19 January 2021

News Flash

देवत्वाचा शाप!

मॅराडोनाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत केलेले निर्णायक ‘गोल’ दूरदर्शनवरून दिसल्याने, भारतीयांना ‘लॅटिन अमेरिकी शैली’ पाहता आली

(संग्रहित छायाचित्र)

 

मॅराडोनाला ना संघ मिळाला, ना व्यवस्था. तरीही त्याच्या नावावर एक जगज्जेतेपद जमा झाले. या यशोगाथेतील परमोच्च क्षण १९८६मध्येच आला आणि संपला..

मॅराडोनाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत केलेले निर्णायक ‘गोल’ दूरदर्शनवरून दिसल्याने, भारतीयांना ‘लॅटिन अमेरिकी शैली’ पाहता आली. गरीब देशातला, गरीब घरातला मॅराडोना भारतीयांनाही भावला..

‘फुटबॉलमधील महानतम’ असे दिएगो अर्माडो मॅराडोनाचे वर्णन त्याच्या मृत्युलेखातही पुरेशा खात्रीने करता येत नाही. कारण अशी उपाधी बहाल करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या आयुष्यातील बऱ्यावाईटाचा ताळेबंद मांडावा लागतो. त्या हिशोबात मॅराडोनाच्या पारडय़ात अनेक गुण कमीच भरतात. फुटबॉल खेळताना आणि निवृत्तीनंतरही अमली पदार्थाचे सेवन, कधी माफिया मंडळींबरोबर ऊठबस, मदिरा-महिलांच्या बाबतीत उठवळपणा, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जगण्याविषयीची तुच्छता असे अवगुण बरेच. मैदानाबाहेर मॅराडोना नेहमीच बेछूट वागत आला. पण अर्धे किंवा अंमळ अधिक फुटबॉलजगत त्याला देव मानते, ते त्याच्या मैदानावरील कौशल्यामुळे. जगभरातल्या किमान दोन पिढय़ा फुटबॉलवर लट्टू झाल्या त्या मॅराडोनासारख्या जादूगाराच्या खेळावर भाळून. १९८६ साली मेक्सिकोत झालेली विश्वचषक स्पर्धा मॅराडोनाने एकटय़ाच्या ऊर्जेवर, मैदानी सर्जकतेवर आणि असीम आत्मविश्वासावर अर्जेटिनाला जिंकून दिली. फुटबॉल हा सांघिक खेळ, वैयक्तिक कौशल्य गौण वगैरे पांढरपेशा निकषांना पूर्णपणे फाटा देणारी ती कामगिरी होती. मॅराडोना तोपर्यंत एक उत्तम फुटबॉलपटू होता. त्याच्या नावापुढे महानतम, देव वगैरे बिरुदे चिकटली ती त्या स्पर्धेनंतर. मॅराडोना समजून घेण्यासाठी त्याच्या या स्पर्धेतील कामगिरीचा संक्षिप्त आढावा घ्यावाच लागतो.

मेक्सिकोत झालेल्या त्या स्पर्धेत अर्जेटिनाकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. ब्राझील, फ्रान्स, इटली, काही प्रमाणात इंग्लंड आणि पश्चिम जर्मनी अशी क्रमवारी मांडली जायची. मॅराडोना कर्णधार होता, पण केवळ २५ वर्षांचा होता. बाकीच्यांची नावेही फारशी ठाऊक नव्हती. स्पर्धेपूर्वी वा दरम्यान मॅराडोनाने कोणतीही विधाने केली नाहीत, फुशारक्याही मारल्या नाहीत. साखळी टप्प्यात तत्कालीन गतविजेत्या इटलीविरुद्ध अर्जेटिनाने बरोबरी साधली आणि त्या सामन्यात मॅराडोनाचा गोल महत्त्वाचा ठरला. परंतु त्याचे पुढील दोन गोल खऱ्या अर्थाने कालातीत ठरले. विश्लेषकांच्या मते ते दोन गोल मॅराडोनाची जीवनकहाणी सांगण्यास पुरेसे ठरतात. इंग्लंडविरुद्ध उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात गोलशून्य बरोबरीची स्थिती असताना, इंग्लिश बचावपटूच्या एका चुकीचा फायदा उठवत मॅराडोना सरसावला. डोक्याने चेंडू गोलजाळ्यात ढकलण्यासाठी त्याने उसळी घेतली, पण उंची कमी पडली! तेव्हा चेंडू त्याने चक्क हाताच्या मुठीने गोलजाळ्यात धाडला. जे मैदानावरील बहुतेक खेळाडूंना, प्रेक्षकांना, दूरचित्रवाणी कॅमेऱ्यांना दिसले – आणि अर्थातच मॅराडोनालाही दिसले, ते त्या सामन्यात पंचगिरी करणाऱ्या टय़ुनिशियन पंचांच्या नजरेतून निसटले! ‘‘तो गोल मीच झळकावला. थोडा डोक्याने, थोडा देवाच्या हाताने,’’ असे मॅराडोना नंतर म्हणाला. ‘हॅण्ड ऑफ गॉड’ या आख्यायिकेचा जन्म हा असा आहे. त्यानंतर चारच मिनिटांनी त्या अ‍ॅझटेका मैदानात जे घडले, ते घडले नसते तर दिएगो मॅराडोना खलनायक म्हणूनच जगला असता आणि संपला असता. त्या पहिल्या गोलमुळे हताश, हतबुद्ध झालेल्या इंग्लिश संघाला सावरण्याची उसंत न देता मॅराडोनाने चेंडूचा ताबा घेतला. अत्यंत चपळाईने, गिरक्या घेत, एक-दोन नव्हे तर पाच इंग्लिश फुटबॉलपटूंना चकवत एकटय़ानेच त्याने आणखी एक केवळ अफलातून म्हणता येईल असा गोल झळकावला. त्या क्षणाची छायाचित्रे, चलचित्रे आजही इंग्लिश बचावपटूंच्या चेहऱ्यावरची भीती, गोंधळलेपण आणि हतबलता स्पष्ट दर्शवतात. त्या एका गोलच्या पुण्याईने जणू आधीच्या गोलमागील पातक धुतल्यागत झाले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि सर्वाधिक संस्मरणीय असे दोन गोल अवघ्या चारेक मिनिटांत त्यापूर्वी किंवा नंतर कधीही नोंदवले गेले नाहीत. उपान्त्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध मॅराडोनाने आणखी दोन गोल केले, त्यापैकी एक तर अविस्मरणीय होता. पण इंग्लंडविरुद्धचे गोल अधिक गाजले, कारण बहुतांश फुटबॉल पत्रकार त्या वेळी इंग्लिश होते. त्या स्पर्धेत मॅराडोनाने पाच गोल केले आणि पाच गोलांसाठी साह्य पुरवले. अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्ध त्याने गोल केला नाही, पण जबर जिद्द आणि आत्मविश्वासाने नेतृत्व केले आणि शारीरिकदृष्टय़ा तगडय़ा जर्मनांना वर्चस्व गाजवू दिले नाही. निर्धारित ९० मिनिटे संपण्यास आठ मिनिटे शिल्लक असताना, सामना २-२ असा बरोबरीत असताना मॅराडोनाच्याच उत्कृष्ट पासवर अर्जेटिनाने निर्णायक गोल केला.

भारतात पूर्ण लांबीची दूरदर्शनवरून दिसलेली ती पहिलीच विश्वचषक स्पर्धा. त्यामुळे बंगाल, केरळ, गोव्याबाहेरील प्रेक्षकांनाही फुटबॉल विश्वचषक म्हणजे नेमके काय असते, आणि युरोपीय व लॅटिन अमेरिकी शैली (आता दोहोंतील सीमारेषा जवळपास संपुष्टात आली आहे) म्हणजे नेमके काय हे पाहता आले. मॅराडोनाची अदाकारी पाहिलेल्या भारतीय प्रेक्षकांना १९८३ मधील कपिलदेवच्या नेतृत्वाखालील क्रिकेट जगज्जेतेपद आणि मॅराडोनाने बलाढय़ देशांच्या मांदियाळीत खेचून आणलेले जगज्जेतेपद यांत अनेक साम्यस्थळे आढळली. मॅराडोनाची लोकप्रियता युरोप, दक्षिण अमेरिकेबाहेर आफ्रिका, आशियात पसरली याचे आणखी एक कारण म्हणजे मॅराडोनाची पार्श्वभूमी. तो गरिबीतून वर आला. १५व्या वर्षांपासून व्यावसायिक आणि १६व्या वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळू लागला. पुढे युरोपात स्पेन, इटलीमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळू लागला आणि अखेरीस वयाच्या पंचविशीतच त्याने क्रीडा जगातील सर्वात मूल्यवान असे फुटबॉल जगज्जेतेपद खेचून आणले. ही सगळी पार्श्वभूमी व्यक्तिपूजेसाठी पोषकच.

पुढे १९९० मधील स्पर्धेतही त्याने अर्जेटिनाला अंतिम फेरीपर्यंत नेले. परंतु तोवर दिएगो मॅराडोना नामक मिथक नामशेष झाले होते. उरला होता तो केवळ व्यवहारी चाणाक्षपणा. त्या वाटचालीत धमक, जिगर होती, पण सौंदर्य नव्हते. इतिहासातील सर्वाधिक निरस असे वर्णिल्या गेलेल्या त्या स्पर्धेत गोल झळकावण्याऐवजी गोल रोखण्यालाच प्राधान्य दिले गेले. त्या व्यवहारवादी लाटेत मॅराडोनाही वाहून गेला. विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी म्हणजे खरे तर कौतुकास्पद कामगिरीच. तरीही मॅराडोनाच्या त्या कामगिरीची चर्चा फारशी झालीच नाही. त्यानंतर तर मॅराडोनाचे नैतिक, व्यावसायिक, आर्थिक स्खलन अधिकच होत गेले. पूर्वी तो अमली प्रेरके, उत्तेजके घ्यायचा, ती वेदनाशमनासाठी अधिक होती आणि कंडशमनासाठी कमी. कारण प्रत्येक सामन्यात, प्रत्येक मैदानावर त्याला शारीरिकदृष्टय़ा जायबंदी करणे यालाच प्राधान्य मिळायचे. त्याला रोखण्याचा अन्य कोणताही मार्ग ज्ञात नव्हता. ही परिस्थिती नव्वदच्या दशकाच्या मध्यावर पालटत गेली. १९९४ मधील स्पर्धेत तर उत्तेजके घेतल्याबद्दल त्याची विश्वचषकातूनच हकालपट्टी झाली. प्रमाणाबाहेर वारंवार वाढत जाणारे वजन, त्यापायी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया, हृदयाची आबाळ, त्यातून होणारे औषधोपचार नि शस्त्रक्रिया या चक्रातून तो अखेपर्यंत बाहेर पडू शकला नाही.

तरीही शंभरीपार वजन गेलेला मॅराडोनाही ज्या खुबीने चेंडूशी करामती करायचा, ते गारूड लक्षावधींच्या मन:पटलावरून कधी पुसलेच गेले नाही. फुटबॉलचे मैदान, चेंडू आणि मॅराडोना ही मैफल कधीही बेरंगी, बेसूर ठरली नाही. महानतम कोण? या चर्चेत जी नावे सातत्याने आणि प्राधान्याने येतात, त्यांच्यापैकी पेले यांना उत्तमोत्तम संघसहकारी लाभले. लियोनेल मेसीला कधीही अर्जेटिनाच्या संघासाठी मनासारखे खेळता आले नाही. बेकेनबाउर, क्रायुफ यांच्यासाठी व्यवस्था तयार होती. मॅराडोनाला ना संघ मिळाला, ना व्यवस्था. तरीही त्याच्या नावावर एक जगज्जेतेपद जमा झाले. या यशोगाथेतील परमोच्च क्षण १९८६ मध्येच आला आणि संपला. त्या स्पर्धेतील मॅराडोनाचे स्मरणदेखील आयुष्यभराचा आनंद देणारे! त्या सामन्यात त्याच्या मदतीला आलेला ‘देवाचा हात’ कधी तरी नाहीसा होणारच होता. तसा तो झाला. पण या एका सामन्यातून त्याच्यातील खेळाडूचे असामान्यत्व आणि त्या खेळाडूच्या माणूसपणातील सामान्यत्व अशा दोन्हीचे दर्शन झाले. माणसाच्या पूर्णत्वाच्या प्रवासातील या उणिवा त्याचा असामान्यत्वाचा प्रवास उजळवून टाकतात. तो पाहिल्यावर जाणवते की असामान्यांचे अल्पकालीन अपुरेपण हे सामान्यांच्या शाश्वत परंतु सपक दीर्घत्वापेक्षा नेहमीच मूल्यवान असते. पण असामान्य गुणांचे हे देवत्व पेलण्याचे सामर्थ्य नसेल तर हे असे देवत्व हा शाप ठरतो. मॅराडोनाच्या जीवनकहाणीचा अर्थ यापेक्षा वेगळा तो काय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:08 am

Web Title: editorial on argentina greatest footballer diego maradona dies abn 97
Next Stories
1 उंच माझा खोका..
2 दुसरी संधी!
3 हे नक्की कोणासाठी?
Just Now!
X