03 December 2020

News Flash

दिवाळी कशाला हवी..

इंद्रियांच्या पलीकडला, उत्कट ऊर्जेतून आपणच निर्माण केलेला नवा, आत्मनिरपेक्ष आनंद शोधण्यासाठी दिवाळी हवीच..

(संग्रहित छायाचित्र)

दिवाळीचे खाद्यपदार्थ बारमाही मिळू लागले, ऑनलाइन खरेदी सोयीची झाली आणि ती वर्षांतून कधीही होऊ लागली; यंदा ‘दिवाळी पहाट’चेही कार्यक्रम रोडावले. सणासुदीला संगीताची एकंदर साथसंगत कमी झाली.. तरीही दिवाळीला महत्त्व उरतेच!

दसरा ते दिवाळी हा काळ मराठी माणसाच्या वर्षभराच्या धबडग्यात सगळ्यात आनंदाचा. कोणतेही कर्मकांड नसलेले आणि मंगलमय उत्साह वाढवणारे असे हे दोन सणांच्या मधले दिवस. पाऊस संपलेला असतो. थंडीला सुरुवात होत असते. वातावरणात एक प्रकारची उत्फुल्लता असते आणि सगळे जण या आनंदाच्या उत्सवाच्या तयारीला लागतात. गेल्या काही वर्षांत ही तयारी वेगळी करावी लागतच नाही, कारण अनारसे, चिरोटे, शंकरपाळे हे पदार्थ फक्त दिवाळीतच खात असत, यावर आजच्या तरुणांचा विश्वास बसेल, असे वाटत नाही. किंवा त्यापैकी काही जणांना, हे पदार्थ दिवाळीचे म्हणून माहीतच नसले, तरी हरकत नाही. कपडय़ांची खरेदी वर्षांतून दोनच वेळा करण्याचे दिवस संपले आता. दिवाळी आणि वाढदिवस या मुहूर्ताना आता तसा अर्थही उरलेला नाही. वर्षभर सगळे मॉल कसे फुल्ल झालेले असतात. घरी, दारी, कार्यालयात आणि अगदी प्रवासातही हातातल्या मोबाइलवर खरेदीचा धूमधडाका वर्षभर साजरा होणाऱ्या या काळात कुणाला दिवाळीची वाट पाहणे हा एके काळी खरेदीच्याही आनंदाचा भाग होता, हे कदाचित खरेही वाटणार नाही. फटाके, फराळ आणि कपडे या सगळ्यामुळे वातावरणच आनंदी होई. आता नोकऱ्या दिवसातले बारा तास असतात आणि ती केव्हाही जाण्याची सतत भीती असल्याने दिवाळीच्या निमित्ताने रजा घेण्याची सोयही राहिलेली नाही. काळ बदलला, हे खरे. पहाटे उठून फटाके उडवणे आणि घरातल्या सगळ्यांबरोबर एकत्र राहून दिवस घालवणे, ही आजकालची चैन झाली आहे. अभ्यंगस्नान करून पहाटे पहाटे घराबाहेर पडून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावणे हा बदल आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडू लागला आहे.

आपण आता सगळेच उत्सव घरातून बाहेर काढू लागलो आहोत, याची ही स्पष्ट दिसणारी खूण. जगण्याच्या धावपळीत संगीताचा आनंद लुटणे हे निर्व्याज आनंदाचे ठिकाण असते. जगण्याच्या प्रत्येक पायरीवर भारतीय संस्कृतीने संगीताची संगत घेतली आहे. आनंदाच्या क्षणी मनाच्या शांतावस्थेत माणसाला संगीत जेवढे श्रीमंत करते, त्याची सर अन्य कोणत्याच भौतिक गोष्टींना वा वस्तूंना येऊ शकत नाही. आपल्या लोकसंगीतात निसर्गाच्या या सगळ्या घडामोडींचे स्वरवर्णन करण्याची क्षमता आहे. पंडित कुमार गंधर्वानी सादर केलेल्या ‘गीतवर्षां’, ‘मालवा की लोकधुनें’ यांसारख्या केवळ लोकसंगीताशी जवळिकीचे नाते सांगणाऱ्या कार्यक्रमांनी, आपला सगळा सांस्कृतिक आसमंत या स्वरांनी कसा भरून राहिला आहे, याचे मनोज्ञ दर्शन घडवले आहे. केवळ संवेदना चेतवणारे हे संगीत जनमानसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले ते या लोकसंगीतामुळेच. नवरात्रातल्या भोंडल्याची गाणी असोत की वर्षांऋतूचे आगमन सांगणारी जनसंगीतातली गीते असोत, ती माणसाचा निसर्गाशी असलेला अतूट संबंध स्थापित करत असतात. त्यामुळेच दिवाळीच्या वातावरणात संगीताचे श्रवण ही आनंदमयी घटना असते. गेल्या काही वर्षांत पहाटेचे आणि उत्तररात्रीचे संगीत जाहीरपणे ऐकण्याची सोय राहिलेली नाही. या कार्यक्रमांनी तीही काही अंशी भरून निघते, परंतु त्याचेही एक अर्थशास्त्र असते. बाजारी असलेल्या मंदीने या कार्यक्रमांच्या प्रायोजकत्वालाही ओहोटी लागलेली आहे. यंदा या कार्यक्रमांची संख्या रोडावली. राजकीय पक्षाचे नेते अशा कार्यक्रमांचे प्रायोजक असण्याची रीत. पण यंदा तेही सगळे निवडणुकीच्या रणधुमाळीत अडकलेले आणि निकाल काय लागेल, याची निश्चिती नसल्याने निकालापाठोपाठ कार्यक्रम ठरवायची त्यांनाही धास्तीच. त्यामुळे यंदा अशा कार्यक्रमांनी साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या आनंदाला आर्थिक अरिष्टाची किनार आहे खरी. त्याच्या जोडीला राज्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरांचीही एक हळवी किनार यंदाच्या दिवाळीला आहे, हे विसरता येत नाही. जगता जगता जमवलेले सगळे वाहून गेल्यानंतर येणारी विषण्णता आणि वैराग्य भाळी लिहिलेल्या राज्यातील लाखो नागरिकांसाठी यंदाची दिवाळी अशी खिन्न आहे.

गेल्या दोन-तीन दशकांचा विचार करायचा, तर दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रात नवाच पायंडा पडला. घरातली दिवाळी आपण सगळे जण घराबाहेर सुखाने साजरी करू लागलो. फराळाचे पदार्थ बाराही महिने मिळू लागले. वर्षांकाठी किमान दिवाळीला कपडे खरेदी करण्यातला आनंद ऑनलाइन खरेदीने हिरावून घेतला. घरबसल्या खरेदीने रस्तोरस्ती होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याचा आनंद अधिक असल्याने त्याकडे वाढलेला कल समजून घेण्यासारखा ठरू लागला. एरवी मुहूर्तावर खरेदी करण्याचे समजही नव्या बाजारव्यवस्थेने पालटले. वाहन खरेदी असो की घर खरेदी, गेल्या काही वर्षांत अशा खरेदीचे मुहूर्तही बावचळू लागले. यंदा दिवाळीच्या आनंदाला चिंतेने ग्रासले असले, तरीही माणसे आनंदाची नवनवी ठिकाणे शोधतच असतात. त्यांना करमणुकीच्या पलीकडे जाऊन अधिक समृद्ध होण्यात रस असतो. वाचन, श्रवण, भटकंती, नव्या ठिकाणांचा शोध अशा सगळ्यांमध्ये माणसे आपले सुखनिधान शोधत असतात. त्यांना मनाच्या तळातली विश्रांती हवी असते. ती मिळण्यासाठी केवळ पैसे उपयोगी पडत नाहीत. त्यासाठी स्वस्थचित्तता हवी असते. ती शोधणे हे आताच्या काळातले सगळ्यात मोठे आव्हान ठरते आहे.

उत्कटता हा मानवी मेंदूला मिळालेला वर आहे. तो वर आहे, हे ज्यांना कळले, त्यांना जगण्यातला उत्साह, त्यातून मिळणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून निर्माण होणारा आनंद यांची साखळी बनवता येते. जीवनातला असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुन:प्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवेनेही तो मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला स्वत:ची तयारी करावी लागते. ही तयारी पाठय़पुस्तकातून किंवा एखाद्या शिकवणीतून होत नाही. आनंद मिळवण्याच्या क्षमता वाढवण्यातूनच हे घडू शकते. त्यासाठी गृहपाठ नाही, की परीक्षा नाही. उत्तीर्ण होण्याचेही बंधन नाही. हवी फक्त मनाची तयारी. मेंदूच्या मदतीने आनंद मिळवू लागल्यावर मग तो किती अक्षय्य असतो, हे सहजपणे लक्षात येऊ लागते. संपन्नता केवळ इंद्रियांतून मिळत नाही. त्यापलीकडे असलेल्या सर्जनाचा अनुभव संपन्नता देतो. इंद्रियांना होणारा आनंद त्यामुळे अधिकच खुमासदार होतो. सुवास, चव, स्पर्श या प्रत्यक्ष आनंदाच्या, तर श्रवण आणि दर्शन या अप्रत्यक्ष आनंदाच्या गोष्टी. त्यातले तारतम्य कळले की सगळेच सोपे होऊन जाते. प्रत्यक्षातल्या आनंदाला जेव्हा उत्कटतेची झालर येते, तेव्हा तोच आनंद आत्मनिरपेक्ष ठरतो आणि आपल्याला संपन्न बनवतो. असे संपन्न होण्याची इच्छा नसलेला समाज आता वाढणे हा खरा धोका आहे. समाजाला त्यातला खरेपणा समजणे आवश्यक अशासाठी आहे, की त्यामुळे त्याला भवतालाचे खरे भान प्राप्त होते. इंद्रियांच्या आनंदाला या उत्कटतेची जोड मिळण्यासाठी पाश्चात्त्य देशांत केवढे प्रयत्न होत असतात. त्याकडे मात्र आपण ढुंकूनही पाहात नाही. मग इतिहासाची उपेक्षा होते, भूगोल ऑप्शनला पडतो, कला विषयांना उत्पन्नाची साधने उरत नाहीत, नागरिकशास्त्र तर पाठय़पुस्तकापुरतेच उरते. असे जगायचे, तर त्याला दिवाळी कशाला हवी, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.

परंतु तरीही आपल्या सांस्कृतिक भवतालात या दिवाळीला महत्त्व उरतेच. मनाची उभारी वाढवण्यासाठी, जगण्याच्या दुर्दम्य इच्छांच्या पूर्तीसाठी आणि जगण्याच्या समृद्धीसाठी ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात यायलाच हवी असते. दिवाळीचा हा सांगावा ऊर्मी आणि विश्वास वाढवणारा ठरो, एवढीच कामना याप्रसंगी करायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:05 am

Web Title: editorial on diwali find happiness abn 97
Next Stories
1 निम्म्याच्या मर्यादा
2 जमिनीवर या..
3 दारिद्रय़हनन
Just Now!
X