न्यायाच्या मार्गाने, अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने, गांधींच्या आधारे अन्यायाचा प्रतिकार करणारे जॉन लुईस हे अंतिमत: जनमनात घर करून राहिले..

कोणाच्या ‘अध्यात ना मध्यात’ न पडता जगण्याचा आग्रह लुईस यांच्या पालकांचा होता. तो त्यांनी कधीही मान्य केला नाही. अन्यांनीही तसे करू नये असेच त्यांचे सांगणे असे..

शरीरसुधारणेची साधना म्हणून व्यायाम हा दररोज नियमितपणे करावा लागतो. त्याप्रमाणे समाजसुधारणेचे प्रयत्नदेखील अव्याहत सुरू ठेवावे लागतात. त्यासाठी काहीएक मूल्यांच्या आधारे जगायचे असते आणि त्याची किंमत द्यायची तयारी असावी लागते. अशी वैयक्तिक शारीरिक, आर्थिक किंमत मोजून शब्दश: शेवटच्या क्षणापर्यंत अमेरिकेतील समाजसुधारणेसाठी झटलेली अलीकडच्या काळातील व्यक्ती म्हणजे जॉन लुईस. दोन दिवसांपूर्वी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची दखल आपण घ्यायला हवी याची अनेक कारणे. वर्णाच्या आधारे सामाजिक दुही वाढवणाऱ्या नृशंस ताकदींशी अहिंसेच्या तत्त्वाच्या आधारे लढणारा त्यांच्यातील ‘गांधी’ लुईस यांची नाळ भारताशी जोडतो. लुईस यांच्यावर अन्याय- अत्याचार करणारे विस्मृतीच्या पडद्याआड कधीच गेले. पण न्यायाच्या मार्गाने, अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने, गांधींच्या आधारे त्यांना सामोरे जाणारे लुईस हेच अंतिमत: अमेरिकी जनमनात घर करून राहिले. निधनसमयी ते ८० वर्षांचे होते.

वास्तविक ते इतके जगले कसे असा प्रश्न पडावा असे त्यांचे आयुष्य. अलाबामासारख्या मागास प्रदेशात शेतमजुराच्या घरातला त्यांचा जन्म. धर्म कोणताही असो दारिद्रय़ नेहमीच बहुप्रसवा असते. लुईस यांचे कुटुंबही तसेच. जॉन दहा भावंडांतील एक. अन्य आणि हा यांच्यातील फरक हा की त्यास शिक्षणाची आस होती आणि कृष्णवर्णीय असल्याने आपल्याला ते नाकारले जात आहे, याची खंत होती. त्या काळात अलाबामात स्वच्छतागृहेदेखील गोऱ्यांसाठी वेगळी असत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बसमध्ये एखादा गोरा असेल तर कृष्णवर्णीयास आपले आसन सोडून त्यास बसू द्यावे लागत असे. जॉन यांनी तसे करण्यास एकदा नकार दिला. तर त्यांना अमानुष मारहाण झाली. हे अमानुष मार खाणे पुढे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भागच झाले. एका आंदोलनात तर त्यांना पोलिसांनी कवटी फुटेपर्यंत मारहाण केली. ते वाचले कसे हेच आश्चर्य. अशा जात्याच बंडखोर तरुणाच्या आयुष्यात वयाच्या १८व्या वर्षी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) आल्याने या बंडखोरीस काहीएक दिशा मिळणार हे ओघाने आलेच.

जॉन यांनी स्थानिक विद्यापीठात शिक्षणासाठी अर्ज केला होता. पण कृष्णवर्णीय असल्याने त्यांच्या अर्जाची पोचदेखील दिली गेली नाही. त्या विद्यापीठापासून जवळच मार्टिन ल्यूथर किंग यांनी एक सत्याग्रह केला होता. त्याने प्रभावित झालेल्या जॉन यांनी आपली प्रवेशाची व्यथा किंग यांना कळवली. त्यावर किंग यांनी या तरुणास स्वखर्चाने भेटावयास बोलावले. ही १९५८ सालची घटना. तिने त्यांचे आयुष्य बदलले. पुढच्या आयुष्यात जॉन हे किंग यांचे उत्तराधिकारी, उजवे हात गणले गेले. किंग यांनी सदर विद्यापीठावर खटला भरण्याचा सल्ला लुईस यांना दिला. पण पालकांनी मोडता घातल्याने त्यांना हा खटला भरता आला नाही. त्याऐवजी त्यांनी महाविद्यालय बदलले आणि आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असताना मात्र चळवळीस विरोध करणाऱ्या पालकांचे काहीएक त्यांनी ऐकले नाही. ते विविध सत्याग्रहांत सहभागी होत गेले. तीन वर्षांनी लुईस अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून दक्षिणेकडे निघालेल्या कायदाभंग यात्रेत सहभागी झाले. त्या वेळी अमेरिकेत गोऱ्या आणि कृष्णवर्णीयांसाठी आंतरराज्य प्रवासाचे नियम वेगळे होते. अनेक राज्यांच्या सीमांवरून कृष्णवर्णीयांना माघारी धाडले जात असे. या प्रथेविरोधात लुईस आणि अन्यांची ही पदयात्रा होती. त्या वेळी माँटगोमेरी बसस्थानकात झालेली मारहाण अभूतपूर्व होती. तीत त्यांच्या शरीरातील अनेक हाडे मोडली.

पण लुईस आणि अन्य कृष्णवर्णीयांचा निर्धार अखंड होता. त्यातूनच लुईस सातत्याने कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढत राहिले. किंग यांच्यानंतरचा या लढय़ातील सर्वात तरुण, प्रभावी नेता अशी त्यांची ओळख त्या वेळी झाली. किंग यांच्याप्रमाणे लुईस यांना वक्तृत्वाचे वरदान नव्हते. पण त्यांची वेदना इतकी सच्ची होती की ती शैलीवर मात करीत असे. पुढचा त्यांचा लढा होता तो मतदानाच्या हक्कांसाठी. कृष्णवर्णीयांना त्या वेळी मतदानाचा हक्क नव्हता. त्या मागणीसाठी लुईस यांनी आणखी एक पदयात्रा योजली. १९६५ सालच्या मार्च महिन्यात निघालेल्या या पदयात्रेचा दिवस अमेरिकी समाजजीवनात ‘रक्तरंजित रविवार’ (ब्लडी संडे) म्हणून ओळखला जातो. या यात्रेत आपल्यावर पोलिसी हल्ला होणार याचा लुईस आणि संबंधितांना अंदाज होता. पण तरीही ते मागे हटले नाहीत. त्यांची ही यात्रा शहराच्या वेशीवर आल्यावर घोडय़ावर स्वार पोलिसांनी त्यांना माघारी जाण्याचा आदेश दिला. लुईस आणि सहकारी पुढेच जात राहिले. त्यानंतर अमेरिकी पोलिसांनी जो काही नृशंस नंगानाच घातला त्यास त्या देशाच्या इतिहासात तोड नाही. याच पोलिसी हल्ल्यात लुईस यांचे डोके फुटले. मेंदूची इजा थोडक्यात वाचली. ते बराच काळ स्वत:च्या शरीरातून वाहून गेलेल्या रक्ताच्या थारोळ्यात तसेच पडून होते. ‘‘माझ्या मरणाची त्या वेळी मला खात्री होती,’’ असे ते नंतर म्हणाले. पण ते वाचले. अमेरिकी प्रसारमाध्यमांनी गणवेशातील गुंडांच्या हिंसाचारास प्रचंड प्रसिद्धी दिली. त्यामुळे अमेरिकी जनमत ढवळून निघाले. महत्त्वाचा मुद्दा असा की अमेरिकी गौरवर्णीय मोठय़ा प्रमाणावर यामुळे लुईस यांच्या बाजूने उभे राहिले आणि या लढय़ाचा परिणाम असा की अवघ्या काही महिन्यांत तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी मतदान हक्कांतील गोरा-काळा भेदभाव नष्ट करणारा आदेश काढला.

त्यानंतरही लुईस थांबले नाहीत. त्यांनी मतदार प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आणि अनेक गरीब कृष्णवर्णीयांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली. अमेरिकी समाजाचे मोठेपण असे की अध्यक्ष जिम कार्टर यांनी लुईस यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांच्या हाती मतदार प्रशिक्षणाची सरकारी धुरा दिली. बराक हुसेन ओबामा हे लुईस यांच्या संघर्षांचे मधुर फळ. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात ओबामा यांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले. लुईस यांच्या अशा प्रवासाची परिणती राजकीय भूमिका घेण्यात होणे साहजिकच. हिंसा, वर्णविद्वेष, वाढता लष्करखर्च या अशा मुद्दय़ांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला. अमेरिकेने पश्चिम आशियात आणि अन्यत्रही छेडलेल्या अनेक युद्धमोहिमांचे ते कडवे टीकाकार होते. याच भूमिकेतून ते धाकटय़ा जॉर्ज बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीस गैरहजर राहिले. बुश यांची युद्धखोरी आणि ट्रम्प यांचे अनैतिक राजकारण त्यांना मंजूर नव्हते. ‘अमेरिकी काँग्रेसचा सदसद्विवेक-रक्षक’ असे त्यांचे रास्त वर्णन केले जात असे. त्यांच्या एका निवडणुकीत त्यांचाच बोलका, वक्तृत्वसंपन्न सहकारी त्यांच्या विरोधात होता. लुईस मतदारांना इतकेच विचारत : तुमचा प्रतिनिधी कसा हवा? बोलका की कर्ता? त्यानंतर लुईस गेली ३० वर्षे लोकप्रतिनिधी होत राहिले. इतक्या संघर्षांनंतरही त्यांचा आशावाद जिवंत कसा राहू शकला? ‘‘नैतिक संघर्षांची कमान मोठी आणि लांब असते. पण ती अंतिमत: न्यायाकडेच झुकते,’’ हे मार्टिन ल्यूथर यांचे वचन ते या प्रश्नावर ऐकवत.

‘‘आहे ते मान्य कर, परिस्थितीशरण जा आणि उगाच व्यवस्थेस आव्हान देण्याच्या फंदात पडू नकोस,’’ असे कोणाच्या ‘अध्यात ना मध्यात’ न पडता जगण्याचा आग्रह लुईस यांच्या पालकांचा होता. तो त्यांनी कधीही मान्य केला नाही. अन्यांनीही तसे करू नये असेच त्यांचे सांगणे असे. ‘‘गप्प राहू नका. आसपासच्या गोंगाटास घाबरून व्यक्त व्हायचे टाळू नका,’’  हा त्यांचा तरुणांना संदेश असे. आपले रामधारी सिंह ‘दिनकर’ म्हणून गेले त्याप्रमाणे ‘जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध’ या तत्त्वास जागून उच्च मूल्यांसाठी तटस्थतेचा आयुष्यभर तिरस्कार करत लढणाऱ्या जॉन लुईस यांना अभिवादन.