29 March 2020

News Flash

मूल्यांचे रक्षण

अखेर रक्ताचे नाते ते रक्ताचे नाते. त्यास काही पर्याय नाही. रक्त हे पाण्यापेक्षा दाट असते अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे ती काही खोटी नाही.

(संग्रहित छायाचित्र)

धाकटय़ाची तातडीची अडचण थोरल्याने दूर केली. जप्ती टळली, तुरुंगवासही टळला. संस्कृतिरक्षणही झाले..

धाकटय़ास तातडीची अडचण अवघ्या पाचसहाशे कोटी रुपयांची. यापेक्षा किती तरी मोठी रक्कम आपण ‘विविध कारणांसाठी’ खर्च करतो. पसा मिळवण्यासाठीही शेवटी पसाच खर्च करावा लागतो.. असा वडीलकीचा विचार थोरल्याने केला.

अखेर रक्ताचे नाते ते रक्ताचे नाते. त्यास काही पर्याय नाही. रक्त हे पाण्यापेक्षा दाट असते अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे ती काही खोटी नाही. रामायणात संपूर्ण राज्य हाती आल्यानंतरही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने राज्य केले त्यामागे नाते होते ते या रक्ताचेच. या रक्ताच्या नात्याचीच तर महती अमर अकबर अँथनी या महान भारतीय कलाकृतीने साऱ्या जगासमोर मांडली. एका आईची लहानपणी विलग झालेली आणि म्हणून तीन वेगळ्या धर्मीयांकडे वाढलेली तीन लेकरे एकाच वेळी तीन खाटांवरून आपल्या मातेस रक्त देतात हे दृश्य पाहून डोळे पाणवले नसेल असा भारतीय गृहस्थ विरळाच. या तीन लेकरांचे वांड अवस्थेत एकमेकांशी मतभेद झालेले असतात, त्यांनी तरी कोणाला बुकलले असते किंवा ते तरी कोणाकडून बुकलले गेले असतात पण रक्ताच्या नात्याचा घट्टपणा इतका की शेवटी या नात्याचे बंध त्यांना अलगदपणे मातोश्रींच्या रुग्णशय्येपाशी घेऊन येतात आणि ही तीनही लेकरे आपल्या मातेस एकाच वेळी रक्तदान करतात. बंधुभाव दर्शनाचे याइतके उत्कट उदाहरण अन्य कोणते असेल बरे? ते झाले मनोरंजन क्षेत्रात आणि तसे खोटेखोटेच. परंतु त्याइतके भव्य, डोळे दिपवणारे खरेखुरे बंधुप्रेम समस्त भारतीयांना पाहावयाचे असेल तर यापुढे मनोरंजन क्षेत्राचा आधार घ्यावयाची गरज नाही. जगातील सगळ्या धनाढय़ांत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या, महानगरी मुंबईत दोन डझनांपेक्षाही अधिक मजली घरांत आपल्या पंचकोनी कुटुंबासह (पंचकोनीच. कन्येच्या विवाहामुळे एका कोनाची वजाबाकी झाली असेल हे खरे. पण या काळात एका चिरंजीवाचे हात दोनाचे चार झाले. त्यामुळे कुटुंब पुन्हा पाच कोनी झाले असणार. असो.) सुखासमाधानाने नांदणाऱ्या उद्योगशिरोमणीची कृती आता यापुढे बंधुप्रेमाच्या उदात्त उदाहरणासाठी इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदली जाईल. भारतीय उद्योग क्षेत्रास तसेच सरकारदरबारातही वंदनीय असलेल्या कुटुंबीयातील धाकटय़ाच्या आणि थोरल्याच्या भरतप्रेमाची ही कहाणी वाचून प्रत्येक भारतीयाचा ऊर आनंदाने भरूनच येईल.

या दोन बंधूंतील धाकटे हे कोणत्याही कुटुंबातील शेंडेफळाप्रमाणे तसे अवखळच. अनेक उद्योगांत पडण्याची त्यांना भारी हौस. उद्योगमहर्षी तीर्थरूपाचेच रक्त धमन्यांतून वाहत असल्याने धाकटय़ाचे उद्योगप्रेम नैसर्गिकच नव्हे काय? कोणत्याही कुटुंबातील धाकटय़ाचे वेडेवाकडे चाळे पालक असतात तोपर्यंत ते सहन करतात. या कुटुंबीयांच्या दुर्दैवाने तीर्थरूप स्वर्गवासी झाले आणि हिशेबी वृत्तीच्या थोरल्याने आपला व्यवसाय अधिकाधिक वाढवत नेला. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये, असे का म्हणतात याचा प्रत्यय तीर्थरूपांच्या निधनानंतर धाकटय़ास आला असणार. उभय बंधूंत वाटणी झाली आणि अधिक चांगले उद्योग थोरल्याच्या पदरात पडले. म्हणजे उद्योगांच्या वाटण्यांतही थोरला हा थोरला ठरला. बिचारा धाकटा. त्यास मिळेल त्यात समाधान मानावे लागले. पण अमर अकबर अँथनी काढणाऱ्या मनमोहन देसाई यांनाही खुणावेल असा या वाटण्यांतील योगायोग म्हणजे धाकटय़ाच्या वाटय़ास गेलेल्या उद्योगात थोरल्यास रस होता आणि थोरल्याला मिळालेले उद्योग आपण चालवावेत असे धाकटय़ास वाटत होते. ही नियतीची लीलाच म्हणायची. थोरल्याचा जीव दूरसंचार उद्योगात गुंतलेला आणि तो उद्योग तर धाकटय़ाच्या वाटय़ास गेलेला. पण वाटणी तर झालेली.

मग थोरल्याने आपल्या अंगभूत हुशारीने स्वतच दूरसंचार उद्योग सुरू केला. धाकटा दुखी झाला. दोघांतील दुरावा अधिकच वाढला. मातेने समेटाचा प्रयत्न करून पाहिला. पण त्यात काही यश आले नाही. पतपेढी क्षेत्रांतील उपकृतांनीही मध्यस्थीसाठी प्रयत्न केले. त्यांनाही यश आले नाही. शेवटी दोघे भाऊ दोन मार्गानीच गेले. धाकटय़ाने थोरल्याचा उद्योगवारू रोखता यावा यासाठी नियामकांशी हातमिळवणी करून पाहिली. लोकप्रतिनिधिगृहात स्वत: स्थान मिळवले. एरवी जे लोकप्रतिनिधी आपल्या तालावर नाचताना पाहावयाची सवय होती त्या लोकप्रतिनिधींत स्वत: जाऊन बसला. म्हणजे जे अंगणात गोवऱ्या वेचावयास येत त्यांच्या हाती फुले द्यावयाची वेळ आली. सर्व उपाय झाले. अंगारे-धुपारेदेखील झाले. पण थोरल्याचा वारू काही आवरता येईना. प्रतिशोधाची भावना बुद्धिवानांसही निर्बुद्ध वागावयास लावते. आणि येथे तर धाकटा बुद्धिवानही आणि उद्योगीदेखील. त्यामुळे आपल्या मोठय़ा भावास मागे टाकण्याची त्याची ईर्षां अधिकच बळावली. पण त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी त्यास तोटाच झाला. कारण उद्योग तोटय़ात येत गेले. बघता बघता डोक्यावरचे ऋण वाढू लागले. हे कमी म्हणून की काय देशातील सर्वोच्च न्यायपालिकेनेदेखील देणी देण्याविषयी दट्टय़ा दिला. एरवी जे मुजरा करण्यासाठी रांगा लावत ते आता पाहून न पाहिल्यासारखे करू लागले. प्रसंग मोठा बिकट म्हणायचा. तोंड लपवायलाही जागा उरली नाही. देणे दिले नाही तर तुरुंगात टाकू अशी सर्वोच्च न्यायालयाची तंबी. त्या मुदतीची घटकापळे जवळ आली. पण पसा काही उभा राहिला नाही. इतक्या दिवसांचा अनुभव असा की बँकांचे प्रमुख आमच्याकडून कर्जे घ्या म्हणून मागे लागत. पण म्हणतात ना घर फिरले की घराचे वासेही फिरतात. धाकटय़ाचे तसे झाले. मदत तरी मागणार कोणाकडे? थोरल्याशी भांडण झालेले. कज्जेदलाली घडलेली. एकमेकांच्या नावे बोटे मोडलेली. काय करावे बरे अशा वेळी?

ते नेमके थोरल्याने केले. उदात्त भारतीय संस्कृतीचा तितकाच उदात्त पाईक असलेल्या थोरल्याचे हृदय भावाचे हाल पाहून द्रवले. कितीही, काहीही झाले तरी तो आपला भाऊ. लहानपणी चाळीच्या गॅलरीत त्याच्याच बरोबर आपण लपाछपी खेळलेलो. असेल तो व्रात्य. घसरला असेल त्याचा पाय. पण म्हणून इतके का कठोर होते कोणी? तीर्थरूप असते तर त्यांनी नसती का केली मदत? नाही तरी ज्येष्ठास वडीलबंधू असेच संबोधतात आपल्या संस्कृतीत. तेव्हा वडीलकीची कर्तव्ये नकोत का पार पाडायला? देशाचा सर्वोच्च सत्ताधीश आपल्या धाकटय़ास काही ना काही कामे देऊन कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना आपण आपल्याच बंधूंचे हाल हातावर हात ठेवून पाहत बसणे योग्य नाही, असे थोरल्याच्या मनाने घेतले. आणि मुळात फिकीर करायची तर कशाची? धाकटय़ास तातडीची अडचण आहे ती अवघ्या पाच-सहाशे कोटी रुपयांची. तिची काय मातबरी. यापेक्षा किती तरी मोठी रक्कम आपण ‘विविध कारणांसाठी’ खर्च करतो. पसा मिळवण्यासाठीही शेवटी पसाच खर्च करावा लागतो. तेव्हा भावासाठी आपण इतकेही करू नये? इतक्या छोटय़ा रकमेसाठी आपल्या कुटुंबाची इज्जत मातीत मिळू द्यायची? छे छे हे काही योग्य नाही. इतकी किरकोळ रक्कम तर आपल्या चालकाच्या खिशांतदेखील असेल, त्यासाठी बँकेतसुद्धा जायची गरज नाही, असे त्याच्या मनाने घेतले. बस्स ठरले तर मग, थोरला मनातल्या मनात म्हणाला. त्याने अडगळीच्या खोलीतल्या संदुका उघडल्या आणि जी काही रक्कम हाताला लागली ती धाकटय़ाच्या हाती टेकवली.

धाकटा खूश झाला. जप्ती टळली. तुरुंगवास टळला. त्याने थोरल्याचे आणि वहिनीचे जाहीर आभार मानले. ‘आपल्या कौटुंबिक मूल्यांचे रक्षण’ केल्याबद्दल आपण थोरल्याचे ऋणी राहू असे धाकटय़ाने चारचौघांत सांगितले. अशा तऱ्हेने सर्वच खूश झाले आणि संस्कृतीचेही रक्षण झाले. असे मूल्यांचे आणि संस्कृतीचे रक्षणकत्रे आपल्या देशात असल्याने नागरिकही आनंदले आणि साठा उत्तराची ही बंधुसंघर्षांची कहाणी बंधुप्रेमात परिपूर्ण झाली. आता ही नवी मूल्यसंस्कृती घराघरांत रुजावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे म्हणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2019 12:36 am

Web Title: editorial on mukesh ambani helps brother anil reliance communications paid rs 550 crore
Next Stories
1 सहज सज्जन
2 सम्राटांचे दारिद्रय़
3 कितीही का पडेनात..
Just Now!
X