…गाण्यातून ‘सांगायचे’ काय, हे नेमके पोहोचवणाऱ्या आशाताईंनी स्वरांचे हे नाते जोडून सामान्यजनांच्या जगण्याला उभारी दिली…

प्रदीर्घ आणि समृद्ध अशा भारतीय सांगीतिक संस्कृतीचे अप्रूप जगातल्या अनेक संस्कृतींना आजही वाटते, याच्या अनेक कारणांमध्ये ‘आशा भोसले’ हेही एक महत्त्वाचे कारण आहे. संगीताच्या क्षेत्रात सुखी अपघात घडून येण्याला महत्त्व असते. आशा भोसले या कलावतीच्या बाबतीत असा सुखी अपघात घडून आला आणि हे जग एका आतुर, संवेदनशील, तरतरीत, टवटवीत, मधाळ आणि खट्याळ अशा स्वरांच्या मिठीत अलगदपणे जाऊन कधी विसावले, ते कळलेही नाही. त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा मानाचा सन्मान जाहीर झाला, तेव्हा त्यांच्या स्वरांच्या हिंदोळ्यावर गेली सात दशके आंदोलन घेत राहिलेले त्यांचे चाहते आणि दर्दी पुन्हा एकदा मोहरून गेले आहेत. या पुरस्कारासाठी त्यांचे अभिनंदन करत असताना, त्यांच्या आजवरच्या प्रदीर्घ आणि अतिशय रसरशीत अशा कारकीर्दीचे साक्षीदार असलेल्या कोट्यवधी मराठी रसिकांचे ऊर भरून येणे, ही अगदीच स्वाभाविक घटणारी घटना. सुरेल आवाजाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या या जगातील प्रत्येकाला ‘आशा भोसले’ का व्हायचे असते आणि का होता येत नाही, याचा शोध घ्यायचा झाला, तर त्याचे उत्तर त्यांच्या नवनिर्मितीच्या ध्यासात सापडेल. त्या गायला लागल्या, तेव्हा भारतीय चित्रपटाचे पार्श्वसंगीत चांगलेच बाळसे धरू लागले होते. शमशाद बेगम, गीता दत्त आणि थोरली बहीण लता मंगेशकर यांनी ललित संगीताचा सारा आसमंत व्यापून टाकला होता. अशात आपली नाममुद्रा तयार करून त्याचे सुवर्ण मोहरेत रूपांतर करण्यासाठी केवळ हिंमत असून चालणार नव्हते, तर त्याच्या बरोबरीने आपल्यातील सर्जनाची मशागत करण्याची तयारीही लागणार होती. आशाताईंकडे ती होती, म्हणूनच त्यांना प्रदीर्घ काळ आपल्या स्वरांची जादू पसरवता आली. आयुष्यात येणाऱ्या सुखदु:खाच्या अनेकविध घटनांमध्ये आशाताईंचा आश्वासक स्वर सगळ्या मराठीजनांना सतत जगण्याची प्रेरणा देत राहिला, जगणे शिकवत राहिला आणि हे जग किती सुंदर आहे, याची पुन:पुन्हा साक्ष देत राहिला.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ

संगीताला भाषा नसते, ते सातासमुद्रापार सहज पोहोचू शकते, हे खरेच. परंतु संगीताची निर्मिती ज्या मातीतून होते, त्या मातीशी त्याची असलेली नाळही सुटत नाही. आशाताईंनी ही नाळ अधिक दृढ केली आणि आपल्या सगळ्यांना एका स्वरसुंदर जगाची ओळख करून दिली. दिवसाच्या सगळ्या प्रहरांत त्यांच्या किती तरी गाण्यांनी प्रत्येकाला समृद्ध केले. मग ते लडिवाळपणे गायलेले ‘दादा मला एक वहिनी आण’ असो की ‘झुकझुक झुकझुक आगीन गाडी’ असो. ही गाणी घरातल्या प्रत्येक खोलीतल्या प्रत्येकाशी संवाद साधत होती. कुणाची बहीण, कुणाची सखी, कुणाची प्रियतमा, कुणासाठी झुरणारी विरहिणी, कुणाच्या देवघरातील मंदपणे तेवत राहणारी समईची ज्योत, तर कु णाबरोबर अल्लडपणे खेळणारी परकरी पोर. आशाताईंच्या स्वरांत हे सारे भाव अतिशय तरलपणे व्यक्त होतात आणि त्या स्वत:च ते गीत बनून जातात. हे असे गाण्यात पूर्ण विरघळून गेल्याशिवाय ‘नाच रे मोरा’तला मोर होता येत नाही आणि जिवाच्या आकांताने ‘जिवलगा…’ आठवणींतला व्याकूळ भाव पोहोचवता येत नाही. असे किती रंग आणि त्याच्या किती रंगीबेरंगी छटा! त्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा, तर ते गीत हृदयात झिरपायला हवे. ते आकळून यायला हवे. केवळ संगीतकाराने सांगितलेली स्वररचना त्याला हवी तशी गाऊन हे साध्य होणारे नाहीच, हे आजकालच्या दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांमुळे सहज कळू शकते. आशाताईंनी स्वररचना ‘जशाच्या तशा’ गायल्या नाहीत, त्याला जीव लावला. त्या रचनांना काय सांगायचे आहे आणि कसे, हे समजून घेतले. त्यात आपली प्रतिभा पुरेपूर ओतली, तेव्हा कुठे त्या रचनेतल्या भावाचे आणि अर्थाचे अनेक पदर ऐकू गेले. हेच त्यांच्या प्रत्येक हिंदी चित्रपट गीतात, गझलेत सहजपणे दिसते.

नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कलाकृतीसाठी देखणे कोंदण हवे असते. संगीत रचनाकारांसाठी तर अशी रेखीव महिरप अधिकच मोहाची. केवळ हार्मोनिअमवर चाल म्हणून दाखवायची आणि ती म्हणायला लावायची, अशा मार्गात काही तरी हातचे सुटून जाते. ते पकडून ठेवण्यासाठी गायक कलावंतालाही निर्मितीची ओढ असावी लागते. आशाताईंसाठी गाणी स्वरबद्ध करणारे एकजात सगळे संगीतकार एवढे नशीबवान की, त्यांच्या मनातले गाणे ओळखून गाऊ  शकणारी एक अपूर्व अशी कलावती त्यांच्या परिसरात होती. गीतांचे असे झळाळते सोने होताना पाहणे, ऐकणे यापरते दुसरे समाधान असूच शकत नाही. हे सारे संगीतकार म्हणूनच आशाताईंच्या ऋणात राहणे पसंत करतात. दत्ता डावजेकर ते श्रीधर फडके  असा संगीतकारांचा एक अतिशय विस्तीर्ण पट आशाताईंनी पाहिला आहे. त्या गातात तेव्हा त्या सुधीर फडके होतात आणि हृदयनाथ मंगेशकरही होतात. आवाजावर हुकमत अशी की, कोणत्याही गीताचे आव्हान लीलया पेलता येईल. त्यामुळेच पिताश्री मास्टर दीनानाथ यांच्यासारख्या पेचदार कलावंताने अजरामर करून ठेवलेल्या नाट्यसंगीताचाही मोह त्यांना आवरता येत नाही. ‘विलोपले मधु मीलनात या’, ‘शूरां मी वंदिले’, ‘चंद्रिका ही जणू’ यांसारख्या नाट्यपदांच्या वाटेला जाण्यासाठी आयुष्यभराची तालीमही कमी पडेल. मात्र आशाताईंनी हे आव्हान स्वीकारले. अभिजात संगीताचे रीतसर शिक्षण मिळणेही दुरापास्त असताना त्यांनी केलेले हे धाडस, त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवणारे.

जगण्याच्या स्पर्धेत कल्पनाही करता येणार नाही, अशा दु:स्वप्नांशी दोन हात करता करता, आशाताईंनी आपल्या जगण्याचा तोराच असा काही बदलला की, जीवनातील आर्तता, कारुण्य, भय, चिंता यांसारख्या भावनांवर विजय मिळवत बिनधास्त, क्वचित छचोर आणि अवखळ बनण्याचे सामथ्र्य हस्तगत केले. त्यामुळेच ‘रेशमांच्या रेघांनी’ या गाण्यातल्या त्यांच्या थिरकणाऱ्या स्वरांना जमिनीपासून उंच उडता येतं. ‘केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली’ या गीतातील कातर हुरहुर, ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ या गीतातील धगधगती ज्वानी, ‘मी मज हरपुन बसले ग’मधील शृंगार, ‘प्रभाते सूर नभी रंगती’ या गीतातील भक्ती, चांदणे शिंपण्यातला तोरा आणि वागेश्वरीला अभिवादन करतानाचा आर्ष भाव… जगण्याचे हे सारे रंग अतिशय उत्कटपणे जगण्याची त्यांची ऊर्मी त्यांच्या प्रत्येक गाण्यात पुरेपूर उतरलेली दिसते. म्हणून, असे जगता यायला हवे, या जाणिवेने ऐकणाऱ्या प्रत्येकालाही नवचैतन्याचा साक्षात्कार होतो. कष्ट, वेदना, दु:ख, क्लेश हे तर सगळ्यांच्याच वाट्याला येतात. त्याने विदीर्ण होता होता, त्याचेच सौंदर्यात रूपांतर करता येणे सगळ्यांनाच कसे जमेल? आशाताईंना मात्र ही अपूर्वाई शक्य झाली. त्यामुळे समस्त मराठी मनांना कैवल्याचा आनंद प्राप्त झाला आणि या विश्वातील दैन्य हरण करण्याची जिद्द निर्माण झाली. जगण्यातले सारे श्रेयस आणि प्रेयस ज्या स्वरांच्या मदतीने हृदयाशी घट्ट कवटाळता यावे, असा हा लावण्यमयी स्वर. प्रत्येक गाण्याचे असे अतीव सुंदर लेणे घडवणाऱ्या आशा भोसले यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण या सन्मानाने महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात तो आपलाच सत्कार आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. ‘लोकसत्ता’च्या वतीने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!