डॅरेन सॅमी आणि मायकेल होल्डिंग यांना भारतात जे दिसले, ते आपल्याला दिसत नसेलच असे नव्हे; पण अमेरिकेचे प्रश्न जणू वेगळे, असे तेथील भारतीयही मानतात का?

रंगावरून, वंशावरून ‘सहजपणे बोलणे’ असे काही राहिलेले नाही. जगभर याची जाणीव वाढत असल्यामुळेच, भारत हा जातिव्यवस्था असलेला देश, याकडेही जगाचे लक्ष जाऊ लागले आहे..

जॉर्ज फ्लॉइड मेला तिकडे अमेरिकेत. कारण तो काळा होता. गोऱ्या पोलिसाने गुडघ्याखाली त्याची गर्दन चेपली अन् तो घुसमटून मेला. आता तिथलेच लोक म्हणताहेत की वाईटच सगळे गोरे अमेरिकन पोलीस. व्यवस्थाच तिथली तशी. वंशद्वेषी. वर्णद्वेषी. त्यात पुन्हा डोनाल्ड ट्रम्पसारखा अध्यक्ष. म्हणजे गोऱ्यांच्या वर्चस्ववादी दर्याला उधाणच. जॉर्ज फ्लॉइडच्या समर्थनार्थ अमेरिकेत सर्वत्र निदर्शनांचा महापूर. त्याचे लोण तिकडे युरोपातही पसरले. तेही तसलेच ना? वसाहतवादी, वंशद्वेषी, वर्णद्वेषी.. काळ्यांवर केवढा तो अन्याय.. बरोबरच आहे त्यांचे रस्त्यावर उतरणे. असे सगळे भारतात परदेशातल्या अन्यायरुदनात मश्गूल असताना एक दिवस डॅरेन सॅमी या क्रिकेटपटूचा प्रश्न येऊन आमच्यावर आदळतो.. आयपीएलदरम्यान मलाही ‘कालू’ असे संबोधले जायचे. हा शब्द वर्णद्वेषी नव्हता ना? हा प्रश्न त्याच्या त्या काळच्या फ्रँचायझीला, मित्रांना, सहकाऱ्यांना उद्देशून होता. डॅरेन सॅमी हा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार.  एक सभ्य क्रिकेटपटू. म्हणून लोकप्रिय. कसाही असला, तरी आपल्याला भारतात जे म्हटले जायचे आणि जगभर सध्या जे काही सुरू आहे, ते परस्परांशी संबंधित आहे असे त्याला वाटावे हेही महत्त्वाचेच. त्याबद्दल त्याने केलेली (समाजमाध्यमावरील) नम्र विचारणा त्याच्या सभ्य आणि संघर्षभीरू व्यक्तिमत्त्वाचे लक्षण. अनेक वर्षांच्या दडपणातून कदाचित तो मोकळा झाला. नि आपण अडकलो! आपल्याला असे मोकळे होण्याचा अधिकार नाही. त्याने उपस्थित केलेला प्रश्न आजचा नाही. वर्षांनुवर्षांचा आहे. रंगभेद, वर्णभेदाचे मुद्दे उठले, की आम्ही गोऱ्या संस्कृतीकडे बोट दाखवून मोकळे व्हायचो. आता ते जमणार नाही. सॅमीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागणार.

तो प्रयत्न सुरुवातीला त्याचाच ‘त्या’ संघातील सहकारी इरफान पठाणने केला. सॅमीला ‘कालू’ संबोधणाऱ्यांतला मी नाही. पण त्याने वर्णद्वेषाचा मुद्दा उपस्थित केला, तो भारताला नवीन नाही. इथे तर भर मैदानांमध्ये दाक्षिणात्य क्रिकेटपटूंनाही, त्यांच्या गडद कायेवरून टोमणेबाजी ऐकावी लागते! या सगळ्यातून आपल्याकडील वर्णवर्चस्ववादाची चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. हा प्रश्न केवळ क्रिकेट किंवा एखाद्या खेळापुरता मर्यादित नाही. जातिवादाच्या रूपाने हजारो वर्षे येथे वंशवाद नांदतोच आहे. त्या अर्थाने आपणही गोऱ्यांइतकेच वंशवादी. वेस्ट इंडिजचे विख्यात माजी गोलंदाज मायकेल होल्डिंग फार सहजपणे शुक्रवारी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहितात, ‘भारतात आम्हाला खूप सन्मान मिळायचा. कधीच वर्णद्वेषी टोमणे ऐकावे लागले नाहीत. पण येथेही एक वर्गव्यवस्था आणि जातिव्यवस्था अस्तित्वात आहे याची जाणीव होती.. अनेक वर्षे भारताचे दौरे करून तिचे अस्तित्व जाणवायचे. एतद्देशीयांविरुद्धच येथे पूर्वग्रह दिसून येत. उजळ कायेचे आकर्षण येथे फारच. येथील उजळ बनवणाऱ्या कथित औषधांचा अब्जावधींचा उद्योग मला नेहमीच बुचकळ्यात टाकतो. उजळ, गोरे तेच चांगले हा वसाहतयुगाचा परिणाम.’ – हे लिहिणाऱ्या होल्डिंग यांना कदाचित ठाऊक असेल किंवा नसेलही. युरोपातील काही फुटबॉल मैदानांमध्ये दिसून येते तशी वर्णद्वेषी हिणवेगिरी क्रिकेटमध्ये प्रामुख्याने दिसली, ती गोऱ्यांच्या देशात नव्हे, तर आपल्याच देशात. इथे मुंबईतच. ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅण्ड्रय़ू सायमंड्स हा मिश्रवर्णी क्रिकेटपटू. माकडाला हिणवतात, तसे त्याला आपल्या वानखेडे स्टेडियमवरच हिणवले गेले होते. तो प्रताप अद्याप बाकीच्या मैदानांवर नोंदवला गेलेला नाही! त्याच्यात आश्चर्य वाटण्याचे खरे तर काही कारण नाही. येथील हजारो वर्षांच्या जातिवर्चस्ववादाला, वंशवर्चस्ववादाला गोऱ्या वसाहतवाद्यांनी वर्ण किंवा रंग वर्चस्ववादाची जोड दिली. जातिवर्चस्ववादाविषयीच्या आपल्या शहाणिवा स्वातंत्र्योत्तर काळात विकसित आणि परिपक्व होत गेल्या. परंतु रंगवर्चस्ववादाविषयी त्या प्रमाणात आणि त्या गांभीर्याने जनजागृती होऊ शकली नाही. कारण रंगावरून दुसऱ्याला टोमणा मारणे हे आपण इतके स्वीकारलेले आहे, की त्याविषयी ज्याला किंवा जिला बोलले जाते, अशांमध्ये ही स्वीकृती मुरून मृतवत झालेली आहे. बहुतेकदा ‘दुखावण्याचा हेतू नव्हता’ वगैरे वक्तव्ये करून या कृत्याचे समर्थन केले जाते. प्रसंग तेथेच मिटतो. पण प्रश्न जिवंतच राहतो. या जाणीवनिद्रेतून आपल्याला दचकवण्यासाठी एखादा सॅमी – कृष्णवर्णी सॅमी – बाहेरून यावा लागतो, हा आपला करंटेपणाच.

पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराझ अहमद याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तेथील एका कृष्णवर्णी क्रिकेटपटूला – आंदिले फेलुक्वायो – भर सामन्यात ‘अबे काले’ असे हिणवले. त्याच्यावर कारवाई झाली. ‘मी तर गमतीने बोललो’ असा त्याचा बचाव. हे अजाणतेपण हा पाकिस्तानी नव्हे, तर दक्षिण आशियाई मानसिकतेचा परिणाम. वेस्ट इंडिजचे पूर्वीच्या पिढीतले क्रिकेटपटू भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंना ‘कुली’ असे संबोधायचे. ते संबोधणे प्रतिक्रियात्मक होते. त्यातील काही भाग मत्सराचा असेलही. पण त्या क्रिकेटपटूंनी गोऱ्या क्रिकेटपटूंना ‘पांढरी माकडे किंवा पांढरी बदके’ वा तत्सम काही संबोधल्याचे ऐकिवात-वाचनात आलेले नाही. अशी भावना त्या कृष्णवर्णीयांमध्ये दक्षिण आशियाई मंडळींच्या संपर्कात आल्यानंतरच का उत्पन्न व्हायची, हे शोध घेण्यासारखे आहे. डॅरेन सॅमीला जे आक्षेपार्ह वाटते, ते आम्हाला वाटत नाही. येथे हे रोजचेच, असे आम्ही मानून चालतो. पण येथून पुढे हे नाही चालणार!

जगभर याविषयीची जाणीव रुंदावते आहे. रंगावरून, वंशावरून ‘सहजपणे बोलणे’ असे काही राहिलेले नाही. डॅरेन सॅमी येथे येऊन हे पाहू शकतो. मायकेल होल्डिंग वर्षांनुवर्षे येथे येऊन हे अनुभवू शकतात. हेच आपण भारतीय, जगभर फिरत आहोत. हेच आपण आता अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांमध्ये प्रभावगट बनू लागलो आहोत. याच आपल्याला तेथेही बोलले जाऊ शकते : हे तेच ना, जेथे रंगावरून टोमणे मारले जातात.. अवहेलना केली जाते? आपण नशीबवान म्हणून आपल्यातील बहुतेकांच्या अगाध जातिजाणिवा आणि धर्मजाणिवांविषयी ती मंडळी तितकी चिकित्सक नव्हती!  अन्यथा किती जण तेथील नंदनवनांमध्ये स्थिरावू शकले असते? आता ती पळवाट चालण्यासारखी नाही. डॅरेन सॅमीच्या त्या प्रसंगाला किंवा प्रसंगांना आता चार वर्षे होऊन गेली. त्याने आज हा मुद्दा काढला नसता, तर तो कालौघात वाहून गेला असता. पण प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. त्याची उत्तरे आपण शोधली पाहिजेत. उतरंडीची व्यवस्था हा आपल्या देशाला, संस्कृतीला  लागलेला शाप आहे. ती धर्मवर्चस्व, जातिवर्चस्व, अर्थवर्चस्व, वर्णवर्चस्व अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये दररोज ठसठसत आहे. आपण मात्र अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढय़ाकडे पाहून टाळ्या पिटत राहतो. गोऱ्यांची अशी जिरवायला हवीच होती, हे म्हणत राहतो.

‘गोरे’ किंवा ‘उजळ’ ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. कृष्णवर्णीयांच्या दृष्टीने आपल्यातलेही अनेक उजळच. आणि म्हणून गोऱ्यांइतकेच वर्णवर्चस्ववादी. पण गोऱ्यांच्या देशांतील अनेक संवेदनशील गोऱ्यांसारखे आपण अजूनही एका गुडघ्यावर झुकून वाकायला तयार नाही. आम्ही त्यांनाच दोषी आणि वेडे पीर मानतो. आम्हाला स्वत:च शहाणे ठरवून..!