News Flash

‘अलीबाबा’ आणि ४० वर्षे!

‘समृद्धी हे पाप नव्हे’ असे मानून ४० वर्षांपूर्वी- १८ डिसेंबर १९७८ रोजी चीनमध्ये आर्थिक सुधारणांची नांदी झाली.. त्याची फळे आज दिसत आहेत!

‘समृद्धी हे पाप नव्हे’ असे मानून ४० वर्षांपूर्वी- १८ डिसेंबर १९७८ रोजी चीनमध्ये आर्थिक सुधारणांची नांदी झाली.. त्याची फळे आज दिसत आहेत!

रूढार्थाने लोकशाही व्यवस्था नसलेल्या, कधीही सार्वत्रिक निवडणुका न घेतलेल्या एखाद्या देशाने गेल्या शतकाच्या उत्तरार्धात कृषीप्रधान व्यवस्था सोडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात उडी घेऊन गेल्या ४० वर्षांमध्ये काही कोटी जनतेला गरिबीरेषेच्या वर आणणे आणि जगातील एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येणे निव्वळ अशक्य आणि कल्पनातीत होते. आपल्या शेजारी देशाने- चीनने हा चमत्कार करून दाखवला. सत्य हे कल्पिताहूनही काही वेळेला अद्भुत असते या उक्तीचे इतके समर्पक उदाहरण दुसरे नाही. आज जगातील सर्वाधिक महाजाल जोडण्या, जगातील सर्वाधिक लांबीचे रस्ते, जगातील सर्वाधिक लांबीचे अतिजलद लोहमार्ग आणि सर्वाधिक शहरीकरण झालेला चीन, हा एके काळचा रोगराईग्रस्त, टंचाईग्रस्त देश. उत्पादन क्षेत्रात प्रचंड प्रमाणात भांडवली व मानवी गुंतवणूक करून काय चमत्कार साधता येतो, हे चीनने दाखवून दिले. (कृषीप्रधान ते आयटीप्रधान अशा बाह्य़वळणाने गेलेल्या भारताच्या हे अजूनही अंगवळणी पडलेले नाही!) त्यामुळे जवळपास बहुतेक आफ्रिका, मध्य आशिया, आग्नेय आशिया, पूर्व युरोप या टापूंमध्ये चिनी माल किंवा उत्पादनांनी बाजारपेठा भरून वाहत आहेत. येथील बहुतेक मोठे बांधकाम प्रकल्प हे चिनी गुंतवणूक, चिनी अभियंत्यांच्या मदतीने उभारले जात आहेत. २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना खीळ बसली होती, त्या वेळी ती संधी आणि पोकळी स्वत:च्या उत्थानासाठी वापरून घेण्याची क्षमता आणि कल्पकता चीनने दाखवली. विस्तारवाद केवळ राजकीय किंवा सामरिक मार्गाने नव्हे, तर आर्थिक मार्गानेही साधता येतो, हे चीनच्या ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ प्रकल्पातून दिसून येते आहे. याला काही जण सावकारी वसाहतवाद असे संबोधतात. लोकशाही वा राजकीय निवडस्वातंत्र्याच्या अभावाबद्दल चीनवर नेहमीच टीका होते. एकाधिकारशाही आणि दडपशाही अशा दोन हातांनी वर्तमान, समृद्ध चीनला घडवले हा तर नेहमीचाच आक्षेप. परंतु चीनच्या उदारीकरणाचे आणि जागतिकीकरणाचे प्रणेते डेंग ज्यावफंग यांच्यापासून प्रत्येक नेत्याने चिनी (आणि वैयक्तिकही) हितसंबंधांसमोर इतर सर्व मुद्दे गौण मानले. या वाटचालीचे नैतिक लेखापरीक्षण करण्याआधी ती सुरू कशी झाली याचा धांडोळा घेणे समयोचित ठरेल.

बीजिंगमध्ये ४० वर्षांपूर्वी म्हणजे १८ डिसेंबर १९७८ रोजी कम्युनिस्ट नेते डेंग ज्यावफंग यांनी पक्षाच्या शिखर बैठकीत बंदिस्त कृषीप्रधान अर्थव्यवस्था त्यजून मर्यादित मुक्त आणि उद्योगप्रधान, व्यवसायप्रधान अर्थव्यवस्थेचा नारा दिला. हा दिवस चीनच्याच नव्हे, तर आधुनिक काळाच्या मानवी इतिहासातही महत्त्वाचा ठरतो. या बैठकीत डेंग ज्यावफंग जे काही बोलले, त्याचा मथितार्थ हा होता – ‘शेतीइतकाच उद्योग-व्यवसाय महत्त्वाचा आणि समृद्धी हे पाप नव्हे’! या धोरणबदलामुळे अल्पावधीत हजारो शेतकरी कारखान्यांमध्ये कामगार आणि उद्योजक बनले. जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रवाहच यामुळे बदलला. यातून जितकी मत्तानिर्मिती झाली, तितकी ती मानवी इतिहासात कधीही झाली नव्हती. माओ त्सेतुंग यांनी घट्ट रुजवलेल्या शेतीप्रधान आणि गरिबीलाच ‘हट्टीकट्टी’ मानण्याच्या मानसिक शृंखला मोडून काढायला काही अवधी गेला. तरीही दोन-अडीच दशकांत जवळपास सात कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले. अजस्र मनुष्यबळ ही चीनची ताकद मानून आखणी केली गेली. कृषी, उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि विज्ञान-तंत्रज्ञान या चार क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरण करण्याचे ठरवले गेले. यातून प्रचंड रोजगारनिर्मिती होणार होती. अजस्र मनुष्यबळाला राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक जाणिवेची जोड मिळाल्यामुळेच चीनला इथवर प्रगती करता आली. हा मार्ग वादातीत नव्हता. जगभर कम्युनिस्ट सरकारे कमकुवत होत असताना चीनमधील लोकशाहीवाद्यांनीही रेटा दिला, ज्यातून ‘थ्येन आन मेन’ घडले. ही चळवळ चिरडूनही चीनला इतर कोणत्याही प्रमुख देशाने वाळीत टाकले नाही याची जाणीव झाल्यानंतर चीनमधील लोकशाहीवाद्यांचे धैर्य खचले. तशा प्रकारची लोकचळवळ पुन्हा उभीच राहिली नाही. अशा चळवळी सहसा असंतोषातून उभ्या राहतात. त्याचा विस्फोट होणार नाही याची काळजी चिनी राज्यकर्त्यांनी घेतली. विविध टप्प्यांवर बाजाराभिमुख धोरणे, व्यवसायाभिमुख अर्थव्यवस्था, व्यापाराचा विस्तार यांतून रोजगारनिर्मितीच नव्हे, तर समृद्धीच्या कक्षा रुंदावतील हे पाहिले. १९९० मध्ये शांघाय स्टॉक एक्स्चेंज उभे राहिले. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. खासगी गुंतवणुकीस मर्यादित प्रोत्साहन दिले गेले. कोणत्याही लहान-मोठय़ा उद्योजकासमोर दोन आव्हाने असतात- पायाभूत सुविधा व बाजारपेठ. या दोन्ही आघाडय़ांवर सरकारी पाठबळ मोठय़ा प्रमाणात मिळत गेले. बाजारपेठांवर व उद्योगांवर सरकारी नियंत्रण किंवा नियमन ही संकल्पना पाश्चिमात्य विश्लेषकांनी विषारी ठरवलेली असली, तरी ती अमृतवेल किंवा कल्पवृक्ष कशी ठरू शकते हे चीनने जगाला दाखवून दिले!

जवळपास १२ हजार अब्ज डॉलरची (१२ ट्रिलियन डॉलर) चिनी अर्थव्यवस्था अमेरिकेनंतर जगातली दुसऱ्या क्रमांकाची आहे. एखादी १८ मजली इमारत अवघ्या १९ ते २० दिवसांमध्ये उभी राहू शकेल अशी यंत्रणा चीनमध्ये आहे. परकी चलन गंगाजळी, आंतरराष्ट्रीय व्यापार, उत्पादन क्षमता या तीन आघाडय़ांवर चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका, जपान व जर्मनी या तीन देशांत मिळून जितक्या मोटारी उत्पादित होतात, त्यापेक्षा अधिक चीनमध्ये बनतात. २००८ मध्ये चीनच्या सरकारने ५६८ अब्ज डॉलरची मदत (स्टिम्युलस) देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली. एके काळी साडेनऊ टक्क्यांनी वाढणाऱ्या चीनचा विकासदर सध्या साडेसहा टक्क्यांपर्यंत आला असला, तरी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा कुठेही कमी झालेली नाही. अमेरिकेशी व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. इतके होऊनही चीनची व्यापारविस्ताराची महत्त्वाकांक्षा कमी झालेली नाही. बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह किंवा स्ट्रिंग ऑफ पर्लसारख्या उपक्रमांमधून ती अधोरेखित होते. चीनसमोरील समस्याही त्या देशाप्रमाणेच अजस्र आहेत. वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू चीनच्या शहरांमध्ये होतात. अवाढव्य कर्ज ही दुसरी समस्या आहे. जगभर गेली काही वर्षे मंदीसदृश स्थितीमुळे मालाला उठाव नव्हता. हा माल निर्मिण्यासाठी उभारलेले कारखाने, आणवलेले कामगार यांच्यातून काही परतावा मिळाला नाही याचा फटका या प्रकल्पांना कर्जे पुरवणाऱ्या बँकिंग क्षेत्राला बसला आहेच. चिनी मालासाठी अमेरिकी बाजारपेठा बंद होत आहेत आणि प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिका मालाला प्रतिबंध करीत आहे. पण यात अधिक नुकसान चीनचे होणार आहे. विद्यमान अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी माओछापाची एकाधिकारशाही आणण्याचा चंग बांधला आहे, असे चिनी विश्लेषकांनाही वाटते. डेंग ज्यावफंग यांची स्तुती ते फारशी करीत नाहीत हेही लक्षात येऊ लागले आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाटय़ावर येत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुरेशा प्रमाणात शासन होत नसल्याची सार्वत्रिक भावना आहे.

तरीही याच चीनमध्ये एके काळी शाळामास्तर आणि त्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असलेल्या एकाला ऑनलाइन व्यापाराची शक्कल सुचली. आज तो शाळामास्तर जॅक मा म्हणून ओळखला जातो आणि अलीबाबा ही त्याची कंपनी जगातील सर्वात बडय़ा ईटेल आणि ऑनलाइन व्यापार कंपन्यांपैकी एक आहे. चीनच्या गुहेतून असे अनेक अलीबाबा बाहेर येताहेत, हे त्या देशाचे गेल्या ४० वर्षांतील यशच मानावे लागेल ना?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 1:57 am

Web Title: economy of china 2
Next Stories
1 प्रश्नांकित प्रसूतिदान
2  ना ताळ ना मेळ!
3 माफीच्या मर्यादा
Just Now!
X