दीर्घकाळ नेतृत्व करू पाहणाऱ्यांच्या अंगी समाजातील अस्मितांच्या दुखऱ्या जखमांवर फुंकर घालण्याची क्षमता आणि तसा विवेक हवा; तो ट्रम्प यांच्याकडे नाही..

सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो. तो नसेल तर कितीही चांगल्या कृत्यासाठी दाखवलेल्या ठामपणाचे रूपांतर पाहता पाहता निर्घृणपणात होते. अशावेळी आपली चूक मान्य करणारे राज्यकर्ते आपला मार्ग बदलतात. हे भान ज्यांना नसते ते कपाळमोक्षाकडे मार्गक्रमणा सुरू ठेवतात..

‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यास असलेला धोका लक्षात घेण्यासाठी अध्यक्षांनी स्वत:समोर आरसा धरावा,’’ इतक्या निर्भीडपणे आपले राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची जागा दाखवून देणारे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’सारखे दैनिक आणि अमेरिकेत सध्या जे काही सुरू आहे त्याबाबत स्पष्ट भूमिका घेणारी माध्यमे यांच्यात पुरते एकमत आहे. आपल्या देशाचा सर्वोच्च नेता त्याच्या पदास साजेसा वागलेला नाही, हे ते एकमत. ट्रम्प यांचे आंधळे समर्थक असणाऱ्या ‘फॉक्स’सारख्या वृत्तवाहिनीस देखील अध्यक्षांची तळी उचलणे दिवसेंदिवस जड जाऊ लागले आहे, इतकी त्या देशातील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या या देशाची अशी वाताहत होताना पाहणे हे केवळ दु:खदायकच आहे असे नाही. तर ते आपल्यासह इतरांच्याही चिंता वाढवणारे आहे. म्हणून त्या देशातील सद्य:स्थितीचा सविस्तर आढावा घेऊन ही परिस्थिती का उद्भवली आणि तीमधून बाहेर पडण्याचा मार्ग काय, याची चर्चा व्हायला हवी.

मिनेसोटा राज्यातील मिनेएपोलिस शहरात गतसप्ताहातील निदर्शनात जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीयाचा पोलिसांहाती मृत्यू झाला. हातात बेडय़ा घातलेल्या या फ्लॉइडला जमिनीवर पालथे पाडण्यात आले आणि आपण मोठे काही शौर्यकृत्य करीत आहोत अशा थाटात एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने त्याचा गळा दाबला. गुदमरलेला जॉर्ज फ्लॉइड प्राणासाठी गयावया करीत होता. पण पोलिसांना दया आली नाही. साधारण पावणेनऊ मिनिटे तो तडफडत होता. परंतु क्षुल्लक कारणासाठी या इसमाचा जीव घेण्याची गरज नाही, असे काही पोलिसांना वाटले नाही. या नृशंस आणि भयानक घटनेचे दृक्मुद्रण सर्वत्र पसरल्यानंतर पोलिसांविषयी संताप उफाळून येणे साहजिक ठरते. हा संताप व्यक्त होताना झालेल्या हिंसाचाराचे समर्थन कोणी करणार नाही. पण पोलिसांच्या कृष्णद्वेषी इतिहास आणि वर्तमानासही पाठिंबा देणेही केवळ अशक्य ठरते. पोलिसांविषयीचा संताप इतक्या तीव्रपणे उफाळून आला याचे कारण मिनेएपोलिस शहरातील वाढती विषमता आणि पोलिसांतील वांशिक दुस्वास. याच शहरात २०१५ आणि २०१६ साली पोलिसांकडून अशाच दोन कृष्णवर्णीयांच्या हकनाक हत्या झाल्या होत्या. त्या वांशिक हिंसेच्या जखमा अद्यापही भरून आलेल्या नाहीत. त्यात सध्याची वाढती विषमता आणि करोनाकालीन निर्बंधांमुळे वातावरणात भरून राहिलेली अस्वस्थता. यामुळे स्फोटक अस्वस्थतेला बेजबाबदार पोलिसांच्या अमानुष वर्तनाची जोड मिळाली आणि पाहता पाहता अमेरिकेत दंगलसदृश हिंसक निदर्शनांचे लोण पसरले. कृष्णवर्णीयांवर अत्याचार यापूर्वीही, अगदी ओबामाकाळातही झाले. पण तेव्हा ते आटोक्यात आणण्याची नियत राज्यकर्त्यांनी दाखवली होती. तसे यंदा न होता अ‍ॅटलांटा, फिलाडेल्फिया, सिएटल, डेट्रॉइट, डेन्व्हर, न्यू यॉर्क, ह्यूस्टन, लुईव्हिले या शहरांत आणि मुख्य म्हणजे राजधानी वॉशिंग्टन येथे या हिंसक निदर्शनांचे लोण पसरले. वॉशिंग्टन शहरात तर अध्यक्षीय निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत हे निदर्शक पोहोचले. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्ष ट्रम्प यांची रवानगी अत्यंत सुरक्षित अशा तळघरात करण्याची वेळ सुरक्षा रक्षकांवर आली. याआधी २००१ साली ९/११ घडले तेव्हा व्हाइट हाऊसवरही विमान आदळणार या भीतीपोटी तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांना असे तळघरात न्यावे लागले होते. यावरून सध्याच्या वांशिक दंगलींच्या आगीची तीव्रता लक्षात येईल.

पण म्हणून त्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे गेल्या चार वर्षांचे दळभद्री असे दुहीचे राजकारण. अमेरिकेसारखे देश हे स्थलांतरितांनी उभे केलेले आहेत. पण ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यावर लगेच या स्थलांतरितांच्या नावे बोटे मोडायला सुरुवात केली आणि त्याविरोधात विद्वेषाची ठिणगी पेटवली. त्याही आधी ट्रम्प यांची निवडणूकच मुळात गोरे-काळे, स्थानिक-स्थलांतरित, ख्रिश्चन-मुसलमान अशा अनेक दुफळ्यांच्या पायावर उभी होती. अमेरिकेच्या ताज्या इतिहासात अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी प्रथमच आतले-बाहेरचे अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला आणि भूमिपुत्रांच्या नावे गळा काढत त्यांचा पाठिंबा मिळवला. तेव्हाच ट्रम्प यांची राजवट ही नसलेली दुही तयार करणारी आणि असलेली दुही वाढवणारी असेल असे मानले गेले. त्या विश्वासास ट्रम्प यांनी आपल्या बेमुर्वतखोर वागण्याने अजिबात तडा जाऊ दिला नाही. उत्तरोत्तर त्यांची राजवट कर्कश्श होत गेली आणि मिळेल त्या मुद्दय़ावर दुफळी निर्माण करत गेली. मिनेएपोलिस येथे जे काही घडले आणि अन्यत्र अमेरिकेत जे काही घडेल ते सर्व ट्रम्प यांच्या अत्यंत क्षुद्र राजकारणाचा परिपाक असेल. काहीही बौद्धिक गांभीर्य नसलेली व्यक्ती जेव्हा इतक्या मोठय़ा पदावर निवडून येते, तेव्हा सर्व क्षेत्रांत चढाओढ निर्माण होते ती अधिकाधिक खुजेपणाचीच. असे झाल्यास जे होते तेच आता अमेरिकेत होताना दिसते.

हे असे होते याचे कारण आपल्या राजकारणाने समाजातील दुभंग वाढणार नाही असे वर्तन नेतृत्वाच्या सर्वोच्च शिखरावरील व्यक्तीचे असावे लागते हे भान अनेकांना नाही. ट्रम्प यांना तर नाहीच नाही. जे जोडता येत नाही ते तोडू नये, या साध्या निसर्गनियमाकडे हे बौद्धिकदृष्टय़ा उनाड / उजाड नेते दुर्लक्ष करतात. जो दीर्घकाळ नेतृत्व करू इच्छितो त्याच्या अंगी समाजातील अस्मितांच्या दुखऱ्या जखमांवर फुंकर घालण्याची क्षमता आणि तसा विवेक हवा. ट्रम्प यांच्या अंगी हे दोन्हीही नाही. त्याचमुळे इतके होऊनही अमेरिकेतील कृष्णवंशीयांस आधारपर काही चार शब्द बोलावेत असे या गृहस्थास अद्यापही वाटलेले नाही. असा आधार देणे सोडाच, पण या अध्यक्षाने निदर्शकांना भडकावणारीच विधाने केली. त्यांना दिसता क्षणी गोळ्या घालायला हव्यात, हे या अध्यक्षाचे मत. वास्तविक हे निदर्शक आणि दंगलखोर यांच्यात मूलभूत फरक आहे. काहीएक मुद्दय़ासाठी ही मंडळी रस्त्यावर उतरली. नंतर त्यांत समाजकंटक घुसले पण अमेरिकी प्रशासनाने सर्वानाच  झुंडखोरांसारखी वागणूक दिली. पोलीस असे बेदरकार तेव्हाच वागू शकतात जेव्हा त्यांच्या मागे त्याहूनही अधिक बेदरकार प्रशासन असते. अमेरिकेत ते तूर्त तरी तसे आहे. त्याचमुळे या निदर्शकांत मोठय़ा प्रमाणावर गोरेदेखील आहेत हे प्रशासनास लक्षात आले नाही.

आणि त्याचमुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांत यास पाठिंबा मिळू शकतो याची जाणीव या प्रशासनास झाली नाही. लंडन, पॅरिस अशा काही महत्त्वाच्या शहरांत अमेरिकेतील घटनांच्या निषेधार्थ निदर्शने होऊ लागली असून त्यांची संख्या वाढल्यास आश्चर्य वाटावयास नको. आज अन्य देशांत या मुद्दय़ास समर्थन वाढताना दिसते याचे कारण आपल्या देशातील राजवटदेखील अशीच आणि इतकीच असंवेदनशील आहे असे अनेकांना वाटू लागले म्हणून. हा इशारा आहे. निष्ठुरता म्हणजेच ठामपणा असे मानणाऱ्या राज्यकर्त्यांना. सत्ताधाऱ्यांच्या ठामपणाच्या मुळाशी मानवतेचा ओलावा असावा लागतो. तो नसेल तर कितीही चांगल्या कृत्यासाठी दाखवलेल्या ठामपणाचे रूपांतर पाहता पाहता निर्घृणपणात होते. अशा वेळी आपली चूक मान्य करणारे राज्यकर्ते आपला मार्ग बदलतात. हे भान ज्यांना नसते ते कपाळमोक्षाकडे मार्गक्रमणा सुरू ठेवतात.

ट्रम्प हे कोणत्या गटात मोडतात हे सांगण्याची गरज नाही. आपल्या देशातील एका विषाणूस हाताळणे त्यांना जमले नाही. त्यात लाखांहून अधिकांचे प्राण गेले. त्यात आता अमेरिकेत या वांशिक विषाणूने डोके वर काढले असून त्यावर तरी ट्रम्प यांना नियंत्रण मिळवता यायला हवे. पहिल्याचा धोका आरोग्यास आहे. पण दुसऱ्याचा एकंदरच स्वास्थ्यास. आरोग्यात स्वास्थ्य असतेच असे नाही. पण स्वास्थ्यात मात्र ते असतेच असते. म्हणून हा दुसरा अधिक घातक ठरेल.