संगीतातील रंजनाइतकेच वैचारिकतेकडे लक्ष देत जसराज यांनी मेवाती घराण्याच्या मूळ शैलीला धक्का न लावता आपली स्वतंत्र ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न केला..

अभिजातता वा भक्तीस लालित्याची जोड ही जसराज यांची शैली; तर ‘जसरंगी’तील मूर्छनेचा वापर त्यांच्या  स्वरविद्वत्तेचा उत्तुंग आविष्कार..

मैफलीची यथासांग तयारी झालेली असते. तबला आणि हार्मोनिअमचे संगतकार स्थानापन्न झालेले असतात.. आणि स्वरमंचावर एका अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे आगमन होते. बरोबर तंबोरा वाजवण्यासाठी शिष्यगण. चटकदार तरीही अभिजात म्हणता येईल असा सिल्कचा कुरता, त्यावर रुद्राक्षापासून अनेक तऱ्हेच्या रुळणाऱ्या माळा, मानेवर रुळणारे शुभ्र केस असा हा थाट. तंबोरे लागल्याची खात्री होताच गुणगुणायला सुरुवात करताना मनोमन प्रार्थनेची आळवणी सुरू होते आणि पहिल्याच स्वरात सगळा आसमंत भारून जातो. नंतर मंचावर उमटत राहते ते एक अखंड, सौंदर्यपूर्ण, तरल आणि अभिजात स्वरशिल्प. पंडित जसराज यांच्या प्रत्येक मैफलीत हा अनुभव भारतातील आणि जगातील रसिकांनी घेतलेला असेल. प्रत्येक बैठकीला समोरच्यांना यशस्वितेच्या समाधानाची तृप्ती देणाऱ्या जसराज यांच्या देहबोलीतूनही हे परावर्तित होत असे.

वयाच्या नव्वदाव्या वर्षांतही स्वरांवरचा ताबा जराही ढळू न देता, गायन करण्याची क्षमता बाळगत जसराज स्वरांच्या दुनियेत मश्गुल होते. प्रचंड कष्टाने स्वरांना धार लावत ते गेली आठ दशके गात राहिले. स्वर हाच श्वास आणि स्वर हाच ध्यास, ही त्यांची जगण्याची प्रेरणा. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय अभिजात संगीतातील गायन परंपरेची मशाल तेवत ठेवण्याचे कार्य ते एकविसाव्या शतकातही करत राहू शकले. अभिजात  संगीताच्या क्षेत्रात गेल्या शेकडो वर्षांच्या काळात अनेकदा मळभ दाटून आले. त्या प्रत्येक वेळी आपल्या असामान्य प्रतिभेने ते मळभ दूर करण्याची अचाट क्षमता असणारे कलावंत पुढे आले आणि संगीत परंपरेची ही मशाल त्यांनी अधिकच तेजस्वी करण्याचा प्रयत्न केला. पंडित जसराज हे या च मालिकेतील. आसपास भीमसेनजी, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर असे एकापेक्षा एक मातबर तेजाळ कलाकार असताना त्यांच्या प्रभावळीत जसराज यांचाही स्वरदीप लक्ष वेधून घेण्याइतका प्रभावी होता. या मंडळींच्या तुलनेत प्रतिभेचे दान जसराजजींच्या पदरात काहीसे कमी असेल असे कोणास वाटेल. पण त्याची उणीव जसराजजींनी आपल्या नेटक्या, प्रसन्न मांडणीतून केली आणि ती कधीही असफल ठरली नाही. म्हणूनच जसराजजींची ‘पडलेली’ बैठक अनुभवणारे कोणीही असायची शक्यता नाही.

एखाद्या शास्त्रज्ञाने अथक परिश्रमांतून नवे संशोधन करावे आणि त्यापूर्वी जे कुणी अनुभवले नाही, त्याची अपूर्वाई सिद्ध करावी, हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच ख्याल संगीतात अभिव्यक्तीची स्वतंत्र शैली निर्माण करणेही. दोन्ही क्षेत्रांत प्रतिभेचे लेणे आवश्यक. तरीही एक मूर्त आणि दुसरे अमूर्त. संगीतातील ही अमूर्तता केवळ बुद्धीला आणि मनाला साद घालणारी. ती उमगणाऱ्याच्या अंतरंगात आनंदाची बाग फुलवणारी. जसराज यांनी त्यांच्या पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवत ही नवी शैली विकसित केली. प्रत्येक घराण्याची ही शैली हा त्या गायन पद्धतीचा नकाशा. मार्ग ठरलेला आहे. तो आधीपासूनच विचारपूर्वक ठरवून ठेवला आहे. तरीही त्याच मार्गावरून जाताना यापूर्वी कुणाच्या लक्षात न आलेली सौंदर्यस्थळे टिपून स्वत:ची नवी पायवाट तयार करण्याचे हे काम अवघड आणि आव्हानात्मक. जसराज यांनी या पायवाटेचा विशाल मार्ग करताना, पाठीमागून येणाऱ्या आपल्या शिष्यांनाही स्वरांच्या काफिल्यात सहजपणे समाविष्ट केले. मेवाती घराण्याची शैली लोकप्रिय करताना संगीतातील आपली सौंदर्यदृष्टी त्यांनी अधिकच तरलपणे सांभाळली. त्यामध्ये अनेक नव्या प्रवाहांना सामावून घेतले. वडील पंडित मोतीराम हे मोठे गायक. पण त्यांचे स्वरछत्र वयाच्या चौथ्या वर्षीच हरपल्याने जसराज यांचे संगीत अध्यापन करण्यासाठी ज्येष्ठ बंधू प्रताप नारायण यांना पुढाकार घ्यावा लागला. संगीतात स्वरांएवढेच महत्त्वाचे स्थान असणाऱ्या तालाला जसराज यांनी जवळ केले. ते उत्तम तबलावादक बनले. पण मैफलीत मध्यभागी बसून आपली कला सादर करण्याच्या जिद्दीपोटी त्यांनी आपला मोहरा गायनाकडे वळवला. अथक परिश्रमांना सर्जनाची जोड मिळाली की कलावंताच्या कलेला तपश्चर्येचे फळ येते, हे जसराज यांनी सिद्ध केले.

स्वरांना सिद्धी प्राप्त करणे हे कोणत्याही गायकासाठी अतिशय आव्हानात्मक. नुसते सुरेल असणारे कलाकार मोजदाद करता न येण्याएवढे. पण स्वरसिद्धी प्राप्त झालेले कलावंत अगदीच थोडे. स्वच्छंदी स्वरांना तालातील लयीचे कोंदण देणारे जसराज म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे. जसराजजींकडे त्यांची स्वत:ची सौंदर्यदृष्टी होती. स्वरांचा रत्नजडित दागिना घडवताना प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. त्याशिवाय दागिना परिपूर्ण होत नाही. संगीतातील अशा अलंकारांचा जसराज यांनी प्रचंड अभ्यास केला. त्या अलंकारांवर हुकूमत मिळवली. परिणामी त्या संगीताला सौंदर्यपूर्णतेचा आशीर्वाद लाभला. संगीतातील रंजनाबरोबरच त्यातील वैचारिकतेकडे अभ्यासपूर्वक लक्ष देत जसराज यांनी मेवाती घराण्याच्या मूळ शैलीला धक्का न लावता आपली स्वतंत्र ओळख देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कला पातळ होऊ न देता संगीताची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम म्हणूनच अधिक महत्त्वाचे. एक नवी शैली स्थापित करणे आणि ती रसिकप्रिय करणे हे संगीताच्या क्षेत्रात महाकठीण. जसराज यांना ते साध्य झाले, याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेली अभिजातता आणि त्यात सहजपणे मिसळलेले लालित्य. स्वरांशी लडिवाळपणे खेळत, त्यांना आंजारत, गोंजारत सौंदर्याची एक नवी अनुभूती देताना स्वत:सह सगळ्यांना त्यात बुडवून टाकण्याची किमया त्यांना साध्य झाली होती. स्वर आणि लय हेच या सगळ्या कलाकुसरीचे मुख्य साधन. ते त्यांनी अतिशय हळवेपणाने सांभाळले. त्यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेला शेवटपर्यंत खळ पडली नाही.

ज्या काळात जगभर संगीताचा प्रसार करण्यासाठी पंडितजी हिंडत होते, त्याच काळात आपली गायनशैली शिष्यांमध्ये संक्रमित करण्यासाठीही जिवापाड कष्ट घेत होते. मेवाती घराण्याची पताका फडकत राहावी, यासाठी त्यांनी पुढील पिढीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. तंत्रज्ञानाच्या आजच्या जगातही केवळ भारतीय अभिजात संगीत ही एकमेव कला अशी असेल, की जी केवळ गुरुमुखानेच शिकणे शक्य आहे. गुरुकडून मिळणारी सौंदर्याची नजर आणि सादरीकरणाची कौशल्ये शिष्यांच्या जडणघडणीत फार महत्त्वाची असतात. जसराज यांनी ते न थकता अखंडपणे केले. अगदी शेवटपर्यंत दूरस्थ राहूनही प्रत्यक्ष संगीत शिकवण्याची त्यांची ऊर्जा विलोभनीयच. पुरुष आणि स्त्री कलावंतांनी सहगायन करणे नैसर्गिक न्यायाविरुद्धचे. याचे कारण पुरुषाचा गळा खालच्या पट्टीतला तर स्त्रीचा वरच्या. त्यामुळे ते जेव्हा एकत्र गातात तेव्हा त्यांच्या नैसर्गिक स्वरात तडजोड करून सोयीच्या स्वरात गावे लागते. जसराज यांनी विचारपूर्वक या सहगायनातून एक वेगळाच संगीतप्रकार निर्माण केला. मूर्छना या संगीतातील संकल्पनेत रागातील प्रत्येक स्वर हा षड्ज समजून रागाची मांडणी करत गेल्यास नवाच राग उत्पन्न होतो. या पद्धतीचा उपयोग करून स्त्री आणि पुरुष कलावंतांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे राग सादर करण्याची ही अभिनव कल्पना सादरीकरणासाठी अतिशय अवघड पण रसनिष्पत्तीसाठी अतिशय सुंदर. रसिकांनीच तिचे नामकरण ‘जसरंगी’ असे करून जसराजजींना मानवंदनाच दिली.

भक्तिसंगीत हा त्यांच्या संगीताचा आणखी एक अतिशय लाघवी आविष्कार होता. भारतीय संस्कृतीत संपूर्णपणे मिसळून गेलेल्या भक्तिरसाला त्यांनी आपल्या गायनातून सादर केले. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे शब्दसंगीत त्यांनी उंचीवर नेऊन ठेवले. शब्दांतून प्रतीत होणाऱ्या भक्तिला त्यांनी सांगीतिक आविष्काराची जोड दिली. त्यामुळे त्यांच्या एकूण संगीताला एक वेगळाच लोभस साज मिळाला. व्यक्ती म्हणूनही पंडित जसराज हे असेच लोभस होते. संगीतातून व्यक्त न होणारा ‘क्रोध’ त्यांच्या स्वभावातही नव्हता. जसराजजींना ‘संगीत मरतड’ या उपाधीने गौरविण्यात आले. मरतड म्हणजे सूर्य. पण हा सूर्य शिशिरातल्या पहाटेचा. आल्हाददायक आणि हवाहवासा. आता तो कायमचा मावळला. या ‘मोहक मरतडा’स ‘लोकसत्ता’च्या वतीने स्वरपूर्ण आदरांजली.