अभिनिवेशशून्य असणे आणि तसेच जगणे हे इरफान खान याचे वैशिष्टय़ आणि मोठेपण. एरवी हाताच्या दोन बोटांची ‘व्ही’ खूण करत मिरवणाऱ्या निर्बुद्धांनी आसमंत भरलेला असताना इरफानचे समंजस प्रौढत्व दिसले, ते कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही..

..हे इरफान खान या कलाकाराचे यथार्थ आणि वास्तववादी वर्णन ठरेल. भारतीय चित्रसृष्टीत नायक, महानायक होण्याची स्वप्ने घेऊन येण्याची परंपरा असताना, केवळ चांगला अभिनेता होणे हेच ध्येय असलेल्या कलाकारांची नवी पिढी उदयास येताना दिसते. इरफान या पिढीचा ‘चारागर’. म्हणजे हाती कंदील घेऊन मागून येणाऱ्यांना मार्ग दाखवणारा. एके काळी चिकनेचोपडे असणे हे चित्रपटात यश मिळवून देण्यासाठी पुरेसे होते. त्याच्या बरोबरीने आडनावाची पुण्याई असेल तर काहीही आचरटपणा हा अभिनय म्हणून खपवता येत असे. इतकी किमान पात्रता आणि समोर मधुबालासारख्या पारलौकिक सौंदर्यवती, यांच्या जोडीला मदन मोहन, अनिल विश्वास, एस. डी. बर्मन आदींपैकी असेच कोणाचे पारलौकिक संगीत असेल तर सुमारदेखील हां हां म्हणता यशस्वी कलाकार म्हणून गणला जात असे. अमिताभ बच्चन यांनी ही परंपरा मोडली आणि नसीरुद्दीन शाह, ओम पुरी अशांनी तिच्या मर्यादा दाखवून दिल्या. यात अमिताभ, शाहरूख वगैरेंनी सुरक्षित असा पहिला मार्ग निवडला. नसीरसारख्यांनी उदरनिर्वाहापुरती त्या मार्गाची मदत घेतली, पण ते आनंदासाठी आपल्या जातिवंत अभिनयाकडे वळले. इरफान खानसारख्या कलावंताने मर्यादित आणि सकारात्मक अर्थाने या दोन्ही मार्गाचा संकर केला आणि आपली रसरशीत अशी परंपरा निर्माण केली. आज तो मार्ग गजबजलेला दिसतो.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
man attacked wife Bhiwandi
ठाणे : जेवण गरम करून दिले नाही म्हणून एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात पाट मारला, महिलेची प्रकृती गंभीर
21 year youth arrested under pocso act for molesting 7 year old school girl
वहीमध्ये लिहिल्याने लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड ; २१ वर्षीय तरूणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा

त्याचे श्रेय इरफान खानसारख्या कलाकारास. कोणत्याही बडय़ा घराण्याची पार्श्वभूमी नाही, कोणास आवडेल असे दिसणे नाही, आवाजही तसा सर्वसामान्यांसारखाच. म्हणजे बाकी सर्व बेताचे, पण रझा मुराद यांच्यासारखा जरबदार आवाज असेही नाही. आणि अभिनयाचा गंध नसतानाही बिनडोक रूपासाठी नायिका म्हणवून घेणाऱ्यांभोवती पिंगा घालत नाचणेही जमत नाही. तरीही भारतीय चित्रपटांत केवळ आणि केवळ उत्तम अभिनयाच्या जोरावर यशस्वी होता येते, हे सिद्ध करून दाखवणारे उदाहरण म्हणजे इरफान खान. उत्तम वेश वा रंगभूषेनंतरही एकाही चित्रपटात इरफान खान वास्तव आयुष्यात दिसे त्यापेक्षा वेगळा दिसला नाही. डोळ्याखालचे ते फुगवटेही तसेच आणि बिछान्यातून नुकताच बाहेर आल्यासारखा तो विस्कटलेपणाही तसाच. ‘मकबूल’मधला मकबूल, ‘स्लम डॉग मिल्यनेअर’मधला पोलीस निरीक्षक किंवा ‘पानसिंह तोमर’मधला डाकू, ‘पिकु’मधला ‘राणा चौधरी’ नामक कुरियरवाला किंवा ड्रायव्हर, ‘लंच बॉक्स’मधला साजन फर्नाडिस किंवा आणखी कोणताही चित्रपट. इरफान खान हा इरफान खानच होता. त्याच्या भूमिका आणि त्याचे व्यक्तिमत्त्व जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू.

कलाकार या नात्याने इरफान खानचे खरे मोठेपण हे. त्याच्यातल्या अभिनेत्याने तो करीत असलेल्या व्यक्तिरेखेवर कधीही मात केली नाही. म्हणजे इरफान साकार करीत असलेली व्यक्तिरेखा ही चित्रपटाच्या पडद्यावर ती व्यक्तिरेखाच वाटे. ही व्यक्ती अशीच असली पाहिजे ही भावना दर्शकांच्या मनात रुजवण्यात इरफान खान प्रत्येक चित्रपटात यशस्वी होत असे. चौकटीचे, म्हणजे फ्रेम या अर्थाने, वजन वा दडपण न घेता अभिनय साकारणे फार कमी कलाकारांना जमते. इरफान हा अशा मोजक्या कलाकारांमधील एक. असे ज्यांना जमते तो कलावंत मी अमुक प्रकारच्याच भूमिका करीन असे म्हणत नाही. आपल्यातील कलाकारास आव्हान मिळेल अशी प्रत्येक भूमिका अशा कलावंतांना खुणावते. मग ती रंगाने काळी असो वा गुलाबी. त्यामुळे इरफानने अनेकढंगी भूमिका केल्या.

पण त्याच्यातील हे ढंग ओळखण्याचे श्रेय मीरा नायर यांना जाते. तोपर्यंत दूरदर्शनवर ‘भारत एक खोज’ या अभिजात मालिकेपासून ते ‘चंद्रकांता’ वा ‘जय हनुमान’ अशा नावांतच सारे काही आले अशा अनेक मालिकांत इरफान खान संधीची वाट पाहत होता. अधेमध्ये चित्रपटांत लहानसहान भूमिका वाटय़ास येत. उदाहरणार्थ पंकज कपूर यांच्या अजरामर भूमिकेने गाजलेल्या ‘एक डॉक्टर की मौत’सारख्या सिनेमात इरफान खान लक्षवेधी भूमिका करून गेला. अशा बऱ्याच मोठय़ा संघर्षांनंतर इरफानला मोठा पडदा मिळाला. त्यानंतर मात्र तो केवळ ‘बॉलीवूड’पुरताच मर्यादित राहिला नाही. अनेक ब्रिटिश आणि हॉलीवूड चित्रपटांत त्याला संधी मिळाली. आणि अजिबात आश्चर्य वाटू नये अशी बाब म्हणजे, पाश्चात्त्य चित्रपटविश्वात तो आपल्या अभिनय गुणांसाठी ओळखला जाऊ लागला. त्या चित्रपटविश्वाचा स्वभाव पाहता ते रास्तही होते. चित्रपट कलाकार हा रूपापेक्षा अभिनय गुणांसाठी ओळखला जायला हवा, असे ते विश्व मानते. त्यामुळे त्या जगात इरफानचे अधिक कौतुक होणे साहजिक.

आपल्याकडे ‘मकबूल’ने इरफानला मोठा उठाव दिला. या चित्रपटातही ‘एक डॉक्टर की..’प्रमाणे पंकज कपूर त्याचे सहकलाकार. त्यांची आणि इरफान खानच्या अभिनयाची जातकुळी एकच. त्यामुळे तो चित्रपट या दोघांच्या कमालीच्या आशयघन भूमिकांसाठी अजूनही अनेकांच्या स्मरणात असेल. या दोघांच्या बरोबरीने त्या चित्रपटातील तितकीच उत्कट तब्बूदेखील संस्मरणीय. एखादी भूमिका गाजली म्हणून इरफान खानने त्याच बाजाच्या भूमिका निवडल्या असे झालेले नाही. हे त्याच्यातील कलावंताचे सच्चेपण अधोरेखित करते. मध्यंतरी एका मुलाखतीत इरफानला त्याच्या बदलत्या भूमिकांसंदर्भात प्रश्न विचारला गेला. या भूमिकांतून इरफान उत्क्रांत होताना दिसतो, अशी त्यावर प्रश्नकर्त्यांची टिप्पणी. त्या वेळी त्यास थांबवून इरफानने दुरुस्ती केली- ‘‘या काळात चित्रपटसृष्टी उत्क्रांत होत गेली.’’ त्याच्या म्हणण्याचा रोख असा की, मी बदललो नाही, तर मला स्वीकारण्याइतका बदल चित्रपटसृष्टीत झाला. पण त्याने हे विधान इतक्या सहजपणे केले की, त्यात कोठेही ‘मी हा असा आहे’ छापाचा अभिनिवेश नव्हता.

हे असे अभिनिवेशशून्य असणे आणि तसेच जगणे हे इरफान खान याचे वैशिष्टय़ आणि मोठेपण. चित्रपटसृष्टीत आहे म्हणून नाचऱ्या जलशांत तो कधी दिसल्याचे स्मरत नाही. ‘‘मी भारतीय सिनेमे तसे कमी पाहतो,’’ हे सांगण्यातही उद्दामपणा व्यक्त होत नसे. परंतु त्याच वेळी त्याचे वाचन दांडगे होते. चित्रीकरणासाठी आल्यावर आपले संवाद मागून घेणाऱ्या नायकांच्या काळात असे वाचणारा अभिनेता केव्हाही उजवाच ठरतो. वाचनातून येणारी बौद्धिकता थिल्लरतेस चार हात दूर ठेवते. इरफानच्या वागण्याबोलण्यातून हे दिसत असे. यातून परिस्थितीस वास्तववादी भूमिकेतून सामोरे जाण्याचा प्रौढपणा अंगी येतो. दुर्मीळ  आणि असाध्य कर्करोगाचे निदान झाल्यानंतर इरफानच्या व्यक्तिमत्त्वातील हा प्रौढपणा लोभस वाटत होता आणि तरीही आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून व्याकूळही करत होता. या आजारातून काहीशी उसंत मिळाल्यानंतरचे त्याचे वागणे-बोलणे यात एक तात्त्विकता होती. ‘‘मला वाटते मी आता शरण जावे,’’ हे त्याचे विधान हे असेच होते. एरवी हाताच्या दोन बोटांची ‘व्ही’ खूण करत मिरवणाऱ्या निर्बुद्धांनी आसमंत भरलेला असताना इरफानचे हे शांतपणे वास्तव स्वीकारणे त्याच्यातील समंजस प्रौढत्व दाखवून देणारे होते.

एखाद्या वृक्षाकडून बऱ्याच अपेक्षा असाव्यात- पण तो अचानक उन्मळून पडावा, असे त्याचे हे अकाली जाणे. त्याच्या अभिनयासारखेच सहज. इरफान खऱ्या आयुष्यात जसा जगला तसाच पडद्यावरही होता. आणि आता तो गेलाही तसाच. या सच्च्या कलाकारास ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.