आर्थिक यशानंतर अनेकांना समाजकारणाच्या मार्गे राजकारण खुणावते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांनीही तेच केले.

थोरले बुश एके काळी कडवे उजवे होते. नंतर ते सहिष्णू उजवे झाले आणि अध्यक्षीय कारकीर्दीनंतर तर ते उजव्या रिपब्लिकनांचे टीकाकारच बनले. त्याचमुळे त्यांनी ट्रम्प यांना कधीही पाठिंबा दिला नाही. त्याआधी आपल्या चिरंजीवाच्या एकांगी धोरणासही त्यांनी विरोध केला.

राजकारणी हा लोकांना आपल्याशी जोडलेला आहे, असे वाटावे लागते. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी हा आपल्यापेक्षा नोकरशहा वा वरिष्ठ अधिकाऱ्यांशीच जास्त संलग्न आहे असे जेव्हा जनतेस दिसू लागते तेव्हा काय होते हे अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांच्यावरून समजून घेता येईल. चार वर्षे अध्यक्ष, आठ वर्षे उपाध्यक्ष, अत्यंत बलाढय़ अशा अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख, चीनसारख्या देशातील अमेरिकेचे राजदूत अशी जवळपास ४० वर्षांची सार्वजनिक जीवनातील पुंजी असलेला अन्य अमेरिकी नेता शोधून सापडणार नाही. त्याचबरोबर इतकी वर्षे सार्वजनिक जीवनात व्यतीत करूनही लोकांना आपला न वाटलेला नेताही शोधून सापडणार नाही. देश म्हणून केवळ अमेरिकाच नव्हे तर जगही ज्या काळात संक्रमणावस्थेतून जात होते त्या काळात बुश यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात एक जागतिक महासत्ता पाहता पाहता कोसळली आणि अमेरिका ही एकच शिल्लक राहिली. त्या अमेरिकेचे थोरले जॉर्ज बुश हे अध्यक्ष. वयाच्या ९४ व्या वर्षी शनिवारी त्यांचे निधन झाले. अमेरिकेच्या राजकीय जीवनात थोरल्या जॉर्ज बुश यांच्यापासून एक नवीन घराणेच उदयास आले. एक मुलगा अध्यक्ष, दुसरा अध्यक्षपदाचा दावेदार, एका राज्याचा गव्हर्नर अशा विविधांगांनी बुश घराणे बहरले. परंतु इतके सर्व असूनही काही तरी महत्त्वाचे नसावे असे बुश यांच्या बाबत झाले.

अभ्यासात अत्यंत हुशार, लब्धप्रतिष्ठितांच्या  आयव्ही लीग्जमधील महाविद्यालयांतून शिक्षण आणि अवघ्या चाळिसाव्या वर्षी अब्जाधीश ही थोरल्या जॉर्ज बुश यांची लौकिकार्थाने ओळख. यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या दरम्यान ते अमेरिकी हवाई दलात अत्यंत यशस्वी पायलट होते आणि दुसऱ्या महायुद्धातील त्यांची कामगिरी चित्तथरारक म्हणावी अशी होती. त्यांच्या विमानावर बॉम्बहल्ला झाला आणि दोन सहवैमानिकांना पॅराशूटच्या साह्य़ाने विमानातून उडी मारावी लागली. ते दोघेही गेले. परंतु बुश यांनी जळते विमान तसेच चालवत शत्रुपक्षाच्या लक्ष्याचा वेध घेतला आणि अगदी शेवटच्या क्षणी विमानातून बाहेर उडी मारली. खाली समुद्र. तेथे असलेल्या जपानी नौकांच्या साह्य़ाने त्यांचे प्राण वाचले. ही विलक्षण शौर्यकहाणी हा बुश यांच्या आयुष्यातील अत्यंत मानाचा झळाळता शिरपेच. महायुद्ध संपल्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात सामील झाले आणि वयाने विजोड अशा बार्बरा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडील तेल क्षेत्राशी संबंधित. बुश यांनी हा व्यवसाय वेगळ्याच पातळीवर नेला. त्याची फळे धाकटय़ा बुश यांना चाखता आली. त्यांनीही तेल कंपनी काढली. हेनकेन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीस थोरले जॉर्ज बुश अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना दोन फायदे झाले. पहिला म्हणजे पश्चिम आशियाच्या वाळवंटी आखातात मोठमोठी कंत्राटे बुश यांच्या कंपनीस मिळाली आणि दुसरा फायदा म्हणजे मोठा व्यावसायिक भागीदारही त्यांना मिळाला. या भागीदाराचे आडनाव बिन लादेन. पुढे ज्याच्या विरोधात बुश यांनी आकांडतांडव केले त्या ओसामाचा हा थोरला भाऊ. आर्थिक यशानंतर अनेकांना समाजकारणाच्या मार्गे राजकारण खुणावते. थोरले बुशही राजकारणात आले.

टेक्साससारख्या राज्याचे ते प्रतिनिधी निवडले गेले. अमेरिकेच्या अर्थकारणात टेक्सास आणि तेलोद्योग यांचे वेगळेच प्रस्थ आहे. एन्रॉन या कंपनीचे मुख्यालयदेखील टेक्सास या राज्यातच होते आणि याच कंपनीला पुढे तालिबान्यांनी त्रास देऊ  नये यासाठी थोरल्या बुश यांनी मध्यस्थी केली होती. त्या मध्यस्थीत तेल कंपन्यांचे हितसंबंध होते. तथापि हा सगळा उद्योग वैयक्तिक लाभासाठी केल्याचा एकही आरोप थोरल्या बुश यांच्यावर झाला नाही. हा त्यांच्या राजकारणाचा मोठेपणा. वास्तविक रेगन यांच्या काळात बुश यांच्या सर्वच कृती वादातीत होत्या असे म्हणता येणार नाही. रेगन यांच्याकडे धडाडी होती. परंतु त्या धडाडीस विवेकाची जोड नव्हती. त्याचमुळे १९८० साली सुरू झालेल्या इराण-इराक युद्धात उभय बाजूंना शस्त्रास्त्र पुरवठा करण्याचा वावदूकपणा रेगन राजवटीने केला. या दोन इस्लामी देशांतील संघर्षांत मध्यस्थ होता इस्रायल आणि त्या मध्यस्थाचा संधानबिंदू होता उपाध्यक्ष बुश. याच काळात अफगाणिस्तानात स्थिरावलेल्या रशियास जेरीस आणण्याचा मार्ग म्हणून त्या परिसरात अफू लागवडीस बेफाम उत्तेजन दिले गेले. त्यामागील हेतू हा की रशियन सैनिकांना त्याचे व्यसन लागावे. हा उद्योग अमेरिकेने फ्रान्सच्या गुप्तहेर यंत्रणेच्या साह्य़ाने केला. त्या वेळी त्यातही मध्यस्थ होते थोरले बुश. या अफू  लागवडीने प्रत्यक्षात घडले उलटेच. पाकिस्तानचे लष्करशहा झिया उल हक यांनीच यातून पैसा केला. रेगन यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्षपदाची सलग आठ वर्षे पूर्ण केल्यावर १९८९ साली थोरले बुश अध्यक्षपदी निवडले गेले.

त्या वेळी रशियात मिखाइल गोर्बाचोव यांचा ग्लासनोस्त काळ सुरू होता आणि इंग्लंडात मार्गारेट थॅचर यांचे खमके नेतृत्व जागतिक राजकारणास दिशा देत होते. तथापि त्या वेळच्या अध्यक्षीय निवडणुकीत बुश यांनी अतिउत्साहात दिलेल्या आश्वासनानेच त्यांचा घात केला. नवे कोणतेही कर लावले जाणार नाहीत असे आश्वासन त्यांनी अमेरिकेस दिले. पण ते त्यांना पाळता आले नाही. दोनच वर्षांत कुवेतचा घास घेणाऱ्या इराकच्या सद्दाम हुसेनविरोधात त्यांना युद्ध छेडावे लागले. तो निर्णय घेताना बुश दोलायमान होते. त्या वेळी पूर्वसुरी रेगन यांच्याप्रमाणेच बुश यांचे कान पिळले ते थॅचरबाईंनी. तेव्हा बुश यांना सद्दामचा बीमोड करण्यासाठी हल्ला करावाच लागला. तथापि त्यासाठी अमेरिकेने त्या वेळी दिलेला पुरावा किती प्रामाणिक होता यावर अमेरिकेतच संशय व्यक्त झाला. कुवेती सीमेवर सद्दामच्या फौजा तैनात झाल्याची उपग्रही छायाचित्रे बुश यांनी आपल्या निर्णय समर्थनार्थ सादर केली. पण त्याची सत्यता संशयास्पदच राहिली. त्याचमुळे अमेरिकी फौजा इराकी राजधानी बगदादपर्यंत पोहोचूनही सद्दामला सुखरूप सोडून परत आल्या, त्या का, असा प्रश्न निर्माण झाला. त्याचे उत्तर बुश यांना देता आले नाही. पुढे २००३ साली त्यांच्या चिरंजीवास तसेच संशयास्पद युद्ध छेडून सद्दामला संपवावे लागले. थोरल्या बुश यांचे हे सैल राजकारण आणि ढगळ अर्थकारण यामुळे १९९२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत एका अगदी नवख्या राजकारण्याने त्यांचा पराभव केला.

बिल क्लिंटन हे त्याचे नाव. क्लिंटन डेमोक्रॅट तर बुश रिपब्लिकन. हे बुश एके काळी कडवे उजवे होते. नंतर ते सहिष्णू उजवे झाले आणि अध्यक्षीय कारकीर्दीनंतर तर ते उजव्या रिपब्लिकनांचे टीकाकारच बनले. त्याचमुळे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कधीही पाठिंबा दिला नाही. तथापि दुसरी अध्यक्षीय संधी न मिळाल्याची खंत त्यांना कायम होती. ती कमी केली ती विरोधी पक्षीय क्लिंटन यांनी. बुश यांच्या अनुभवाचा उत्तम फायदा क्लिंटन यांनी करून घेतला आणि त्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिल्या. या दोघांचे सूत इतके जुळले की बुश यांचे वर्णन क्लिंटन यांचा नसलेला पिता असे केले जात असे. या दोघांचे हे सौहार्द शेवटपर्यंत शाबूत होते. ट्रम्प यांच्या निवडीनंतर तर ते अधिकच घट्ट झाले. एके काळचा टोकाचा हा रिपब्लिकन नेता पुढे इतका बदलला की आपल्या चिरंजीवाच्या एकांगी धोरणासही त्यांनी विरोध केला. अमेरिकेच्या सहिष्णू, सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचे ते प्रतीक होते. ‘‘आपण एकमेकांच्या विरोधात लढलो म्हणून एकमेकांचे शत्रू नाही,’’ असे ते म्हणत. ‘‘राजकारण कधीही असभ्य आणि ओंगळ असता नये,’’ असे त्यांचे मत होते. ते तसे त्यांच्याच पक्षाकडून झाले असताना बुश यांनी जग सोडले ते बरेच झाले.