23 January 2021

News Flash

हवीहवीशी फकिरी..

जेआरडी टाटांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत कोहलींनी, ही कंपनी काय काय करू शकते याचा आराखडा मांडला.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईचा वीजपुरवठा अबाधित ठेवणारी ‘आयलँडिंग’ यंत्रणा ते ‘टीसीएस’ ते भारतातच संगणक बनवण्याची तयारी.. कोहली यांचे काम व त्यांची स्वप्नेही मोठीच होती..

जेआरडी टाटांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत कोहलींनी, ही कंपनी काय काय करू शकते याचा आराखडा मांडला. भारतापेक्षा अधिक वेगाने अमेरिकेत संगणकक्षेत्र वाढेल, हे लक्षात घेऊन अमेरिकेतही ‘टीसीएस’ची शाखा काढली..

ही फार जुनी गोष्ट नाही. जेमतेम पन्नास वर्षांपूर्वीची. ज्या वेळी भारतात संगणक हा दिसतो कसा आननी हेदेखील माहीत नव्हते आणि आपल्या मायबाप सरकारचा सीमा शुल्क विभाग संगणक आयात करू देत नव्हता; ज्या वेळी संगणकास ‘यंत्र’ म्हणण्यास सरकारी अधिकारी नकार देत होते, कारण त्यात फिरते भाग नाहीत आणि त्यातून काहीही ‘बाहेर’ पडत नाही, असे त्यांचे मत होते; ज्या वेळी संगणकसंबंधित कामांत ५० लाख गुंतवणे हा वायफळ खर्च आहे असे अनेकांना वाटत होते;  ज्या वेळी सॉफ्टवेअर अभियंते तयार करण्याचे घाऊक कारखाने भारतात तयार होऊ शकतात असे कोणास स्वप्नही पडत नव्हते; त्या वेळी मॅसेच्युसेट्स येथील विख्यात एमआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन मुंबईत टाटा पॉवर्समध्ये काम करणाऱ्या तरुणाकडे जहांगीर रतनजी दादाभॉय  टाटा, ऊर्फ जेआरडी, यांनी संगणकविषयक नव्या विभागाची सूत्रे दिली. कालातीत दृष्टी असलेल्या जेआरडींचा विश्वास या तरुणाने इतका सार्थ ठरवला की भारतातील संगणक उद्योगाचे भीष्म पितामह ही यथार्थ उपाधी त्याच्या मागे लागली. करारी, प्रसंगी उद्धट वाटावा असा हा फकीरचंद कोहली नामक तरुण वयाच्या शंभरीपासून हाकेच्या अंतरावर असेपर्यंत तसाच होता. एक व्यक्ती एका आयुष्यात काय काय करू शकते याच्या साक्षात्कारी अनुभवासाठी कोहली हा रसरसता पाठ होता. त्याचा अखेरचा अध्याय शुक्रवारी लिहिला गेला.

अलीकडचा ताज्या अपघाताचा अपवाद वगळता मुंबईत वीजपुरवठय़ात व्यत्यय येत नाही. समस्त महाराष्ट्रात वीजपुरवठा खंडित झाला तरीही मुंबईस वीजव्यत्ययाचा धक्का बसत नाही. त्यासाठीचे गुंतागुंतीचे तंत्रज्ञान ही कोहली यांची निर्मिती. ‘टाटा पॉवर’मध्ये असताना त्यांच्या कल्पनेतून हे ‘आयलँडिंग’ तंत्रज्ञान विकसित झाले हे अनेकांना ठाऊकही नसेल. या अशा कल्पक तरुणास जेआरडींनी हेरले आणि ताज्या ताज्या स्थापन झालेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस’ (टीसीएस) या कंपनीत आणले. अनेकांना हेही ठाऊक नसेल की अशी काही कंपनी स्थापन करावी ही कल्पना मुळात जेआरडींचे मेहुणे-त्यांची बहीण रोदाब हिचे पती-लेस्ली सॉहनी यांची. टाटा समूहात इतक्या कंपन्या आहेत तर त्यांचे हिशेब आदी सांभाळण्यासाठी स्वतंत्र डेटाएंट्री विभाग स्थापन करायला हवा, ही या सॉहनी यांची कल्पना. टाटा समूहातील कर्मचारी, त्यांचे वेतनादी तपशील, कंपन्यांचे आर्थिक व्यवहार आदी कामे हा विभाग करू शकेल, अशी ती कल्पना. त्यातून आधी ‘टाटा कम्प्युटिंग सेंटर’ आणि नंतर ‘टीसीएस’ आकारास आली. त्यानंतर वर्षभरातच कोहली टाटा पॉवरमधून टीसीएसमध्ये आणले गेले.

जेआरडी एखाद्यास एखादी जबाबदारी दिली की त्यात नंतर नाक खुपसत नसत. त्यामुळे कोहली यांच्याविषयी सुरुवातीच्या सहा महिन्यांतच शंका व्यक्त झाली तरी जेआरडींनी त्यास कवडीची किंमत दिली नाही. या सहा महिन्यांत कोहली यांनी काहीही केले नाही. फक्त ही संभाव्य कंपनी काय काय करू शकते याचा अंदाज घेतला आणि अत्यंत शिस्तबद्धपणे आपल्या भविष्यकालीन विस्ताराचा आढावा सादर केला. अशी काही कंपनी चालवायची तर माणसे हवीत. म्हणजे उच्चशिक्षित अभियंते हवेत. ते शोधण्यासाठी कोहली देशभरातील विद्यापीठांत जात. ‘आयआयटी’वर त्यांचे विशेष लक्ष असे. एका आयआयटीत संगणक विभाग सुरू झाला हे कळल्यावर कोहली स्वत: त्या विभागासाठी मदत करू लागले. अशा आयआयटीतील शब्दश: असंख्य तरुणांना त्यांनी आपल्या पंखाखाली घेतले. सुब्रमण्यम रामादोराई, म्हणजेच एस. रामादोराई, हे टीसीएसचे भावी प्रमुख हा त्यांचाच शोध आणि त्यांचीच घडणावळ. अनेक उत्तमोत्तम अभियंते जेथे घडले ते पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय आज जे काही आहे त्याचे श्रेय कोहली यांना जाते. हे महाविद्यालय स्वायत्त कसे राहील यासाठी त्यांनी जातीने प्रयत्न केले आणि राज्य सरकारशी प्रसंगी संघर्ष केला. मूळच्या पेशावर येथील कोहली यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी प्रयत्न करावेत यातून त्यांचा उदार दृष्टिकोन आणि त्यांना हेरणाऱ्या जेआरडींची हिरेपारख वृत्ती दिसून येते.

टीसीएसला आपण टाटा समूहाचे इंजिन होईल इतके मोठे करू शकतो, हे कोहली यांनी ताडले आणि त्यातूनच या कंपनीचा प्रचंड विस्तार झाला. त्या वेळी परकीय चलन नियंत्रण कायद्यामुळे संगणक आयात अशक्य होती. संगणक आयात करावयाचा तर संरक्षण, अर्थ आणि व्यापार अशा तीन खात्यांकडे अर्ज करावा लागत असे आणि त्यांच्याकडून होकार आलाच तर नंतर ११ विविध विभागांकडून ‘ना हरकत’ दाखले आणि आवश्यक ते परवाने घ्यावे लागत. आयबीएम ही त्या वेळची सर्वात मोठी संगणक कंपनी. पण ती ते विकत नसे. या कंपनीकडून ते भाडय़ाने घ्यावे लागत. ती अडचण सहन करत कोहली यांनी कोवळ्या टीसीएसला भरपूर कामे मिळवून दिली. संगणक हा समाजवादीय विचारांचा प्रभाव असलेल्या भारतात त्या वेळी संतापाचा विषय होता. या संगणकामुळे लाखोंचे रोजगार जातील ही भीती. त्यामुळेच त्यातून आयुर्विमा महामंडळाने खरेदी केलेले संगणक नुसते धूळ खात पडून होते. कर्मचारी संघटनांचा विरोध हे त्यामागील कारण. परिणामी प्रचंड आर्थिक गुंतवणूक करूनही आयुर्विमा महामंडळ संगणकास हातही लावत नव्हते. इकडे संगणक आयातीतील अडथळे कसे सोडवायचे या विवंचनेत कोहली. आणि दुसरीकडे आयात करूनही केवळ आडमुठय़ा कर्मचाऱ्यांमुळे पडून असलेले संगणक अशी ती स्थिती. कोहली यांच्या कानावर हा प्रकार आल्यावर त्यांनी सरळ हे जुने संगणक विकत घेतले आणि आपल्या कंपनीत कामास जुंपले. अशाही काळात तीन लाख डॉलर्स आणि तितकाच कर मोजून ‘आयबीएम’चा मेनफ्रेम महासंगणक आणण्याची हिंमत कोहली यांनी दाखवली. ती किती सुस्थळी होती हे आपला इतिहास दर्शवतो. त्या वेळच्या भारतापेक्षा संगणक व्यवहार अमेरिकेत अधिक वेगाने वाढेल हे कोहली यांना कळत होते. त्यातूनच त्यांनी आपल्या कंपनीची शाखा थेट न्यू यॉर्क येथे काढली आणि त्या एक-कर्मचारी शाखेत रामादोराई यांना नेमले. याच्याच जोडीला भारतात त्या वेळी संगणक निर्मिती कंपनीही काढावी असा कोहली यांचा प्रयत्न होता. तथापि, लहान विमानपट्टींवर मोठी विमाने नाही उडवता येत. भारताची धावपट्टी ही कोहली यांच्या स्वप्नांसाठी पुरेशी नव्हती. व्यक्ती काळाच्या पुढचे पाहणारी असली तरी काळ किती भविष्यवेधी होतो यालाही काही मर्यादा असतात. विशेषत: आपल्यासारख्या देशात. त्याचमुळे थेट विमानेच बनवायची तयारी करूनही जेआरडींना भारतात विमान निर्मिती कारखाना सुरू करता आला नाही आणि कोहली आपल्याकडे संगणक बनवू शकले नाहीत.

निवृत्तीनंतरही संगणक आणि भाषा या विषयांवर त्यांचे काही ना काही सुरू असे. त्यांचे प्रथम दर्शन हे दरारादर्शक असे, पण तो दूर ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न केला की कोहली मोकळेपणाने बोलत. त्यांच्या वागण्यातील नावास साजेशी एक तृप्त अलिप्तता लोभस होती. हा फकीर मन जडेल असा होता आणि त्यांची फकिरी हवीहवीशी होती. या उद्यमशील फकिरास लोकसत्ता परिवारातर्फे अभिवादन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 12:06 am

Web Title: editorial on pioneers of the information technology industry fc kohli dies abn 97
Next Stories
1 देवत्वाचा शाप!
2 उंच माझा खोका..
3 दुसरी संधी!
Just Now!
X