भारताबद्दल आणि त्याच्या संस्कृतीबद्दल ममत्व वाटणाऱ्या सर्वानीच कपिला वात्स्यायन यांचे कला-संस्कृतीविषयक चिंतन समजून घ्यायला हवे..

संस्कृती ही निव्वळ अभिमानस्पद किंवा गौरवास्पद ठरवण्याची बाब नाही असे सांगून न थांबता सर्जन, समन्वय आणि सहभाग या मूल्यांवर त्यांनी भर दिला..

‘गीतगोविंद’सारखे मध्ययुगीन काव्य देशभरातील अभिजात नृत्यशैलींचे पोषण करते, हे काव्य अनेक शैलींच्या लघुचित्रांचा विषय होते किंवा पार्वती-सदाशिव-अघोर हे शिवाचे त्रिमूर्ती रूप या ना त्या स्वरूपात केवळ भारतात नव्हे, तर आग्नेय आशियापर्यंत आढळते.. हा  खऱ्या अर्थाने संस्कृतीप्रसार! कोणा एका राजवटीमुळे नव्हे किंवा एखाद्याच पंथामुळे नव्हे, तर भारतीय सौंदर्यदृष्टीमुळे हा प्रसार घडला. ही सौंदर्यदृष्टी ‘भारतीय’, कारण इथल्या अध्यात्मात रुजलेली ही सौंदर्यदृष्टी सत्य-शिव-सुंदराशी नाते सांगते. ते नाते आपण कसे पुढे नेणार आहोत? बदलत्या काळाबरोबर संकल्पना बदलतात हे खरे; पण ‘वर्तमाना’ची कल्पना न करता ‘भूत आणि भविष्य’ हे दोन काळ मानून, त्या काळ-सम्राटाची सहचरी- सम्राज्ञी म्हणजे पृथ्वी, असे अथर्ववेदातील ‘पृथ्वीसूक्त’ सांगते. आज याच पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आणणारे आणि ‘वर्तमाना’चाच विचार करणारे आपण, त्या आपल्या भूत-भविष्याची जाणीव कशी जपणार आहोत? बदल घडतातच, फरक असतातच, वादही उरतातच.. पण या बदलांना, फरकांना, वादांना साकल्याने कवेत घेऊनच आपण वाढायचे आहे ना? -हे चिंतन कपिला वात्स्यायन यांचे, त्यातून पुढे येणारे प्रश्न त्यांनी कधी थेट लिहिलेले नसले, तरी त्या प्रश्नांना भिडण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न, हेच त्यांच्या जीवनाचे सार होते. ही जीवनयात्रा गुरुवारी, १७ सप्टेंबर या तारखेस संपली.

ते जीवन कसे होते, याकडे पाहण्याचे मार्ग अनेक. राजकीयदृष्टय़ा पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिल्यास ‘इंदिरा गांधींच्या जवळच्या म्हणून मोठय़ा झाल्या,’ या एका वाक्याने, सुमारे २५ उत्तमोत्तम संशोधनपर ग्रंथांच्या या लेखिकेचा जीवनपट गुंडाळून टाकता येईल. निव्वळ माहितीप्रधान दृष्टीने पाहिले तर त्या ग्रंथांच्या यादीसह, शिक्षण दिल्ली आणि अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठे तसेच बनारस हिंदू विद्यापीठात किंवा लग्नाआधीचे आडनाव मलिक, प्रख्यात हिंदी कवी ‘अज्ञेय’ (सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन) यांच्याशी विवाहानंतर त्यांचे आडनाव, संसार अल्पजीवी (१३ वर्षे) पण काडीमोडानंतरही सासरचे आडनाव कायम असे काही वैयक्तिक तपशील दिसू लागतील आणि राजकारणबाह्य़ सरकारी दृष्टीने पाहता कपिला वात्स्यायन यांचा किती संस्थांशी संबंध होता, मौलाना अबुल कलाम आजाद हे शिक्षणमंत्री असताना शिक्षणात भारतीय संस्कृतीला स्थान देण्यासाठी स्थापन झालेल्या समितीपासून ते ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रा’च्या – अर्थात दिल्लीतील प्रतिष्ठित ‘आयजीएनसीए’च्या स्थापनेपर्यंत अनेक संस्थांची जबाबदारी कपिला वात्स्यायन यांनी कशी उत्तमपणे सांभाळली, हेही दिसेल. यातून जणू त्यांचे मोठेपण कळणार नाही, अशी खात्रीच बाळगून मग त्यांना पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमीची प्रतिष्ठित फेलोशिप, किंवा रॉकेफेलर पाठय़वृत्ती, नेहरू पाठय़वृत्ती अशा बिनीच्या अभ्याससंधी कधीकधी मिळाल्या होत्या याचीही जंत्री देता येईलच. पण यातून कपिला वात्स्यायन यांचा खरा परिचय होईल का? अशा तपशिलांनाच आयुष्य मानण्याच्या पलीकडे त्या गेल्या होत्या, हे कुणाला समजेल का? त्याहीपेक्षा, कपिला वात्स्यायन आता असणार नाहीत हे आपले- भारत नावाच्या देशाबद्दल आणि त्याच्या संस्कृतीबद्दल ममत्व वाटणाऱ्या सर्वाचे- नुकसान आहे, हे कुणाला निव्वळ व्यक्तित्वाच्या साचेबद्ध तपशिलांतून कसे समजणार?

संहिता आणि भावदर्शन यांमधला भेद भरताच्या नाटय़शास्त्रापासून भारतीय चिंतनामध्ये स्पष्ट आहे. असे म्हणू की, कपिला मलिक म्हणून जन्मलेल्या व्यक्तीला एक संहिता मिळाली होती. इंदिरा गांधी या ‘गूँगी गुडिया’सुद्धा नव्हत्या तेव्हापासून त्यांच्याशी कपिला यांची ओळख असली, तरीही ‘इंदिरा गांधींशी जवळीक’ हाही त्या संहितेचा भागच म्हणू. किंवा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निव्वळ एका आदेशाने ‘आयजीएनसीए’ ही संस्था स्थापन होणे आणि तिच्या संस्थापक अध्यक्षपदी कपिला वात्स्यायन यांची नियुक्ती होणे हाही संहितेचा भाग. पण या संहितेचे कपिला यांनी पुढे काय केले?

‘मी यापूर्वीही अनेक कलासंस्थांशी संबंधित होते, त्यापेक्षा ही निराळी संस्था असेल,’ हे राजीव गांधींना सांगणाऱ्या कपिला वात्स्यायन अहंकाराने बढाई मारत नव्हत्या, हे नंतर त्या संस्थेने सिद्ध केले. अनेक देशांतील ग्रंथसंग्रहालयांत विखुरलेला भारतीय वारसा कपिला यांनी येथे आणला, सुसज्ज वास्तूसह त्याच आवारात ‘माटी घर’ ही संजय प्रकाश या वास्तुरचनाकाराची कलाकृतीच ठरावी अशी इमारतही उभी राहिली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, संस्कृतीच्या विखंडित रूपांची सांधेजोड करण्याचे काम या संस्थेने कपिला यांच्या कारकीर्दीत उत्तमपणे केले. लेखी अथवा अभिजात मानल्या जाणाऱ्या वारशाइतकाच तोंडी वारसाही महत्त्वाचा आहे, हे जाणले. म्हणूनच, ‘काळ संकल्पनेचा विचार’ या विषयावर येथे झालेल्या परिसंवादात दलाई लामा आणि जयंत नारळीकर, शतकानुशतके तमिळनाडूत राहिलेल्या तोडा ‘आदिवासीं’सह सहभागी झाले होते. किंवा जयदेवाच्या गीतगोविंदाचे संगणकाधारित बहुमाध्यमी – मल्टिमीडिया- रूप या संस्थेने सिद्ध केले. संशोधनसंस्थेचा दर्जा मिळवून ‘आयजीएनसीए’ने अनेक अभ्यासकांना संधी दिली. संस्थेची अशी उभारणी करण्यासाठी दीर्घ प्रशासकीय अनुभवही हवा. तो कपिला वात्स्यायन यांच्याकडे होता.

पण या संस्थात्मक कार्याच्या पलीकडे कपिला वात्स्यायन यांचे विचारधन आहे. अमेरिकेतून मायदेशी परततानाच ‘आपल्याला खरा भारत माहीत कसा नाही?’ हा प्रश्न घेऊन, त्याची अनेक उत्तरे शोधून नव्या प्रश्नांकडे जाण्याची धमक कपिला यांनी दाखवली. कथ्थक, मणिपुरी, भरतनाटय़म् आणि ओडिसी या चारही नृत्यशैली रीतसर शिकलेल्या कपिला यांनी नाटय़शास्त्राच्या आजूबाजूला पाहात एकीकडे वेदवाङ्मय तर दुसरीकडे बौद्ध त्रिपिटके, पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. या अभ्यासाला राजकीय डावे-उजवेपणाची तमा नव्हती आणि त्यांची संस्कृतीसमन्वयवादी विचारधारा ही कुणाच्या राजकीय सोयीचा भाग नव्हती. ‘समन्वय म्हणजेच संस्कृती’ या समजेतून ती उमलली होती. ‘उमलून येण्या’चे पृथ्वीसूक्तातील उल्लेख, हे कपिला यांना सर्जनाचे, कलेचे भान माणसाला येण्याचा क्षण वाटतात. कलादेखील मातीशी नाते सांगते, तिने उमलूनच यायला हवे.. हा आग्रह पुढे त्या अनेकदा मांडतात आणि त्याहीपेक्षा, ‘कला हा ‘इव्हेन्ट’ नव्हे आणि रसिक हे बघे नव्हेत. लोक बघेच असतील, तर कलेतून संस्कृतीकडे जाता येत नाही’ अशा अर्थाचे सूत्रही सांगतात! हे महत्त्वाचेच, कारण फ्रान्समध्ये ऐन चार्ल्स द गॉल राजवटीत ‘सोसायटी ऑफ द स्पेटॅकल’ लिहिणाऱ्या गाय डिबोर्डने जी खंत व्यक्त केली होती, तिच्या पुढे जाणारी उत्तरे कपिला वात्स्यायन यांच्याकडून मिळतात. ‘संस्कृतीला अभिमानास्पद, वैभवशाली वगैरे विशेषणे न लावता पाहिले, की तिच्याकडे पाहण्याची दृष्टी स्वच्छ होते. नपेक्षा ती इतरांबद्दल कलुषित आणि अप्रामाणिक राहाते’ हेही त्यांनी मांडलेले सूत्र.

अनेक अव्वल सांस्कृतिक संस्थांच्या सूत्रधार म्हणून उत्तम कारकीर्द करणाऱ्या या विदुषी एका अर्थाने संस्कृतीच्या सूत्रधार ठरतात, त्या भरतमुनींच्या नाटय़शास्त्रातील कलावंत व रसिक यांतील दुवा ठरणाऱ्या ‘सूत्रधारा’प्रमाणे. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.