काळजी घेणे म्हणजे विवेकास रजा देणे नव्हे. ती आपण सद्य:स्थितीत सामुदायिकपणे देत आहोत किंवा काय हे तपासण्याचे काम वर्तमानपत्रांचे!

आज बहुतकरून अनेकांची वर्तमानपत्राशी शारीर भेट झाली असेल. पहिले आणि दुसरे महायुद्ध, भारत-पाकिस्तान, भारत-चीन युद्ध, असंख्य दंगेधोपे, पूर/अवर्षणादी संकटे, आणीबाणी अशा कोणत्याही अस्मानी वा सुलतानी आव्हानास जे जमले नाही ते शौर्यकृत्य एका अदृश्य विषाणूने करून दाखवले. ते म्हणजे वर्तमानपत्र बंद करणे. आतापर्यंत कधीही करावी न लागलेली कृती गेल्या काही दिवसांत जवळपास साऱ्या देशाने अनुभवली. या काळात वर्तमानपत्रांचे वितरण झाले नाही. याचा अर्थ वर्तमानपत्रे आणि तत्संबंधी कर्मचारी या काळात साथसोवळे पाळत होतेच; पण ते घरोघर बसून होते असे नाही. ते बहुतांशपणे आपली नमित्तिक कर्तव्ये करीत होते. तरीही आपल्या हाती वर्तमानपत्रे पोहोचू शकली नाहीत.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

त्यामागचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे वर्तमानपत्रांचे वितरक आणि ती घरोघर पोहोचती करणारे कर्मचारी यांच्यावरील संकटाचे सावट. करोना नामक विषाणू हा संपर्कातून पसरतो आणि जगात त्याने उत्पात घडवलेला आहे. सबब आपणही हा संपर्क टाळला नाही तर आपणासही या उत्पातास सामोरे जावे लागेल या त्रिकोणातून या आजाराबाबत अनामिक भीती तयार झाली. निर्बुद्ध शौर्यापेक्षा सुबुद्ध भीतीच्या पोटातून येणारी खबरदारी केव्हाही स्वागतार्ह. या खबरदारीचा भाग म्हणून वर्तमानपत्राचे वितरणच नको अशी भूमिका अनेकांनी घेतली. परिणामी वर्तमानपत्राचे वितरण थांबले. पण वर्तमानपत्रे थांबली होती असे नाही. ती नव्या माध्यमात सुरू होती आणि त्याच माध्यमातून त्याचे ‘वितरण’देखील सुरू होते. दरम्यानच्या काळात वर्तमानपत्राद्वारे विषाणू प्रसार होत नाही, याची खातरजमा झाल्याने त्यांचे कागदी स्वरूपातील वितरण बुधवारपासून सुरू होत आहे. खंडानंतरच्या पहिल्या दिवसापासून ते लगेच पूर्ववत होईल अशी अपेक्षा नाही. पण ते लवकरच पूर्वपदावर येईल, ही खात्री मात्र निश्चित आहे. वर्तमानपत्रांद्वारे एकच ‘विषाणू’ पसरतो. तो म्हणजे विचार.

म्हणूनच वर्तमानपत्रांचे वितरण थांबणे याचा अर्थ समाजातील वैचारिक घुसळण थांबणे. वस्तुत: केवळ वृत्तप्रसार हाच उद्देश असता तर त्यासाठी वर्तमानपत्रांपेक्षा किती तरी अधिक सशक्त आणि सुदृढ माध्यमे आहेत. त्यांची कार्यक्षमता सर्वार्थाने वादातीत. वर्तमानपत्रांची त्यांच्याशी स्पर्धा नाही. पण इतकी वेगवान माध्यमे असतानाही विविध रूपांतील वर्तमानपत्रांची गरज लागते. भौतिक जगात कितीही आलिशान, वेगवान, श्रीमंती मोटारी दिवसागणिक येत असल्या तरी शेती करण्यासाठी वा निरोगी रस्तानिर्मितीसाठी त्याचा उपयोग नसतो. त्यासाठी कंटाळवाणा ट्रॅक्टर आणि गजगतीने जाणारा रोड रोलरच लागतो. फटाकडय़ा आणि चुणचुणीत मोटारी त्या कामी निरुपयोगी. तद्वत समाजाची वैचारिक मशागत करावयाची असेल तर आणि विचारभिन्नतेतून तयार होणारा सोशीक सहिष्णुतेचा मार्ग आधी तयार करून नंतर रुंदावायचा असेल तर त्यासाठी वर्तमानपत्रेच हवीत. अन्यांच्या तुलनेत हे माध्यम कष्टप्रद आहे, हे मान्य. म्हणजे अन्य माध्यमे मनास येईल तेव्हा जनरंजन करू शकतात. वर्तमानपत्रास काळ-काम-वेग यांच्या मर्यादा आहेत. पण या मर्यादा हेच त्यांचे सामर्थ्यदेखील. पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’तील काकाजी म्हणतात त्याप्रमाणे ‘‘ताजमहाल पहावयाचा असेल तर आग्ऱ्यास जावे लागते, तुमच्या दाराशी नाचतमुरडत येतात ते मुहर्रमचे डोले.’’ तेव्हा आठवडाभराच्या  या अनुपस्थितीने शहाण्यांच्या मनात वर्तमानपत्रांचे महत्त्व अधोरेखित केले असणार ही खात्री आहे.

करोना ही एक काही अशा प्रकारची आलेली पहिलीच साथ नव्हे आणि शेवटची तर नव्हेच नव्हे. या आजारात सध्या जितक्यांचे प्राण जातात त्यापेक्षा अधिक सरासरी बालके दरिद्री आफ्रिका खंडात वा आशियाई देशांत क्षय वा उपासमारीने मरतात. मुंबईत लोकलखाली आल्याने वा तीमधून पडल्याने सरासरी दहा जण दररोज प्राणास मुकतात. आपल्या देशात केवळ महामार्गावरील अपघातांत दरवर्षी मरणाऱ्यांची संख्या एक लाख इतकी प्रचंड आहे. त्यांच्याविषयी समाजाने अशी घाऊक पथ्ये पाळल्याचा इतिहास नाही. ते तितके फॅशनेबल नसावे. अर्थात म्हणून या नव्या साथीविषयी काळजी घेऊ नये असे अजिबात नाही. पण काळजी घेणे म्हणजे विवेकास रजा देणे नव्हे. ती आपण सद्य:स्थितीत सामुदायिकपणे देत आहोत किंवा काय हे तपासण्याची गरज आहे. अशा तपासणीचे काम वर्तमानपत्रे करीत असतात. निदान त्यांनी ते करणे अपेक्षित आहे. ते कसे याचे सर्वोत्कृष्ट स्पष्टीकरण गोपाळ गणेश आगरकर ‘सुधारक काढण्याचा हेतु’ या लेखात देतात. ‘‘जगत्कारणाच्या तोंडातून, हातातून, मांडीतून व पायातून एकेक वर्ण निघाला अशी ज्यांची वर्णोत्पत्तीविषयी कल्पना.. अशा कोटय़वधी विचारशून्य मनुष्यांनी आपल्या अडाणी समजुतीप्रमाणे चांगले म्हटले, वाईट म्हटले, अविचारी व हेकट व्यक्तींनी नाके मुरडली किंवा तिरस्कार केला तरी ज्यास लोककल्याणाची खरी कळकळ आहे, सत्य बोलणे वा सत्यास धरून चालणे यातच ज्याचे समाधान आहे अशाने वरच्यासारख्या क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला किंवा उपहास्यतेला यित्कचितही न भिता आपल्या मनास योग्य वाटेल ते लिहावे व सांगावे हेच उचित होय,’’ असे आगरकर लिहितात. अशी सुधारणा घडण्यासाठी प्रयत्न करणे हे वर्तमानपत्राचे जीवितकार्य.

त्यांच्या प्रसारास आडकाठी आणून तेच नेमके सद्य:स्थितीत हाणून पाडले जाताना दिसते. वर उल्लेखिल्याप्रमाणे एक विचारजंतू सोडल्यास वर्तमानपत्राच्या माध्यमातून आरोग्यास अपायकारक असे काही प्रसारित होत नाही. तथापि विचार करणे हेच अनेकांसाठी आरोग्यास अपायकारक वाटत असेल तर ती बाब अलाहिदा. अशा वेळी समाजातील बुद्धिजीवींनी एकत्र येणे आवश्यक असते. वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे होते. बुद्धिजीवी संघटित नसतात. त्यांच्याकडून समाजाच्या सामूहिक विचारशक्तीस दिशा देण्याचे काम होते. इतिहासात हे काम वर्तमानपत्रांनी केले आणि वर्तमानातही ते सुरू आहे.

‘‘लोकांच्या समजुतीने सर्व काही केले जाईल अशा प्रकारची व्यवस्था झाली म्हणजे मग कोणाचीही कुरकुर राहणार नाही. अद्यापपर्यंत कोणावरही जुलूम झालेला नाही, हे खरे आहे व परवा जे हजारो लोक मिळेल त्या गाडीत बसून गाव सोडून गेले ते अगदी मूर्खपणाने गेले असे म्हणणे भाग येते,’’ हे बाळ गंगाधर टिळक यांच्या ‘सांथीच्या तापाचा प्रसार बंद करण्याकरता नवी योजना’ या शीर्षकाने ९ मार्च १८९७ या दिवशी प्रकाशित झालेल्या लेखातील विधान. आजही वर्तमानपत्रे हा विषय उपस्थित करीत आहेत आणि त्यांच्यावर अशी वेळ का आली असा प्रश्न विचारीत आहेत. पुण्यातील प्लेगची आणि मुंबईतील तापाची साथ यावर त्या वेळी बळवंतरावांनी किमान १५ अग्रलेख/लेख लिहिले. त्या वेळी अन्य माध्यमे नव्हती हे मान्य. पण असती तरी बाळ गंगाधरांचे संपादकीय त्यास पुरून उरले असते.

ही ताकद जशी आणि जितकी टिळकांची तशीच ती वर्तमानपत्र या माध्यमाची. बाळ गंगाधर वा आगरकर हे नव्या माध्यमांतून तयार होऊ शकत नाहीत. त्यास वर्तमानपत्रच लागते. याचा अर्थ इतकाच की जास्तीत जास्त विचारोत्सुकांनी वर्तमानपत्रांचे स्वागत करावे. त्यासाठी त्या वर्तमानपत्राचे विचार पटायलाच हवेत असे नाही. विचारभिन्नता व्यक्त करण्यासाठी तरी विचार समजून घ्यावे लागतात. त्यासाठी वर्तमानपत्र हवे. त्याचे मुद्रण आणि वितरण आज काही प्रमाणात का असेना सुरू होत आहे. त्याचे वर्णन करण्यास ‘पुनश्च हरि ॐ’ याखेरीज अन्य कोणती शब्दयोजना समर्पक असू शकते? इच्छा इतकीच की ‘पुनश्च हरि ॐ’ असे पुन्हा कधी म्हणण्याचा प्रसंग वर्तमानपत्रांवर येऊ नये. तसे न होणे आपल्यासारख्या विचारी वाचकांहातीच.