News Flash

‘समग्र’ अण्णाभाऊ

वाचक होण्यासाठी जे निखळ माणूसपण आवश्यक असते, ते आपल्याला पुन्हा देण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत आहे..

संग्रहित छायाचित्र

 

वाचक होण्यासाठी जे निखळ माणूसपण आवश्यक असते, ते आपल्याला पुन्हा देण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीत आहे..

अण्णाभाऊंच्या कथानकांमधील माणसे एखाद्या जातीपुरती नाहीत. महाराष्ट्राची स्वप्ने, दु:खे आणि स्पंदने त्यांनी टिपली आहेत..

माणसाला माणसाबद्दल काही सांगणारे सर्व साहित्य प्रचारकी असतेच. निखळ असतात ते वाचक किंवा साहित्याचे भोक्ते. वाचकांनाच निखळ राहायचे नसेल, स्वत:पेक्षा वेगळ्या रंगाचे साहित्य हाणूनच पाडायचे असेल, तर मग ते प्रचारकी ठरवले जाते किंवा ते विटंबना करणारे आहे, ते अश्लील वगैरे आहे असे काहीबाही आक्षेप नोंदवले जातात. मग जुनी कुठली तरी कादंबरी, ‘पाणी’सारखी कविता किंवा ‘यदा कदाचित’सारखे नाटक यांविषयी इतक्या प्रयोगांनंतर, इतक्या वर्षांनंतर कधी तरी अचानक वाद होतात. वाचक म्हणून आपला निखळपणा नासवून टाकणाऱ्या शक्ती आव मात्र असा आणतात की साहित्यातच काही तरी खोट आहे. खोट काढणारे बोट कुणाचे, त्यांना साथ देण्याने आपण सुरक्षित राहणार की नाही, हे पाहून समाजातले विशिष्ट वर्ग माना डोलावतात, वाचकाचा निर्मळपणा अशाने मळतो. मराठीत तर असे झाले आहे की, या मळाची पुटेच्या पुटेच वाचकांवर चढलेली दिसतात. म्हणून मग जोतीराव फुले किंवा बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे आपण लेखक म्हणून पाहूच शकत नाही. त्या नावांना कोणता समाजगट साथ देतो, आपण त्या समाजगटाला जवळचे की दूरचे, याचा अंदाज घेत वाचन होते. हल्ली तर व्हॉट्सअ‍ॅपवरच जे काही वाचन होईल तेवढय़ानेच भरून पावणारे लोकही असतात. वाचक म्हणून प्रयोगशील न राहता समाजगटाला शरण जाण्याची ही परमावधी म्हणावी लागेल. या अशा स्थितीत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य पुन्हा एकदा तरी वाचावे, त्यांच्या कालजयी काव्याची एखादी तरी ओळ पुन्हा गुणगुणून पाहावी अशी शिफारस करणे, हे अंमळ अप्रस्तुतच. तरीही ती येथे करण्याचे कारण केवळ अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष १ ऑगस्ट रोजी संपते आहे हे नव्हे.

अण्णाभाऊ साठे हे आपणा वाचकांवर साचलेल्या मळाची सारी पुटे धुवून काढू शकणारे लेखक आहेत म्हणून. वाचक होण्यासाठी जे निखळ माणूसपण आवश्यक असते, ते आपल्याला पुन्हा देण्याची ताकद अण्णाभाऊंच्या लेखणीत आहे म्हणून. ही लेखणी, समीक्षकांच्या शब्दांत सांगायचे तर ‘बहुप्रसवा’. म्हणजे भरपूर लिहिणारी. पण अण्णाभाऊंचे साहित्य हे अनेक प्रकारचेसुद्धा. लावण्या, गाणी, पोवाडे आणि १४ लोकनाटय़े, तीन नाटके, सुमारे १३० कथा, १३ कादंबऱ्या, कादंबऱ्यांवर आधारलेले सात चित्रपट.. आणि मुख्य म्हणजे लोकांसमोर नाटक, लोकनाटय़ सादर करण्याचा अनुभव. कलापथकाद्वारे अनेक ठिकाणी कार्यक्रम. या साऱ्याला हेतू जनजागृतीचा. लहानपणी पाहिलेली पत्री सरकारची चळवळ, वयाची विशी ओलांडताना १९४२ची चळवळ- कष्टकरी म्हणून जगण्याचा पुरेपूर अनुभव असल्यामुळे साम्यवाद जवळचा, म्हणून कामगार चळवळ आणि पस्तिशीनंतर संयुक्त महाराष्ट्राची, मग गोवामुक्तीची चळवळ. या संघर्षांना बळ देणारी गाणी लिहिणाऱ्या आणि कष्टकरी, गरीब यांच्या गोष्टी रोचकपणे सांगताना माणसाने माणसाशी माणसासारखेच वागावे, या नैतिकतेशी तडजोड न करणाऱ्या अण्णाभाऊंचे साहित्यिक कूळ कोणते?

ते सहज सापडणार नाही. महाराष्ट्राची साहित्यपरंपरा पेशवाई बुडाल्यानंतर निरनिराळ्या दिशांनी वाढली, त्यात केशवसुत होते तसे पठ्ठे बापूरावही होते. नवे काही सांगण्याचे काम दोघेही करत होते. ‘जग बदल घालुनी घाव’ ही भावना केशवसुतांनादेखील मान्य असणारी; पण त्यापुढे ‘सांगुनी गेले जगी भिमराव’ म्हणणाऱ्या अण्णाभाऊंची केवळ रचना शाहिरी, म्हणून पठ्ठेबापूंवर केलेला अन्याय अण्णाभाऊंवरही होत राहिला. महाराष्ट्राची शाहिरी परंपराच संयुक्त महाराष्ट्राच्या लढाऊ काळात मैदानात उतरली, तेव्हा – प्र. के. अत्रे यांच्या ‘झेंडूच्या फुलां’चा अपवाद वगळता अन्य कवी कोठे होते? ‘मंगलकलश’ आल्यानंतरही डांग, उंबरगाव, बेळगाव, कारवारचा आपल्या राज्याला झालेला विरह अण्णाभाऊंनी ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ या लावणीतून मांडला, त्या लावणीचे अभिजातपण सदा कऱ्हाडे वगळता कुणाला दिसलेच कसे  नाही? अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांना भडक म्हणणाऱ्यांना, त्याच काळातल्या अतिरंजित कादंबऱ्याही जमेस धरून तत्कालीन वाचक-लेखक संबंधांचा काहीएक अंदाज बांधावा, असे कसे काय वाटत नाही? ‘कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करणारे’ असा शिक्का जर अण्णाभाऊंवर सहजपणे मारून टाकायचा असेल, तर ते ज्या ‘इप्टा’ या संस्थेपर्यंत पोहोचले होते, तेथील पृथ्वीराज कपूर ते सलील चौधरी यांच्यापर्यंतच्या अन्य गुणवंतांकडे मात्र गुणांच्या आधारेच पाहिले जाते, हे कसे? साम्यवाद काय आणि आर्यवर्चस्ववाद काय, या दोन्ही केवळ राजकीय विचारधारा नसून दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळातील अस्तित्वाचा पुनशरेध घेण्याच्या प्रेरणा ठरल्या होत्या आणि त्यांपैकी जी त्यातल्या त्यात बुद्धिगम्य ती त्या काळच्या अनेकांना आपली वाटली, हा भूतकाळ आपण स्वच्छपणे मान्य कसा करीत नाही? टिळकांना अभिप्रेत असलेली कामगार चळवळ करणाऱ्या श्रीपाद अमृत डांगे यांची जात न पाहणारे लोक, डांगे यांना साथ देणाऱ्या अण्णाभाऊंच्या जातीचा उल्लेख मात्र आवर्जून कसा काय करतात?

अण्णाभाऊ साठे यांच्या मूल्यमापनाचा दुष्काळ महाराष्ट्रात आहे, असे अजिबात नाही. त्यांच्यावर सुमारे डझनभर पीएच.डी. प्रबंध लिहून झाले आहेत आणि त्याहीआधी त्यांच्या योगदानाविषयी लिखाण झाले, त्यांचा आधार या प्रबंधांना आहे. आपल्या महाराष्ट्रात समीक्षकांची कंपूशाही अगदी १९७०च्या दशकापर्यंत होती आणि त्याबाहेरील साहित्याचे मूल्यमापन हे प्रतिष्ठा वा प्रसिद्धीपासून दूर राहिले, हा दोष अण्णाभाऊंचे मूल्यमापन करणाऱ्यांचा नाही. दुष्काळ आहे, तो आज अण्णाभाऊंचे साहित्य वाचून त्यातले मर्म समजून घेणाऱ्या वाचकांचा. व्हॉट्सअ‍ॅप वगैरे सोडून लगेच ‘फकिरा’ किंवा ‘माकडीचा माळ’ कुणी वाचावी, ही अपेक्षा तूर्तास चूकच. पण अण्णाभाऊंना लेखक-साहित्यिक म्हणून पाहिले गेले नाही, तर त्यांच्यावरला एका- आणि फक्त एकाच- समाजगटाचे पुढारी हा शिक्का अधिक गडद करण्याचा गुन्हा समस्त मराठीभाषकांकडून घडेल आणि घडतोही आहे.

तमाशा ते लोकनाटय़ हे संक्रमण अण्णाभाऊंनी घडवले, कादंबरीतून लोकांच्या सुखदु:खांचे धागे विणले आणि कथांना समकालीन लोककथांचे स्वरूप दिले. या कथांमध्ये चोरआहेत, मुंबईत आलेले जॉबर, रोजंदार, घरगडी आहेत, गावात जातीच्या पंचाविरुद्ध उभे राहून ‘मरीआईचा गाडा ओढणार नाही’ म्हणत गाडय़ाची चाके निकामी करणारे तरुण आहेत; पुरुषाच्या वासनेला बळी पडल्यावर चिडून उठणाऱ्या स्त्रिया आहेत, ‘शेतकरी बदललाय’ असे सांगून सावकाराला धडा शिकवणारे आहेत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ‘तुम्ही जगलेच पाहिजे’ असा धीर देणारे आणि सारा न भरल्याबद्दल शेतकऱ्यांना ताब्यात घेणाऱ्या प्रांतसाहेबांना ‘आम्हांस न विचारता ही धरपकड का?’ असा जाब विचारणारे विष्णुपंत कुलकर्णी आहेत..

अण्णाभाऊंची ही माणसे काही एखाद्या जातीचा किंवा समाजगटापुरता अभिमान धरणारी नव्हेत. ती महाराष्ट्रातली माणसे आहेत. या पात्रांची दु:खे आणि त्यांची स्वप्ने ही अख्ख्या महाराष्ट्राची होती आणि आहेत. जगण्याला समग्रपणे समजून घेऊ पाहणाऱ्या सर्जनशील कलावंताने टिपलेली ती आपल्या गतकाळाची स्पंदने आहेत. या साहित्यिकाला आपण समग्रपणे समजून न घेणे ही शोकांतिकाच. आणि ती एकटय़ा अण्णाभाऊंची शोकांतिका मानणे, म्हणजे जबाबदारी नाकारणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:04 am

Web Title: editorial on annabhau sathe birth centenary year abn 97
Next Stories
1 दोनाचे सहा..!
2 ‘विद्या’वंतांचे वेडेपीक!
3 कवणे चालोचि नये?
Just Now!
X