आनंदापुढली आव्हाने किंवा लोक आनंदी नसण्याची कारणे- या वर्षी जगभर थोड्याफार फरकाने सारखीच होती. कारण जगभर थैमान घालणारा करोना विषाणू!

… त्यामुळे यंदा जागतिक आनंद निर्देशांक काढण्याचे निकष कदाचित बदलतीलही; मात्र यंदाच्याही निर्देशांकात आपली आणखी घसरण झाल्यास ‘निकष चुकीचे’ यापेक्षा निराळा काही तरी आक्षेप आपणास शोधावा लागेल…

‘प्रधानजी, राज्याची हालहवाल कशी आहे?’ असे वाक्य रंगमंचावरल्या राजाने उच्चारताच प्रधानाचे उत्तर तयार असे- ‘सगळी आबादीआबाद आहे महाराज, प्रजा आनंदात आहे, कोणीही दु:खात नाही’… मराठी वगनाट्ये, नाटके यांतून सुमारे पंचवीसेक वर्षांपूर्वीपर्यंत नेहमी ऐकू येणारे हे संवाद त्या वेळी काल्पनिक होतेच आणि आता तर ही ठरावीक सुरुवात कुणी फार वापरत नसल्याने कालबाह्यच म्हणावी लागेल. पण ‘लोक आनंदी असणे’ हे कोणत्याही राज्यासाठी महत्त्वाचे असते, ही समजूत मात्र कधीच कालबाह्य होणार नाही. म्हणून तर सन २०१२ पासून दरवर्षी २० मार्च या दिवशी ‘जागतिक आनंद अहवाल’ प्रकाशित होतो आणि जागतिक आनंद निर्देशांकाची क्रमवारीही जाहीर होते. २० मार्च हा ‘जागतिक आनंद दिन’ म्हणून पाळला जातो. हे दिवस पाळणे वगैरे संयुक्त राष्ट्रे वा त्या संघटनेच्या परिवारातील ‘युनेस्को’ यांचे उपक्रम. कशाचेही दिवस पाळू शकतात या संघटना! १९ मार्च रोजी ‘जागतिक निद्रा दिवस’ असतो… म्हणून जसे १९ मार्चला कोणी दिवसभर झोपून राहत नाही, तसे २० मार्चला आनंद दिवस म्हणून कोणी आनंदीही होत नसेल. गेलाबाजार, आनंद निर्देशांकाचा अहवाल काढणारे कोलंबिया विद्यापीठ आणि अन्य संस्थांमधले तज्ज्ञ  तेवढे, प्रत्येक वर्षी हा अहवाल यथासांग प्रकाशित होतो म्हणून आनंदत असतील… ते ठीक. पण हे संयुक्त राष्टप्रणीत दिवस पाळले जातात ते १४ फेब्रुवारीच्या

‘प्रेम दिना’सारखे नसतातच. ज्याचा दिवस पाळला जातो आहे त्या गोष्टीबद्दल जगात जाणीवजागृती व्हावी, अभ्यास व्हावा, यासाठी हे दिवस असतात. थोडक्यात असे की, जलदिनी पाण्याबद्दल किंवा पर्यावरणदिनी उत्तर ध्रुवापासून आपापल्या शहरापर्यंतच्या पर्यावरण समस्यांबद्दल जशी चिंता व्यक्त होते, तशी आनंददिनी चिंताच व्यक्त होणार… तीही आनंदाबद्दल!

यंदा तर ही चिंता मोठीच. तेही साहजिक. कारण गेले अख्खे वर्ष जगभर थैमान घालणारा करोना विषाणू. त्यामुळे यंदा जगातील कुठल्या देशात किती कमी आनंद आहे, याची चिंता करणे अगदी सोपे होऊन गेलेले असणार. करोनाचा फैलाव वाढत असताना या रोगाविषयी माहितीच कमी असल्याने आणि चाचण्या वेळखाऊ असल्याने त्याला एक गूढ दहशतकारी वलय होते, ते भेदले जाते न जाते तोवर टाळेबंदीचा जाच जाणवू लागला होता आणि ‘अनलॉक’ किंवा ‘पुनश्च हरिॐ’ म्हणूनही अनेक नागरी सेवा कमीच उपलब्ध असल्यामुळे म्हणा किंवा अनेकांच्या नोकऱ्या जाणे, पगारांत किंवा मिळकतीत कपात होणे यामुळेही  चिंता वाढतच होत्या. आपापल्या देशातील वैद्यकीय सुविधांच्या तत्परतेबद्दल संशय वाढू लागला होता. रुग्णालयात जागाच नाही म्हणून इथून तिथे वणवण करावी लागण्याचा अनुभव भारताच्या काही शहरांत जसा होता, तसाच्या तसाच तो अमेरिकेच्याही काही राज्यांमध्ये आला. टाळेबंदीला विटलेल्या फ्रेंचांनी तर रस्त्यांवर उतरून जाळपोळ केली. ब्रिटन, इटली, पोलंड आदींनी टाळेबंदी उठवली आणि पुन्हा लादली. हे सारे लक्षात घेता, आनंदापुढे असणारी आव्हाने- किंवा लोक आनंदी नसण्याची कारणे- जगभर थोड्याफार फरकाने यंदा सारखीच होती. रोगाची लक्षणे धडधडीत दिसत असल्यावर वैद्यकांचे काम जसे सोपे होऊन जाते, तसेच यंदा आनंदाच्या मोजमापाचा जागतिक अहवाल बनवून प्रत्येक देशाचा आनंद निर्देशांक काढणाऱ्यांचे काम सोपे झालेले असणार.

हे निर्देशांक काढणारे लोक निकषच नीट लावत नाहीत, म्हणून मग भारतासारख्या देशांचा क्रमांक खाली गेलेला दिसतो, असा आक्षेप हल्ली आपल्या आत्मनिर्भरतेला बळकटी देतो आहे. मग तो निर्देशांक नागरी स्वातंत्र्याचा असो की व्यवसाय सुलभतेचा. जर त्या निर्देशांकात आपली घसरण दिसून आली, तर त्यामागचे निकषच चूक किंवा अपुरे होते, असे आपण म्हणू शकतो! आनंद निर्देशांकात भारताचा क्रमांक २०१२ साली १११ वा होता, तेथून २०२० मध्ये- म्हणजे करोनाच्या आधी- तो १४४ इतका खाली गेला. विचित्र बाब म्हणजे, २०२० मध्ये पाकिस्तानचा क्रमांक मात्र ६६ वा होता. का, तर म्हणे  ‘सामाजिक आधार’- म्हणजे कुटुंबीय, परिचित अशा ‘बिरादरी’तल्या लोकांचा आधार आपणास आहे, असे पाकिस्तान्यांना भारतीयांपेक्षा फारच अधिक वाटते! असल्या आधाराबरोबर बंधनेही येतात, पण त्यांचे ओझे आपल्या शेजारी देशातील नागरिकांना कमीच भासते! म्हणून ते आपल्यापेक्षा दुपटीहून जास्त पुढे. हे अर्थात गेल्या वर्षीपर्यंतचे चित्र.

यंदा ते कदाचित बदलेल. करोना हे सामायिक संकट जगापुढे आल्याने त्या संकटाशी लढण्याचे किती बळ तुमच्याकडे आहे असे वाटले, हा प्रश्न यंदा महत्त्वाचा ठरेल. आदल्या बहुतेक सर्व वर्षांत दरडोई उत्पन्नासारख्या निश्चित आकड्याखेरीज, ‘सामाजिक पाठिंबा’सारखे किंवा ‘भ्रष्टाचारामुळे तुमचा आनंद हिरावला जातो का?’, ‘स्वत:च्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते का?’ हे व्यक्तिनिष्ठ प्रश्नही नमुना पाहणीत विचारले जात आणि तेही निर्देशांकाचे निकष ठरत. यंदा अनेक देशांचे सकल राष्ट्रीय उत्पन्नच माहीत नाही, मग दरडोई उत्पन्न कसे काढणार? टाळेबंदीच बराच काळ होती, मग कसले निर्णयस्वातंत्र्य असणार? त्यामुळे यंदा निकष बदलतील, अशी अपेक्षा आहे. यंदाच्या अहवालातील काही भाग आधीच वाचता येतो, तो सर्व करोनाकाळास वाहिलेलाच आहे. तेव्हा निर्देशांकही त्यावर आधारित असणार, ही शक्यता अधिक.

मात्र, यंदाच्याही निर्देशांकात आपली आणखी घसरण झाल्यास ‘निकष चुकीचे’ यापेक्षा निराळा काही तरी आक्षेप आपणास शोधावा लागेल. आम्ही एकदिलाने दिवे लावले, थाळ्या व टाळ्या वाजवल्या हे दिसले नाही का तुम्हाला, असे विचारावे लागेल म्हणा किंवा आम्ही केलेला आत्मनिर्भरतेचा संकल्प, ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ची पुण्यात तयार झालेली लस जगभर पाठवून आम्ही दिलेली संजीवनी हे सारे आमच्या आनंदाचाच भाग आहेत, असे ठणकावून सांगावे लागेल.

ते काम आपल्या देशातील धुरीण करतीलच. तूर्त आपण जागतिक आनंद निर्देशांकाची चर्चा थांबवून, नुकतीच ५० वर्षे पूर्ण केलेल्या ‘आनंद’ या चित्रपटाच्या आठवणीत रमावे हे बरे. सर्वच कलावंतांनी उत्तमरीत्या भूमिका निभावल्याने तो चित्रपट गाजला हे खरेच; पण कर्करोगावर इलाज पुरेसा ठरणार नसल्याचे माहीत होऊनही आनंदीच राहणाऱ्या, दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या नायकाच्या कथानकामुळे तो अजरामर ठरला. जगापुढील अटळ दु:खांनाही असेच नजरेआड करणे कधीही सोयीचे. त्यामुळे दु:खे कमी होणार नाहीत, पण आनंद तरी अढळ राहील. हा प्रयोग व्यक्तिगत पातळीवर आपण करतोच. फक्त तो सामाजिक वा राष्ट्रीय पातळीवर कसा करायचा, हे युक्तीने शोधून काढावे लागेल. जगातील अनेक देशांनी भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर संबंध तोडले असतानाही ‘फील गुड फॅक्टर’ची- म्हणजे लोक आनंदात असल्याची जाहिरात आपल्या देशात करण्यात आली होती. ती फसली, म्हणून विस्मृतीत गेली.

तरीही आपण, ‘राज्याची हालहवाल कशी आहे?’ या प्रश्नावर ‘लोक आनंदी आहेत’ असेच म्हणत राहावे हे बरे… जागतिक निर्देशांकापेक्षा हा हवाला- मग तो हवेतला का असेना- आपल्याला आनंद देणारा ठरेल!