वाढत चाललेल्या गारठय़ावर महाराष्ट्राला माहीत असलेला उपाय गोधडीचा. पण आज गोधडी कुठे आहे?

गेल्या काही वर्षांपासून हवामान फारच बिघडले आहे. एकामागोमाग धक्के देत आहेत सारे ऋतू. म्हणजे ज्यास ग्रीष्म म्हणावे हमखास तो पाऊस घेऊन येतो आणि गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत बसलेल्या आपला अचानक घाम निघू लागतो. सगळे हे असे चाललेले आहे. प्रचलित मराठी बोलीतील वाक्प्रचार वापरून सांगायचे, तर टोटलच लागेनाशी झाली आहे या ऋतूंची. जगभरच चालू आहे हे. जागतिक हवामानबदलाचा हा परिणाम म्हणावा काय? परंतु तसे म्हणावे तर काही जण आगाऊच अंगावर येऊन सांगतील : हवामानबदल वगैरे सारे काही झूट असते, खोटेपणा आहे तो पर्यावरणवाद्यांचा. हे असे म्हणणाऱ्यांची आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या अशी काही वाढत चालली आहे की वाटावे : हेच तर सत्य आहे. आणि मग बाहेर उन्हात नग्नपाऊस पडत असला तरी सारे काही कोरडे आहे हेच सत्योत्तरी सत्य उराशी धरून बसावे लागते. पण कोणी आपल्या मनाच्या पडद्यावर कितीही रंगीबेरंगी चित्रे रंगविली, तरी त्याने वस्तुस्थिती मुळीच बदलत नसते. सध्याची वस्तुस्थिती हीच आहे की हवामान बिघडले आहे. म्हणजे यंदाचेच पाहा ना, पावसाळा किती लांबला होता उग्रपणे. आणि आता सन २०१८ उगवले ते गारठा घेऊनच. हा गारठाही कसा, तर धगदार. आत आत जाणवणारा.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

पण तो काही अचानक आलेला नाही. विष चढत जावे हळूहळू काळजापर्यंत तसा गारठाही चढत जातो हवामानात. गारठय़ाची रात्र थंडाई हवेला.. वगैरे कवितेत म्हणणे ठीक. तेथे तर ओल्या जोंधळ्याला आलेली चांदण्याची झीळसुद्धा दिसते लखलखीतपणे. शहरातल्या कवींना आपापल्या उबदार कोषातून त्यातली गुलाबी थंडीही जाणवते मनातल्या मनात. पण वास्तवाचे विस्तव कवितेच्या स्वरधारांनी विझवता येत नसतात. आपल्या बिघ्यात जोंधळा पिकवणाऱ्याला माहीत असते, की सगळाच गारठा काही गुलाबी नसतो. पिके जाळण्याचीही ताकद असते त्यात. अद्याप तरी तेवढी वेळ आलेली नाही. त्या गारठय़ाने हुडहुडी भरलेली नाही की कानाला दडे बसलेले नाहीत आपल्या. नाकांची श्वास घेण्याची क्षमताही मंदावलेली नाही त्या सर्दीने. थोडक्यात पिकला नाही तो तितकासा. आता कुठे आपल्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातून येणारे गार वारे पोहोचले आहेत. आपल्याला त्याच्या परिणामांची कल्पना नाही फारशी. पण हे उत्तरेतून येणारे वारेच अनेकदा महाराष्ट्रातील वातावरणाचा पोत ठरवीत असतात. आताही त्या वाऱ्याचा परिणाम होईलच. सोपे झाले आहे ते आताशा. येथील माहीतगार सांगतात की पूर्वी नव्हते असे. पूर्वीच्याही पूर्वी तर या सह्य़पठारांवरून उठणाऱ्या वाऱ्यांकडे देशाचे लक्ष असे. त्या वाऱ्यांमध्ये देशाचे हवामान बदलण्याची क्षमता होती म्हणतात. आता ते राहिलेले नाही. कशामुळे झाले हे? बहुधा उंच उंच झाडे नाहीशी झाल्यामुळे. किंवा वडासारखे मुळे घट्ट धरून राहणारे, एखाद्या संस्थेप्रमाणे विस्तारणारे वृक्ष उरले नाहीत त्यामुळे हे झाले असावे. अरण्यांतले असे डेरेदार वृक्ष खांबांसारखे असत. सगळे वातावरण पेलत असत ते. आता त्या जागी उरलीत ती जंगले. कीड लागलेल्या झाडोऱ्यांची. मधल्या काळात येथे अगदी ठरवून ठरवून एकाच मापाची आणि एकाच वाणाची रोपे लावण्यात आली. आपले दुर्लक्षच झाले त्याकडे, पण वृक्षारोपणाचे हे कार्यक्रम फार पूर्वीपासून सुरू होते. आता ती झाडे फोफावली आहेत. उंच झाली आहेत. झेंडय़ाच्या काठीप्रमाणे. त्यांच्या पानात ना सावली देण्याची क्षमता, ना वादळ निर्माण करण्याचा दम. बाहेरून वाहात येणाऱ्या वाऱ्याने सळसळत राहणे हे त्यांचे काम. हल्ली या सळसळीलाच वादळ म्हणतात, ती बाब वेगळी. परंतु यामुळे झाले असे, की उत्तरेतून येणाऱ्या थंड हवेने येथील वातावरण बिघडवून टाकले. आधीच मूळचा गारठा आणि त्यात ही बाहेरची हवा. त्याने नाक चोंदणे, कानाला दडे बसणे, कातडीची संवेदनाच हरवणे हे होणारच आहे. अद्याप ते जाणवत नाही. परंतु लक्षणे दिसू लागली आहेत त्याची. आपल्या अहमदनगरचेच उदाहरण घ्या. तेथे एरवीही गारठा बारा महिने आणि तिन्ही काळ मुक्कामीच असतो हल्ली. त्याने संवेदनांनाही हुडहुडी भरल्याच्या बातम्या वरचेवर येतच असतात वर्तमानपत्रांच्या आतील पानांतून. पण परवाच्या दिवशी तेथे सात अंश सेल्सिअसपर्यंत पारा उतरला होता. माणसांच्या मनांनाही गोठविण्यास एवढा, शवागृहांतल्यासारखा गारठा पुरेसा असतो. तेव्हा प्रश्न आहे तो हाच, की या शीतलहरीचा सामना करायचा तरी कसा? आद्र्रतादायक मलमे आणि खोलीतील उष्मायंत्रे ज्यांना परवडतात त्यांना या गारठय़ाशी तसेही काही देणे-घेणे नसते. ओठ एरवीही फुटत नसतात त्यांचे. ज्या ओठांतून थंडीच्या कविताच फुटतात ते फुटणे शक्यच नसते. इतरेजन अशा वेळी शोधतात त्या शेकोटय़ाच. पण हल्ली तशा शेकोटय़ा तरी कुठे उरल्यात. आणि ज्या उरल्यात तेथे जाऊन पाहावे तर त्यात जाळण्यासाठी काहीही टाकलेले. अगदी वाहनांचे टायरसुद्धा. ते अधिकच विषारी, प्रदूषणकारी. त्यापेक्षा गोधडी बरी. गोधडी. चिंध्या-चिंध्यांची. आडव्या-उभ्या टाक्यांनी एकत्र जोडलेली, चिंध्यांच्या सलग महावस्त्राची गोधडी. हजारो वर्षे या गोधडीने महाराष्ट्राला गारठा बाधू दिला नाही. हल्ली इतिहासाची धग देऊन गारठा तीव्र केला जाण्याचे तंत्र सर्रास वापरले जाते. त्याच इतिहासाची साक्ष काढली, तर तो हेच सांगेल की ही गोधडी ज्ञानोबा-तुकोबांनी पांघरली होती. तीच जिजाऊंनी शिवबांच्या अंगावरही टाकली होती आणि माझी फाटकी गोदड म्हणणारे आदिवासी कवी वाहरू सोनवणे यांनीही पांघरली होती. काळानुरूप फरक असेल तिच्यात. चिंध्या लहान-मोठय़ा असतील. पण जोडणारे टाके तेच आहेत अजूनही. हवामान कितीही बिघडलेले असो, त्या महावस्त्रानेच उबदार राहिला हा महाराष्ट्र देश.

आज मात्र ते विरत चालले आहे. टाके सैल पडले आहेत. कोणी जरा ओढाताण केली तर फाटेल अशी अवस्था झाली आहे त्या गोधडीची. आणि नवी गोधडी शिवावी असे मायेचे हातच उरले नाहीत येथे. काळ तर असा आला आहे, की गारठय़ाने हाडे गोठली तरी चालतील, परंतु ही चिंध्याचिंध्यांची गोधडी अंगावर घेणार नाही असे बजावून सांगणारी माणसे निर्माण झाली आहेत. त्यांना हवे आहे ते

एकसलग, एका वस्त्राचे, बिनटाक्यांचे ब्लँकेट. गोधडी जुनीपुराणी आणि म्हणून फेकून देण्याची गोष्ट ठरली आहे त्यांच्यासाठी. त्यांचे ठीक आहे. त्यांनी खुशाल पाहावीत तशा एकरंगी, परीटघडीच्या ब्लँकेटची स्वप्ने. पण आपण ते सांगतात म्हणून का म्हणून फेकून द्यावे आपले हे सांस्कृतिक संचित? गारठय़ाने गोठलेल्या हातांनी काही लोक जाळताना दिसतात चिंध्या. पण त्याने गारठा पळत नसतो. उलट त्या आगीने गारठाच अधिक पुष्ट होतो. हवामान बिघडले की असेच सारे विपरीत घडत असते. तेव्हा प्रयत्न करायला हवा तो हा बिघाड दुरुस्त करण्याचा. आणि तोवर चिंध्याचिंध्यांना जोडणारे टाके टिकवून ठेवण्याचा. गारठय़ाने हाडे गोठू नयेत समाजपुरुषाची, यासाठी एवढे तर करायलाच हवे..