ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना त्यांच्या सल्लागाराच्या नियमभंगाबद्दल जबाबदारीने प्रश्न विचारणारे पत्रकार आणि सामान्यजन हे लोकशाहीस अभिमानास्पदच..

प्रचंड बहुमताने निवडून आलेले जॉन्सन सरकार या आगळिकीस पाठीशी घालत असल्याचा निषेध म्हणून मंत्री राजीनामा देतात आणि सत्ताधारी पक्षाचे ४० खासदारही दबाव आणतात, हे आणखी विशेष!

करोनामुळे राजकारण बदलेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकात प्रा. एडवर्ड लटवाक यांनी केले; त्याच्या दुसऱ्याच दिवशी ब्रिटिश मंत्रिमंडळातून एका मंत्र्याने पंतप्रधानांच्या सल्लागाराच्या निषेधार्थ राजीनामा द्यावा ही घटना फारच रंजक ठरते. रंजक अशासाठी की, हे प्रकरण येथेच थांबत नाही. यानंतर डॉमिनिक कमिंग्स या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सल्लागाराने राजीनामा न दिल्यास त्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी सत्ताधारी हुजूर पक्षाच्या ४० खासदारांनी एकत्रितपणे केली. विरोधी मजूर पक्षाने तर पंतप्रधान जॉन्सन यांच्या सरकारवर टीकेच्या तोफा डागल्या असून विविध जनमत चाचण्यांतील कलदेखील सरकारविरोधातच जाताना दिसतात. अमेरिका, ब्राझील असे अनेक देश करोनाकेंद्रित राजकीय वादळात सापडलेले असताना, त्यात आता ब्रिटनची भर. यातून जॉन्सन यांची सहज सुटका होण्याची शक्यता नाही.

झाले ते असे की, करोनाकालीन निर्बंधावस्थेत समस्त ब्रिटिश जनता आला दिवस कसा तरी ढकलत असताना पंतप्रधान जॉन्सन यांचे स्वीय सहायक कमिंग्स आपल्या पालकांना भेटण्यासाठी ४०० किलोमीटरचा प्रवास करते झाले. त्यांच्यासमवेत या प्रवासात एका प्रकाशनगृहात संपादक असलेली त्यांची पत्नीदेखील होती. वास्तविक त्यांच्या पत्नीस करोनाची लक्षणे दिसत होती आणि या दोघांनीही प्रवास करणे शहाणपणाचे नव्हते. त्यातही या कमिंग्स यांचा आगाऊपणा असा की, ते केवळ आपल्या पालकांनाच भेटून थांबले नाहीत वा राजधानी लंडनला परतले नाहीत. त्यांनी जवळील एका निसर्गरम्य स्थानासही भेट दिली. तेथे काही काळ व्यतीत केल्यानंतर हे उभयता लंडनला परतले. हे सर्व तसे गुलदस्त्यातच राहिले.

पण ‘द गार्डियन’सारख्या सर्वापासून समानांतरी असलेल्या वर्तमानपत्राने पंतप्रधानांच्या सल्लागाराचा हा उद्योग चव्हाटय़ावर आणला आणि चांगलेच वादळ उठले. संपूर्ण इंग्लंड कठोर टाळेबंदी अनुभवत असताना पंतप्रधानांच्या सल्लागाराने हे असे स्वातंत्र्य अनुभवावे का, हा प्रश्न चारही दिशांनी विचारला जाऊ लागला आणि कमिंग्स यांच्या वर्तनाविषयी संताप व्यक्त झाला. या आगीत तेल खुद्द कमिंग्स यांनीच ओतले. करोनाकाळातील बंदिवासात पालकांना भेटणे हे एक वेळ क्षम्य झाले असते. पण त्यानंतरची त्यांची सहल अनेकांच्या डोळ्यावर आली आणि ते साहजिकही होते. त्याचे समर्थन करताना कमिंग्स आणखी खोलात गेले. ‘‘पालकांना भेटून पुन्हा लंडनपर्यंत मोटार चालवत यायचे होते. ते जमेल का हे पाहण्यासाठी डोळ्यांची क्षमता तपासणे हा उद्देश यामागे होता, ते पर्यटन नव्हते,’’ असे अजब तर्कट त्यांनी आपल्या समर्थनार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. तोही अंगाशी आला.

यानंतर जे काही घडले ते खऱ्या लोकशाहीस अभिमान वाटावा असे. प्रथम म्हणजे या कमिंग्स यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. तीत त्यांची जी चिरफाड झाली ती पत्रकारितेचे सामर्थ्य आणि जबाबदारी दाखवून देणारी होती. मुदलात हे कमिंग्स हे तसे गूढ गृहस्थ. पंतप्रधान जॉन्सन यांचे अत्यंत महत्त्वाचे सल्लागार जरी ते असले, तरी त्यांना प्रकाशझोतापासून दूर राहाणे आवडते. पण या नियमभंगाने कमिंग्स यांच्या सार्वजनिक जीवनाची कुंडलीच चव्हाटय़ावर मांडली गेली. त्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली ती केवळ पंतप्रधानांचा अधिकार असलेल्या ‘१०, डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातील गुलाबवाटिकेत. कमिंग्स यांच्या पत्रकारीय उलटतपासणीस तेथूनच सुरुवात झाली. ‘‘तुम्ही सरकारचाच नियम तोडला आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा काय,’’ अशा थेट प्रश्नापासून ते ‘‘सर्वसामान्य लंडनकराने टाळेबंदी तोडल्यास त्याच्याकडून दंड आकारला गेला, या दंडापोटी तुम्ही किती रक्कम भरली,’’ अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती कमिंग्स यांच्यावर झाली. त्यात त्यांनी आपली ‘तशी चूक’ झाली इतपत कबुली दिली. पण क्षमा मागणे वा राजीनामा देणे मात्र ‘गरज नाही’ म्हणून नाकारले. थोडक्यात त्यांचा आविर्भाव ‘त्यात काय एवढे’ असा बेफिकिरीचा होता.

त्यामुळे तर त्यांच्याविरोधातील वादळाची तीव्रता अधिकच वाढली आणि त्यात जॉन्सन सरकार अडकले. ब्रिटिश माध्यमांनी हा मुद्दा असा काही लावून धरला, की खुद्द जॉन्सन यांना त्याची दखल घ्यावी लागली आणि वार्ताहर परिषदेस सामोरे जावे लागले. वार्ताहरांच्या प्रश्नांचा भडिमार त्यात इतका होता की जॉन्सन गांगरून गेले आणि त्यांना हा संवाद आवरता घ्यावा लागला. सामान्य जनतेस एक न्याय आणि कमिंग्स यांना दुसरा नियम हे कसे, हा सर्व वार्ताहरांच्या प्रश्नांचा गाभा होता आणि जॉन्सन यांचा विषय बदलण्याचा प्रयत्न पत्रकारांनी यशस्वी होऊ दिला नाही. यात जॉन्सन इतके केविलवाणे झाले, की कमिंग्स यांच्या दृष्टीक्षमता तपासण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांना आपल्यालाही करोनामुळे कसा चष्मा लागला आहे वगैरे काही सांगावे लागले आणि खिशातून चष्मा काढून दाखवावा लागला. पण त्यामुळे अर्थातच प्रश्न मिटला नाही. आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी पंतप्रधान जॉन्सन कोणत्याही स्तरास जात आहेत असाच संदेश त्यातून गेला आणि सरकारविरोधात टीकेची झोड उठली. विविध नागरी संघटनांनी आपापल्या लोकप्रतिनिधींकडे सरकारविरोधात नाराजी तर व्यक्त केलीच. पण वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी या काळात टाळेबंदीमुळे ताटातूट झालेल्यांच्या कहाण्या विशेषत्वाने प्रसिद्ध केल्या आणि त्यावर ‘कमिंग्स पाहा किती भाग्यवान, त्यांच्यावर अशी काही वेळ आली नाही’- अशी मल्लिनाथी केली. त्यातही एका एकाकी वृद्धाची प्रतिक्रिया सर्वानाच भावनावश करणारी होती. हा वृद्ध ४० वर्षांच्या संसारानंतर आपल्या सहचारिणीस अखेरचा निरोपही देऊ शकला नाही. त्याची अर्धागी करोनाने गेली आणि सरकारी नियमामुळे त्यास घरातच डांबून राहावे लागले. या गृहस्थाने आपल्या निवेदनाचा शेवट कमिंग्स यांना लाखोली वाहात केला.

या सगळ्याचा परिणाम असा की, पंतप्रधानांच्या या सल्लागाराच्या निषेधार्थ स्कॉटलंड प्रांतातील मंत्री डग्लस रॉस यांनी पदत्याग केला. वास्तविक कमिंग्स यांचे कृत्य आणि रॉस यांचा काही संबंध नाही. पण सहकाऱ्यामुळे जनतेत निर्माण झालेल्या सरकारविरोधातील भावनांचा आदर करीत आपण राजीनामा देत असल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या मतदारसंघातील अनेकांनी कमिंग्स यांच्या कृत्याबद्दल रॉस यांना जाब विचारला. दरम्यान, काही महत्त्वाच्या जनमत चाचण्यांचे कलही सरकारविरोधात गेले. कमिंग्स यांचे चुकले आणि पंतप्रधान जॉन्सन तरीही त्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल सर्वच चाचण्यांतून सरकारविषयी नाराजी व्यक्त झाली. तिच्यावर स्वार होत सत्ताधारी पक्षाच्या सुमारे ४० खासदारांनी- जॉन्सन यांनी कमिंग्स यांच्यावर कारवाई करावी, अशी भूमिका घेतली. कमिंग्स यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास त्यांना काढून टाकावे असेच या सर्वाचे म्हणणे. अशी मागणी करणाऱ्या स्वपक्षीयांचा हा दबाव वाढतच जाईल अशी लक्षणे दिसतात.

ताज्या निवडणुकांत स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेल्या जॉन्सन सरकारला अशा संकटास तोंड द्यावे लागणे ही ब्रिटिश इतिहासातील अभूतपूर्व घटना. यानिमित्ताने जनतेस उत्तरदायी नसलेल्या अशा उपटसुंभांचे सरकारातील प्रस्थ कसे वाढते आहे, याची चर्चा ब्रिटिश राजकारणात सुरू झाली ही महत्त्वाची बाब. या कमिंग्स यांनी ब्रेग्झिट मोहिमेचा वारा जॉन्सन यांच्या शिडात भरण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे ते पंतप्रधानांसाठी महत्त्वाचे. त्यामुळेच कमिंग्स यांच्यावर आज ना उद्या राजीनामा देण्याची वेळ येईल अशी चिन्हे आहेत. तसे झाल्यास कमिंग्स हे विषाणुनिर्मित राजकारणाचे बळी ठरतील. या विषाणूप्रमाणेच विषाणुकारणाचा प्रसार अबाधित राहील असे दिसते.