आयात शुल्क वाढविण्याचे ट्रम्प यांचे धोरण म्हणजे जागतिक व्यापारयुद्धाची सुरुवात, या भीतीनेच बाजार गळाठले..

देहदर्शन आणि तत्संबंधी अन्य उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका मदनिकेने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाजूक आरोप करावेत आणि त्याच दिवशी ट्रम्प यांचे अर्थसल्लागार गॅरी कोहेन यांनी पदत्याग करावा या दोन घटनांचा अर्थाअर्थी संबंध नाही. परंतु या दोनही घटना एकाच व्यक्तीशी निगडित असल्याने त्यामागील बेमुर्वतखोरी आणि साहसवाद हा दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. यापैकी पहिली घटना भाष्य करण्याच्या लायकीची नाही आणि दुसरीबाबत जागतिक पातळीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून देशोदेशींचे बाजार त्यामुळे कोसळल्याने त्याची दखल घेणे अगत्याचे ठरते.

कोहेन हे ट्रम्प यांचे सर्वात ज्येष्ठ आर्थिक सल्लागार. विचाराने मूळचे डेमोक्रॅटिक. गोल्डमन सॅक्स या जगातील सर्वात बलाढय़ बँकेच्या सेवेत ते बराच काळ होते. जागतिकीकरण आणि मुक्त व्यापार व्यवस्थापन यांचे ते खंदे समर्थक. गेली १४ महिने ते व्हाइट हाऊसच्या सेवेत ट्रम्प यांना अर्थसल्ला देण्याची जबाबदारी पेलत होते. वास्तविक ट्रम्प यांना सल्ला देणे आणि विस्तवावरून चालणे यापैकी दुसरे अधिक सहनीय वाटावे अशी परिस्थिती. कोहेन यांनी ती कशीबशी हाताळली. पण फारच झेपेनासे झाल्यावर त्यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. या धक्क्याने जागतिक अर्थक्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून त्यामुळे अनेक देशांचे भांडवली बाजार घसरगुंडी अनुभवत आहेत. याचे कारण कोहेन यांची गच्छंती ही प्रतीक आहे. ट्रम्प जो आर्थिक विचार राबवू पाहतात त्यात त्यांना यश येणे म्हणजे कोहेन यांचे जाणे, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. याचे कारण ट्रम्प यांच्या अर्थनीतीस खुद्द कोहेन यांचा तीव्र विरोध होता. जागतिकीकरणाचे चक्र पुन्हा उलटे फिरवण्याकडे ट्रम्प यांचा कल असून जगातील अनेक अर्थतज्ज्ञांप्रमाणे हे धोरण कोहेन यांना मंजूर नाही. परंतु ट्रम्प आणि कोहेन यांच्यातील मतभेदाचा हा पहिलाच प्रसंग नव्हे. याआधी गतसाली पॅरिस येथील वसुंधरा परिषदेत ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली ती देखील कोहेन यांच्यासारख्यांच्या मताविरुद्ध होती. या पॅरिस करारातून बाहेर पडावे असे ट्रम्प यांचे मत. तर तसे करणे कोहेन यांना नामंजूर. असे केल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल ते होईलच. पण जगाचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेने अशी पळवाट काढता कामा नये, असे त्यांचे मत. त्याकडे अर्थातच ट्रम्प यांनी दुर्लक्ष केले आणि या करारातून अमेरिकेस वेगळे काढण्याची भाषा केली. त्याच वेळी खरे तर कोहेन हे अध्यक्ष ट्रम्प यांच्यापासून दूर जाण्यास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात विविध विषयांवर ट्रम्प यांनी तोडलेल्या ताऱ्यांमुळे या प्रक्रियेस गती आली आणि त्याची परिणती कोहेन यांच्या राजीनाम्यात झाली.

कोहेन यांच्या राजीनाम्यामागे आहे ट्रम्प यांचा पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम यावर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय. अमेरिकेच्या मुक्त व्यापार धोरणाचा फायदा अमेरिकेपेक्षा अन्यच देशांना जास्त होतो, अशी ट्रम्प यांची धारणा असून त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या परदेशी मालांवर मोठे आयात शुल्क आकारायला हवे असे त्यांचे म्हणणे. हे ट्रम्प यांच्या एकंदरच हास्यास्पद समजशक्तीस साजेसेच. वास्तविक या संदर्भात अनेक जणांचे अभ्यास अहवाल प्रदर्शित झालेले आहेत. परंतु या असल्या अभ्यासांवर वगैरे ट्रम्प यांचा विश्वास नाही. ते स्वत:स स्वयंभू मानणाऱ्या नेत्यांच्या पिढीचे. स्वयंभू असल्यामुळे कोणत्याच विषयांवर तज्ज्ञांची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. याच स्वयंभू वृत्तीने त्यांनी पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियम या दोन खनिजांवर आयात शुल्क वाढवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. ट्रम्प इतके आत्मसिद्ध की इतक्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आपल्या आर्थिक सल्लागाराशी बोलावे असे काही त्यांना वाटले नाही. कोहेन यांना अंधारात ठेवूनच ट्रम्प यांनी हे शुल्क वाढवण्याचे ठरवले. अशा परिस्थितीत या पदावर अधिक काळ राहणे कोहेन यांना अप्रस्तुत वाटले असल्यास नवल नाही. तेव्हा त्यांनी राजीनामा देणे हे अगदी रास्तच म्हणावे लागेल.

कारण आत्मसन्मान वगैरे असे काही कारण कोहेन यांच्या राजीनाम्यामागे नाही. आयात शुल्क वाढवताना ट्रम्प यांनी आपणास विचारलेही नाही, हा मुद्दादेखील त्यांच्या लेखी महत्त्वाचा नाही. कोहेन यांचा एकूणच विरोध आहे तो ट्रम्प यांच्या व्यापार धोरणास. आयात शुल्क वाढवण्याचा मार्ग निवडणे म्हणजे देशांतर्गत उत्पादकांना उगाचच चुचकारणे असे मानणाऱ्या वर्गाचे कोहेन हे प्रतिनिधी. देशांतर्गत उत्पादकांना जागतिक स्पर्धेस तोंड द्यावे लागले तर ते अधिक कार्यक्षम होतात, त्यांचा दर्जा वाढतो आणि उत्पादन खर्चही कमी होतो, असे अन्य अनेक अर्थतज्ज्ञांप्रमाणे कोहेन मानतात. त्यामुळे ट्रम्प यांचे हे सुरक्षावादी धोरण त्यांना मंजूर नाही. या असल्या सुरक्षावादी धोरणांमुळे अकार्यक्षमतेलाच खतपाणी मिळते हे त्यांचे म्हणणे रास्त आहे. या संदर्भात कोहेन यांच्या विचारधारेस अनुकूल असे काही तपशील प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे निष्कर्ष लक्षात घेणे समयोचित ठरावे. अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या पोलादावर प्रति टन १० डॉलरने आयात शुल्क वाढवले तर नव्याने एक हजार जणांना रोजगार मिळतात. परंतु याच वाढीव आयात शुल्काच्या दुष्परिणामामुळे भाववाढ आदी होऊन जे काही घडते त्यामुळे पाच हजार जणांना रोजगारास मुकावे लागते, असे काही अमेरिकी पाहणीचेच निष्कर्ष आहेत. खेरीज या अशा एकतर्फी आयात शुल्कवाढीमुळे मित्र देशांनाच अधिक फटका बसतो आणि शत्रुराष्ट्रे अमेरिकी वस्तूंवर आयात वाढवण्याचा मार्ग चोखाळतात. आता नेमके तसेच होत आहे. कॅनडा हा अमेरिकेचा सर्वात मोठा पोलाद पुरवठादार. तसेच हा देश अमेरिकेचा सर्वात जवळचा शेजारीदेखील. पोलादावरील आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाचा फटका त्याच देशाला सर्वाधिक बसणार असून त्या खालोखाल युरोपीय देशांतही या मुद्दय़ावर नाराजी निर्माण झाली आहे. ट्रम्प यांना आयात शुल्क वाढवावयाची गरज भासली ती चीन या व्यापार प्रतिस्पर्धी देशास नामोहरम करता यावे यासाठी. परंतु चीनपेक्षा अमेरिकेच्या मित्रदेशांनाच या निर्णयाचे दुष्परिणाम अधिक सहन करावे लागणार आहेत.

ट्रम्प यांना अर्थातच याची काही फिकीर नाही. ते आपल्याच मस्तीत आहेत. आपल्या निर्णयामुळे नव्या व्यापारयुद्धाचा धोका आहे, याची त्यांस जाणीवही नाही. इतकेच नाही तर व्यापारयुद्धे मला आवडतात,असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यावरून त्यांची बेमुर्वतखोरी कळावी. अमेरिकेस प्रत्त्युत्तर म्हणून डेनिम कापडाचे काही विख्यात ब्रॅण्ड्स, हार्ले डेव्हिडसनसारखी श्रीमंती दुचाकी अशा अमेरिकी उत्पादनांवर युरोपात जबर करआकारणी करण्याचा इशारा युरोपीय संघाने दिला आहे. चीननेदेखील अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे. जर्मनीने तर ट्रम्प यांच्या विरोधात चांगलीच आघाडी उघडली आहे. यातील संभाव्य धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ख्रिस्तिन लगार्द यांनी दिलेले उत्तर हे शहाणपणाचे आणि वास्तववादी आहे. व्यापारयुद्धात विजेता कोणीच नसतो, पण पराजय मात्र सर्वाचा होतो, अशा शब्दांत लगार्द  यांनी ट्रम्प यांना उत्तर दिले.  यातील शहाणपण किती प्रमाणात ट्रम्प यांच्यापर्यंत जाईल हा प्रश्नच आहे. अन्यथा आपण सर्वच या युद्धात हरणार यात शंका नाही. तूर्त तरी परिस्थिती तशीच दिसते.