जानेवारीच्या मध्यापासूनच सावध होणे, चाचण्यांची व्यवस्था- तीही सरकारमार्फत- करणे, सोबत कृत्रिम श्वसन उपकरणांची निर्मिती आणि अतिदक्षता कक्षांची व्यवस्था वाढवणे.. असा विज्ञानाधारित दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व जर्मनीत आहे..

एकच विषाणू, एकच मानवजात आणि विविध भूप्रदेश. पण त्याचे होणारे परिणाम मात्र पूर्ण वेगळे. हे करोना विषाणूसंदर्भातील सध्याचे चित्र. अनेक मुद्दे शिकवून जाणारे. आज जवळपास २०५ देशांचे वर्तमान या विषाणूने काळवंडले असून या प्रत्येक देशातील परिस्थिती त्या त्या देशातील जनता आणि त्यांचे राज्यकर्ते यांच्या मानसिक आणि बौद्धिक स्थितीचे दर्शन घडवते. जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था, जगातील सर्वोत्तम सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, जगातील सर्वात मोठी लोकशाही, काही हुकूमशाही राज्यव्यवस्था, काही एकाधिकारशाह्य अशा अनेक प्रकारच्या भूप्रदेशांत या विषाणूने घडवून आणलेल्या हाहाकाराचा आकार वेगवेगळा. परिणाम मात्र सर्वाचा एक. नागरिकांचे मरण. पण अशा काळातही काही देश त्यांच्या राज्यकर्त्यांच्या विज्ञानवादी, तर्काधिष्ठित, डोळस, जनप्रिय आणि विश्वासार्ह राज्यव्यवस्थेचे जेव्हा दर्शन घडवतात तेव्हा ते केवळ कौतुकास्पद राहात नाही. तर ते तितकेच अनुकरणीय ठरते. अशा काही मोजक्या देशांतील आघाडीचा देश म्हणजे जर्मनी. आज संपूर्ण जग या विषाणूने इतके हवालदिल झालेले असताना एका महायुद्धाचे कारण असलेला आणि दोन महायुद्धांत पिचलेला जर्मनी हा एकमेव देश कसा काय या विषाणूच्या डोळ्यात डोळा घालून उभा राहू शकतो, हा एकमेव प्रश्न जगातील अनेक राजसत्तांना पडलेला दिसतो. त्याचे उत्तर मिळविताना या विषाणूहल्ल्यास जर्मनी कसा काय सामोरा गेला हे पाहायला हवे.

आज जर्मनीत साधारण लाखभर लोकांना या विषाणूचा स्पर्श झालेला आहे आणि ते सर्व करोनाबाधित म्हणून विलगीकरण अनुभवत आहेत. तरीही या विषाणूने प्राण गेलेल्यांची संख्या आहे जेमतेम १,४४४ इतकीच. टक्केवारी पाहू जाता करोनाने प्राण घेतलेल्यांचे प्रमाण जर्मनीत आहे १.४ टक्के इतके. शेजारच्या इटलीत ते १२ ते १३ टक्के इतके आहे;  तर स्पेन, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांत ते १० टक्के वा अधिक आहे. अमेरिकेत ते अडीच टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून यावर मात केल्याचा दावा करणाऱ्या चीनमध्ये ते चार टक्के असल्याचे मानले जाते. या लढाईत दक्षिण कोरियाचा उल्लेख कौतुकाने होतो. पण त्या देशातही हे प्रमाण १.७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. याचा अर्थ या सर्व देशांत करोनाचा प्रभाव रोखण्यात देदीप्यमान यश मिळाले ते एकटय़ा जर्मनीस. खरे तर फ्रान्स वा इटलीच्या तुलनेत जर्मनीत करोनाबाधित तरुणांचे प्रमाण अधिक आहे. इटलीत करोनाबाधिताचे सरासरी वय ६० आहे तर फ्रान्समधे ६२.५. म्हणजे जर्मन तरुण अधिक मोठय़ा प्रमाणावर या विषाणूच्या साथीने ग्रासला गेला. पण तरीही या आजारात बळी जाणाऱ्यांचे प्रमाण जर्मनीपेक्षा अन्य देशांत अधिक. अर्थात तरुण शरीराने या विषाणूशी दोन हात करणे अधिक सक्षम असे मानले जाईल. पण वृद्धांचे प्रमाण लक्षात घेतले तरीही जर्मनी इतर देशांच्या तुलनेत फारच पुढे आढळतो. शेजारील युरोपीय देशांच्या मुळावर करोना उठलेला असताना एकटय़ा जर्मनीस या विषाणूने कसे काय इतक्या सहजपणे सोडले? त्या देशाच्या राज्यकर्त्यांचे द्रष्टेपण हे त्याचे उत्तर.

जानेवारीच्या मध्यास जर्मनीच्या सार्वजनिक आरोग्य सेवेस प्रथम या विषाणूची तिरकी आणि वेगवान चाल लक्षात आली. त्या वेळी इतर देशांतील अशा सेवा सुस्तावस्थेत तरी होत्या किंवा हा विषाणू आपल्या देशात प्रवेश करणारच नाही, अशा भ्रमात होत्या. त्या वेळी जर्मन वैद्यकीय विद्यापीठांनी या आजाराच्या त्वरित चाचण्यांची यंत्रणा विकसित केली आणि त्या देशातील औषधोद्योगाच्या साह्य़ाने प्रत्यक्षात आणली. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे या साऱ्यासाठी येणाऱ्या खर्चाचा भाग हा सरकारने उचलला. त्यातून अत्यंत जलदगतीने निदान करता येईल अशा प्रकारची वैद्यकीय सामग्री त्या देशात मोठय़ा संख्येने उपलब्ध झाली. सरकारी मदतीचा फायदा असा की त्यामुळे ती जनतेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिली गेली. अमेरिकेसारख्या देशाला हे अजूनही जमलेले नाही, हे लक्षात घेता जर्मनीचे द्रष्टेपण लक्षात यावे. यानंतर डॉक्टर वा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या हाती ही उपकरणे देऊन जर्मनीने फिरत्या प्रयोगशाळा उभ्या केल्या. ‘कोविड टॅक्सी’ अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोटारींनी अनेक शहरे शब्दश: पिंजून काढली. हा काळ अनेक जर्मन शेजारील ऑस्ट्रिया, इटली अशा देशांतील बर्फाळ पर्यटनातून परत येण्याचा.

त्यामुळे जर्मनीच्या सर्व सीमांवर या ‘कोविड टॅक्सी’ तैनात करून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी घेतली गेली. त्यात करोना लक्षणे आढळलेल्या प्रत्येकाच्या विलगीकरणाचे आदेश दिले गेले. त्यांचा तपशील त्याच वेळी संबंधित यंत्रणांना दिला गेला आणि त्यानंतर दररोज संबंधित शहरातील आरोग्य कर्मचारी या विलगित नागरिकांची वास्तपुस्त करू लागले. या सर्वाच्या अर्थातच नोंदी ठेवल्या गेल्या आणि त्याची काटेकोर शहानिशा होईल अशी व्यवस्था केली गेली. या काळात कोविड चाचण्यांचा वेग जर्मनीने इतका वाढवला की आठवडय़ास किमान चार लाख नागरिकांची तपासणी त्यातून होऊ लागली. ही संख्या संपूर्ण युरोप वा अमेरिकेतील चाचण्यांपेक्षाही अधिक आहे. यास समांतर आणखी दोन गोष्टी जर्मनीने केल्या.

अशक्त फुप्फुसांसाठी आवश्यक अशा कृत्रिम श्वसन उपकरणांच्या निर्मितीस मोठी गती दिली आणि रुग्णालयांत अतिदक्षता कक्षांची क्षमता वाढवायला सुरुवात केली. अधिक आणि त्वरित चाचण्यांमुळे केवळ रुग्णच कळतात असे नाही तर संबंधित रुग्णास कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज लागेल किंवा काय याचाही अंदाज येतो. त्यामुळे नेमक्या वेळी नेमक्या रुग्णांसाठी ही यंत्रणा जर्मनी उपलब्ध करून देऊ शकला. अतिदक्षता कक्षांची क्षमता वाढवणेदेखील अत्यंत उपकारक ठरले. आजमितीस त्या देशात दर लाख रुग्णांसाठी ३५ इतके अतिदक्षता कक्ष उपलब्ध आहेत. त्या तुलनेत इटलीत हे प्रमाण आहे १२; नेदरलँड्ससारख्या देशात तर अवघे सात. सध्या संपूर्ण जर्मनीत ४० हजारांपेक्षाही अधिक अतिदक्षता कक्ष उपलब्ध असून आता तो देश इटली आणि अन्य देशांतील रुग्णांनाही सामावून घेऊ लागला आहे. म्हणजे त्या देशाची क्षमता गरजेपेक्षा अधिक आहे. या सर्व प्रक्रियेत रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होऊ शकते म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या गट चाचण्यांची पद्धत जर्मनीने विकसित केली आणि आता तर प्रत्येक शहरातील किमान लाख नागरिकांच्या चाचण्याही सुरू केल्या. यात एक जरी करोनाबाधित आढळला तर त्या व्यक्तीची निवासी इमारत, नातेवाईक आदी सर्वाचे विलगीकरण केले गेले. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांचा सरकारी वैद्यक करोनाबाधित असल्याचे आढळल्याबरोबर खुद्द मर्केलही विलगवासात गेल्या.

तरीही आज त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख पुन्हा चढता आहे यात आश्चर्य नाही. अन्य देशांना भान यायच्या आधी मर्केल यांनी सुमारे ४५ लाख कोटी रुपये या निमित्ताने तिजोरीतून अतिरिक्त उपलब्ध करून दिले. जर्मनीच्या कोविड-कालीन कामगिरीचे वेगळेपण तपासण्यासाठी न्यू यॉर्क टाइम्स आदींनी त्या देशातील विविध वैद्यकीय विद्यापीठे, संस्थाप्रमुखांच्या मतांचा कानोसा घेतला. सर्वाच्या बोलण्यात एक मुद्दा प्रकर्षांने होता. मर्केल यांनी दाखवलेला विज्ञानाधारित आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन. त्यामुळेच दिवे न लावतादेखील जर्मनीतील अंधार दूर झाल्याचे दिसून येते. तो नसेल तर मात्र उजेडामागे अंधार तसाच राहतो.