News Flash

सिंधुरत्न

प्रत्येक एशियाड व राष्ट्रकुल स्पर्धेत भारत अधिकाधिक पदके जिंकत आहे. हे कोणत्याही घोषित अभियानातून घडून आलेले नाही..

(संग्रहित छायाचित्र)

ना उद्योगविश्वाचे मोठे पाठबळ ना सरकारी पाठिंबा.. तरीही वैयक्तिक खेळांत जगज्जेतेपदांवर भारतीय नाव कोरताहेत; याचे श्रेय कुटुंबांना द्यावे काय?

प्रत्येक एशियाड व राष्ट्रकुल स्पर्धेत भारत अधिकाधिक पदके जिंकत आहे. हे कोणत्याही घोषित अभियानातून घडून आलेले नाही.. सिंधूसारखी क्रीडारत्ने या मातीत वर्षांनुवर्षे निर्माण होताहेत. ती हुडकून काढण्याकामी संस्थात्मक पुढाकार हवा आहे..

क्रिकेटवेडय़ा भारतामध्ये हॉकी वगळता फार थोडय़ा खेळांमध्ये जगज्जेते निर्माण झालेले दिसून येतात. क्रिकेट आणि हॉकीला बरीच वर्षे जनाधार आणि राज्याधार मिळालेला आहे. आज क्रिकेटला बरकत आहे नि हॉकी मरणासन्न झाले आहे, ते पूर्णपणे भिन्न कारणांसाठी. परंतु जनाधार, राज्याधार किंवा उद्योगविश्वाचे कोणतेही पाठबळ न मिळता काही मोजक्या खेळांमध्ये भारतीय मौलिक कामगिरी करून दाखवतात, तेव्हा त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. पी. व्ही. सिंधूने रविवारी बॅडमिंटनमध्ये मिळवलेले जागतिक अजिंक्यपद या पार्श्वभूमीवर पारखावे लागेल. पुन्हा क्रिकेट किंवा हॉकी हे सांघिक खेळ. याउलट बॅडमिंटन, टेनिस किंवा बुद्धिबळ अशा खेळांमध्ये वैयक्तिक गुणवत्तेचा, जिद्दीचा, महत्त्वाकांक्षेचा, चिकाटीचा कस लागतो. त्यामुळेच १९८०च्या दशकात जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रकाश पडुकोणने जिंकलेले कांस्यपदकही मोलाचे ठरते. आईकडून बुद्धिबळाचे बाळकडू मिळाल्यानंतर, फिलिपिन्समध्ये राहूनही त्या खेळातील गोडीचे विजयात रूपांतर करणारा विश्वनाथन आनंद हा भारतीय क्रीडाक्षेत्राचा खरा नायक ठरतो. आनंद आणि सिंधूने अनुक्रमे बुद्धिबळ आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये दुर्मीळ जगज्जेतेपद पटकावले. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पियाडमध्ये अभिनव बिंद्राने यजमान चिनी प्रतिस्पर्ध्याचा प्रतिकार मोडून काढत सुवर्णपदक जिंकले. अशी वैयक्तिक अजिंक्यपदे भारतात अति दुर्मीळ ठरतात. सव्वा अब्जांच्या देशात एकटय़ा-दुकटय़ा अजिंक्यपदाचे मोल नि कौतुक ते काय, असा प्रश्न विचारणारेही याच भूमीत हजारोंनी सापडतात. पण म्हणजे अजिंक्यपदाची शक्यता एक अब्जांश असतानाही तिला तुच्छ लेखणे हाच पराकोटीचा करंटेपणा नव्हे काय? असा करंटेपणा भारतात निपजतो याची कारणे दोन. एक म्हणजे भारत हा क्रिकेटवेडय़ांचा देश असला, तरी क्रीडाप्रेमींचा देश नाही. आणि दुसरे म्हणजे, क्रिकेटेतर खेळांमध्ये आपल्याकडे जगज्जेते निर्माण होऊ शकतात, या शक्यतेवर आपला विश्वास नाही. त्यावर अधिक भाष्य करण्यापूर्वी प्रथम सिंधूच्या अभूतपूर्व कामगिरीचा धांडोळा घेणे यथोचित ठरेल.

स्वित्झर्लंडमधील बासेल शहरात रविवारी पार पडलेला महिला एकेरीचा अंतिम सामना भलताच एकतर्फी ठरला. सिंधूने अंतिम लढतीत जपानच्या नोझुमी ओकुहाराचा अवघ्या ३८ मिनिटांत आणि केवळ १४ गुण गमावून ज्या प्रकारे फडशा पाडला, तो अभूतपूर्वच होता. सिंधूने अतिशय ताकदीने फटके लगावत विलक्षण आक्रमक खेळ केला. ओकुहारा ही साधारण प्रतिस्पर्धी नाही. दोन वर्षांपूर्वी तिने याच स्पर्धेत अत्यंत प्रदीर्घ अंतिम लढतीत सिंधूच्या हातातोंडाशी आलेले जगज्जेतेपद हिरावून नेले होते. तो धक्का पचवणे सोपे नव्हते. गेल्या वर्षी पुन्हा एकदा सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण त्या वेळी स्पेनच्या कॅरोलिना मारिनने तिचे स्वप्न फोल ठरवले. यंदा तिसऱ्यांदा जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळताना कदाचित तिच्या मनात त्या पराभवांनी कल्लोळ केला असेल. सिंधू उत्तम खेळते, पण मोक्याच्या सामन्यांमध्ये तिचा धीर खचतो असे तिच्याविषयी बोलले जाऊ लागले होतेच. कदाचित या सर्व टीकाकारांचा कर्कश कोलाहल कायमचा बंद करण्याच्या जिद्दीने सिंधू रविवारी उतरली होती. टीकाकारांचा राग जणू तिने प्रतिस्पर्ध्यावर काढला आणि ओकुहाराच्या प्रतिकाराची खांडोळी केली. २०१३ मध्ये ग्वांगजो येथे जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्यानंतर जवळपास प्रत्येक वर्षी सिंधूने कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धेत एखादे पदक तरी जिंकलेलेच आहे. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूला सुवर्णपदकाच्या लढतीत स्पेनच्या मारिनकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग दोन वर्षे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर तिच्या मानसिक कणखरपणाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या. खरे तर त्या निराधार होत्या. कारण बहुतेक स्पर्धामध्ये सिंधूच्या प्रतिस्पर्धी तिच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठय़ा होत्या. सातत्याने मोठय़ा स्पर्धामध्ये किमान कांस्यपदकापर्यंत धडक मारणाऱ्या खेळाडूविषयी अशी टीका खेळाविषयीच्या अज्ञानातूनच होऊ शकते. क्रिकेटमध्ये इनमिन दहा देशांकडून स्पर्धेची सवय असणाऱ्यांना जागतिक खेळांतील वैयक्तिक प्रकारांमध्ये किती वैविध्यपूर्ण प्रतिस्पर्धी समोर येऊ शकतात याची फारशी कल्पना नसतेच. अशा क्रीडाप्रेमींचा आणि विश्लेषकांचा बौद्धिक पस फार व्यापक नसतो. खेदाची बाब ही की, भारतासारख्या देशात अशी मंडळीच जनमत तयार करण्यात आघाडीवर असतात. सिंधूच्या बाबतीत केव्हा ना केव्हा ती जागतिक अजिंक्यपद पटकावणार अशी खात्री तिचे पूर्वीचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि सध्याचे प्रशिक्षक विमलकुमार यांना होती. २०२० मध्ये टोक्योत ती ऑलिम्पिक सुवर्णपदकही जिंकू शकते. अशा कामगिरीसाठी आत्मविश्वास दृढ होण्याचे दृष्टीने परवाचे जगज्जेतेपद महत्त्वाचे ठरते.

प्रकाश पडुकोण, पुलेला गोपीचंद, विश्वनाथन आनंद, लिअँडर पेस, अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांचा उदय कशामुळे झाला? यांच्यामागे कोणाची प्रेरणा होती? कारण रूढार्थाने त्यांच्याआधी त्या-त्या खेळांमध्ये भारताने जागतिक स्तरावर विजेते पाहिलेले नव्हते. सरकारी किंवा कॉर्पोरेट पाठबळाशिवाय या मंडळींनी इतकी प्रगती कशी काय साधली? याचे थेट उत्तर देता येत नसले, तरी काही धागे सापडतात. कुटुंबाचे पाठबळ हे कित्येकदा सरकारी किंवा सामाजिक पाठबळापेक्षा मोठे ठरते. भारतात कुटुंबांची ही वीण आजही घट्ट आहे. क्रिकेटने भारतीय समाजमनावर गारूड केलेले असले, तरी गेली काही वर्षे आपल्या मुलीने किंवा मुलाने वेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवावे, यासाठी कित्येक पालकांनी त्या वेळी स्वत:च्या आकांक्षांना मुरड घातली. आज हे प्रमाण किती तरी अधिक पटींनी वाढलेले दिसते. बॅडमिंटनचे वेड हे विशेषत: पुणे आणि ठाण्यात होते. हैदराबाद आणि बेंगळूरुमध्ये त्याला योग्य दिशा मिळाली. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्रात आजही बुद्धिबळाच्या स्पर्धा मोठय़ा संख्येने होत असतात. १९९६ पासून एकाही ऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची पाटी कोरी राहिलेली नाही. प्रत्येक एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारत अधिकाधिक पदके जिंकत आहे. हे कोणत्याही घोषित क्रांतीतून किंवा अभियानातून घडून आलेले नाही. ‘खेलो इंडिया’च्या कित्येक वर्षे आधीपासून ही सुप्त घुसळण सुरू आहे. तिच्यातून एखादा विश्वनाथन आनंद किंवा फोगट भगिनी किंवा राही सरनौबत किंवा विदिथ गुजराती भारताला मिळत असतो. क्रिकेटच्या अवाढव्य आणि धनधुंद रेटय़ासमोर टिकून राहणे आणि विजेते घडवणे हे सोपे नाही. त्यादृष्टीने आनंद, बिंद्रा, सिंधू अशी उदाहरणे क्रांतिकारकच ठरतात. या क्रांतीला क्वचितच एखाद्या टप्प्यावर सरकारी किंवा औद्योगिक पाठबळ मिळाले. याची पूर्ण कल्पना असूनही जे पालक त्यांच्या मुलांना अशा खेळांमध्ये भाग घेण्यासाठी उद्युक्त करतात, त्यांचे पाल्य सततच्या अपयशांतून मोडून पडू नयेत यासाठी जिवाचे रान करतात, अशा पालकांचा जाहीर सत्कार करण्याचे काम तरी सरकारने केले पाहिजे. सिंधूसारखी क्रीडारत्ने या मातीत वर्षांनुवर्षे निर्माण होत आहेत. ती हुडकून काढण्याकामी आजवर निव्वळ वैयक्तिक पातळीवर, तोही अपत्यप्रेमातून पुढाकार घेतला गेला आहे. त्याला अधिक व्यवस्थात्मक, यंत्रणात्मक स्वरूप दिले जाण्याची गरज आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रात बहुतेक चांगल्या बाबी या व्यवस्थेमुळे नव्हे, तर व्यवस्थेशिवाय झालेल्या आढळतात. याचा अर्थ व्यवस्थेने नेहमीच स्वत:ची जबाबदारी झटकून पदकविजेत्यांना राष्ट्रप्रेमाचे सल्ले देत राहावेत किंवा त्यांच्या दिग्विजयावर ट्विटरबाजी करून मोकळे व्हावे असा नव्हे. सिंधूमागील सुप्त ताकदीची दखल घेऊन ती वृद्धिंगत होण्याच्या दिशेने यापुढे प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी क्रिकेटपलीकडे पाहण्याची सवय तुम्ही-आम्हीही अंगी बाणवावी लागेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 12:12 am

Web Title: editorial on p v sindhu wins world championship title abn 97
Next Stories
1 ढोल कुणाचा वाजं जी..
2 विशेष संपादकीय – उजवा उमदा उदारमतवादी
3 ..का बोभाटा झाला ‘जी’?
Just Now!
X