अमेरिकी अध्यक्षपदाइतकीच तेथील सत्तासंक्रमणाची परंपराही मोठी आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प या परंपरेला सणसणीत अपवाद ठरले..

सन २०२० मधील अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक अभूतपूर्व ठरते, कारण रशिया किंवा चीन अशा परकीय शक्तींनी नव्हे, तर त्या देशातील ‘जुन्याजाणत्या’ रिपब्लिकन पक्षानेच सत्तासंक्रमणात खोडा घातला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध निर्विवाद बहुमत मिळवून अध्यक्षीय निवडणूक जिंकलेली आहे. बुधवारी रात्री उशिरा ट्रम्प यांनी अलास्का जिंकल्यामुळे त्यांच्या नावावर २१७ प्रातिनिधिक मते नोंदवली गेली, तरी बायडेन यांनी पेनसिल्वेनिया राज्य जिंकून २७० प्रातिनिधिक मतांचा आकडा केव्हाच ओलांडलेला आहे. अजूनही जॉर्जियासारख्या मोजक्या राज्यांचे निकाल बाकी असले तरी बायडेन यांच्या निवडीवर त्याने फरक पडणार नाही. परंतु ट्रम्प हे मानायला तयार नाहीत. बालवाडीमध्ये खेळाचा भाग म्हणून एखाद्या लहान मुलाच्या हातून खेळणे दुसऱ्या बालकाकडे द्यायची वेळ येते, त्या वेळी पहिले मूल खेळणे उराशी कवटाळून भोकाड पसरते. आपल्याला हे खेळणे दुसऱ्याकडे सुपूर्द करावेच लागेल, हे त्या बालकाच्या बालमतीलाही पक्के उमगलेले असते. तरीही वेळ काढणे आणि साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे राहील याच उद्देशाने रडारड सुरू असते. पण अमेरिकी निवडणूक म्हणजे बालवाडीतला खेळ नव्हे आणि अमेरिकी अध्यक्षपद हे खेळणे नव्हे! तरीही ज्या हट्टाग्रहाने ट्रम्प त्याला कवटाळून बसले आहेत आणि विविध अफलातून सबबी सांगत आहेत, ते त्यांच्या अल्पमतीशी सुसंगतच. मात्र मुद्दा केवळ ट्रम्प यांच्यापुरता मर्यादित नाही. रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प यांना पर्यायी नेतृत्वच उरले नसल्याचा निष्कर्ष सध्याच्या घडामोडींवरून काढता येऊ शकतो. अमेरिकी लोकशाहीसाठी आणि पर्यायाने जगभरातील लोकशाहीवाद्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरते. त्यामुळे या अवस्थेचे विश्लेषण आवश्यक ठरते.

अनेक राज्यांमध्ये निवडणूक गैरप्रकार झाले असून, त्यातून आपल्यावर आणि तुमच्यासारख्या लाखो रिपब्लिकन मतदारांवर अन्याय झाला; निवडणुकीचा निकाल आपल्यावर लादला, असे जेव्हा ट्रम्प म्हणतात, त्या वेळी ते अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशा निवडणूक यंत्रणेवर अविश्वास दाखवत असतात. बहुतेक वृत्तवाहिन्या आपल्या विरोधात असल्यामुळे त्यांची निकालभाकिते ही पूर्वग्रहदूषित आणि खोटी आहेत, असे म्हणणारे ते पहिले अध्यक्ष ठरतात. अमेरिकेत मतमोजणी पूर्ण होण्याआधी प्रमुख वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी निव्वळ मतदानोत्तर पाहणी आणि जनमत कलाच्या जोरावर विजेता जाहीर करण्याची परंपरा आहे. त्यांच्याविषयी आजतागायत एकाही पराभूताने संशय, संदेह व्यक्त केलेला नाही. ट्रम्प तसा तो व्यक्त करतात, त्या वेळी त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील त्यांचे सहकारी काहीच कसे बोलत नाहीत? बायडेन यांचा विजय मान्य करणाऱ्यांची संख्या उणीपुरी चारही भरत नाही. इतर बहुतेक सूचक मौन बाळगून बसलेत. तर काहींनी- ट्रम्प यांच्या मुखातून विजयाचा घास हिरावून घेण्यात आला, या बालिश आरोपाचे समर्थन केलेले दिसते. हे मौन किंवा ट्रम्प यांच्यासाठी व्यक्त झालेला (क्षीण का होईना) पाठिंबा रिपब्लिकन पक्षातील नेतृत्वदारिद्रय़ाचा आणि शुचिताऱ्हासाचा निदर्शक आहे. अशी वेळ त्यांच्यावर कशी आणि का आली?

यासाठी २०१६ पर्यंत मागे जावे लागेल. त्या वेळी ट्रम्प यांना आव्हान देऊ शकेल असा सक्षम उमेदवारच त्या पक्षातून पुढे येऊ शकला नाही. ट्रम्प हे मूळचे बांधकाम व्यावसायिक. ते काही रिपब्लिकन कार्यकर्ते नव्हते. इतर बहुतेक राष्ट्राध्यक्ष जसे गव्हर्नर, सेनेटर, अ‍ॅटर्नी जनरल (हे पद तेथे राजकीय असते) असे टप्पे ओलांडून येतात, तसे काही ट्रम्प यांच्या बाबतीत घडले नव्हते. तरीही त्यांच्या मागे रिपब्लिकन पक्ष उभा राहिला, कारण त्यांच्यासमोर इतर कोणताही पर्याय नव्हता. ट्रम्प यांच्याकडे त्या काळी असलेली धनमाया हाच बहुधा कळीचा मुद्दा ठरला. तो त्या निवडणुकीपुरता ठीक. परंतु ट्रम्प यांना नाही, तरी बहुसंख्य रिपब्लिकन सेनेटर, गव्हर्नर, प्रतिनिधींना अमेरिकी आणि रिपब्लिकन परंपरेचा विसर पडला काय, अशी शंका येते. त्या देशाने आजवर सर्वाधिक रिपब्लिकन अध्यक्ष पाहिले आहेत. गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध निग्रहाने घटनादुरुस्ती करवून घेतलेले अब्राहम लिंकन या परंपरेचे निर्विवाद मेरुमणी. आणखी एक नोंद महत्त्वाची. ट्रम्प यांच्यासह आजवर जे सहा अध्यक्ष फेरनिवडणुकीत पराभूत झाले, ते सर्वच्या सर्व रिपब्लिकन होते. ट्रम्प वगळता इतर पाचांनी निवडणूक निकालावर, निवडणूक यंत्रणेवर वा प्रतिस्पध्र्यावर आरोप केले नाहीत. अमेरिकी अध्यक्षपदाइतकीच तेथील सत्तासंक्रमणाची परंपराही मोठी आहे. इतर कोणत्याही लोकशाही देशात पराभूत किंवा मावळता प्रमुख इतका काळ सत्तापदावर राहात नाही. कारण सत्ता सुपूर्द करण्यासाठी आवश्यक परिपक्वता आणि नैतिक शहाणपण अमेरिकेत अध्याहृत धरलेले असते. ट्रम्प या परंपरेला सणसणीत अपवाद ठरले याबद्दल केवळ त्यांना नव्हे, तर रिपब्लिकन पक्षालाही दोषी ठरवावे लागेल. कारण अमेरिकी निवडणूक यंत्रणेवर संशय व्यक्त करून सत्तासंक्रमणच धोक्यात आणण्याचे पातक ट्रम्प यांच्याइतकेच त्यांच्याही माथी फोडले जाईल.

वास्तविक इतके निराश होण्याची किंवा ट्रम्प यांच्यासारख्या आत्मकेंद्री, आढय़ताखोर आणि लोकशाही परंपरांविषयी तुच्छता बाळगणाऱ्या व्यक्तीला घट्ट पकडून ठेवण्याची रिपब्लिकनांना तशी आवश्यकता नाही. अध्यक्षीय निवडणुकीत प्रातिनिधिक मते कमी पडली, तरी आजवरच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची जनप्रिय मते ट्रम्प यांना मिळालीच आहेत. प्रतिनिधिगृहासाठी झालेल्या काही लढतींमध्ये रिपब्लिकनांनी डेमोक्रॅट्सचे वर्चस्व घटवले आहे. शिवाय सेनेटमध्येही आपल्या जागा बऱ्याच प्रमाणात राखलेल्या आहेत. जनतेने भरभरून मते दिली तरी ती लोकशाही परंपरा आणि मूल्ये चुरगाळून टाकण्याची मोकळीक वा संमती नव्हे, हे उमगण्याइतका एकही शहाणा रिपब्लिकन पक्षात उरलेला नाही ही बाब त्या पक्षाच्या ऱ्हासपर्वाची निदर्शक ठरते. या संदर्भात नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला घडलेल्या एका घटनेचा दाखला देणे उचित ठरेल. सन २००० मध्ये रिपब्लिकन धाकटे जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅट अल्बर्ट गोर यांच्यातील निवडणूक फ्लोरिडातील निकालापुरती अधांतरी होती, तेव्हाची ही घटना. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशी गोपनीय माहिती तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन आणि उपाध्यक्ष असलेले गोर यांना रोजच्या रोज पुरवली जायची. बुश आगामी अध्यक्ष बनतील, अशी अटकळ बांधून क्लिंटन यांनी त्या दिवसांमध्ये बुश यांच्यापर्यंतही ही माहिती पोहोचेल ही व्यवस्था केली. लवकरच फ्लोरिडातील निकाल लागून बुश अध्यक्ष बनले. क्लिंटन हेही डेमोक्रॅट होते, परंतु त्यांनी राष्ट्रहितासमोर क्षुल्लक पक्षीय राजकारणाला फाटा दिला. नवीन अध्यक्षाला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील माहिती सुरुवातीपासूनच पूर्ण ज्ञात असलेली बरी, असा सद्विचार क्लिंटन यांनी केला. ट्रम्प त्या उंचीचेच नाहीत! त्यामुळे अजूनपर्यंत अशी गोपनीय माहिती त्यांनी बायडेन यांच्यापर्यंत पोहोचू दिलेली नाही. ट्रम्प यांच्या विलक्षण कोतेपणाची हद्द म्हणजे, बायडेन यांच्यासाठी व्हाइट हाऊस रिते करण्याची प्रक्रियाही त्यांनी सुरू केलेली नाही. त्याऐवजी जवळपास अर्धा डझन राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांतील काही निकालातही निघाल्या, तरी असा आचरटपणा करण्यापासून ट्रम्प यांना रोखण्याची तसदी रिपब्लिकन नेत्यांनी घेतलेली नाही. एकाही आरोपादाखल ट्रम्प यांनी पुरावे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता कमीच. परंतु सध्याचे रिपब्लिकन नेतृत्वदारिद्रय़ पाहता, २०२४ मध्ये अध्यक्षपदाची रिपब्लिकन उमेदवारी ट्रम्प यांनाच मिळाली, तर आश्चर्य वाटायला नको. रिपब्लिकन ऱ्हासपर्वाची ती परमावधी ठरेल!