‘सुपर जम्बो’ म्हणून एअरबसने २००५ पासून विक्री सुरू केलेले ‘ए-३८०’ विमान आता गाशा गुंडाळते आहे..

भव्यदिव्य बनवून दाखवायचे म्हणून हे मोठे विमान तयार झाले. ८०० माणसे एकाच वेळी बसू शकतील, इतके मोठे. पण महत्त्वाकांक्षा मोठेपणाची असली, तरी प्रत्यक्षात किफायत पाहावीच लागते, हे याच कंपनीला हल्ली उमगले..

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
blow to airline
रद्द केलेल्या तिकिटाची वाढीव दराने विक्री प्रकरणी विमान कंपनीला दणका, भरपाईपोटी ५० हजार रुपये देण्याचा आदेश
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

बोइंग विमान कंपनीच्या सुपरिचित बी-७४७ विमानाची सध्या पन्नाशी साजरी होत असताना, त्याला आव्हान म्हणून युरोपच्या एअरबस कंपनीने प्रचंड गाजावाजा करून जागतिक बाजारात आणलेल्या ए-३८० विमानाला मात्र ‘ऐन तारुण्यात’ अखेरची घरघर लागलेली आहे. या प्रकारच्या विमानांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२१ मध्ये विमानांचे उत्पादन पूर्णपणे थांबवले जाईल. या विमानांचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या दुबईच्या सरकारी मालकीच्या एमिरेट्स विमान कंपनीने ३६ विमानांची मागणी रद्द केली आणि कंपनीने हा निर्णय घेतला. सध्या एअरबस कंपनीकडे नोंदवल्या गेलेल्या ऑर्डरची पूर्तता केल्यानंतर ए-३८० हे प्रकरण एअरबसच्या दृष्टीने संपुष्टात येईल. अर्थात विमानांचे सरासरी आयुष्य वीस वर्षे असल्यामुळे ही विमाने अगदी २०३०च्या दशकातही दिसत राहतील. बी-७४७ जम्बो जेट म्हणून ओळखले जायचे. त्यालाही भारी पडेल असे विमान म्हणूनच सुपर जम्बो या टोपणनावाने संबोधले जाते. परंतु एरवी नवीन विमाननिर्मितीच्या बाबतीत बोइंगप्रमाणेच अत्यंत काटेकोर राहिलेल्या एअरबसचा अंदाज सुपर जम्बोच्या बाबतीतच चुकला कसा, हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल.

२००६ मध्ये बोइंग कंपनीचे विक्री पथक मुंबईत आले. बोइंग कंपनीने बी-७८७ हे दीर्घ पल्ल्याचे विमान बाजारात आणले होते. त्याच सुमारास ए-३८०चा गाजावाजा सुरू झाला होता. आधीच्याच वर्षी फ्रान्समध्ये या विमानाचे साग्रसंगीत अनावरणही झाले होते. तर मुंबईत बोइंगच्या अधिकाऱ्यांनी एक मुद्दा असा मांडला की प्रवासी विमान वाहतुकीचा कल क्षमतेकडून पल्ल्याकडे झुकू लागला आहे. विनाथांबा दीर्घ पल्ल्याची उड्डाणे हेच या क्षेत्राचे भविष्य आहे. बोइंगच्या ताफ्यात त्या सुमारास बी-७७७ हे मध्यम क्षमता व मध्यम पल्ल्याचे विमान होतेच. एअरबसकडेही ए-३३० आणि नव्याने बनवलेले ए-३४० अशी मध्यम-दीर्घ (पण दीर्घ नव्हे) पल्ल्याची विमाने होतीच. तरीही त्यांनी ए-३८० प्रकल्पात प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ गुंतवणूक ओतली होती, याचे कारण म्हणजे बोइंगकडील बी-७४७. बी-७४७ हे बोइंगच्या मुकुटातील शिरपेच होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, इतके अजस्र विमान बोइंगने थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल चाळिसेक वर्षे (ए-३८० वर मंथन सुरू होते तोपर्यंत) नफ्यात वापरून दाखवले होते. त्या अजस्रपणात अर्थातच प्रतीकात्मकताही ठासून बसली होती. बी-७४७ हा अमेरिकी अभियांत्रिकी प्रगती आणि सळसळत्या उद्यमशीलतेचा आविष्कार होता. त्याचे देखणे रूप त्याच्याविषयीचा मिथकात आणि वास्तवात भर घालणारेच ठरायचे. एरवी बोइंगप्रमाणेच प्रत्येक स्तरातील विमानाच्या निर्मितीचा भविष्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या एअरबस कंपनीला त्या कंपनीसारखे काही तरी भव्यदिव्य बनवून दाखवायचेच होते. त्यातूनच ए-३८० सुपर जम्बोची संकल्पना जन्माला आली. खरे तर बी-७४७ हा एक अपघात होता. त्या वेळी म्हणजे ६०च्या दशकात बोइंगला अमेरिकी हवाई दलासाठी मालवाहू विमान बनवायचे होते. तो प्रयोग पूर्णत्वाला गेला नाही, तेव्हा हाती असलेल्या आराखडय़ातून मालवाहक विमान बनवण्याऐवजी प्रवासी वाहतूक विमान जन्माला आले. सुरुवातीला त्या विमानालाही उठाव नव्हता. पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आशियाई अर्थव्यवस्थाही युरोप आणि अमेरिकेप्रमाणे प्रगतिपथावर मार्गस्थ झाल्या. जगभर समृद्धी वाढली आणि विमान प्रवासाची गरज आणि हौसही वाढली. बी-७४७ आणि ए-३८० ही दोन्ही अजस्र विमाने असली, तरी दोहोंची जन्मकथा आणि त्यामागची पाश्र्वभूमी भिन्न आहे. एअरबसने मोठय़ा विमानाच्या निर्मितीची चर्चा १९८८ मध्ये सुरू केली. प्रत्यक्षात असे विमान पहिल्यांदा उडेपर्यंत २००५ साल उजाडले. त्या वेळी एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, सिंगापूर एअरलाइन्स, क्वांटास आणि मुख्य म्हणजे दुबईचे एमिरेट्स अशा बडय़ा विमान कंपन्यांनी एअरबसशी खरेदी करार केले. एमिरेट्स कंपनीने तर ए-३८०च्या निर्मितीपासूनच मोठय़ा संख्येने ही विमाने खरीदली आहेत. जानेवारी २०१९ पर्यंत एअरबस कंपनीकडे ३१३ विमानांची नोंदणी झाली, त्यापैकी २३४ विमानांची पाठवणीही झालेली आहे. त्याहीपैकी १२३ विमाने एकटय़ा एमिरेट्सकडे आहेत. ए-३८० विमान हे बी-७४७ प्रमाणेच डबलडेकर असले, तरी वरील मजल्यावर किती तरी अधिक प्रवासी बसू शकतात. विमानाची एकूण प्रवासी वहनक्षमता ८०० असली, तरी सर्वसाधारणपणे ५२५ पेक्षा अधिक प्रवासी यातून प्रवास करीत नाहीत. एरवी ५००-५२५ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी दोन विमाने लागली असती, ते काम ए-३८० सारखे एकच विमान करू शकते. म्हणजे विमानतळांवर विमानांची कमी कोंडी आणि प्रवासखर्चही (प्रवासी व विमान कंपन्या अशा दोहोंसाठी) कमी असे हे सोयीस्कर चित्र होते. पण मग नेमके बिघडले कोठे?

ए-३८० विमानांच्या प्रकल्पावर आजवर २५ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. यात विविध खर्चाचा समावेश होता. हे विमान आकाराने मोठे, त्यामुळे मध्यम आकाराच्या विमानतळांचा आकारही ते विमान सामावून घेण्यासाठी वाढवावा लागणार होता. मुंबईचे उदाहरण घ्यावे लागेल. बारा वर्षांपूर्वी या विमानतळाच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी म्हटले होते, की हे विमान उतरवण्यासाठी आवश्यक धावपट्टी आमच्याकडे आहे. पण पाचशेहून अधिक प्रवासी हाताळू शकतील इतके स्थलांतर-तपासणी आणि सीमाशुल्क काऊंटरच आमच्याकडे नाहीत. मुंबईतले हे चित्र प्रातिनिधिक होते. काही विमानतळांची क्षमता वाढवण्यासाठी एअरबसलाही पैसा ओतावा लागला. हा खर्च वाढतच गेला, त्या वेळी कंपनीच्या अपेक्षेनुसार विमान उड्डाणे वाढलीच नाहीत. याचे एक कारण दशकभरापूर्वी सुरू झालेली जागतिक मंदीसदृश स्थिती हेही होते. रोजगार घटले, सधन देशांतील नागरिकांकडील पैसा आटला आणि याचा थेट फटका नोकरी, व्यवसाय वा पर्यटनासाठी होणाऱ्या आंतरखंडीय विमानप्रवासाला बसला. वीस वर्षांपूर्वी ए-३८० विषयी मंथन सुरू झाले, त्या वेळी असे अजस्र प्रवासी विमान हा सट्टा नसला, तरी वायदा होता. प्रवाशांची, उड्डाणांची संख्या अपेक्षेनुसार न वाढल्यामुळे तो फसला. याच्या बरोबरीने निधीअभावी अनेक विमानतळांची क्षमता वाढवण्याची कामे रखडली. त्यामुळे ए-३८० विमाने सामावू शकतील अशा विमानतळांची संख्याही अपेक्षेप्रमाणे वाढलीच नाही. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत, प्रथम बोइंग आणि नंतर एअरबस कंपनीकडेही पर्यायी विमाने विकसित झाली ही ए-३८०साठी मृत्युघंटा ठरली. बी-७८७ हे सध्या दीर्घ पल्ल्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे विमान आहे. पण त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी एअरबसने ए-३५० विकसित केले आहे. दोघांची क्षमता आणि पल्ला जवळपास सारखा आहे. क्वांटास या ऑस्ट्रेलियन विमान कंपनीने दाखवून दिले, की एका मार्गावर ५०० प्रवासी क्षमतेचे एक विमान (ए-३८०) वापरण्यापेक्षा २५० प्रवासी क्षमतेची (बी-७८७) दोन विमाने कमी इंधनात आणि त्यामुळे कमी किमतीत उडवली जाऊ शकतात. जगातील सर्वाधिक व्यग्र म्हणवल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क-लंडन मार्गावर ए-३८० कधीही वापरले जात नाही. बी-७४७ हे विमान आता अधिकाधिक वेळा निव्वळ मालवाहू विमान म्हणून वापरले जाऊ लागले आहे. ए-३८० साठी तो मार्गही बंद आहे. कारण केवळ अधिक प्रवासी हे उद्दिष्ट ठेवून ते बनवले गेले होते. काँकॉर्ड या स्वनातीत विमानाप्रमाणेच युरोपचे आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रवासी विमान अशा रीतीने अकाली निवृत्त होत आहे. यातून प्रवासी आणि विमान कंपन्यांना फायदाच होणार असला, तरी उडणे आणि टिकणे यांमधील महदंतर दाखवून देणारी ही अधुरी कहाणी पचवणे विमानदर्दीना जडच जाईल.