वयाने अनेकांपेक्षा कमी असले, तरी मनोहर पर्रिकर यांनी संघ-भाजपच्या जुन्या पिढीचे संस्कारधन टिकविले होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवा माध्यमांतून दिसतो तसा ख्रिस्तीबहुल नाही, हे पर्रिकरांच्या राजकारणाने दाखवून दिले. अंगभूत धडाडी, तीस मिळालेली माध्यम नियंत्रणाची जोड आणि अभ्यास या जोरावर अल्पावधीतच पर्रिकर संभाव्य राष्ट्रीय नेते म्हणून गणले जाऊ लागले..

रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेल्या प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान आदींनंतरच्या पिढीतील मनोहर पर्रिकर हे बिनीचे नाव. या तिघांइतकेच किंबहुना अधिक प्रमाणात राष्ट्रीय जबाबदारीसाठी मनोहर हे अधिक पात्र आणि अधिक सज्ज होते. पण ते आता होणे नाही. कर्करोगाच्या असाध्य आजाराशी वर्षभराच्या संघर्षांने अशक्त झालेल्या कुडीतून पर्रिकर यांचा प्राण अखेर निघून गेला. त्यांच्या निधनाने पुढच्या पिढीतील एका आश्वासक नेत्याची अकाली अखेर झाली. पर्रिकर यांचे महत्त्व केवळ एका भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री इतकेच नाही. ते त्याहून बरेच अधिक आहे.

ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जसे आहे तसेच त्यांना घडवणाऱ्या संस्कार व्यवस्थेतदेखील आहे. मनोहरसारखी एक नेत्यांची पिढीच्या पिढी संघाच्या तालमीतून तयार झाली. ती अर्थातच हिंदुत्ववादी होती. पण अलीकडच्या काळात हिंदुत्वाचा जो एक कर्कश आणि कानठळ्या बसवणारा आविष्कार पाहावयास मिळतो, त्या हिंदुत्वाशी पर्रिकर दूरान्वयानेही जवळ आले नाहीत. एक प्रकारची समावेशकता त्यांच्या हिंदुत्वात होती आणि म्हणूनच ती सह्यदेखील होती. उत्तम शैक्षणिक अधिष्ठानास धर्मसंस्काराचे कोंदण मिळणार असेल तर त्यात एक शांतसमावेशकता आपोआप येते. भाजपच्या अनेक जुन्या नेत्यांत तशी ती आहे. पर्रिकर त्या नेत्यांचे प्रतिनिधित्व करायचे. चेहऱ्यावर एक स्मित, गोव्याच्या मातीतून आपोआपच उगवलेली एकेरीत सलगीची सवय आणि अभ्यासू वृत्ती हे पर्रिकर यांचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या राजकीय कौशल्याचे महत्त्व हे त्यांनी जमवलेल्या संचितात आहे. हे संचित सहिष्णु होते. म्हणूनच आयआयटीतील उच्चशिक्षणानंतर व्यवसायात शिरताना निवडावयाचा भागीदार हा धर्माने मुसलमान आहे, म्हणून त्यांच्या मनात कसलाही किंतु नव्हता. म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या त्यांच्या पहिल्या प्रयत्नात ख्रिश्चन धर्मगुरूंनी पर्रिकर यांच्यासाठी जातीने प्रचार केला. आपल्या रविवारच्या प्रार्थनांतून या धर्मगुरूंनी पर्रिकर यांचे सरळसरळ समर्थन केले. ही आधीच्या संघीय पिढीतील समंजसता आहेच, पण पर्रिकर यांच्याबाबत ती अधिक होती. याचे कारण गोव्याच्या मातीत आढळेल. या मातीत ख्रिश्चनांचे चर्च आणि हिंदूंची देवळे गुण्यागविंदाने एकत्र नांदतात आणि त्यांच्या परिसरात वावरणारे सहज मुसलमानही असू शकतात. त्याचे कोणालाच काही टोचत नाही. या सहजपणाचा वापर पर्रिकर यांनी व्यक्तिमत्त्व सादरीकरणात उत्तम केला. भारतीय मनांस उच्चपदस्थांच्या साधेपणाचे एक विचित्र आकर्षण आहे. व्यक्तीची कृती कशीही असो. पण तीत साधेपणा असेल तर त्याच्या दोषांकडे आपला समाज उदार अंतकरणाने पाहतो. या पाहण्यात एक सुखद आश्चर्य असते. पर्रिकर यांना या सामान्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या या आश्चर्याचे आकर्षण होते. म्हणून कोणत्याही पदावर असले तरी पर्रिकर लोकांच्या या डोळ्यातील आश्चर्यानंदाचा आनंद घेत.

गोव्यासारख्या उगाचच ख्रिश्चनबहुल मानल्या जाणाऱ्या प्रांतात भाजप रुजवण्याचे श्रेय पर्रिकर यांना जाते. येथे एक बाब लक्षात घ्यायला हवी की दाखवला जातो तितका गोवा हा प्रांत अजिबात ख्रिस्ती नाही. वास्तव उलट आहे. तो हिंदुबहुलच आहे. हिंदूंचे प्रमाण त्या राज्यात ६५ टक्क्यांच्या आसपास असावे. पण तरीही माध्यमांतील सादरीकरणामुळे गोवा हा अधिक ख्रिस्ती भासतो. तेव्हा गोव्यासारख्या ख्रिस्ती राज्यात पर्रिकर यांनी भाजपला रुजवले असे म्हटले जाते ते खरे नाही. गोवा हा अत्यंत हिंदू आणि धार्मिक असा प्रदेश असून आजही तेथे तुळशीचे लग्नसुद्धा वाजतगाजत साजरे होते. तेव्हा अशा ठिकाणी भाजपला रुजवणे हे वाटते तितके अवघड नव्हते. करायचे होते ते इतकेच की तेथील बहुजन हिंदूंना धर्माच्या झेडय़ांखाली एकत्र आणणे. ती जबाबदारी संघाने आणि विश्व हिंदू परिषदेने जशी उचलली तशी राजकीय पातळीवर पर्रिकर यांच्यासारख्यांनी ती हाताळली. याचा परिणाम असा झाला की मुळातच अशक्त आणि कालबाह्य होत चाललेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष पर्रिकर यांनी अधिकच खिळखिळा केला. तसेही गोव्यास स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर आणि महाराष्ट्रात विलीनीकरणाची शक्यता मावळल्यानंतर स्थानिक पक्षाने स्वतस महाराष्ट्रवादी म्हणवून घेणे चुकीचेच होते. पर्रिकर यांनी ती चूक जनतेच्या डोळ्यासमोर ठसठशीतपणे मांडली. त्यास धर्माचा आधार मिळाला आणि संघाच्या कार्यामुळे रुजलेल्या वृक्षास भाजपच्या रूपाने चांगली फळे लाभली. ती चाखण्याच्या योग्य वेळी पर्रिकर तेथे होते. तेव्हा मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे सहज चालत येणे हा नैसर्गिक तपशिलाचा भाग होता.

त्यानंतरचा पर्रिकर यांचा पुढचा प्रवास तितका वादविवादरहित नाही. ज्या समाजातून पर्रिकर येतात त्यास गोव्याच्या समाजजीवनात भलताच मान आहे. त्यात पर्रिकर हे आयआयटीसारख्या संस्थेतून यशस्वीपणे बाहेर पडलेले. म्हणजे जन्मास कर्माचीही साथ लाभली. त्यामुळे पर्रिकर मंत्रिमंडळात पहिल्या एक ते दहा क्रमांकावर एकच नाव असे. ते म्हणजे मनोहर पर्रिकर. हे भाजपच्या अलीकडच्या कार्यशैलीशी सुसंगतच म्हणायला हवे. गुजरात आणि गोवा या दोन राज्यांत याची सुरुवात झाली. त्या पद्धतीचे अंगभूत वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण प्रशासनावर एकाच व्यक्तीची पकड असते आणि मंत्रिमंडळात नावे जरी अनेक असली तरी ती नावापुरतीच असतात. पर्रिकर यांची ही कार्यशैली होती. अधिकाराचे विकेंद्रीकरण हे जरी त्यांना अमान्य होते तरी त्याचा म्हणून एक फायदा असतो. तो म्हणजे भ्रष्टाचार करण्याच्या संभाव्यता नष्ट होतात. पर्रिकर यांनी ते करून दाखवले. त्यांच्या उभ्या राजकीय आयुष्यात त्यांच्यावर मनमानीपणाचा आरोप झाला असेल, पण एकदाही कधी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा डाग त्यांना स्पर्शला नाही. अंगभूत धडाडी, तीस मिळालेली माध्यम नियंत्रणाची जोड आणि अभ्यास या जोरावर पर्रिकर संभाव्य राष्ट्रीय नेते म्हणून गणले जाऊ लागले. गोव्यासारख्या एका जिल्ह्याच्या आकाराइतक्या प्रदेशातील नेत्याने राष्ट्रीय स्तरावरच्या शक्यता जागृत कराव्यात हे निश्चितच कौतुकास्पद. ही बाब भाजपसाठीही तितकीच अभिनंदनीय. यामुळेच एकेकाळी राज्यस्तरीय नेत्यांची मोठी फळीच्या फळी या पक्षाने उभी केली.

हिंदी भाषेविषयी तितकेसे नसलेले ममत्व हे सुरुवातीच्या काळात पर्रिकर यांच्या राष्ट्रीय राजकारण प्रवेशाच्या आड आले. अनेकांना ठाऊक नसेल. परंतु नितीन गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या वादग्रस्त काळात पर्रिकर यांचे नाव परिवारात त्यांना पर्याय म्हणून घेतले जात होते. पर्रिकर यांच्या राष्ट्रीय आगमनाची तयारीदेखील सुरू होती आणि त्यासाठी गोव्यातील काही खाण मालकांचा पुढाकार होता. पण त्या प्रयत्नांत काही यश आले नाही. यामागे पर्रिकर यांच्या स्वभावविषयक मर्यादादेखील काही प्रमाणात कारणीभूत असाव्यात. भाजपच्या गोव्यातील अधिवेशनात पक्षाध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी त्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्या या काहीशा मी म्हणेन ती आणि तीच पूर्व या स्वभावाची द्योतक होती. याच स्वभावामुळे त्यांची संरक्षणमंत्रिपदाची कारकीर्द पडद्यामागच्या वादळाची ठरली. नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केली नसती तर पर्रिकर मध्येच हे पद सोडून गोव्यात परतले असते. गडकरी यांच्या हाताळणीमुळे ते गोवा विधानसभा निवडणुकांपर्यंत दिल्लीत थांबले.

पण त्यांचे दिल्ली वास्तव्य हे एकाकी होते. ना कोणा पक्ष कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे वर्दळ असे ना अन्य कोणाची. गोव्यात मुख्यमंत्री असले तरी मोकळेपणाने वागण्याच्या त्यांच्या अधिकारावर नियंत्रण नसे. दिल्लीत संरक्षणमंत्रिपदी असताना ते आले. त्यामुळेही त्यांना परतीची आस होती. तसे ते परतलेही. पण त्यांचा पूर्वीचा दिमाख आणि तोरा गमावून. सत्ता टिकवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाचे त्यांना वावडे होते असे नाही. परंतु या वेळची फोडाफोड ही देशाच्याच डोळ्यावर आली. ती करून मिळवलेल्या सत्तेत ते स्थिरावत असतानाच त्यांना कर्करोगाने गाठले. दोन दशकांपूर्वी त्यांची पत्नीही याच आजाराने गिळंकृत केली होती. तो घाव उर्वरित काळात कधीच भरून आला नाही. ते अधिकाधिक एकटे होत गेले. तो एकटेपणा आता कायमचा संपला. मनोहर पर्रिकर चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण एकदाही ते आपली पाच वर्षांची मुदत पूर्ण करू शकले नाहीत. ही त्यांची राजकीय तशीच वैयक्तिक आयुष्यातील अपूर्णता. त्या अपूर्णतेस आज पूर्णविराम मिळाला. भारतीय राजकारणात अशीही प्रामाणिक साधी माणसे कमीच. त्यात जी होती वा आहेत, त्यांतील एक सहज साधे सज्जन असे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून कायमचे गेले. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना आदरांजली.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial on goa chief minister manohar parrikar death
First published on: 19-03-2019 at 00:32 IST