16 January 2019

News Flash

आना सिंगापूर..

उत्तर कोरियाच्या अध्यक्षांशी चर्चा ‘यशस्वी’ झाल्याचा दावा अमेरिकी अध्यक्षांनी जाहीरपणे करणे हे अगदी अपेक्षितच होते.. 

उत्तर कोरियाच्या अध्यक्षांशी चर्चा ‘यशस्वी’ झाल्याचा दावा अमेरिकी अध्यक्षांनी जाहीरपणे करणे हे अगदी अपेक्षितच होते.. 

उत्तर कोरिया त्यांच्याकडील अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी किती काळ घेणार हे अनिश्चित, त्यासाठी कोणताही कालबद्ध कार्यक्रम नाही, या काळात अमेरिकेने त्या देशावर लादलेले आर्थिक निर्बंध उठवले वा कमी केले जाणार नाहीत, उत्तर कोरियाने जे करू म्हणून शब्द दिला तो पाळला नाही तर काय, याबाबत काहीही निश्चित निर्णय नाही. आणि तरीही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात मंगळवारी झालेली बहुचíचत, बहुप्रतीक्षित भेट ही ‘फॅन्टॅस्टिक’ आणि ‘ग्रेट’ होती. अमेरिकेचे अध्यक्ष खुद्द ट्रम्प यांचेच हे शब्द. तो उत्तर कोरियाचे किम यांनी फेटाळलेला नाही. किंबहुना ट्रम्प यांच्याप्रमाणे ते भेटीनंतर वार्ताहर परिषदेसाठी सिंगापुरात थांबलेदेखील नाहीत. त्यामुळे ट्रम्प म्हणतात त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. तो तूर्त ठेवायला हवा. कारण कृती ऐतिहासिक असली तरी तिची फलनिष्पत्ती इतिहास घडवणारी असतेच असे नाही, हे वैश्विक सत्य ट्रम्प यांना माहीत नाही. गेल्या काही वर्षांत अनेक देशांत हा अशा एकांगी, इतिहास घडवणाऱ्या – निदान तसा दावा करणाऱ्या – नेत्यांचा सुळसुळाट झालेला आहे. ट्रम्प या सर्वाचे शिरोमणी. ज्या व्यक्तीस ठेचायला हवे असे त्यांना अलीकडेपर्यंत वाटत होते, ज्या देशावर अखंड बॉम्बवर्षांव करून तो बेचिराख करण्याची त्यांची इच्छा होती, ज्या देशात मानवी हक्कांना काडीचीही किंमत नाही आणि याबद्दल त्या देशप्रमुखास शासन करण्याचा त्यांचा मानस होता त्या उत्तर कोरियाचा अध्यक्ष किम जोंग उन याच्याशी ट्रम्प यांची मंगळवारी चर्चा झाली खरी.

वास्तविक दोनच आठवडय़ांपूर्वी ट्रम्प यांना किम हा विश्वासार्ह वाटत नव्हता आणि त्याच्या अण्वस्त्र बंदी आश्वासनावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी ही बठक रद्द केली होती. त्यानंतर या किम यांनी एका अवाढव्य लिफाफ्यातून ट्रम्प यांना संदेश धाडला. तो काय होता हे गुलदस्त्यात आहे. परंतु त्यानंतर ट्रम्प यांचे पुन्हा मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे १२ जून रोजी तटस्थ देश सिंगापुरात किम यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय पक्का केला. आमची भेट झाल्या झाल्या पहिल्याच काही क्षणांत ती यशस्वी होते की नाही हे मला कळेल, अशी ट्रम्प यांची दर्पोक्ती होती. त्याप्रमाणे पहिल्या हस्तांदोलनानंतर लगेचच टीव्ही कॅमेऱ्यांकडे पाहात ट्रम्प यांनी ‘गुड व्हेरी गुड’ असा चीत्कार केला आणि भेटीची फलश्रुती सकारात्मक असेल असे सूचित केले.

ते तसेच असणार होते. किंबहुना ते तसे नसते तर ट्रम्प यांना चाललेच नसते. त्यांच्यासाठी ही भेट यशस्वीच व्हायला हवी होती. दुसरा पर्याय नव्हता. याचे कारण या भेटीसाठी येताना ट्रम्प हे जी-७ या जगातील सात प्रमुख देशप्रमुखांच्या बठकीचा विचका करून आले होते. कॅनडात भरलेल्या या परिषदेतील संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करायलाच त्यांनी नकार दिला आणि नंतर यजमान देशाच्या पंतप्रधान जस्टिन त्रुद्रॉ यांचा ट्विटर-अपमान करून ट्रम्प यांनी आपल्यातील बेभरवशी नेत्याचे दर्शन घडवले. तेथून उठून ते आले थेट सिंगापुरात. त्या आधी अलीकडे इराणबरोबर सुरळीत चाललेला करार मोडून त्यांनी आणखी एक शत्रू उगाचच तयार केला. त्यांचे सारे लक्ष होते ते सिंगापूरकडे. कारण उत्तर कोरियाच्या मुद्दय़ावर याआधी कोणत्याही अमेरिकी प्रशासनास यश आलेले नाही. आपल्या पूर्वसुरींना जे जमले नाही, ते करून दाखवणे आणि त्यांना जे जमले ते खोडून काढणे ही ट्रम्प यांची कार्यशैली असल्यामुळे उत्तर कोरियाच्या मुद्दय़ावर त्यांना यशस्वी होण्यापासून पर्यायच नव्हता.

खरा मुद्दा आहे तो ‘यशस्वी म्हणजे काय?’ हा. ट्रम्प यांचा उत्साह पाहता या दोन नेत्यांनी हस्तांदोलन केले, स्मितहास्याचे छायाचित्री क्षण दिले हेच त्या परिषदेचे यश. याखेरीज या दोघांत कोणताही करारमदार आदी झालेला नाही. उत्तर कोरियाच्या किम यांनी आपला प्रदेश अण्वस्त्रमुक्त करण्याचे आश्वासन दिले हे खरे. पण त्यासाठी काळाचे कोणतेही बंधन त्यांनी घालून घेतलेले नाही आणि अमेरिकेने तसा आग्रहदेखील केलेला नाही. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार ही परिषद यशस्वी झाली असे म्हणावे तर उत्तर कोरियावरील कोणतेही निर्बंध उठवण्याचा निर्णयही ट्रम्प यांना घेता आलेला नाही. परिषदोत्तर वार्ताहर परिषदेत त्यांना या संदर्भात विचारणा झाली असता, ट्रम्प म्हणाले, ज्या क्षणी किम प्रत्यक्षात आपली अण्वस्त्रे दूर करतील त्याच वेळी निर्बंध उठवले जातील. तथापि, किम ही अण्वस्त्रे कधी दूर करणार? ट्रम्प यांच्या मते लवकरच. म्हणजे कधी ते फक्त किम यांनाच ठाऊक. तेव्हा या परिषदेत झाले ते इतकेच. आता यालाच महान यश असे कोणास मानावयाचे असेल तर तो आनंद हिरावून घेणारे आपण कोण? अलीकडे हे असे आत्मकेंद्री नेते काहीबाही जगावेगळी कृती करतात आणि थोर घटना असे सांगत आत्मस्तुतीचे ढोल बडवून घेतात. ही त्यातलीच एक कृती.

हे असे मानायचे कारण ट्रम्प यांनी जे काही आज केले वा करण्याचा प्रयत्न केला त्यातील प्रत्येक गोष्ट याआधी केली गेलेली आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया या देशांनी याआधी पहिल्यांदा १९९२ साली अण्वस्त्र मुक्तीचा प्रयत्न करून पाहिला. पण त्यानंतर दोनच वर्षांनी उत्तर कोरियाचे किम जोंग इल – म्हणजे विद्यमान अध्यक्षाचे वडील- यांनी सर्व परदेशी निरीक्षकांना हाकलून दिले आणि उपलब्ध प्लुटोनियमच्या आधारे नव्याने अणुबॉम्ब बनवणे सुरू करण्याची धमकी दिली. पुन्हा १९९९ साली उत्तर कोरियावरील निर्बंध हटविण्याचे गाजर दाखवीत त्या देशाने क्षेपणास्त्र चाचणी करू नये यासाठी प्रयत्न झाले. त्यास काही प्रमाणात यश आलेही. त्याचमुळे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या उत्तर कोरिया भेटीचाही घाट घालण्यात आला. पण ते काही होऊ शकले नाही. त्यानंतर दोन वर्षांनी २००२ साली आपल्याकडे युरेनियम समृद्धी आणि अणुबॉम्बनिर्मितीचा गुप्त प्रयोग कसा सुरू आहे ते उत्तर कोरियानेच जाहीर केले. मग जपान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आदी देशांनी उत्तर कोरियाशी शांतता करार करण्याचा प्रयत्न केला. २००६ साली उत्तर कोरियाने अणुचाचण्या करून या प्रयत्नांना सुरुंग लावला. त्यानंतर २००९ ते २०१७ या काळात उत्तर कोरियाने पाच अणुचाचण्या केल्या. गेल्या वर्षीच्या काही चाचण्यांतील अण्वस्त्रवाहक अस्त्रे तर अमेरिकी शहरांचा वेध घेतील इतक्या दीर्घ पल्ल्याची होती. त्याच निमित्ताने ट्रम्प आणि किम यांनी एकमेकांच्या नावे शिमगा सुरू केला. त्यानंतर अमेरिकेच्या वतीने या अशा परिषदेचे प्रयत्न सुरू झाले आणि जे काही साध्य करावयाचे होते ते साध्य झाल्याने किम यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या क्षणी अशा चच्रेची गरज आपल्यापेक्षा अमेरिकेला आहे असे किम यांचे उद्गार होते. त्यामुळे आपल्या अध्यक्षाने अमेरिकी अध्यक्षास कसे नमवले आणि चच्रेस भाग पाडले याच्याच कहाण्या उत्तर कोरियी माध्यमात प्रसृत होत असल्याचे चिनी नियतकालिकांनी दाखवून दिले आहे.

तेव्हा हे दोन नेते भेटले हेच मोठेपण मानावयाचे असेल तर ही भेट निश्चितच मोठी ठरते. पण तिचे फलित काय हे काही काळाने ठरेल. आपल्याकडे १९६० सालच्या  ‘सिंगापूर’ नावाच्या चित्रपटातील शम्मी कपूर आणि निम्मी यांचे ‘जीवन में एक बार आना सिंगापूर’ असे गाणे लोकप्रिय होते. तूर्तास ते गाणे आठवावे इतकेच ट्रम्प आणि किम यांच्या भेटीचे महत्त्व.

First Published on June 13, 2018 2:23 am

Web Title: donald trump kim jong un