डोळ्यांमागील मेंदूवर ताबा नसल्यास डोळ्यासमोरचे आपोआप पाहिले जाऊ शकते. हा मेंदू घडवण्याची जबाबदारी ज्यांची, त्यांनी स्वत:च बातमी होऊ नये! 

गायक/चित्रकार वा कोणताही कलाकार हा ज्याप्रमाणे त्या निर्मितीक्षणापर्यंतच कलाकार असतो. त्यानंतर तो सर्वसामान्यच असतो. पत्रकारांचेही तसेच आहे. निदान असायला हवे..

बातमीदारच जेव्हा ‘बातमी’ बनतो तेव्हा ते मर्यादाभंगाचे द्योतक असते आणि या व्यवसायाच्या घसरत्या विश्वासार्हतेचे निदर्शक. मुंबई आणि दिल्ली येथील उच्च न्यायालयांनी सोमवारी स्वतंत्रपणे दोन स्वतंत्र प्रकरणांत माध्यमांसमोरचा हा धोका दाखवून दिला. या दोन्हीही प्रकरणांत गुंतलेले माध्यमवीर हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संबंधित आहेत आणि या दोन्हींत एक नाव समान आहे. ते म्हणजे अर्णब गोस्वामी. त्याच्या या माननीय पंगतीत कोणी नविका कुमार आणि राहुल शिवशंकर यांचेही स्थान आहे. रस्त्यावरची भांडणे, मुंबईतील रेल्वे स्थानकात दिवसागणिक शेकडय़ांनी घडणारे प्रवाशांनी हातघाईस येण्याचे प्रसंग आदी पाहण्यात बरीच गर्दी रमते. मार खाणारा मार खातो, मारणारे मारतात! पण पाहणाऱ्यास कोण कोणास का मारीत आहे याची काही माहिती असण्याची गरज नसते. कोणी तरी कोणावर तरी हात उगारत आहे या परात्पर शौर्याचा ‘आनंद’ अनेकांसाठी भावनिक निचरा करणारा असतो. या अशा निचऱ्याची गरज ज्या वर्गास लागते तो वर्ग साधारणत: वर उल्लेखलेल्या आदरणीयांचा प्रेक्षकवर्ग असावा, असा संशय घेण्यास जागा आहे. याबाबत निश्चित काही निष्कर्षदर्शक विधान करणे येथे टाळले, कारण या तिघांच्याही दर्शनाचा, त्यांच्या पत्रकारितेचा प्रत्यक्ष अनुभव प्रस्तुत लेखकास नाही. तथापि हे तीन बातमीदारच बातम्या झाल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून येत असल्याने त्या व्यवसायाच्या चिंतेतून या साऱ्या प्रकरणांवर भाष्य करणे हे व्यवसायधर्म पालन ठरते. अन्यथा या स्तंभातून दखल घ्यावी इतकी या तिघांची एकत्रितही योग्यता नाही.

यातील अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण पत्रकारितेशी संबंधित नाही, पण अन्य दोघांचा विषय हा व्यवसायजन्य आहे. पण या तिघांचाही दर्जा दाखवून देणारी बाब म्हणजे अर्णबेतर अन्य दोघांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने जी विधाने केली ती या तिघांनाही लागू पडतात. माध्यम स्वातंत्र्याचा गैरवापर हे यातील समान सूत्र. अर्णबेतर अन्य दोघांविरोधात हिंदी चित्रपट व्यवसायातील काही निर्माते, कलाकार आदींनी तक्रार केली होती. आपल्या हातातील माध्यमशक्तीच्या जोरावर हे दोघे चित्रपट व्यवसायास सरसकट बदनाम करतात असा त्यांच्यावर आरोप होता. अर्णबबाबतही हा आरोप सरसकट लागू होतो. आपला स्टुडिओ म्हणजे अंतिम सत्यदर्शनाचे सर्वोच्च तीर्थस्थान आहे असा या तिघांचाही समज असावा असे त्यांच्याबाबत जी काही न्यायालयीन आणि न्यायालयबाह्य़ टीकाटिप्पणी होते त्यातून दिसून येते. यानिमित्ताने माध्यमांची एकूणच भूमिका काय असायला हवी, याची चर्चा व्हायला हवी. कारण चांगले काय हे ठाऊक असल्याखेरीज वाईट काय याचा निर्णय करणे अनेक जणांना जमू शकत नाही. त्यात भारतीय दूरचित्रवाणी प्रेक्षक एखादा प्रणब रॉय वा एस पी सिंग अशांचा अपवाद वगळता पिठाच्या दुधावर पोसलेल्या अश्वत्थाम्यासारखा कुपोषित आहे. पिठात पाणी घालून तयार झालेला पांढरा द्रव दूध समजून पिण्यातच या दर्शकांची हयात गेली. त्यामुळे खरे दूध प्यावयाची संधी मिळाल्यास हा वर्ग तोंड वेंगाडतो. जे हीन आहे त्याची सवय शरीर लवकर स्वीकारते. उत्तमाचा परिचय हा त्यावरचा उतारा असू शकतो. निदान त्यातील काही विचारी जनांसाठी तरी.

दिग्दर्शक ज्याप्रमाणे पडद्यामागून दिसायला हवा, तद्वत पत्रकार त्याचे लिखाण/ सादरीकरण यातून दिसायला हवा. म्हणजे पत्रकार हा लाक्षणिक अर्थाने पडद्यामागे असायला हवा. पडद्यासमोर नव्हे. हे पथ्य अलीकडेपर्यंत पाळले जात होते. मुद्रित माध्यमात अजूनही या तत्त्वाचा आदर केला जातो. तथापि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत पडदा हेच माध्यम असल्याने ते तसेच्या तसे पालन करणे अशक्य हे मान्य. पण म्हणून या माध्यमांतील पत्रकारांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. याचे कारण वाचन ही काही एक ठरवून करावयाची क्रिया आहे. पाहण्याचे तसे नाही. डोळ्यांमागील मेंदूवर ताबा नसल्यास डोळ्यासमोरचे आपोआप पाहिले जाऊ शकते. वर उल्लेखलेल्या रस्त्यावरच्या प्रसंगांसारखे. यात महत्त्वाचा मुद्दा असा की आपोआप दिसले म्हणून त्याचा परिणाम होत नाही, असे नाही. उलट मन:पटलाच्या अदृश्य प्रदेशात ही दृश्ये नोंदली जातात. त्याचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकारांना याचे भान असणे अधिक आवश्यक.  ज्यांच्याबाबत सोमवारी न्यायालयीन भाष्य झाले त्या वरील तिघांना हे भान किती आहे हे स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकताच नाही.

यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की गायक/ चित्रकार वा कोणताही कलाकार हा ज्याप्रमाणे त्या निर्मितीक्षणापर्यंतच कलाकार असतो. त्यानंतर तो सर्वसामान्यच असतो. पत्रकारांचेही तसेच आहे. निदान असायला हवे. ही मिरवायची गोष्ट नाही. याचे भान इलेक्ट्रॉनिक माध्यमांत सहसा नसते याचे कारण या माध्यमांतील पत्रकार ‘दिसतात’. ते काय करतात, काय बोलतात हे माहीत असेल/नसेल. पण कोणत्या तरी वाहिनीवर तुम्ही दिसता हीच (आणि इतकीच) अनेकांची ओळख. पण त्यावरही हा वर्ग सुखावतो आणि दूरचित्रवाणीच्या चौकोनापुरतेच मर्यादित असायला हवा असा आपला व्यवसाय या चौकोनाबाहेर आणतो. या चौकोनाबाहेरच्या जगण्यात त्यास सामान्य नागरिकापेक्षा अधिक कोणतेही अधिकार नाहीत. या जगण्यातील संघर्षांत काही अडचणी/आव्हाने यांस सामोरे जावे लागले तर ते आव्हान पत्रकारितेसमोरचे नसते. पण तसे भासवले जाते आणि विशेषाधिकारांचा दावा केला जातो.

अर्णबने या विशेषाधिकारांचे सरसकट उल्लंघन केले आणि अन्य दोघांनी काही विशिष्टांबाबत मर्यादाभंग केला. म्हणूनच अर्णबच्या हेबियस कॉर्पस याचिकेची दखलही न्यायालयाने घेतली नाही. तसेच जामिनासाठी संबंधित न्यायालयाचे दरवाजे न ठोठावता थेट उच्च न्यायालयात त्याचे धाव घेणेही असफल ठरले. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी याची जाणीव करून दिली. अर्णबचे स्थानिक न्यायालयातील वर्तनही त्याचा समावेश बुद्धिजीवी वर्गात का करावा असा प्रश्न पाडणारे. ‘आपणास सारेच ओळखतात’ असे वाटू शकण्याइतका उच्च दर्जाचा बिनडोक उर्मटपणा त्याच्या वर्तनात होता. कायद्यासमोर सर्व समान अशी पोपटपंची माध्यमातून करायची आणि प्रत्यक्षात ‘विशेषाधिकारां’वर दावा करायचे ही किळसवाणी राजकारणी लबाडी अर्णबच्या वर्तनातून ओतप्रोत वाहून जाताना दिसते. मुखपत्रांनादेखील काही एक पावित्र्य असते. अर्णबच्या पत्रकारितेत त्यांचा अंशदेखील नाही इतकी ती बीभत्स. या विद्रूपतेचे डाग व्यवसायावर उडू लागले आहेत हे कळण्याइतकीही शुद्ध त्यास नसेल तर त्यावरून या व्यवसायासमोरील गंभीर आव्हानाचा आकार लक्षात येईल.

आपल्या व्यवसायापेक्षा, पेशापेक्षा आपण मोठे आहोत असे जेव्हा एखाद्यास वाटू लागते तेव्हा हे आव्हान अधिक गडद होते. रंगभूमीपेक्षा एखादा अभिनेता वा गायन कलेपेक्षा एखादा गायक ज्याप्रमाणे मोठा होऊ शकत नाही त्याप्रमाणे कोणताही पत्रकार पत्रकारितेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. तसे जर वाटू लागले तर स्खलन अपरिहार्यच. यात त्यास समाजमाध्यमी पाठिंबा देणाऱ्यांचा बौद्धिक अजागळपणाही दिसतो. पालघरमधील साधूंची हत्या असो किंवा सुशांतसिंहची आत्महत्या. अर्णबच्या पत्रकारितेने त्याच्या या पाठीराख्यांना उलट तोंडघशी पाडले आहे. पालघर हत्येमागे अर्णबची पत्रकारिता दावा करत होती तसा धार्मिक हात नव्हता आणि सुशांतसिंहच्या आत्महत्येमागे अर्णब सूचित करीत होता तसा राजकीय कट आढळून आलेला नाही. त्याच्या पाठीराख्यांनी हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.

पण अलीकडे किमान विचार करण्यानेही अनेकांचा मेंदू शिणतो. मदारीसदृश खेळ हे असा शिणवटा घालवतात. पण म्हणून तेच किती काळ पाहावे हेही कळत नसेल आणि माध्यमेही स्वत:स मदाऱ्याच्या (खरे तर त्या खेळास अधिक कौशल्य लागते) पातळीवर उतरवण्यास तयार असतील तर समाज मृतप्राय होणे फार काळ दूर नाही.