आयुर्वेदाकडे विज्ञान म्हणून न पाहता निव्वळ परंपरेचा बाजार मांडल्याने दोनपाच बाबा/बापू यांचे भले होईलही; पण आयुर्वेद मात्र होता तेथेच राहतो..

नव्या औषधाच्या चाचण्या किती, कुठे केल्या; प्रशासकीय आणि वैद्यकीय उलटतपासणीची पायरी त्याने कधी पार केली; त्या औषधास योग्य शिखर संस्थांची मान्यता का नाही.. या प्रश्नांची उत्तरे रामदेव बाबांनी अद्याप दिलेली नाहीत..

ज्याप्रमाणे धार्मिक पावित्र्य वा अध्यात्म आणि पंडे यांचा संबंध नाही त्याप्रमाणे आयुर्वेद आणि अलीकडचे काही वैदू यांचे दूरान्वयानेही काही नाते नाही. आपल्याकडे औषधांविषयी असलेले गैरसमज- खरे तर अंधश्रद्धाच- भल्याभल्यांना अचंबित करू शकतील. त्यात ते औषध आयुर्वेदिक वा होमिओपाथी यांचे असेल तर शहाण्यांचाही विवेक सुटतो तेथे अन्यांची अवस्था काय वर्णावी! या अंधश्रद्धांतील सर्वात अव्वल म्हणजे ‘अमुक औषधाचे काहीही ‘साइड इफेक्ट्स’ नाहीत’, असे बिनदिक्कत केले जाणारे विधान. इतका दुसरा बिनडोक दावा सापडणे अवघड. खरे तर जे ‘इफेक्ट’ करते त्याचे ‘साइड इफेक्ट’ असतातच आणि म्हणून ज्याचे काहीही ‘साइड इफेक्ट’ नाहीत असे सांगितले जात असेल ते मुळातच ‘इफेक्टिव्ह’ असणार नाही. पण इतकाही किमान शहाणपणा आपल्याकडे दाखवला जात नाही. या अज्ञानाचा फायदा आयुर्वेद नावाने वैदूगिरी करणारे उचलतात. त्यामुळे त्यांचे उखळ तेवढे पांढरे होते आणि जनता ‘साइड इफेक्ट’ नाही म्हणून काहीही ‘इफेक्ट’ नसलेले काहीबाही औषध म्हणून सेवन करते. बाबा रामदेव यांच्या ताज्या कथित करोना औषधाच्या दाव्याच्या निमित्ताने आयुर्वेद हे एक शास्त्र आणि पोटार्थी वैदू यांची चर्चा व्हायला हवी.

याचे कारण यातून प्रामाणिक अशा आयुर्वेद या शास्त्राचे नुकसान होते. ते वैदूंना होणाऱ्या अल्पकालीन फायद्यापेक्षा किती तरी गंभीर आणि दीर्घकालीन आहे. याची सुरुवात मुळात औषधांच्या स्वामित्व आणि बौद्धिक हक्कांवरून (पेटंट) झाली. औषधांच्या बाबत जागतिक पातळीवर ‘प्रॉडक्ट पेटंट’ ही पद्धती सर्वमान्य आहे. याचा अर्थ एखाद्या कंपनीस तिच्या एखाद्या उत्पादनावर स्वामित्व हक्क मिळतो. त्यामुळे एकाच नावाची दोन वा अधिक कंपन्यांची औषधे बाजारात येऊ शकत नाहीत. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारत सरकारने या पद्धतीस आक्षेप घेतला. कारण आपल्याकडील आयुर्वेद वा युनानी ही प्राचीन पद्धती. या प्राचीन पद्धतीत अंतिम औषधाइतकीच, म्हणजे प्रॉडक्टइतकी ते बनविण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. त्यामुळे या पद्धतींवर विश्वास असणाऱ्यांनी ‘प्रोसेस पेटंट’चा आग्रह धरला. म्हणजे औषध बनवताना काही एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करणे आणि त्यावर बौद्धिक संपदा अधिकार मागणे. यातून झाले असे की अनेक कंपन्यांची एकाच नावाची आयुर्वेदिक औषधे आपल्याकडे बाजारात उपलब्ध झाली. म्हणूनच एखादा काढा वा साधे ‘त्रिभुवनकीर्ति’सारखे औषध अनेक कंपन्या बनवतात. तेव्हा ग्राहक जेव्हा दुकानात एखाद्या आयुर्वेदिक औषधाची मागणी करतो तेव्हा अनेक कंपन्यांची त्याच नावाची औषधे समोर येतात.

हे चांगले की वाईट हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन. पण या पद्धतीत काही कारणांनी एखादे औषध बदनाम होते तेव्हा ते औषधच टीकेचे धनी होते. त्यात ते बनवणाऱ्या कंपनीचे नाव येत नाही. म्हणून पर्यायाने आयुर्वेद तितका बदनाम होतो. याचा विचार ना सरकारने केला ना आयुर्वेदावर उपजीविका करणाऱ्यांनी. यामुळे आपल्या देशात आयुर्वेदिक दावा करणारी अनेक बांडगुळे फोफावली. भारतीय असल्यामुळे आयुर्वेदाविषयी अनेकांच्या मनात मुळातूनच एक ममत्व असते. त्याचा गैरफायदा या बांडगुळांनी मनसोक्त घेतला आणि अजूनही घेत आहेत. यातून एक विज्ञानदुष्ट अशी वैश्यवृत्ती वैदूंची मोठी पैदास आपल्याकडे झाली. त्यामुळे आयुर्वेदावरचे प्रामाणिक संशोधन मागे पडले. या संदर्भात मुंबईत दिवंगत डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. त्यांनी काही वनस्पतींच्या औषधी गुणांवर सातत्याने संशोधन केले आणि कोणत्याही वैज्ञानिक संशोधनाप्रमाणे त्याचे दस्तावेजीकरणही केले. त्याचा मोठा फायदा झाला आणि काही गंभीर आजारांत त्या वनस्पतीजन्य आयुर्वेदिक औषधांचा समावेश झाला. त्याचप्रमाणे डॉ. सदानंद  सरदेशमुख यांचा उल्लेख करायला हवा. त्यांच्याकडून वाघोली येथे कर्करोग आणि काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधे, काही प्राण्यांचे दूध आणि श्वसनविकार अशा अनेक मुद्दय़ांवर संशोधन सुरू असून त्याच्या रास्त नोंदी ठेवल्या जातात आणि टाटा कर्करोग रुग्णालयासारखी संस्था त्यात सहभागी होते.

हे शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनाचे लक्षण. कोणतेही विज्ञान परिपूर्ण नसते. पण आपल्यातील अपूर्णता मान्य करण्यात- मग ती व्यक्ती असो वा औषध पद्धती- परिपूर्णतेची हमी असते. अ‍ॅलोपॅथी ही औषध प्रणाली आणि तिचे पुरस्कर्ते यांना ही अपूर्णता मान्य असते. म्हणून त्यात सातत्याने नवनवीन संशोधन सुरू असते आणि नवनवे शोध लागतात. या पद्धतीत एखाद्या रसायन वा संयुगास औषधाचा दर्जा देण्याआधी कठोर चाचण्यांस सामोरे जावे लागते. यात हजारो, लाखो रुग्णांचा, स्वयंसेवकांचा समावेश असतो आणि त्याच्या रास्त नोंदी ठेवल्या जातात. ही प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया. म्हणून एखाद्या आजारावरचे नवे औषध बाजारात इतके सहजासहजी येत नाही. यात कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक असते आणि त्या संशोधनाचे, औषधाचे, त्यामुळे घेतल्यास दिसणाऱ्या ‘साइड इफेक्ट्स’ यांचे दस्तावेज तयार केले जातात. त्यांची छाननी होते आणि त्याचा आवश्यक तो तपशील संबंधित औषधाच्या कुपीवर ग्राहकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावा लागतो.

यातील कोणती प्रक्रिया बाबा रामदेव यांनी आपल्या कथित औषधासाठी पूर्ण केली? या कथित औषधाच्या चाचण्या कोणत्या विविध भौगोलिक प्रदेशांतील कोणत्या रुग्णालयांत, किती वयाच्या किती रुग्णांवर केल्या याचा तपशील बाबा रामदेव यांनी जाहीर करावा. एखाद्या नव्या औषधाचा दावा सादर केला गेल्यावर त्याची प्रशासकीय आणि वैद्यकीय अशा दोन्ही आघाडय़ांवर कठोर उलटतपासणी होते. बाबा रामदेव यांच्या या कथित औषधाची ती झाली काय? कोणत्या तज्ज्ञांनी ती केली? बाबा रामदेव म्हणतात आपण सर्व चाचण्या आणि प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केल्या. तसे जर असेल तर आपल्या राष्ट्रीय वैद्यक संशोधन परिषदेची त्यास मान्यता का नाही? या मान्यतेसाठी बाबांनी औषध सादर केले नाही की सादर करूनही त्यांना ती मान्यता दिली गेली नाही? या कथित औषधाचा इतका मोठा दावा बाबा करत असतील तर खरे तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने हे औषध जागतिक आरोग्य संघटनेस आंतरराष्ट्रीय वितरणासाठी सादर करायला हवे. निदान त्याची तरी निर्यात होऊन काही डॉलर्स भारत सरकारच्या तिजोरीत जमा होतील. पण यातील काहीही होणार नाही. कारण जे काही झाले आहे त्यास शास्त्रीय आधार नाही.

संबंधितांची तो घ्यायचीही इच्छा नाही. कारण तो घेतला तर या मंडळींचे पितळ उघडे पडेल. खरे तर ही अशी अर्धकच्ची अवैज्ञानिक वैदू मंडळी हे खरे आयुर्वेदास लागलेले ग्रहण आहे. या मंडळींना रस आहे तो फक्त आयुर्वेदाच्या बाजारपेठीय क्षमतांतच. एक शास्त्र म्हणून संशोधन त्यांना झेपत नाही. या अशांना अलीकडच्या काळात जोड मिळाली आहे ती अ‍ॅलोपॅथीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यामुळे आयुर्वेद शिकाव्या लागलेल्या पोटार्थी वैदूंची. हे दोघे मिळून आयुर्वेदाकडे फक्त परंपरा म्हणून पाहतात आणि वैज्ञानिक मुद्दय़ांवर त्याबाबत प्रश्न निर्माण करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवतात. याचा परिणाम असा की यामुळे दोनपाच बाबा/बापू यांचे तेवढे भले होते पण आयुर्वेद मात्र होता तेथेच राहतो.

‘तेल हा विषय अरबांहाती सोडण्याइतका बिनमहत्त्वाचा नाही,’ हे हेन्री किसिंजर यांचे विधान आयुर्वेदास लागू पडते. आयुर्वेद अशा काही बाबा/ स्वामींहाती सोडून चालणार नाही. या असल्या भाकड कथाकारांपासून आयुर्वेदास वाचवायला हवे.