या राज्यातून गाढवे कमी व्हावीत हे किती उद्विग्न करणारे वास्तव. इतक्या वर्षांच्या सरकारी प्रयत्नांचे हेच का फळ?

आपल्या समाजात गाढवांची संख्या पुरेशी नाही. मग ती माध्यमे/ समाजमाध्यमे यांत इतकी कशी? खरे तर ती समाजमाध्यमांत तरी इतक्या प्रमाणात दिसता कामा नयेत. तथापि वास्तवात हे प्रमाण व्यस्त आढळते.

निवडणुकीच्या आणि दुष्काळाच्या काळात सर्वसाधारणपणे माणसांची मने घट्ट होतात. तरीही या बातमीने आमचे काळीज हेलावले. घात, अपघात, फसवणूक, आस्मानी आणि सुलतानी संकटे, शैक्षणिक गोंधळ आदी कोणत्याही वृत्ताने काहीही वाटून न घेणाऱ्या पत्रकारितेच्या पेशात या बातमीने सार्वत्रिक चुकचुकाट घुमला. ही बातमी आहे राज्यातील एकंदरच गाढवांच्या आटत्या संख्येविषयी. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर गाढवांचा तुटवडा जाणवत असून राज्य सरकारने तो भरून काढण्यासाठी पावले उचलली आहेत, हे ते वृत्त. इतके मोठे, श्रीमंत, संपन्न, पुरोगामी असे महाराष्ट्र राज्य. पण त्या राज्यात फक्त २९ हजार १३२ इतकीच गाढवे शिल्लक असावीत? हा! हंत! हंत! नलिनीं गज उज्जहार.. किंवा मराठीत प्रतिक्रिया (मुद्दा गाढवांचा असल्याने प्रतिक्रिया संस्कृतपेक्षा प्राकृतातच दिलेली बरी) द्यावयाची झाल्यास हेचि फल काय आपल्या तपाला.. असे म्हणावे लागेल.

या राज्यातून गाढवे कमी व्हावीत हे किती उद्विग्न करणारे वास्तव. इतक्या वर्षांच्या सरकारी प्रयत्नांचे हेच का फळ?  कोणत्याही सरकारची इच्छा असते गाढवांची जमात जास्तीत जास्त वाढावी हीच. सगळे प्रयत्न त्याच दिशेने असतात. तरीही गाढवांची कमतरता भासावी आणि वर त्याची बातमीही दिली जावी हा तसा शुद्ध गाढवपणाच. परिस्थिती इतकी गंभीर की सरकारी पशुसंवर्धन खात्यास त्याची दखल घ्यावी लागली. हे खाते शेतकऱ्यांसाठी, अल्पभूधारकांसाठी जगण्यात मदत म्हणून कोंबडीची पिल्ले, झालेच तर शेळ्यामेंढय़ा पालन वा वराहपालन आदी शिकवत असते. गाईम्हशींना बुळकांडय़ा वगैरे रोगाची लागण झाल्यास हे खाते चच्रेत येते. या खात्याचा प्राण्यांशी संबंध तसा इतकाच. पण आपली ही चौकट मोडून गाढवांच्या कमतरतेची दखल या खात्यास घ्यावी लागली हे निश्चितच देश बदल रहा है.. याचे निदर्शक. गाढवांची संख्या कमी होणे ही तशी काही साधीसुधी दुर्लक्ष करावी अशी बातमी नाही, हेदेखील यावरून कळून यावे. वाघांची संख्या कमी झाली, सिंह आपल्याकडे नाहीत, चित्ते तर आता फक्त चित्रांतच राहणार अशी परिस्थिती. पण म्हणून गाढवेदेखील नसावीत? काय म्हणायचे या कर्मास. एके काळी जरा शहरापलीकडे गेले की ऐसपैस पसरलेले उकिरडे आणि त्यात आपल्या नाकपुडय़ांतून फुर्रकार करून आत्मानंदी लागलेल्या टाळीत उकिरडा चिवडणारे बिनसोंडेचे हत्ती आणि गाढवे हमखास भेटत. स्वच्छ भारत करता करता हे उकिरडे नष्ट झाले म्हणावेत तर तसे नाही. ते आहेत. बिनसोंडेचे हत्तीदेखील मुबलक आहेत. नाहीत ती बिचारे गाढवे. काय झाले असावे असे बरे त्यांना?

गेल्या दशकभरात शहरांत मोठी स्थलांतरे झाली. तेव्हा गाढवेदेखील शहरांत मोठय़ा प्रमाणावर आली असावीत अशी अटकळ शहरांची अवस्था पाहता कोणीही बांधली असणे शक्य आहे. पण तसे झालेले नाही. म्हणजे ग्रामीण भागांचा उद्धार करून गाढवे शहरांत आली असे नाही. आपली खेडी होती तशीच आहेत. भग्न आणि बकाल. त्यामुळे त्यास कंटाळून गाढवांना शहरांत यावे असे वाटल्यास नवल नाही. पण शहरी भागांतही गाढवांची कमतरताच सरकारी पाहणी नोंदवते. खेडय़ांत नाही आणि शहरांतही नाही. मग या गाढवांचे झाले काय?

समाजात जे जे दिसते त्याचे प्रतिबिंब माध्यमे/ समाजमाध्यमांतही उमटते असे समाजशास्त्री सांगतात. पण गाढवांबाबत अपवाद असावा. आपल्या समाजात गाढवांची संख्या पुरेशी नाही. मग ती माध्यमे/ समाजमाध्यमे यांत इतकी कशी? समाजमाध्यमांचे तर बोलायलाच नको. खरे तर ती समाजमाध्यमांतही इतक्या प्रमाणात दिसता कामा नयेत. तथापि वास्तवात हे प्रमाण व्यस्त आढळते. हे असे का हा मोठाच प्रश्न. काही समाजशास्त्री याबाबतही लक्ष घालतील अशी आशा. हे झाले वस्तुस्थितीबाबत. पण ती मुळात निर्माणच का झाली?

सभ्यता हे खरे गाढवांचे व्यवच्छेदक लक्षण. सभ्य गृहस्थ ज्याप्रमाणे आपण बरे आणि आपले काम बरे या कालजयी मूल्यावर जगत असतो, तसेच गाढवांचे असते. आपल्या पाठीवर कुंभाराची मडकी आहेत की नदीतील चोरटी वाळू.. काही का असेना.. आपल्याला काय त्याचे? ओझी वाहायचे आपले काम मुकाट केलेले बरे, असे गाढवांचे वर्तन असते. कोणाच्या अध्यात ना मध्यात. कुत्र्याप्रमाणे उगाच कोणाचे लांगूलचालन नाही, मांजरांप्रमाणे लबाडपणा नाही, बलांचा मठ्ठमुर्दाडपणा नाही की गाईंची मराठी चित्रपटांतली सात्त्विकता नाही, घोडय़ांप्रमाणे चवचाल बडेजाव मिरवणे नाही, अस्वलांप्रमाणे अजागळपणा नाही, उंटांप्रमाणे बेशिस्त नाही, वाघसिंहांप्रमाणे मस्तवालपणा नाही, हत्तीप्रमाणे गतिमंदता नाही की कोल्ह्य़ांप्रमाणे आतल्या गाठीचे असणे नाही. गाढव म्हणजे मूर्तिमंत सभ्यता आणि ऋजुता. तथापि समाजातून एकंदरच सभ्यता कमी होऊ लागल्याचा परिणाम गाढवांवरही झाला असेल काय? शक्यता नाकारता येत नाही. जेथे सभ्य माणसांनाच कोणी कुत्रा विचारत नाही तेथे आपली काय पत्रास असे गाढवांना वाटले असल्यास त्यांना दोष देता येणार नाही.

कारणे काहीही असोत. गाढवांची कमतरता सर्वानीच गांभीर्याने घ्यायला हवी. वास्तविक समाजास मोठय़ा प्रमाणावर गाढवांची गरज असते. याची अनेक कारणे. गाढवे मुळात प्रश्न विचारत नाहीत. मुकाट कामे करतात. मालक कोणीही असो. आपली ओझी वाहण्यात ती कधीही हयगय करीत नाहीत. त्यांना नैतिकता सतावत नाही. पाठीवरचे सामान कमाईचे असो की लुटलेले. गाढवे तितक्याच निरपेक्षपणे ते ईप्सित स्थळी पोहोचवतात. तसेच तोंड वर करून त्यात काय आहे हे पाहायला जात नाहीत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’मधील काकाजींनी म्हणून ठेवले आहे त्याप्रमाणे गाढवे स्थितप्रज्ञ असतात. कचऱ्याचा कागद आणि आंब्याच्या कोयी-साली. गाढवे तितक्याच निर्गुण निराकार अशा भावनेने त्यांचा आस्वाद घेतात. त्यांची कश्शाविषयीही तक्रार नसते. अन्य प्राण्यास सांभाळायचे म्हणजे त्यांचे केवढे कवतिक. औषधे, प्रथिने, लशी वगैरे. गाढवांचे त्या तुलनेत काहीही करावे लागत नाही. कोणी हौसेने काही केलेच तर त्याचा त्यांना आनंद नसतो आणि कोणी काहीच विचारले नाही तरी त्याचे त्यांना दु:ख नसते. काहीही झाले तरी ते परिस्थितीबाबत तक्रार करीत नाहीत. तक्रारच नाही कोणाविषयी त्यामुळे त्यांच्याविषयी मानवी (की गर्दभ) हक्क आयोग, विशाखा समिती असे काही म्हणजे काहीच व्याप नाहीत. रस्त्यावरच्या कुत्र्यांविषयी अलीकडे पोलिसांत तक्रारी होतात. गाढवाविषयी, म्हणजे गाढवांवरील अत्याचारांविषयी, अशी काही कोणी तक्रार केल्याचे ऐकिवात नाही. श्वानकुलास भाद्रपदाची म्हणून एक आस असते. गाढवांचे त्याबाबतही काही म्हणणे नाही. कुत्र्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. तसे झाले की इतरांसाठी तो मोठाच उच्छाद. पण गाढवांबाबत तोही धोका नाही. भावनाच नाहीत. त्यामुळे त्या दुखावण्याचा धोका नाही. तसेच त्यामुळे पुढचे अब्रूनुकसानी, कज्जेदलाली वगैरे अशीही काही डोकेदुखीच नाही.

असा सर्वगुणसंपन्न जीव आपल्यातून कमी होत असेल तर ती निश्चितच काळजी वाढवणारी बाब ठरते. म्हणून गाढवांची प्रजा वाढावी यासाठी सर्व त्या प्रयत्नांची गरज आहे. देशातील अन्य काही राज्यांनी जागोजागी गोशाला उभारून गाईंना ज्याप्रमाणे संरक्षण दिले त्याप्रमाणे गाढवशाला उभारून या गर्दभांच्या रक्षणाचीदेखील सोय करायला हवी. या गाढवांच्या कमतरतेमुळेच अलीकडे लाथा झाडण्याची प्रथा माणसांत पसरू लागली आहे, हे सत्य आपण लक्षात घ्यायला हवे. गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर या लाथा झाडण्यात वाढच होण्याचा धोका संभवतो.