विज्ञानाची कास धरून समाजाच्या जाणिवा जाग्या करणाऱ्या नारळीकर यांची अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड हा समृद्ध मराठी तर्कवादी परंपरेचाच गौरव..

प्रज्ञा, प्रतिभा, सर्जनशीलता यांचा संगम असलेले नारळीकर लेखक आहेत; तसेच उत्तम विज्ञान संवादकही आहेत..

‘सरस्वती’ आणि ‘लक्ष्मी’ एकत्र नांदत नाहीत याप्रमाणे आपल्याकडे विनाकारण रुजवला गेलेला दुसरा समज गणित आणि ललित कला यांच्यातील द्वंद्वाबाबत आहे. ज्यास भाषादी कलांत गती आहे तो गणितात मार खातो हे आपल्या कानीकपाळी शाळेपासून बिंबवलेले असते. त्यामुळे आपल्याकडे शालेय स्तरावर एक प्रकारचे कानकोंडेपण तयार होते. भाषेत उत्तम असलेला गणित जमत नाही म्हणून लाजत राहातो आणि गणित जमते तो भाषा, कला आपल्यासाठी नाहीत म्हणून र्कुेबाजपणात मश्गूल असतो. वास्तविक यातून मेंदूच्या एकाच भागाचा विकास झालेली असंतुलित प्रजा आपण निर्माण करतो याचे भानच आपल्याला नाही. ते यावे यासाठी अभ्यासावे असे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे जयंतराव नारळीकर. वास्तविक उत्तम वाङ्मयातही गणित असते. कादंबरी वा कथेस ‘खोली’ वा ‘उंची’ असेल तर ती मोठी ठरते आणि नसेल तर त्या लेखनाची गणना ‘उथळ’ अशी केली जाते. वाङ्मय, संगीत, चित्रशिल्पादी कलांचा मोठेपणा जोखण्यासाठी वापरले जाणारे ‘खोली’, ‘उंची’, ‘ताल’, ‘तोल’, ‘संतुलन’ आदी शब्दप्रयोग हे त्यातील गणिताचे द्योतक असतात. मराठी वाङ्मयात या गणित आणि अगणित विज्ञानाची सुरेख गुंफण नारळीकर यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या साहित्यिक कामगिरीचा आदर करीत साहित्य संमेलनाध्यक्षपदाची झालेली त्यांची निवड मराठी सारस्वताच्या अंगणात अद्याप मिणमिणता का असेना पण शहाणपणाचा दिवा तेवता आहे हे जाणवून देणारी आणि म्हणून आनंददायी ठरते.

एकविसाव्या शतकाची दोन दशके उलटून गेल्यानंतरही आपल्यातील विज्ञान साक्षरता यथातथाच म्हणावी, अशी दिसत असताना, केवळ विज्ञानाची कास धरून समाजाच्या जाणिवा जाग्या करणाऱ्या नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही घटना तितकीच महत्त्वाची ठरते. बाबा-बापूंची रसरसती पण बोगस बाजारपेठ फुलून वाहत असताना आजच्या काळात नारळीकर यांची निवड आधार देणारी. समाजाच्या विचारधारणा अधिक शास्त्रशुद्ध असाव्यात आणि त्यामागे शुद्ध शास्त्रीय संशोधन असावे, यासाठी नारळीकर यांनी आयुष्यभर जे लेखन केले, ते वाचकप्रिय झाले याचे कारण त्यात कोणताही अभिनिवेश नाही. प्रयोगशाळेतील अभ्यासाचा सामान्यांशी काहीही संबंध नाही, असे मानणाऱ्या जगात नारळीकर यांनी विज्ञानाचे अनाकलनीय गूढ सामान्यांच्या घरात पोहोचवले. विश्वचक्राचा अर्थ समजून घेणाऱ्या नारळीकर यांचे त्याविषयीचे लेखन अतिशय सुबोध आणि सहज पद्धतीने समजावून सांगणारे. त्यामुळे मराठी साहित्याचे जग अधिक समृद्ध झाले. आज विज्ञानाच्या क्षेत्रात जे काही संशोधन सुरू आहे, ते कित्येक हजार वर्षांपासून भारतात अस्तित्वात असल्याचा छातीठोक पुरावा देणाऱ्या निर्बुद्ध महाभागांशी निर्थक वाद घालत बसण्यापेक्षा विज्ञान समजावून सांगण्याचा नारळीकर यांचा खटाटोप म्हणूनच अधिक महत्त्वाचा. अशा भोंदूपणाकडे दुर्लक्ष करीत आपले संशोधनाचे काम अतिशय नेटाने आणि कमालीच्या एकाग्रतेने करण्यात त्यांना अधिक रस वाटला. त्यामुळे मराठी वाचकांच्या ज्ञानात तर भर पडलीच; परंतु कणभराने का होईना, या विषयांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची वृत्ती समाजात निर्माण झाली. याचे श्रेय डॉ. नारळीकर यांचेच.

त्यांचा जन्म कोल्हापूरचा. मात्र शालेय शिक्षण झाले हिंदीतून. मराठी आणि हिंदी या दोन्ही त्यांच्यासाठी मातृभाषाच. बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख असलेले वडील रँग्लर विष्णू नारळीकर आणि संस्कृतविदुषी असलेल्या आई सुमती यांच्यामुळे घरात अभ्यास व अध्ययनाचेच वातावरण. जयंत नारळीकरांनी बनारसमधून पहिल्या क्रमांकाने पदवी मिळवली आणि ते थेट केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. तिथे बी.ए., एम.ए., पीएच.डी. आणि रँग्लर या पदव्या मिळवल्या. तिथेच सर डॉ. फ्रेड हॉइल व डॉ. नारळीकर यांनी ११ जून १९६४ रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीपुढे गुरुत्वाकर्षणाचा एक नवा सिद्धांत मांडला. यात अर्न्‍स्ट माख यांच्या तत्त्वाला गणितीय रूप देऊन आइनस्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षणाशी त्याची सांगड घालण्यात आली. जडत्व केवळ वस्तूचा मौलिक गुणधर्म नसून त्याचा विश्वरचनेशी संबंध आहे असे त्यांनी महाविस्फोट सिद्धान्ताला आव्हान देणाऱ्या सिद्धान्तात म्हटले होते. कृष्णविवरांप्रमाणे विश्वात श्वेतविवरे अस्तित्वात आहेत व प्रत्यक्षात ती विवरे नसून द्रव्य व ऊर्जा यांची उगमस्थाने आहेत, हे निरीक्षण त्यांनी नोंदवले. गुरुत्वाकर्षणाबाबत त्यांनी जो सिद्धांत मांडला होता तो हॉइल-नारळीकर सिद्धांत म्हणून खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. नारळीकरांनी परदेशात संशोधन केले, पण ते पुढील संशोधनासाठी भारतात आले. मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी संशोधन सुरू ठेवले. जगातील संशोधक आज जेथे येतात त्या ‘आयुका’ या पुण्यातील संस्थेच्या स्थापनेत त्यांना केंब्रिज विद्यापीठातील इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरेटिकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी या संस्थेतील अनुभवाची बरीच मदत झाली. जागतिक दर्जाची संस्था कशी असावी याचा आयुका हा आदर्शच.

‘आयुका’ची जबाबदारी स्वीकारण्यासाठी १९८९ मध्ये त्यांनी पुण्यात स्थलांतर केले. त्यापूर्वी १९७२ ते १९८९ या काळात नारळीकर मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत होते. त्यांच्याबाबतचा गमतीशीर योगायोग म्हणजे डॉ. विष्णू नारळीकर आणि जयंत हे दोघेही टाटा यांच्या शिष्यवृत्तीने गौरवले गेले. पितापुत्रांनी तितकीच उच्च कोटीची गुणवत्ता दाखवल्याचे दुसरे उदाहरण विरळा. आयुका या खगोल विज्ञान संशोधन संस्थेत त्यांनी जागतिक कीर्तीच्या अनेक वैज्ञानिकांना बोलावून त्यांचा येथील संशोधकांशी आणि समाजाशी संवाद घडवून आणला. अलीकडच्या काळात लायगो प्रकल्पात गुरुत्वीय लहरींचा शोध लावण्यात यश आले; त्यात आयुकातील वैज्ञानिकांचाही मोठा वाटा होता. या कामगिरीचे श्रेय नारळीकरांनी केलेल्या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपातील उभारणीला होते. वैज्ञानिक हा कुशल संघटक व मार्गदर्शकही असू शकतो याचे हे उदाहरण. प्रज्ञा, प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचा संगम असलेले नारळीकर लेखक तर आहेतच पण उत्तम विज्ञान संवादकही आहेत. साध्या पोस्टकार्डावर प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर मिळवा, यासारख्या साध्या कल्पनेला मिळालेला प्रतिसाद त्यांच्या या संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारा होता. वास्तुशास्त्र, फलज्योतिष आणि अंधश्रद्धा यांच्यावर समाजात वाढत असलेला विश्वास ही त्यांना काळजी करण्यासारखी बाब वाटते, याचे कारण समाजाची विचार करण्याची शक्ती हळूहळू कमी होत असल्याचे हे निदर्शक असे ते मानतात. यामुळे ते खंतावतात. पण त्याविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहण्यापेक्षा विज्ञानसाक्षरता वाढवणे त्यांना अधिक महत्त्वाचे आणि दीर्घकालीन परिणामकारक वाटते. वैज्ञानिक कल्पना गोष्टीरूप सांगून वाचकांना विचारप्रवृत्त करायला लावणारे त्यांचे लेखन त्यामुळेच अधिक उपयोगी आणि महत्त्वाचे. विज्ञान हा आपला प्रांत नाही अशी सामान्य माणसांची समजूत पुसून टाकून दैनंदिन जीवनात पावलागणिक असणाऱ्या विज्ञानाचे मर्म समजावून घेण्याची सवय त्यांच्या लेखनातून निर्माण झाली. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी खगोलशास्त्रात संशोधन केले. ‘यक्षांची देणगी’पासून त्यांचा ग्रंथप्रवास सुरू झाला आणि वाचकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे मराठी साहित्यात विज्ञान हा विषय सहजपणे समाविष्ट झाला, समृद्ध झाला. या लेखनाची जगातील अनेक भाषांमध्ये झालेली भाषांतरे मराठी भाषेला सातासमुद्रापार नेणारी ठरली. दोन डझनांहून अधिक संख्येने असलेल्या त्यांच्या पुस्तकांमुळे मराठी मनांत विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले. परिणामी अशा विषयांवरील लेखनाला चालनाही मिळाली. नारळीकरांनी विज्ञान लेखनाच्या पायवाटेचा हमरस्ता कसा होईल यासाठी सतत प्रयत्न केले.

‘‘सोपे करून सांगता येत नसेल तर तो त्या विषयातील तज्ज्ञ नाही, त्यास तो विषय समजलेला नाही,’’ असे आइन्स्टाइन म्हणत. नारळीकर ज्या सहजतेने विज्ञानाची गूढ तत्त्वे आपल्या लिखाणातून सामान्यांना उलगडून दाखवतात ते पाहिल्यास त्यांना त्यांचा विषय किती समजला आहे, हे आपल्या लक्षात येते. मनोरंजनातून मौलिक ज्ञान ही महाराष्ट्राची आद्य परंपरा. ती आता खंडित झालेली दिसत असली तरी नारळीकर हे त्या परंपरेचे पाईक. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ असे सांगणाऱ्या साने गुरुजींच्या वचनातील मुले म्हणजे केवळ वयाने लहान बालके नाहीत; तर काही तरी शिकू पाहणारे सारे. आणि त्यातील प्रभु म्हणजेही कोणी आकाशस्थ अज्ञात शक्ती नव्हे तर मानवी प्रज्ञेस आवाहन करणारी प्रतिभा. नारळीकरांनी हे नाते जोडले. त्यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड हा बाळशास्त्री जांभेकरांपासूनच्या समृद्ध मराठी तर्कवादी परंपरेचाच गौरव. जयंतराव आणि त्यांच्यापेक्षाही गणित प्रसार आणि अध्यापनात कदाचित कांकणभर सरस मंगलाताई यांचे ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे याबद्दल अभीष्टचिंतन.