07 December 2019

News Flash

‘चवथी’चा चंद्र

जे थांबते ते विज्ञान नसतेच; म्हणून तर आपल्या शास्त्रज्ञांकडून आणखीही अपेक्षा आहेत..

(संग्रहित छायाचित्र)

अडचणींवर अवघ्या आठवडय़ाभरात मात करून मंगळवारी मिळवलेले यश, यात आपल्या तंत्रज्ञ / वैज्ञानिकांचे मोठेपण दडलेले आहे! आपण योग्य वेळी, योग्य स्थानी योग्य आयुधांसह आहोत ही बाब मोठी आश्वासक; कारण पुढची काबीज करावी अशी बाजारपेठ ही अवकाशक्षेत्र असणार आहे..

गेल्या सोमवारी इंधनगळतीमुळे पुढे ढकलावे लागलेले चांद्रयान अभियान अवघ्या आठवडाभरात आपल्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी यशस्वी करून दाखवले. यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे, म्हणजे इस्रोचे, मन:पूर्वक अभिनंदन. जगातील मोजक्या देशांतील विज्ञान संस्थांत इस्रो गणली जाते. अशा संस्था ज्या ठिकाणी विकसित झाल्या ते अन्य देश प्रगत आहेत. त्यांच्याकडे अफाट साधनसंपत्ती आहे. आपले तसे नाही. तिसऱ्या जगातील जगणे आणि त्यास साजेशा साधनसंपत्तीच्या आधारे विकसित देशांशी स्पर्धा करणे अवघड असते. आपल्या वैज्ञानिकांनी या साऱ्या अडचणींवर मोठय़ा ताकदीने आणि सातत्याने मात केली. १९६० च्या दशकात होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने केरळातील थुंबा येथे या संस्थेची पहिली पावले पडली. तो आणि नंतरचा काळ एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या तंत्रज्ञाने सायकलवरून प्रवास करीत संस्था उभारणीत स्वत:ला झोकून देण्याचा. इस्रोच्या उभारणी काळातील छायाचित्रे वा इतिहास ज्यांनी पाहिला/वाचला असेल त्यांना सुरुवातीला बलगाडीवरून कसे प्रक्षेपक नेले जात ते स्मरेल. तेथपासून ‘चांद्रयान-२’च्या टप्प्यापर्यंत इस्रोने मारलेली भरारी केवळ नेत्रदीपक ठरते. त्यासाठी या संस्थेतील वैज्ञानिकांचे आणि त्यांचा पुरवठा अक्षय राहण्यासाठी वेळीच उभारण्यात आलेल्या शिक्षण संस्थांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

अवघ्या काही दिवसांत आपली ‘चांद्रयान-२’ मोहीम चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर उतरेल आणि त्यातील यंत्रवाहन त्या पृष्ठभागावर प्रत्यक्ष उतरेल त्या वेळी पुन्हा एकदा इतिहासाचे नवे पान इस्रोच्या नावाने लिहिले जाईल. गेल्या आठवडय़ात पुढे ढकलले गेलेले उड्डाण आणि आज त्या वेळी उद्भवलेल्या अडचणींवर मात करीत मंगळवारी  मिळवलेले यश यात आपल्या तंत्रज्ञ / वैज्ञानिकांचे मोठेपण दडलेले आहे. गेल्या आठवडय़ात आपल्याला या यानांचे उड्डाण पुढे ढकलावे लागले कारण क्रायोजेनिक इंजिनास लागलेली गळती. या इंजिनाचे तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचे असते आणि त्यातील इंधनास वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या दबावाखाली वेगवेगळ्या रूपात ठेवणे हे त्याहूनही अधिक खडतर असते. त्या वेळेस द्रवरूप इंधनास काही एक विशेष दबावाखाली ठेवणाऱ्या हेलियमच्या वायुकक्षात गळती आढळून आली. त्यामुळे हे उड्डाण ऐनवेळी लांबणीवर टाकले गेले. पण अवघ्या आठवडय़ात आपल्या तंत्रज्ञांनी हा दोष दूर केला आणि आज चांद्रयान त्यामुळे मोठय़ा दिमाखात आपली साधनसामग्री घेऊन अवकाशाकडे झेपावले. अवकाश महासत्तेत भारताचा प्रवेश झाल्याचे ते द्योतक होते. आपण पहिली आणि दुसरी औद्योगिक क्रांती हुकलो. त्यामुळे त्याची फळे सर्वसामान्य भारतीयाच्या ताटात पडेपर्यंत बराच काळ जावा लागला. त्यामानाने अवकाश-क्रांती घडत असताना आपण योग्य वेळी, योग्य स्थानी योग्य आयुधांसह आहोत ही बाब मोठी आश्वासक ठरते.

याचे कारण यापुढे पुढची काबीज करावी अशी बाजारपेठ ही अवकाशक्षेत्र असणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेच्या चंद्रसहलीनंतर आजतागायत अवघ्या ५७१ व्यक्तींना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बंध तोडता आले. म्हणजे इतकीच माणसे अवकाशात जाऊ शकली. परंतु ‘द इकॉनॉमिस्ट’ दाखवून देते त्यानुसार आगामी काळात मात्र अवकाशयात्रींची संख्या झपाटय़ाने वाढेल. प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने होणारा विकास, नवेनवे इंधनशोध आणि कमीकमी होत जाणारा खर्च यामुळे अवकाशक्षेत्र ही उद्याची बाजारपेठ असणार आहे यात शंका नाही. यामुळे अवकाश हे नवे पर्यटन वा तीर्थक्षेत्र ठरणार आहे. अशा वेळी या क्षेत्रात आपण आघाडी घेऊ शकलो तर ते निश्चितच दूरदृष्टीचे ठरेल यात शंका नाही. त्यामुळे देशोदेशांत आताच अवकाश प्रगतीची लगबग दिसून येते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२४ पासून पुन्हा एकदा मानवी प्रवासी चंद्रावर पाठवू इच्छितात. चीनलादेखील २०३५ सालापर्यंत चंद्रावतरण करावयाचे आहे. आपणही २०२२ सालापर्यंत मानवी चंद्रमोहीम हे लक्ष्य ठेवलेले आहे. त्या दृष्टीने आजचे आपले यश महत्त्वाचे ठरते.

ते लक्षात घेताना या क्षेत्रात जागतिक पातळीवर काय सुरू आहे याचाही आढावा घ्यायला हवा. कारण त्यामुळे आपणांस किती मजल मारायची आहे याचाही अंदाज यायला मदत होते. त्यासाठी अवकाशक्षेत्राच्या विकासासाठी विकसित देशात खासगी उद्योगाने यात मारलेली मुसंडी लक्षणीय ठरते. स्पेसेक्स ही ‘टेस्ला’कार एलॉन मस्क यांची कंपनी, जेफ बेझोस यांची अ‍ॅमेझॉन, व्हर्जनि गॅलॅक्टिक आदी कंपन्यांनी हजारो कोटींची गुंतवणूक या क्षेत्रात केली असून यातील व्हर्जनि ही कंपनी तर २०२२ पर्यंत हजार पर्यटकांना अवकाशात घेऊन जाण्याचे उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने प्रयत्नास लागली आहे. तेच आपले पहिला भारतीय चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य आहे, ही बाब लक्षात घ्यायला हवी. स्पेसेक्स या एकटय़ा कंपनीचे जवळपास दोन डझन इतके उपग्रह आताच अवकाशात घिरटय़ा घालू लागले आहेत. यातील अनेक कंपन्यांनी केवळ चंद्रावर नव्हे तर मंगळ आदी ग्रहांवरदेखील पर्यटक पाठवण्याची तयारी सुरू केली असून त्यामुळे प्रक्षेपकनिर्मिती हीदेखील मोठी व्यवसायसंधी ठरणार हे उघड आहे. त्यामुळे या संभाव्य व्यवसायसंधी साधण्यासाठी आपण सज्ज राहण्यात निश्चितच शहाणपणा ठरतो. भूतकाळात आपल्या द्रष्टय़ा राज्यकर्त्यांनी तो निश्चितच दाखवला. त्याच विज्ञानदृष्टिकोन आणि विज्ञानवृत्तीच्या मार्गाने आपले वर्तमानातील आणि भविष्यातील राज्यकत्रे देशास नेतील ही आशा.

तथापि या संदर्भात आपल्या वैज्ञानिक संस्थांबाबत काही अपेक्षा वर्तवणे गरजेचे ठरते. त्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चमकदार घोषणांच्या प्रेमात न पडण्याची. अशा घोषणा, घोषवाक्ये यांची गरज राजकारणी आणि शासकांना असते. वैज्ञानिकांनी या मोहापासून चार हात दूर राहायला हवे. आपली अवकाश संशोधन संस्था आता तशी आहे, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. आजच्या प्रक्षेपकाचे ‘बाहुबली’ हे नाव हा यामागचा एक पुरावा. आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह या प्रक्षेपकातून अवकाशात वाहून नेता येणार म्हणून त्याचे नाव ‘बाहुबली’. पण हा ‘बाहुबली’ आज जे वजन घेऊन अवकाशात उडाला ते आहे जेमतेम आठ टन. आपल्या दृष्टीने भले हा विक्रम असेल. पण यापेक्षा साधारण चार पट वजन स्पेसेक्सच्या फाल्कन या प्रक्षेपकाने आपल्यापेक्षाही पुढे वाहून नेले आहे. शौर्यदर्शक नावे शस्त्रास्त्रांना ठेवली जातात, प्रक्षेपकासारख्या साधनांना नव्हे. तात्पर्य इतकेच की बाहुबली आदी उन्मादसदृश नावे वैज्ञानिक संस्थांनी निवडण्याचे कारण नाही. या क्षेत्रात अंतिम साध्य असे काही नसते.

कारण हे विज्ञान क्षेत्र आहे. ते क्षितिजासारखे असते. आपण पुढे जाऊ तसतसे आपले क्षितिजही पुढे जाते. ते तसेच असायला हवे. जे थांबते ते विज्ञान नसतेच. ‘चांद्रयान-२’च्या प्रक्षेपणाआधी पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल, म्हणजे पीएसएलव्ही, नावाने ओळखले जाणारे ४६ प्रक्षेपक आपण अवकाशात सोडले. तरीही या वेळेस आपणास इंधनगळतीच्या आव्हानास तोंड द्यावे लागले. ते आपण पार केले हे कौतुकच. पण त्यामुळे आव्हानाचा आकार ध्यानात आला. जगातील अवघ्या तीन देशांना हे साध्य करता आले आहे. आपण चौथे. ही खचितच मोठी अभिमानाची बाब. अवकाशविज्ञानातील यशाची ही चवथीच्या चंद्राची कोर अशीच तळपत ठेवणे हे आर्यभट्ट, भास्कराचार्य आदींचा वारसा सांगणाऱ्या आपणासमोरचे खरे आव्हान.

First Published on July 23, 2019 12:06 am

Web Title: editorial on chandrayaan 2 launch abn 97
Just Now!
X