करोना साथसंकटामुळे माणसाची घरकोंडी झाली, तर त्याच वेळी एरवी न दिसणारे प्राणी-पक्षी मुक्तपणे बागडताना दिसू लागले. यास काव्यगत न्याय म्हणायचा का?

मानवजातीचे एक बरे असते. मेंदूत प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते, स्मरणशक्ती तगडी असते. अनुभव लक्षात ठेवणे, जुन्या व नव्या अनुभवांना ताडून योग्य तो निर्णय घेणे, प्रत्येक गोष्टीची तुलना करणे हे वरदान मानवी मेंदूला लाभले आहे. त्याचा वापर करून माणसाने त्याच्या वावराचा पैस दिवसेंदिवस वाढवतच नेला. इतका की, त्याला अतिक्रमण म्हणावे अशी स्थिती आता आली आहे. ही  मानवी अतिक्रमणाची बाधा सर्वदूर दिसते. जंगलात माणसाचा वाढलेला वावर याच बाधेचा निदर्शक म्हणता येईल. यामुळे इतरांचा संकोच होतो हे त्याच्या गावीही नसते. प्राण्यांचे मात्र तसे नसते. त्यातल्या त्यात वन्यजीवांची अवस्था तर निराळीच. जैविक भावनांच्या आधारावर जगणारे हे जीव भीती आणि राग या दोनच घटकांपुरते सीमित असतात. त्यांच्यातही पालकत्वाची भावना असते, पण ती मर्यादित स्वरूपात. एकदा का पिल्ले मोठी झाली, त्यांच्यात स्वसंरक्षण सिद्धता निर्माण झाली, की ही भावना आपसूकच गळून पडते. मेंदूच्या मर्यादित विचारक्षमतेमुळे वन्यप्राणी लवकर स्वत:ला असुरक्षित समजतात. परिणामी, इतरांपासून दूर पळतात. कोणी त्यास निसर्गाच्या सान्निध्यात एकटेपणाने मुक्तसंचार असे म्हणतात. मुद्दा असा की, सध्या टाळेबंदीमुळे मानवाच्या वावरावर मर्यादा आल्या. त्याच्या सारे काही व्यापून टाकू या वृत्तीवर गदा आली. त्याचा फायदा प्राण्यांनी उचललेला दिसतो.

गेला महिनाभर हे प्राणी स्वत:ची हद्द ओलांडून संचार करताना दिसू लागले आहेत. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीत तर मोरांच्या थव्याने मोकळ्या रस्त्यावर थुईथुई नाच केला. काही ठिकाणी अस्वले रस्त्यावर आली. मोकळ्या रस्त्यांवर बिबटय़ांची भ्रमंती वाढली. वाघ हा तर भारतीय जंगलाचा राजाच. त्याच्या रुबाबदार जगण्यात मानवजातच काय, पण इतर वन्यजीवांनासुद्धा यत्किंचितही स्थान एरवी नसते. तोही कधी नव्हे तो मोकळ्या रस्त्यांवर शतपावली करताना दिसू लागला. मानवी मनाची गुंतागुंत या प्राण्यांच्या वाटय़ाला नसते. मी सुरक्षित आहे की असुरक्षित, एवढाच विचार ते करतात. जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरची मानवी वर्दळ कमी झाली. वाहनांचे आवाज थांबले. गावालगतच्या शेतशिवारातसुद्धा माणसांचे दर्शन दुर्मीळ म्हणावे असे चित्र निर्माण झाले. यातून या प्राण्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्यांच्या मुक्त वावराचा परीघ आपसूकच वाढला.  हे तसे दुर्मीळच. आजवर मानवाच्या हस्तक्षेपामुळे या प्राण्यांच्या जगण्यात संकोच आला. त्या संकोचचा पीळ अधिकाधिक घट्ट करत नेण्याकडेच मानवाची वाटचाल सुरू आहे. मात्र करोनामुळे नेमकी उलट स्थिती निर्माण झाली. या साथसंकटात माणसाच्याच संचारावर बंदी आली. आणि एरवी कधी न दिसणारे प्राणी जंगलात, गावाच्या वेशीवर मुक्तपणे बागडताना दिसू लागले. यास काव्यगत न्याय म्हणायचा का?

बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल हे एरवी माणसांच्या वर्दळीने भरून गेलेले असते. आता तिथेही शांतता लाभल्याने प्राण्यांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केलेली दिसते. परवा तर सांबराची पिल्ले बकरीचे दूध पीत असल्याचे विलोभनीय दृश्य दिसले. मानवी अडसर दूर झाल्यावर प्राण्यांमधल्या सजातीय-विजातीय या सीमा आपसूक गळून पडतात की काय, अशी शंका अनेकांना हे दृश्य बघितल्यावर आली असेल. तसेही प्राण्यांचे सहजीवन हा गूढ  विषय. नेहमी कळप करून राहणाऱ्या प्राण्यांना असुरक्षिततेची चिंता कायम भेडसावत असते. पण आता मानवाचा वावर कमी झाल्याने ही भावना दूर झाली आणि त्यांच्यातील भेदाचे अंतर गळून पडले, असा निष्कर्ष आता कुणी काढलाच तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

खरे तर जंगलात राहणाऱ्या तमाम वन्यजीवांनी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीची एक विशिष्ट आखणी करून घेतलेली दिसते. यातील प्रत्येकाला मानवापासून धोका वाटत असला, तरी घनदाट जंगलात कुणी राहायचे, जंगलाच्या वेशीवर कुणी राहायचे हे अगदी ठरून गेलेले. अस्वल, चितळ, नीलगाई, काळवीट, चिंकारा, कोल्हे यांना वेशीवर राहायला आवडते. त्यांना हवे असलेले खाद्य जंगलात आणि बाहेरही मिळते. वाघाला निवांत निवासासाठी घनदाट जंगल हवे असते. त्याचेच प्रतिरूप असलेला बिबटय़ा हा व्याघ्रवर्गातला सर्वात द्वाड प्राणी! तो जंगलातही राहतो अन् उसाच्या शेतातसुद्धा. भक्ष्याच्या शोधात बेभान होऊन भटकणे हाच त्याचा एकमेव छंद. त्यामुळे अनेकदा बंदी नसतानाही तो मानवी वस्तीत धुमाकूळ घालतो. कुणाला तरी मारतो. मग त्याला पकडण्यासाठी साऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागते. आता टाळेबंदीच्या काळातसुद्धा त्याचे हे बेलगाम भटकणे सुरूच आहे.

ही झाली बंदीमुळे आनंदलेल्या वन्यजीवांची गोष्ट. परंतु याच बंदीमुळे माणसांची सवय झालेल्या अथवा माणसाळलेल्या प्राण्यांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. जगभरातील व्याघ्रप्रकल्पांत प्राणी मानवाला दिसावेत म्हणून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या सोयी केल्या जातात. पाणवठे ही त्यातली एक. कर्मचाऱ्यांनी यात पाणी भरायचे आणि विशिष्ट वेळी प्राण्यांनी येऊन ते प्यायचे. हा क्षण पर्यटकांनी डोळे भरून बघायचा. या रिवाजाची प्राण्यांनासुद्धा सवय होऊन गेली आहे. आता अचानक हे थांबले असले तरी प्राणी विशिष्ट वेळेत पाणवठय़ाभोवती घुटमळताना दिसतात. इकडेतिकडे बघतात. पण त्यांना कुणीही दिसत नाही. पर्यटकच नसल्याने अनेकदा हे पाणवठेसुद्धा भरले जात नाहीत. मग या प्राण्यांच्या सवयीत खोडा पडतो आणि त्यांची पाण्यासाठी अतिरिक्त भटकंती सुरू होते. पर्यटन थांबल्यामुळे  आणि आवक बंद झाल्यामुळे हतबल झालेल्या व्याघ्रव्यवस्थापनाच्या लक्षात ही बाब येत नसेल का? आधी प्राण्यांच्या नैसर्गिक सवयी बदलायच्या आणि मग करोनाच्या भीतीमुळे त्यांच्याकडे लक्षच द्यायचे नाही. अशा वेळी त्या मुक्या जीवांनी करायचे काय? करोनासंकटातील अस्तित्वाची लढाई लढताना या मुक्या जीवांकडे दुर्लक्ष व्हायला नको इतकेच.

जगभरातल्या प्राणिसंग्रहालयांतील प्राण्यांची आणखीच वेगळी व्यथा. जर्मनीच्या उत्तरेकडील न्यू म्युन्स्टर संग्रहालयातील प्राण्यांना खाऊ काय घालायचे, असा प्रश्न तेथील अधिकाऱ्यांना पडला. टाळेबंदीमुळे अन्नाची तजवीज करणे फारच कठीण झाल्यास प्रसंगी तिथलेच काही प्राणी मारून त्याचे मांस उर्वरितांना खाऊ घालावे लागेल, असे ते बोलून दाखवतात. बर्लिनच्या संग्रहालयातील पांडा हे तसेही जगप्रसिद्ध. त्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची रीघ लागते. नुकताच येथे जुळ्या पांडांचा जन्म झाला. बंदीमुळे पर्यटकांना ही पिल्ले पाहता येत नाहीत. जेव्हा ती उठेल तोवर हे पांडा मोठे झालेले असतील. त्यामुळेच आता अधिकाऱ्यांनी या पांडांचे ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठी सुविधा सुरू केली आहे.

या साऱ्याचा मथितार्थ एकच. मानव आणि वन्यजीवांमधील दीर्घकालीन संबंध. भले यातील दोघे अनेकदा एकमेकांच्या जीवावर उठलेले असोत; त्यांच्या नात्यातील गोडवा नेहमीच मोठा ठरत गेलेला. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’ याच म्हणीची सार्थ आठवण करून देणारा. मानवाच्या सध्याच्या वावरसंकोचामुळे तमाम प्राणीवर्गाला निश्चितच आनंद झालेला असेल, त्यांना बोलून तो व्यक्त करता येत नाही. त्यामुळेच त्यांनी रस्ते, शहरे, शिवारे अशी मानवी वर्दळीची ठिकाणे मुक्तसंचारासाठी निवडली आहेत. मृत्यूच्या भीतीमुळे धास्तावलेल्या, फिरण्याचा संकोच झालेल्या मानवाने या संचाराकडे हा ‘आपला पराभव’ नव्हे तर ‘त्यांचा विजय’ झाला या नजरेतून बघावे एवढी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे?