या ताज्या धडाडीदर्शक निर्णयाद्वारे अमेरिकी अंतर्गत गुप्तचर यंत्रणेचे, म्हणजे फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, एफबीआयचे प्रमुख जेम्स कोमी यांना सरळ पदावरून दूर केले. एफबीआयचे प्रमुख कोमी हे किती उत्तम कामगिरी करीत आहेत, ते किती धडाडीचे आहेत आणि आपल्याला त्यांचे कसे कौतुक आहे असे संदेश ट्वीट करून काही दिवस उलटायच्या आत ट्रम्प यांचे कोमी यांच्याबद्दलचे मत बदलले आणि त्यांनी ही कारवाई केली. एफबीआयच्या प्रमुखाची नियुक्ती ही दहा वर्षांसाठी असते. कोमी यांनी जेमतेम तीन वर्षे पूर्ण केली आहेत. ते माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात नेमले गेले. यंदाच्या जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प हे कोमी यांच्या संदर्भात काही निर्णय घेतील, असे बोलले जात होते. परंतु ट्रम्प यांनी तसा निर्णय घेतला नाही आणि उलट आपला कोमी यांच्यावर किती विश्वास आहे, अशीच बतावणी सातत्याने केली. गतसाली ऐन निवडणुकीच्या काळात या कोमी यांनी ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या खासगी मेल वापरण्याच्या कृतीवर टीका केली होती. त्या वेळी ट्रम्प यांनी असे धैर्य दाखवणाऱ्या कोमी यांचे कौतुकच केले. त्यानंतर दोन वेळा ट्रम्प यांनी कोमी यांची स्तुती केली. आणि अचानक अध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकले. हे का घडले?

यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोमी करीत असलेली रशिया आणि ट्रम्प यांच्यातील साटेलोटय़ाची चौकशी. ट्रम्प यांना निवडणुकीच्या काळात रशियाकडून विविध मार्गानी रसद पुरवली गेली. ती आर्थिक नव्हती. तर ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांची बाजू जास्तीत जास्त लंगडी करणे हे या रसदीमागचे उद्दिष्ट होते. ते साध्य करण्यासाठी हिलरी यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयातील संगणकांत रशियन माहिती महाजाल चाच्यांनी घुसखोरी केली आणि ती विकिलिक्सच्या जुलियन असांज याच्या मदतीने ही घटना सर्वदूर पसरेल अशी व्यवस्था केली. हिलरी यांचा वैयक्तिक संगणक आणि हिलरी यांनाही यात लक्ष्य केले गेले. याचा फायदा अर्थातच ट्रम्प यांना होत गेला आणि जनमत त्यांच्या बाजूने झाले. अमेरिकेच्या या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा हा हस्तक्षेप इतका ढळढळीत होता की त्याचा चांगलाच बभ्रा झाला. परिणामी या सगळ्याच्या चौकशीचे आदेश माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना द्यावे लागले. या चौकशीत ट्रम्प यांचा संभाव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी रशियाशी संधान बांधलेले आढळून आले. युक्रेन आदी ठिकाणच्या रशियाच्या कृतीबद्दल अमेरिकेने त्या देशावर र्निबध जारी केले आहेत. ट्रम्प यांची एकदा का निवड झाली की हे र्निबध उठवले जातील असे आश्वासन या फ्लिन महाशयांनी रशियाला दिल्याचे या चौकशीत आढळून आले. ही बाब उघड झाली कारण एफबीआयकडून फ्लिन आणि रशियाचे अमेरिकेतील राजदूत किस्लियाक यांचे दूरध्वनी संभाषण नोंदवण्याचे आदेश दिले गेले होते म्हणून. या सगळ्याकडे काणाडोळा करीत ट्रम्प यांनी सत्ताग्रहणानंतर याच फ्लिन यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. मात्र त्या वेळी फ्लिन यांच्या रशियन चुंबाचुंबीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली गेली आणि परिणामी फ्लिन यांना पायउतार व्हावे लागले. ट्रम्प यांना हा मोठा धक्का होता.

त्यामुळे एफबीआयने आपल्या रशियन संबंधांपेक्षा सरकारी माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत जाते कशी याची चौकशी अधिक जोमाने करावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. ट्रम्प हे जगात सध्या अन्यत्र दिसून येतात तशा आत्मकेंद्री नेत्यांतील एक आहेत. व्यवस्था, परंपरा आदींची त्यांना काही पर्वा नाही. त्याचमुळे त्यांनी ओबामा यांच्यावर काही हीन आरोप केले. ओबामा यांनी आपल्या कार्यालयात हेरगिरीचा आदेश दिला होता हा त्यातील एक. एफबीआयने त्या आरोपास दुजोरा द्यावा असे त्यांचे म्हणणे. कोमी यांनी ते केले नाही. कारण तसे घडलेच नव्हते. तरीही एफबीआयने आपली तळी उचलावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाविषयी चौकशी समितीसमोर कोमी यांची साक्ष झाली. त्या वेळी कोमी यांनी हा हस्तक्षेप नाकारावा असे ट्रम्प यांना वाटत होते. कोमी यांनी तेही केले नाही. उलट रशियन हस्तक्षेपाच्या चौकशीची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेव्हा कोमी आपल्याला डोईजड होत आहेत असा रास्त समज ट्रम्प यांनी करून घेतला आणि कायदा विभागातील आपल्या हुजऱ्या अधिकाऱ्यांकरवी कोमी यांच्या विरोधात अहवाल तयार केला. त्याचीच परिणती अखेर त्यांच्या हकालपट्टीत झाली. परंतु हा निर्णय जाहीर केल्यापासून ट्रम्प यांच्याच अडचणीत वाढ झाली असून जनमताचा झोका त्यांच्या विरोधातच जाताना दिसतो.

हा निर्णय इतका टोकाचा आणि अतिरेकी होता की ट्रम्प यांचे समर्थन करण्यासाठी पहिले जवळपास दहा-बारा तास एकही सरकारी अधिकारी माध्यमांसमोर आला नाही. कोणत्याही अन्य आत्मकेंद्रित नेत्याप्रमाणे ट्रम्प यांनी हा निर्णय घेताना अन्य कोणांस विश्वासात घेतले नव्हते. जाहीर करावयाच्या आधी फक्त एक तास आपल्या आसपासच्यांना बोलावून ट्रम्प यांनी या निर्णयाची कल्पना दिली. इतकेच काय या निर्णयापासून ट्रम्प यांनी आपल्या प्रसिद्धीप्रमुखासही लांब ठेवले. महत्त्वाचे मंत्री आदींना निर्णय जाहीर व्हायच्या वेळेलाच त्याची माहिती मिळाली. याचा परिणाम असा झाला की ट्रम्प यांच्या बचावार्थ कोणीही सुरुवातीला पुढे आलेच नाही. आपल्या विरोधात जनमत दाटत असल्याचे घरी बसून टीव्हीवर पाहणाऱ्या ट्रम्प यांनी अखेर संतापून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तेव्हा कोठे ट्रम्प यांची बाजू समोर येऊ लागली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. आपली रशियाप्रकरणी चौकशी होऊ नये याच हेतूने ट्रम्प यांनी कोमी यांना दूर केले असा समज अमेरिकी जनतेचा झाला असून तो अनाठायी म्हणता येणार नाही. अध्यक्षांच्या नाराजीचा झटका लागून दूर व्हावे लागलेले कोमी हे तिसरे अमेरिकी उच्चपदस्थ. स्थलांतरितांवर बंदी घालण्याच्या निर्णयास न्यायिक पाठिंबा न देणाऱ्या सॅली येट्स यांना ट्रम्प यांनी असेच दूर केले. न्यूयॉर्कचे धडाडीचे विधिप्रमुख प्रीत भरारा यांचीही ट्रम्प यांनी अशीच हकालपट्टी केली. आणि आता हे एफबीआयप्रमुख कोमी. हे सर्व ट्रम्प यांच्या राजवटीस सहा महिनेही झाले नसताना घडले. तेव्हा पुढे काय, हा प्रश्न आहेच.

या प्रकरणात ट्रम्प आणि रशियाचे पुतिन यांच्या निरंकुश सत्ताकारणाचे झालेले दर्शन हे काळजी वाढवणारे आहे. निवडून आलो म्हणजे आपण कसेही मोकाट सुटू शकतो, असे मानणारे नेते जगात अनेक देशांत आहेत. अमेरिकेतील या प्रकरणाने मोकाटांच्या या मनमानीचा जगाला असलेला धोकाच अधोरेखित होतो.