अन्य अनेक राज्यांत युती-आघाडी केलेल्या आणि करणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नुकताच पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीला ‘स्वबळा’चा आदेश दिला आहे..

पक्षातर्फे राज्यात ६७,००० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असले तरी राज्य भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने अधिक सक्षम व्हावे असे जे. पी. नड्डा सांगतात; हे भाजपच्या आधुनिक राजकीय व्यवस्थापनास साजेसेच. परंतु महाराष्ट्राचा अलीकडील इतिहास युती व आघाडय़ांचा आहे..

अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी, समाजातील पददलितांच्या प्रगतीसाठी वा विषमता दूर करण्यासाठी, पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्यासाठी वगैरे अशा कोणा उदात्त कारणांसाठी आपल्या देशाच्या इतिहासात राजकीय पक्षांची आघाडी स्थापन झाली, असे घडले आहे काय? या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणाचा काही किमान अंश शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती ‘नाही’ असेच देईल. राजकीय पक्ष हातमिळवणी करतात ते प्राधान्याने सत्तास्थापन करता यावी हे एकमेव उद्दिष्ट ठेवून. सत्ता नामक चंचला कोणा एकास वरत नाही आणि तिचे पाणिग्रहण करणे कोणा एकास झेपत नाही म्हणून दोघातिघा वा अधिकांनी एकत्र येऊन तीस प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे राजकीय पक्षांची युती वा आघाडी. शक्य झाल्यास ही सत्ता आपल्या एकटय़ाचीच व्हावी अशीच या सर्व बिजवरांची इच्छा असते. पण ते जमत नाही म्हणून केवळ नाइलाज म्हणून हे आघाडी प्रयोग होतात हे चिरंतन सत्य. पक्ष बदलतील पण हे तत्त्व मात्र सर्वास लागू होते. हे आसेतुहिमाचल सत्य एकदा का मान्य केले की मग ‘‘महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्वार्थासाठी स्थापन झाली,’’ हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप हास्यास्पद अधिक की केविलवाणा अधिक, की दोन्ही- असा प्रश्न पडेल. शिवसेनेने आपला हात धरून सत्तासंसार स्थापला तर तो देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालेला रीतसर नातेसंबंध आणि राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी केल्यास ती कृती मात्र राजकीय बदफैली, असा भाजपच्या म्हणण्याचा अर्थ.

तोच त्या पक्षाच्या राज्य पातळीवरील नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत अधोरेखित करण्यात आला. राज्य भाजपच्या नवनियुक्त कार्यकारिणीच्या बैठकीस नड्डा यांनी दिल्लीतून मार्गदर्शन केले. या कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक. बारा पक्षांचे पाणी पिऊन भाजपच्या अंगणात गंगाजलप्राशनार्थ दाखल झालेल्या अनेक आदरणीयांचा समावेश या कार्यकारिणीत आहे. हे सर्व मान्यवर सर्वसंगपरित्याग करून महाराष्ट्रभूच्या उद्धारासाठीच भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या मनात कोणताही राजकीय स्वार्थ नाही, हे आपण अजाण जनतेने लक्षात घ्यायला हवे असे नड्डा यांना बहुधा अभिप्रेत असावे. हरयाणात दुष्यंत चौताला यांच्या पक्षाशी भाजपने निवडणुकोत्तर केलेली आघाडी ही अजिबात स्वार्थासाठी नाही. नरेंद्र मोदी यांच्यावर टोकाचे टीकाप्रहार करणाऱ्या, भ्रष्टशिरोमणी लालूप्रसाद यांच्याशी अपवित्र युती करून बाटलेल्या नितीश कुमार यांच्याशी भाजपची युती ही मुळीच स्वार्थासाठी नाही. इतकेच काय पण एके काळी पाकिस्तानवादी गणल्या गेलेल्या मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाशी भूतपूर्व जम्मू-काश्मीर राज्यात भाजपने केलेली युती म्हणजे तर परमार्थाचा सर्वोच्च नमुना. या कोणत्याही युतींत भाजपचा स्वार्थ नाही. म्हणूनच राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, सर्वगुणसंपन्न उदयनराजे भोसले हे वा असे बहुराजकीयपक्षकोविद नेते भाजपवासी होतात ते त्यांच्यातील स्वार्थभावनेचे दमन झाल्यावरच असे काही नड्डा यांनी आपणास सांगितले तरी आपण त्यावर विश्वास ठेवायला हवा. कारण ते राजकीयगुणसंपन्न, सद्गुणी अशा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणून. इतकेच काय, ज्या व्यक्तीचे स्थान तुरुंगात आहे असे भाजपस निवडणुकीपूर्वी वाटत होते त्या अजित पवार यांच्याशी पहाटकालीन गांधर्वयुती करण्याच्या भाजपच्या मनसुब्यातही काही म्हणता काही स्वार्थ नव्हता. राज भवन किती पहाटे शपथविधीस तयार होऊ शकते आणि माध्यमांना किती लवकर त्याचा सुगावा लागू शकतो याची चाचणी घेण्याचाच त्यामागे उद्देश होता असे भाजपाध्यक्षांनी सांगितले तरीही ते सत्य आपण ग्रहण करायला हवे. या सत्य वृत्तीपोटीच नड्डा यांनी आपल्या महाराष्ट्र शाखेस स्वबळावर सत्ता खेचून आणण्याचा आदेश दिला.

पण दुसऱ्याच दिवशी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यावर पाणी ओतले. भाजप अजूनही शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास तयार आहे हे गुपित चंद्रकांतदादांनी फोडले. हे म्हणजे घटस्फोटावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतरसुद्धा जोडीदारास डोळे घालण्याचा प्रकार. एका बाजूने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात सत्तेस स्वबळावर जिंका आणि दुसरीकडून ज्या प्रांतात सत्ताहरण करावयाचे आहे तेथील अध्यक्ष ‘एक से भले दो’ असे सुचवतात. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षास हे शोभणारे नाही. पण पाटील यांच्या विधानाचा आश्चर्यधक्का येथेच थांबत नाही. ‘शिवसेना साथीस घेऊ; पण निवडणुका मात्र स्वतंत्र लढवू,’ असे अजब तर्कट चंद्रकांतदादा मांडतात तेव्हा भल्या भल्या राजकीय पंडितांच्या डोळ्यासमोर काजवे चमकून ‘आता हे काय काढले नवीनच’ असा प्रश्न त्यांस पडला असणार. निवडणुका स्वतंत्र लढवल्यावर बहुमत मिळाल्यास भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज काय आणि नाही मिळाले तर शिवसेनेच्या पाठिंब्याची किंमत काय, हा प्रश्न. दादांनी त्याचे उत्तर द्यायला हवे. या कार्यकारिणी बैठकीत राज्य भाजपने तब्बल ६७ हजार व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप स्थापन केल्याबद्दल नड्डा यांनी संतोष व्यक्त केला. या ग्रूप्सवरून पक्षाचा प्रचार अधिक जोमाने करण्याची सूचना पक्षाध्यक्षांनी केली. पक्षाचा माहिती-तंत्रज्ञान विभाग अधिक सक्षम करण्याची गरजही नड्डा यांनी व्यक्त केली. राज्यभरात ६७ हजार व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप स्थापले जाणे आणि राज्य भाजपच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने अधिक सक्षम होणे म्हणजे काय, हे महाराष्ट्रातील स्मार्ट फोनधारकांना समाजमाध्यमांतून आगामी काळात कळेलच.

पण त्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा प्रसारही या ग्रूप्सवरून झाल्यास नागरिकांचे खरे प्रबोधन होईल. कारण हा इतिहास दर्शवतो की महाराष्ट्रात साधारण गेल्या तीस वर्षांत एकाही राजकीय पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. शेवटचा असा एकहाती विजय मिळवणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. पण त्यानंतर त्या पक्षाला आपल्या त्या यशाच्या सावलीतही कधी जाता आले नाही, इतकी दुर्दशा झाली. त्याचप्रमाणे ना राष्ट्रवादी ना शिवसेना स्वबळावर सत्ता मिळवू शकले. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही सेनेस एकटय़ाला सत्तासोपान चढता आला नाही आणि नरेंद्र मोदी यांच्या ऐन लाटेतही भाजप १२२ पेक्षा अधिक आमदार मिळवू शकला नाही. ज्या निवडणुकीनंतर त्या पक्षास अजितदादांशी गांधर्वयुती करावी लागली त्या निवडणुकीतही भाजपला जास्तीत जास्त १२५-१३० जागांचीच अपेक्षा होती. अर्थात म्हणून स्वबळावर सत्तास्वप्ने पाहूच नयेत असे अजिबात नाही. भाजपसारख्या शिस्तबद्ध, बूथप्रमुख- पन्नाप्रमुखसारख्या आधुनिक राजकीय व्यवस्थापनविशारद पक्षास तर हे मुळीच लागू होत नाही. त्यामुळे त्या पक्षाने आपली घोडदौड सुरू ठेवण्यात कोणाचा अडसर असणार नाही.

पण मुद्दा आहे तो आपण सोडून अन्य कोणत्याही राजकीय युतीस स्वार्थी, अप्पलपोटी वगैरे ठरवण्याच्या भाजपच्या वृत्तीचा. वास्तविक दिल्लीत याच पक्षाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात दोन डझनभर राजकीय पक्षांशी युती करून सरकार चालवले आहे. इतकेच काय वैचारिकदृष्टय़ाही अस्पर्श अशा डाव्यांनाही आघाडय़ांच्या राजकारणात साथ देऊन आपली लवचीकता काँग्रेसइतकीच आहे हे दाखवून दिलेले आहे. आताही अनेक पक्षांतील गणंगांना सामावून घेऊन आपले ‘टाकाऊतून टिकाऊ’ युत्या करण्याचे राजकीय कसबच भाजप सिद्ध करतो. तेव्हा राजकारण, निवडणुका, युती वगैरे मुद्दय़ांवर आपण अन्यांपेक्षा कोणी वेगळे आहोत हे दाखवून देणे भाजपने आता तरी थांबवावे. राजकारणाच्या आखाडय़ात भाजप हा सध्याचा ‘राजहंस’ आहे आणि त्याचे ‘चालणे जगी झालिया शहाणे’ हे मान्य. पण म्हणून अन्य कोणा ‘पक्षा’ने चालूच नये, हा हट्ट बरा नाही.