31 March 2020

News Flash

चंद्रमाधवीचे प्रदेश

चांद्रयानाचे जे काही झाले ते निव्वळ यश वा अपयश या संकल्पनांतून मोजता येणार नाही..

(संग्रहित छायाचित्र)

एखाद्या प्रयोगाच्या कथित यशापयशाच्या उन्मादावर स्वार होण्यात धन्यता मानणाऱ्यांनी- आपण वैज्ञानिकतेसाठी काय करतो, या प्रश्नाचे उत्तर शोधावे. मग लक्षात येईल, की महासत्ता होण्याच्या स्वप्नावर हिंदूोळणाऱ्या आपल्या देशात गेली तब्बल २० वर्षे विज्ञान संशोधनावरील तरतुदींत वाढच झालेली नाही..

‘या पृथ्वीचे त्या चंद्राशी कुठले नाते’ हा प्रश्न बाल ते विज्ञान अशा सर्वच साहित्याला गेली कित्येक वर्षे पडलेला आहे. त्या नात्यावर शिक्कामोर्तब करण्याचे प्रयत्नही गेली अनेक वर्षे सुरू आहेत. ‘चांद्रयान’ हा त्यातीलच एक. आपल्यापासून साधारण पावणेचार लाख किमी अंतरावर.. आणि तरीही आपल्याला सर्वात जवळ.. असलेल्या चंद्रावर विमानाच्या दहापट वेगाने किंवा सेकंदाला १.६ किमी वेगाने उडणाऱ्या आपल्या या यानाने आपला वेग शून्यावर आणत चंद्राच्या कुशीत अलगद उतरणे अपेक्षित होते. चांद्रयान उतरले. पण ती अभिव्यक्ती आपल्याला पाहिजे होती तशी झाली नाही. विज्ञानाचा अभूतपूर्व आविष्कार हा मानवी भावनेच्या वळणावर गेला आणि शांत, संयतपणे चंद्रास स्पर्श करण्याचे सोडून आपले यान नको त्या आवेगाने चंद्रास जवळ करते झाले. वेग आणि आवेग यांतील सूक्ष्म भेद त्या यंत्रासही समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. अशा वेळी जमिनीवरील माणसाचे वा वाहनाचे जे होते तेच चांद्रयानाचे झाले. परिणामी जे मीलन शिष्टसंमत सभ्यतेच्या मर्यादचौकटीत होणे अपेक्षित होते, ते तसे झाले नाही. कल्पनेस वास्तवात उतरवण्याचे विज्ञान असो वा कल्पनेच्या रेटय़ात बऱ्याचदा वाहत जाणारे जगणे असो; अनेकदा हे असे होते. पण जगण्याच्या मर्यादा जाणून त्यांचा परीघ शास्त्रशुद्धपणे वाढवत नेणे म्हणजे विज्ञान.

त्यात भावनाविवशतेपेक्षा करकरीत बुद्धीस आव्हान आणि आवाहन असते. गेली कित्येक वर्षे हा बुद्धिसंघर्ष सुरू आहे. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ती केवळ कल्पना होती. पण १९६९ साली नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल टाकले आणि ही कल्पना प्रत्यक्षात आली. त्याआधी आठ वर्षे- १९६१ साली युरी गागारीन हा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण भेदून अवकाशात झेपावणारा पहिला मानव ठरला होता. त्यानंतर एका वर्षांने आपल्याकडे अवकाशसंशोधनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हीच ती संस्था, जी आज ‘इस्रो’ या नावाने ओळखली जाते. गेले जवळपास दीड महिना जगातील विज्ञानप्रेमींचे लक्ष या इस्रोवर होते. कारण चांद्रयान. त्याचे जे काही झाले ते यश वा अपयश या संकल्पनांतून मोजता येणार नाही. कारण विज्ञानात यश आणि अपयश असे काहीच नसते. अंतिम मुक्ती अध्यात्मात असते असे म्हणतात. विज्ञानात काहीच अंतिम नसते. म्हणूनच ते रसरशीत असते. या क्षेत्रात असतो तो केवळ प्रयोग. तो प्रयोग आपण उत्तमपणे साधला यात शंका नाही. ही बाब मान्य करून अन्य कोणत्याही प्रयोगाप्रमाणेच या प्रयोगाचेही मूल्यमापन करायला हवे. कारण मूल्यमापन हा विज्ञानाचा पाया आहे.

ते करताना चांद्रयानाने अपेक्षित शून्य गती साधली नाही, या एकाच मुद्दय़ावर शोक करण्याचे कारण नाही. आपण जे काही साध्य केले ते निश्चितच अभिनंदनास पात्र ठरते. यातून इस्रोसारख्या संस्था स्थापण्यातील दूरदृष्टीही दिसून येते. जे साध्य झाले नाही त्यासाठी या मोहिमेच्या प्रमुखास रडू यावे की न यावे, याची चर्चा आपले लहानपण दाखवून देणारी ठरते. ज्यास महत्त्व द्यायला नको त्यालाच महत्त्व देण्याच्या आपल्या राष्ट्रीय सवयीचा हा परिणाम. वास्तविक आपल्या चांद्रयानाआधी पाच महिने, ११ एप्रिल या दिवशी इस्राएलच्या ‘बेरेशित’ चांद्रयानाचेही असेच झाले. आपल्याकडे संपूर्ण सरकार.. आणि त्यामुळे देश.. चंद्रावतरणाचा क्षण कॅमेराबद्ध करण्यासाठी आतुर होता. पण विज्ञान असे सेल्फीग्रस्तांसाठी नसते. हे सत्य एका शहराइतक्या टीचभर आकाराच्या, ‘स्टार्टअप नेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्राएललाही कळले. त्या देशाची चांद्रयान मोहीम तर एका खासगी स्वयंसेवी कंपनीने हाती घेतलेली होती. आपल्या इस्रोच्या चांद्रयान मोहिमेसाठी सुमारे ९८० कोटी रुपये खर्च झाले. पण इस्राएलचे चांद्रयान ७०० कोटी रुपयांत उडाले. म्हणजे आपल्या चांद्रयानापेक्षाही किती तरी स्वस्तात. आपली चांद्रयान मोहीम ४६ दिवस चालली. तर इस्राएलची ४९ दिवस. आपले यान चंद्रापासून २.१ किमी अंतरापर्यंत गेले आणि नंतर दिसेनासे झाले. इस्राएलचे चांद्रयान तर चंद्रापासून अवघे ५०० मीटर अंतरावर असताना हाताबाहेर गेले. हे झाले कोसळलेल्या चांद्रयानांचे. त्या तुलनेत आपण ज्या देशाशी स्पर्धा करायला हवी, त्या चीनने तब्बल दोन वेळा.. २०१३ आणि २०१८.. चांद्रमोहिमा यशस्वी केल्या.

याचा कोणताही गवगवा झाला नाही. ना इस्राएलच्या कथित अपयशाचा ना चीनच्या कथित यशाचा. समस्त इस्राएली वा चिनी आपापल्या चांद्रयानांकडे लक्ष लावून होते असे झाले नाही, की एखाद्या क्रिकेट सामन्याप्रमाणे प्रत्येक षटकानंतर काय झाले त्याचे धावते समालोचन त्या देशात झाले नाही. अमेरिकेने शेकडय़ांनी उपग्रह अवकाशात सोडले आणि अनेक मानव-मोहिमा हाती घेतल्या. पण सामान्य अमेरिकी नागरिक त्याकडे जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखा डोळे लावून बसला होता असे काही दिसले नाही.

खऱ्या विज्ञानप्रेमी समाजात असे काही होणारही नाही. याचे कारण विज्ञान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक प्रयोगाचे मूल्यमापन आणि दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीतील यशापयश हे मूलत: भिन्न असते. निवडणुकीतील यश पुढील पाच वर्षे पुरते. विज्ञानाची भूक मोठी असते. ती कधीच भागू शकत नाही. त्यामुळे तिचे साजरीकरण करायचे नसते. तसे करावयाचे नसल्याने विज्ञानाच्या मूल्यमापनास शब्दांच्या क्षणभंगुर रांगोळीची गरज नसते. म्हणून त्या प्रयोगांचा गवगवा करायचा नसतो. विज्ञान म्हणजे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चित्रविचित्र आवाज करावे लागतात असा काही डोंबाऱ्याचा खेळ नव्हे. हे असे थेट प्रक्षेपणी खेळ जनसामान्यांच्या मनोरंजनासाठी गरजेचे. विज्ञानास त्याची गरज नसते. डझनांनी नोबेल विजेते पदरी बाळगणारी आणि तरीही कसलाही अभिनिवेश न बाळगणारी अनेक पाश्चात्त्य विद्यापीठे अशा मूलभूत विज्ञानी कामाचा मूक.. आणि म्हणून समर्थ.. आविष्कार आहेत. ती तशी आहेत याचे कारण ‘आधी केले मग सांगितले’ हे रामदासी शहाणपण या विज्ञानसंस्था आणि समाज जगतात म्हणून.

म्हणून ट्विटर तुकडय़ांतून वा फेसबुकी चव्हाटय़ावरून एखाद्या वैज्ञानिक घटनेचा बाजार मांडणे वेगळे आणि समाजाच्या अंगी विज्ञानभावना बिंबवणे वेगळे. यातील पहिलीसाठी कोणत्याही किमान बुद्धीचीही गरज नसते आणि दुसरीसाठी फक्त त्या बौद्धिकतेच्या प्राणप्रतिष्ठेची तेवढी निकड असते. अनेक चिरंतन प्रयोगांतील एखाद्या प्रयोगाच्या कथित यशापयशाच्या उन्मादावर स्वार होण्यात धन्यता मानणाऱ्यांनी- आपण या वैज्ञानिकतेसाठी काय करतो, या प्रश्नाचे उत्तर मनातल्या मनात तरी शोधण्याची हिंमत दाखवावी. तेवढे धैर्य असेल तर मग लक्षात येईल, की महासत्ता होण्याच्या स्वप्नावर हिंदोळणाऱ्या आपल्या देशात गेली तब्बल २० वर्षे विज्ञान संशोधनावरील तरतुदींत वाढच झालेली नाही. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्का इतकीही रक्कम आपण विज्ञान संशोधनासाठी खर्च करत नाही. २०१५ नंतर विज्ञानविषयक तरतुदीचे प्रमाण कसे बदलले, हे समजून घेणे प्रक्षेपक विज्ञान कळण्याइतके अवघड नाही. तसेच देशातील विज्ञान संशोधनाची गंगोत्री असणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या तरतुदीत किती कपात झाली, हेही जाणून घेणे समाजमाध्यमावर पोसलेल्या गुगलजीवी पिढीस अशक्य नाही. या तुलनेत अर्थव्यवस्थेत आपल्यापेक्षा २० पटींनी मोठी असलेली अमेरिका विज्ञानावर २.८ टक्के इतकी प्रचंड रक्कम खर्च करते आणि आपल्यापेक्षा दोनशे वा अधिकच पटींनी लहान असलेला इस्राएल ४.३ टक्के रक्कम विज्ञानावर खर्च करतो. आकाराबाबत असेच भिन्न असलेल्या चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतही हे प्रमाण अनुक्रमे २.१ आणि ४.२ टक्के इतके आहे.

आताही समस्त देशवासीय विचारशून्यतेच्या भारावलेल्या अवस्थेत इस्रोच्या पाठीशी (?) असल्याचे दाखवत असले, तरी यातील अनेकांस अवघ्या काही महिन्यांपूर्वी याच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली वेतनकपातीची तक्रार माहीत नसावी. ज्या आपल्या अभियांत्रिकीचे आपण तोंडभरून कौतुक करीत आहोत, त्याच अवकाश अभियंता संघटनेने अलीकडे उपस्थित केलेला वेतनकपातीचा मुद्दा अनेकांच्या गावीही नसावा. कथित यशापयशाच्या चंद्रचांदण्यात भारावणे कवीमंडळींना ठीक. समाजास आणि त्याच्या धुरिणांस असे करून चालत नाही. या अज्ञानाच्या चंद्रमाधवीचे प्रदेश टाळायचे कसे, हे आपण शिकायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 12:06 am

Web Title: editorial on chandrayaan 2 moon landing abn 97
Next Stories
1 द्वंद्वनगरचे आधारवड..
2 काळ्यापांढऱ्याच्या मर्यादा
3 आसामी आक्रोशाचे उत्तर
Just Now!
X