03 June 2020

News Flash

पातळीचे प्रमाण..

सारेजण राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून जनतेची सेवा हेच प्रत्येक नेत्याचे ध्येय आहे,

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रचाराची पातळी सात वर्षांपूर्वी ज्या स्तरावर होती, ती आज घसरली आहे असे मतदारांस वाटले तरी नेते सहमत होतीलच असे नाही..

समाजमाध्यमे, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणीच्या तमाम वृत्तवाहिन्या आणि गल्लोगल्लीच्या सभांमधील सततच्या प्रचारामुळे जागा होऊन अखेर ‘लोकशाहीचा धागा’ झालेला मतदारराजा सकाळीच डोळे चोळत घराबाहेर पडला असता, अचानक त्याचाही पाय घसरला आणि आपण चांगलेच तोंडावर आपटलो असल्याची जाणीव त्याला झाली, पण टांगा मात्र वरच असल्याचे लक्षात येताच त्याला आनंदही झाला. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने अजूनही आपण लोकशाहीचा धागा आहोत, हे लक्षात येऊन तो सावरला. त्याने मान वळवून वर पाहिले. प्रचाराच्या रणधुमाळीत रंगलेले सारेजण वरूनच आपल्याकडे पाहात आहेत, हातवारे करून पुन्हा वर येण्याची विनवणी करत आहेत, असा भासही त्याला झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्यासाठी, तमाम मतदारराजांसाठी, काही ना काही आश्वासक लिहिलेले आहे, याची त्याला जाणीव झाली. सारेजण राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून जनतेची सेवा हेच प्रत्येक नेत्याचे ध्येय आहे, हेदेखील त्याला जाणवले, आणि तो विचार करू लागला : गेल्या दोनचार महिन्यांत याच नेत्यांनी मतदारास खूश करण्यासाठी एकमेकांचा खरपूस वगैरे समाचार घेत आपली पातळी सोडली होती. आता आपण घसरून ज्या पातळीवर येऊन थांबलो आहोत, ती घसरगुंडी या नेत्यांनीच आपल्यासाठी गुळगुळीत करून ठेवली आहे, याची जाणीवही त्याला झाली, आणि मतदारराजा खंतावला.. त्याने मनातल्या मनात जुन्या आठवणींची उजळणी केली, आणि घसरल्या जागी नीट बसून तो आठवणींची ती पाने चाळू लागला..

मग त्याला जाणवले, प्रत्येक निवडणुकीतच प्रचाराची पातळी घसरत असल्याने, तो गांभीर्याने घेण्यासारखा मुद्दाच राहिलेला नसतानाही, पातळीची चर्चा होतच असते. पातळी घसरणे हा सार्वजनिक जीवनातील नैतिकतेशी संबंधित मुद्दा असला तरी, निवडणूक काळात नैतिकतेबाबत किती अपेक्षा असायला हव्यात याचा कोणताच मापदंड सामान्य मतदारासाठी निश्चित झालेला नाही. त्यामुळेच, प्रचाराची पातळी घसरली असे सामान्य मतदार  मानतो, तेव्हा नेतेमंडळी त्याच्याशी सहमत होतातच असे नाही. ज्या पातळीच्या स्तराशी आज आहोत, त्याच्याही खाली अनेक स्तर आहेत, याची आत्मविश्वासपूर्ण खात्रीच या नेतेमंडळींना असते, असेही त्याच्या लक्षात आले, आणि पातळी घसरल्याबद्दल मतदारराजा म्हणून हक्काने आपण नेतमंडळींना दूषणे देत असलो, तरी पातळीचे प्रमाण म्हणावे तितके घसरलेलेच नसते अशीच नेतेमंडळींची भावना असते, हेही त्याला कळून चुकले. यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी फारच कमी दिवस मिळाल्याने, कितीही पातळी घसरली असली, तरी घसरण्याच्या कमाल स्तरापर्यंत पोहोचणे कोणासच शक्य झाले नसणार, हेही त्याला जाणवले. प्रचारासाठी कमी अवधी देऊन पातळीच्या शेवटच्या स्तरापर्यंत घसरण्याची संधी न दिल्याबद्दल त्याने मनोमन निवडणूक आयोगाचे आभारही मानले..

प्रत्येक नेता स्वत:स ‘जाणता राजा’ समजत असल्याने, रयतेच्या मनाची नाडी आपणासच गवसली असून कोणत्या जनतेसमोर काय बोलावे, याची त्याला पुरेपूर कल्पना असते. हे मतदारराजाही जाणून असतो. म्हणूनच, कोणता नेता कोठे काय बोलेल, याचा पक्का अंदाजही त्याला असतो. खेडय़ापाडय़ातल्या सभेत कोणता नेता काय बोलणार याची उत्सुकता असल्याने जनताही त्यांच्या तोंडचे ‘ते वाक्य’ ऐकण्यासाठीच ‘जिवाचे कान’ करून जमा झालेली आहे असा या नेत्यांचा पक्का समज असतो. मनासारखा श्रोतृवृंद आपल्या रसवंतीचा आस्वाद घेण्यासाठी उतावीळ असल्याचे जाणवते, आणि जिभेला तसे काही बोलण्याचा मोह आवरेनासा होतो. हावभाव शिगेला पोहोचतात..मग अशा सिद्ध व्यासपीठावरून कुणी कुणाचे धोतर फेडण्याचे आश्वासन देऊन जनतेला खूश करतो.. अशा वाक्यांना टाळ्या-हशांचा पाऊस पडल्यावर, आपल्या याच वाक्याची ‘बातमी’ होणार याची त्याला खात्री असते..असे काही झाले, की याहूनही खालची पातळी आपण गाठू शकतो, हे दाखविण्यासाठी जाणकार नेतेही पुढे सरसावतात. ‘४० वर्षे काय गवत उपटले काय,’ असा साभिनय सवाल करतात, आणि सभेचा उत्फुल्ल प्रतिसाद मिळाल्याचे समाधान त्यांनाही जाणवू लागते. असे काही केले की टाळ्या पडतात, हशा फुटतो हे लक्षात येते, आणि कोणे एके काळी आपणही सुसंस्कृत वगैरे होतो हे विसरून, खालच्या पातळीच्या विरोधकांना जेरबंद करण्यासाठी आणखी खालची पातळी कोणती गाठता येईल याचा शोध सुरू होतो.. सभाशास्त्राचा एक नियम असतो. श्रोत्यांना केवळ विचार ऐकायचे नसतात. आजकाल माध्यमेही दृक्श्राव्य वगैरे झालेली असल्याने, कानांएवढेच महत्त्व डोळ्यांनाही असते. अशा वेळी शब्दांना परिणामकारक हावभावांची जोड दिली, की त्याचा प्रभाव जनमानसावर पडतो, हे जाणकारांच्याही नव्याने लक्षात आलेले असते. परिणाम साधतो, आणि लगोलग समाजमाध्यमांवर तो व्हिडीओ ‘व्हायरल’ होतो. लाखो लोकांपर्यंत पोहोचतो, आणि तो पाहताना, ‘प्रचाराची पातळी घसरली’ असा ‘खेदपूर्ण’ विचार, ‘लोकशाहीचा धागा’ झालेला मतदार करू लागतो. मग, दुसऱ्या दिवशी, त्या हावभावांच्या बातमीसोबत, ‘पातळी घसरल्याच्या’ बातम्या सुरू होतात..

असे झाले की नेहमीचे कलावंतही जागे होतात. माय भवानी, छत्रपती, मावळे, मोगल, छावा, बछडा, औलाद, भगवा, हिरवा, मर्द-नामर्द, कुत्रा, डुक्कर, साप, गाढव अशा नेहमी वापरावयाच्या शेलक्या शब्दांसोबत ‘डूब मरो’सारख्या अनवट सल्ल्यांची पखरण सुरू होते.. हा पातळीचा एक आगळा प्रकार आहे, हे एव्हाना मतदारराजास सवयीने माहीत झालेले असते. त्याची मजा लुटण्यातही आनंद आहे, असे त्याला वाटू लागते. कुणाला ‘नाच्या’ आठवतो, तर कुणाला ‘पिस्तुल्या’ची आठवण येते..  कुणी ‘चड्डीत राहा’ असा दम भरतो..

अशा रीतीने एकंदरीतच पातळी घसरल्यामुळे प्रचारास रंग चढलेला असतानाच, मतदारराजाही गुंग होऊन जातो. मग निवडणूक ही हसवणूक आहे, असे वाटू लागते. कधी फसवणूकही वाटू लागते, आणि जाहीर सभांमध्ये जीभ घसरू देणारा उमेदवार विनवणूक करू लागला, की मतदारराजाची करमणूकही होते.. ज्यांनी आपली पिळवणूक केली, जागोजागी अडवणूक केली, जनतेची रडवणूक केली, पाच वर्षे ज्यांच्यामुळे आपली फसवणूक झाली तेच नव्या प्रचार मोहिमांतून आपली करमणूक करीत असल्याचे पाहून मतदारराजा जुने सारे विसरून जातो, आणि घसरत्या पातळीशी एकरूप होऊन निकालाकडे डोळे लावून बसतो.. एकदा निकाल लागला, की जी कोणती मिरवणूक सुरू होईल, त्यात आपणही नाचायचे आहे, हेही तो ठरवून टाकतो.. मग घसरून पडलेल्या जागीच तो स्वत:स सावरतो, आणि वर गेलेल्या टांगा व्यवस्थित जमिनीवर ठेवून पुन्हा नव्या आशेने उभा राहतो.. ‘प्रचाराची पातळी प्रमाणाबाहेर घसरली आहे असे आपणास वाटत नाही,’ हे सात वर्षांपूर्वी ‘जाणत्या राजा’ने काढलेले उद्गार त्याला आता आश्वासक वाटतात, आणि आसपास सावधपणे पाहत, मनातल्या मनात तो त्याच्याशी सहमतही होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 1:01 am

Web Title: dropping level of election campaign in maharashtra assembly elections zws 70
Next Stories
1 किती काळ भूतकाळ?
2 नक्की कोणते सावरकर?
3 नोबेलमागची गरिबी
Just Now!
X