तेल अविव येथील अमेरिकेचा दूतावास आता जेरुसलेम येथे हलविण्याचा ट्रम्प यांचा निर्णय अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे..

शीर्षस्थ पदांवरील व्यक्ती ‘काही तरी’ करून दाखवण्याच्या प्रेमात एकदा का पडली की सारासारविवेक हरवते आणि काहीही करू शकते हे खरेच. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली ही बाब पुन्हा एकदा स्वत:च्या कृतीतून जगास पटवून देण्याचा चंग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधलेला दिसतो. अन्यथा कोणताही किमान शहाणा इसम इस्रायलमधील आपला दूतावास तेल अविव येथून हलवून जेरुसलेम येथे नेण्याचा निर्णय घेताच ना. इस्रायलचा जन्म झाल्यापासून त्या देशाच्या आर्थिक राजधानीत, म्हणजे तेल अविव या शहरात अमेरिकेचा दूतावास आहे. त्यामागे अनेक राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. परंतु ट्रम्प या सगळ्यांकडे दुर्लक्ष करू इच्छितात. अमेरिकेचा आणि जगाचाही इतिहास आपल्यापासूनच सुरू होतो, असा त्यांचा भ्रम असावा. त्याचमुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा जेरुसलेम येथे अमेरिकी दूतावास हलविण्याच्या निर्णयाचे सूतोवाच केले. त्या वेळी आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या क्षेत्रास बसलेला धक्का बराच काळ टिकला. पण, ‘‘ट्रम्प हे केवळ असे बोलले असतील, पण प्रत्यक्षात ते इतके टोकाचे काही करणार नाहीत,’’ ही एक आशा त्यानंतर टिकून होती. ती आता धुळीस मिळाली. कारण आपली ती इच्छा प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला असून ते त्याबाबतचा आदेश प्रसृत करणार आहेत. हे भयानक आणि भीतीदायक आहे. का, ते समजून घ्यायला हवे.

याचे कारण १९४८ साली जेव्हा इस्रायलची नाळ ब्रिटिश साम्राज्यापासून अधिकृतपणे तुटली तेव्हादेखील ती देश प्रसूती नैसर्गिक नव्हती. जॉर्डन नदीच्या तीरावर यहुदींची पवित्र भूमी आहे, या मोझेस या प्रेषिताच्या बायबलपूर्व आदेशाचे पालन डेव्हिड बेन गुरियन यांनी केले आणि अमेरिकेच्या मदतीवर जगभरातील यहुदींना त्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा आदेश दिला. त्यानंतर जगभरातून अक्षरश: लाखो यहुदी तेथे आले आणि त्यानंतरच्या संघर्षांत इस्रायल या देशाचा जन्म झाला. वास्तविक या प्रदेशावर इस्रायलींइतकाच पॅलेस्टिनींचाही हक्क. ज्या वेळी इस्रायल देश म्हणून जन्म घेत होते त्या वेळी जेरुसलेमवर जॉर्डन या देशाची मालकी होती. साम्यवादी उठावानंतर पुढे ज्याप्रमाणे जर्मनीतील बर्लिन विभागले गेले त्याप्रमाणे जेरुसलेम हे शहरदेखील इस्रायली आणि जॉर्डेनियन यांच्यात वाटले गेले. जगातील अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या शहरांतील एक असे हे शहर. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेथलेहेम येथे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि जेरुसलेम येथे ‘अखेरचे भोजन’ घेऊन तो आकाशाकडे मार्गस्थ झाला. त्याचप्रमाणे शेजारील टेकडीवरील हराम अल शरीफ टेकडीवरील अल अक्सा मशिदीतून इस्लाम धर्माचा प्रेषित महंमद पैगंबर हादेखील स्वर्गाकडे रवाना झाला. इस्लाम धर्मीयांसाठी जगातील हे तिसरे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण. खेरीज यहुदींसाठी अतिशय पवित्र अशी वेस्टर्न वॉल या टेकडीच्या पायाशी. म्हणजे ख्रिश्चन, मुसलमान आणि यहुदी या तीन धर्मीयांसाठी हे एकच स्थळ धर्मदृष्टय़ा कमालीचे महत्त्वाचे. त्याचमुळे १९४८ साली इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर या शहराचे व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली राखले जाईल असे ठरले. परंतु १९६७ साली इस्रायलने एकतर्फी लष्करी कारवाई करून हा भाग बळजबरीने आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून पूर्व जेरुसलेमवर इस्रायल सरकारचेच नियंत्रण आहे. या देशाच्या दांडगाईस अमेरिकेने आपल्या आंतरदेशीय राजकारणासाठी नेहमीच पाठीस घातले. त्यामुळे इस्रायलची पुंडाई वाढत गेली आणि हा देश हळूहळू आसपासचा प्रदेश बळकावतच गेला. इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांनी लष्करप्रमुख असताना अल अक्सा मशिदीवर केलेल्या अश्लाघ्य कारवाईनंतर पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष चांगलाच चिघळत गेला आणि पश्चिम आशियाच्या आखातात हिंसाचाराचा नंगानाच सुरू झाला. प्रसारमाध्यमे आणि प्रचार यंत्रणांवर कमालीचे नियंत्रण असल्याने जागतिक पातळीवर इस्रायल हा नेहमी गरीब, बिच्चारा रंगवला जातो. वस्तुस्थिती तशी नाही. या देशाने अमेरिकेच्या डोक्यावर बसून सारा आसमंतच आपल्या कह्य़ात राहील अशी व्यवस्था केली आहे, हे वास्तव आहे. आताही या शहरात मोठय़ा प्रमाणात पॅलेस्टिनी आणि अरब राहतात. परंतु त्यांना समान वागणूक नसते. त्यांना आश्रित म्हटले जात नाही, इतकेच. परंतु त्यांना दिली जाणारी वागणूक ही इस्रायलींच्या तुलनेत दुय्यम असते आणि पालिका प्रशासन मनात येईल तेव्हा वा कोणत्याही संशयावरून त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार काढून घेते. खेरीज पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांना विभागणारी प्रचंड भिंत हा बिगरयहुदींसाठी मोठा अडथळा आहेच. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने इतके दिवस एक संकेत सातत्याने पाळला.

तो म्हणजे जेरुसलेमवर इस्रायलचा मालकी दावा कधीही मान्य केला नाही. कारण तसा तो एकदा केला की इस्लाम धर्मीयांना मुद्दाम डिवचल्यासारखे होईल आणि त्यातून हिंसाचाराचा भडका उडेल याची अमेरिकेस असलेली जाण. आतापर्यंत अरबांशी झालेल्या विविध युद्धांत अमेरिकेने अर्थातच इस्रायलची तळी उचलली. त्यातूनच १९७३-७४ सालातील अरब देशांचा अमेरिकेवरील तेल बहिष्कार घडला. अमेरिका अरब देशांकडून तेल तर घेणार आणि त्याच अरब देशांविरोधात इस्रायलला मदत करणार, असे वारंवार घडत गेले. त्यामुळे अमेरिका आणि अरब देश यांच्यात इस्रायलच्या मुद्दय़ावर कायमच तणाव राहिला. २०१६ सालापासून यात लक्षणीय बदल घडेल अशी परिस्थिती निर्माण झाली. ती म्हणजे अमेरिका इंधनाच्या खनिज तेलाबाबत स्वयंपूर्ण बनली. समुद्राच्या तळाखाली कित्येक किलोमीटरवर दडून बसलेले तेलकण हुडकून काढण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेने विकसित केले. त्यात, त्या देशात तसेच शेजारील कॅनडा आणि मेक्सिकोच्या सामुद्रधुनीत मोठे तेलसाठे आढळून आले. परिणामी अमेरिकेचे अरबांवरील अवलंबित्व संपले. असे झाले तरीही अमेरिकेत जोपर्यंत बराक ओबामा यांच्यासारखे संतुलित नेतृत्व होते तोपर्यंत त्यांनी इस्रायलला मोकळीक मिळणार नाही, याची काळजी घेतली.

परंतु गतसाली ट्रम्प सत्तेवर आले आणि सगळ्याच संतुलनाचे बारा वाजले. सामान्य ज्ञान वा शहाणपण हा दैवी गुण वाटावा असे त्यांचे वर्तन. त्यामुळे रशिया असो वा पश्चिम आशिया. ट्रम्प यांनी मनास येईल ते करावयास सुरुवात केली. त्यात त्यांचा जावई जेराड कुशनेर हा त्यांचा पश्चिम आशियाविषयक सल्लागार. म्हणजे जणू माकडाहाती कोलीतच. या कुशनेर याने अलीकडेच सौदी राजपुत्र सलमान यास फितवून त्या देशातील सत्ता समीकरणच बदलून टाकले. तेही एक वेळ ठीक मानता आले असते, परंतु आता त्याच जावयाच्या नादास लागून ट्रम्प जेरुसलेमचा निर्णय घेऊ पाहतात. म्हणजे एकाच वेळी सौदी अरेबिया आणि इस्रायल या दोन्हीही देशांत अशांततेची हमीच. हा निर्णय किती धोकादायक ठरेल हे जॉर्डन आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांनी सूचित केले आहे. परंतु आपण आपल्या जावयाचा मित्र सौदी राजपुत्र सलमान यास इस्रायलच्या मुद्दय़ावर शांत करू शकतो, असे ट्रम्प यांना वाटते. हे असे वाटणे हा तद्दन मूर्खपणा आहे. कारण धर्माच्या प्रश्नाचा समंध एकदा का बाटलीतून निघाला की त्यास पुन्हा जेरबंद करण्याची ताकद ना या राजपुत्रात आहे ना ट्रम्प यांच्यात. तसे झाल्यास पश्चिम आशियाची पुन्हा वाताहतच होईल.

उद्ध्वस्ततेच्या उंबरठय़ावर असलेला येमेन, उद्ध्वस्त झालेला सीरिया, अशांत सौदी, अस्थिर इराक, प्रक्षुब्ध इराण, संतप्त ओमान आणि हे कमी म्हणून की काय जेरुसलेमच्या निद्रिस्त ज्वालामुखीस डिवचणारा ट्रम्प यांचा निर्णय. अशा वेळी

बर्बाद गुलिस्ताँ करने को तो, एक ही उल्लू काफी था,

यहां हर शाख पे उल्लू बठा है, अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा?

असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर तूर्त तरी कोणाकडे नाही, हे आपले शोचनीय वास्तव.