सचिन पायलट यांनी राजस्थानात केलेले बंड यशस्वी होण्याची शक्यता कमी; पण या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वशून्यतेची दळभद्री लक्षणे चव्हाटय़ावर आली..

आपल्याच उपमुख्यमंत्र्याच्या चौकशीचा आदेश देऊन अशोक गेहलोत यांनी पायलट यांचा जाहीर पाणउतारा केला. असे होत असताना राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करून आपल्या पक्षातील उद्याच्या नेत्याचा अपमान टाळला असता तरी पुढचे रामायण घडले नसते..

रंगरूपाप्रमाणे बंडखोरीचा गुणही रक्तातून येत असावा. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावरून असे म्हणता येईल. हे पायलट सध्या सत्तेत असूनही आपल्या सरकारविरोधात नाराज आहेत आणि दिल्लीत आपल्या काही आमदारांना घेऊन फुरंगटून बसले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात त्यांनी केलेले हे पहिले उघड बंड. इतके दिवस सचिन पायलट नाराज असल्याच्या बातम्या येतच होत्या. पण त्या नाराजीस तोंड फुटले नव्हते. अखेरीस हे गळू फुटले आणि नाराजी वाहती झाली. सचिन पायलट हे वडील राजेश पायलट यांच्यासारखेच तडफदार. थोरले पायलट काही एक कर्तृत्व गाजवून राजकारणात आले तर धाकटय़ा पायलटास सर्व काही आयते मिळाले. थोरल्या पायलटांनी आपल्या कारकीर्दीत दोन वेळा बंड केले. एकदा पंतप्रधान नरसिंह राव यांच्या विरोधात आणि दुसरे पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या विरोधात. सोनिया गांधी यांनाही आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण ते तिसरे आव्हान टळले. या बंडांतून वेगळे असे काही राजेश पायलट यांच्या हाती लागले नाही. सचिन पायलट यांच्या बंडाची फलश्रुतीही काही वेगळी असण्याची शक्यता नाही. वडिलांच्या तुलनेत सचिन यांस राजकारणात सर्व काही लवकर मिळाले. सर्व काही लवकर मिळाल्यावर अधिकाच्या अपेक्षा वाढतात. सचिन पायलट यांच्या त्या वाढल्या आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे. त्यासाठी ते पात्र आहेत की नाही, ते त्यांना मिळायला हवे की नको वगैरे मुद्दय़ांची चर्चा अन्यांनी करण्याचे कारण नाही. कारण तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या पुढच्या पिढीतील नेत्यांचे काय सुरू आहे, हा मुद्दा निश्चित दखल घेण्यासारखा.

याचे कारण याआधी शेजारील मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचे असेच बंड झाले आणि त्यातून काँग्रेसचे- कमलनाथ यांचे- सरकार जाऊन भाजपच्या हाती सत्ता आली. राजस्थानातही तसेच काही होणार की काय, या प्रकारच्या वावडय़ा उठताना दिसतात. तथापि मध्य प्रदेशात जे झाले त्याची पुनरावृत्ती राजस्थानात होण्याची शक्यता कमी. याची प्रमुख कारणे दोन. पहिले म्हणजे सत्तास्थापनेसाठी मध्य प्रदेशात आणि राजस्थानात भाजपला हव्या असणाऱ्या आमदारांची संख्या. मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्या आमदारसंख्येत फार फरक नव्हता. त्यामुळे पाचसहा जण जरी फोडता आले तरी सत्तासंतुलन बिघडणार होते. राजस्थानात तसे नाही. सत्तेच्छुक भाजप आणि सत्ताधारी काँग्रेस यांच्या आमदार संख्येत तीसहून अधिकचा फरक आहे. त्यामुळे इतक्या सगळ्यांना फोडणे तसे ‘खर्चीक’ काम. अर्थात भाजपची ‘साधनसंपत्ती’ लक्षात घेता इतकी ‘खरेदी’ भाजपस परवडणार नाही, असे नाही. पण इतक्या सर्व फुटिरांना घेऊन त्यांना नंतर देणार काय, हा प्रश्न आहे. आणि दुसरे कारण म्हणजे ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणे सचिन पायलट यांना काही केंद्रातील पदाची अभिलाषा नाही. त्यांची नजर आहे ती मुख्यमंत्रीपदावर. ते भाजपकडून दिले जाण्याची शक्यता नाही. ते तसे दिले तर वसुंधराराजे शिंदे काय करणार हा प्रश्न. म्हणून सचिन पायलट यांनी काँग्रेस त्याग केला तरी भाजपकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक काही मिळण्याची शक्यता नाही. अर्थात त्यांनी पुरेसे आमदार मिळवून स्वतंत्र गट स्थापन केला आणि मुख्यमंत्रीपदावर दावा केला तर काँग्रेसला खिजवण्यासाठी भाजप सचिन पायलट यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. पण त्यासाठी त्यांच्या मागे पुरेसे आमदार असायला हवेत. ते आहेत असे आज तरी म्हणता येणार नाही. उलट बहुसंख्य आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याच तंबूत राहणे पसंत केले. तेव्हा तूर्त तरी या बंडातून सचिन पायलट यांच्या विमानास उड्डाण करता येईल अशी लक्षणे नाहीत.

पण या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वशून्यतेची दळभद्री लक्षणे चव्हाटय़ावर आली. ज्योतिरादित्य शिंदे काय वा सचिन पायलट काय. आहे त्या पेक्षा मोठे सत्तापद मिळावे यासाठी त्यांनी बंड केले हे पूर्णत: खरे नाही. राजकारणातील बहुतांश बंडांमागे सदर नेत्यास नाकारले जाणारे महत्त्व आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष अधिक कारणीभूत असते. सचिन आणि ज्योतिरादित्य या दोघांच्याही बंडामागे तेच कारण होते. पक्षाध्यक्ष नसूनही पक्षाध्यक्ष असलेले, म्हणजे त्या पदाची अधिकृत जबाबदारी न घेता केवळ सत्ता गाजवणारे राहुल गांधी हे या दोघांच्याही बंडांमागचे मूळ आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे संबंध सध्या ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ असे आहेत. राहुल गांधी आहेत म्हणून त्यांच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा करावी तर तीत हमखास निराशा पदरी पडते आणि ते नाहीत असे मानून काही करताही येत नाही, असा प्रत्येक काँग्रेसजनाचा आजचा अनुभव. या पक्षाचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी तीच अडचण काही आठवडय़ांपूर्वी रास्तपणे मांडली तर त्याची दखल घेण्याऐवजी झा यांनाच प्रवक्तेपदावरून दूर केले गेले. आज सचिन पायलट यांच्या बंडानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी व्यक्त केलेली भावनाही नेमकी तीच आहे. ‘‘आता तरी पक्षश्रेष्ठी योग्य ती दखल घेतील. नपेक्षा तबेल्यातून घोडे उधळल्यानंतर दरवाजाची खुंटी लावण्यात काही अर्थ नाही,’’ असे सिबल यांना वाटते. ते रास्त आहे.

पण प्रश्न राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना काय वाटते हा आहे. त्या आपल्या चिरंजीवांचे कान उपटताना दिसत नाहीत आणि ‘पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घे’ असे सुनावतानाही दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेस सध्या निर्नायकी आहे. अशा वातावरणात ज्यांना काही भविष्याची (अर्थातच स्वत:च्या – देश, राज्य वगैरे नाही) चिंता आहे त्यांची अस्वस्थता वाढणारच. आताही सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाच्या अभावापेक्षा डाचत आहे ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे वर्तन. राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेची पुरेपूर हमी असल्याने गेहलोत यांनी पायलट यांची पूर्ण उपेक्षा केली. इतकेच नव्हे तर आपल्याच उपमुख्यमंत्र्याच्या चौकशीचा आदेश देऊन त्यांनी पायलट यांचा जाहीर पाणउतारा केला. याची गरज नव्हती. असे होत असताना राहुल गांधी वा सोनिया यांनी हस्तक्षेप करून आपल्या उद्याच्या नेत्याचा अपमान टाळला असता तरी पुढचे रामायण घडते ना. ज्योतिरादित्य, आसामचे हेमंत बिस्व सर्मा हे सत्ता आणि पदांपेक्षाही काँग्रेसमधून गेले ते तेथे होणाऱ्या या अशा उपेक्षेमुळे. ही उपेक्षा आणि पक्षाच्या भवितव्याविषयीचे औदासीन्य ही काँग्रेसजनांची आजची खरी वेदना आहे आणि तिचे मूळ पक्षाच्या नेतृत्वशून्यतेत आहे. तेव्हा त्यासाठी भाजपला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. आपला संसार सांभाळता येत नसेल तर शेजारच्याला बोल का लावायचे, हा प्रश्न काँग्रेसजनांनी आपल्या नेतृत्वास आता तरी विचारावा.

तसे झाल्यास राहुल गांधी यांना बदलावे लागेल. सध्या त्यांचे वर्तन पारंपरिक ‘संस्कारी’ कुटुंबातील सर्वात थोरल्या चिरंजीवासारखे आहे. हा थोरला स्वत:ही संसाराला लागत नाही. आणि म्हणून धाकटय़ांचीही गाडी पुढे जात नाही आणि त्यांची कुचंबणा होते. अशा वेळी ज्येष्ठ चिरंजीवाने योग्य तो बोध घेतला नाही तर धाकटे आपापला मार्ग शोधतात. काँग्रेसमधे तसे होऊ लागले आहे. म्हणून या पक्षाचे नेतृत्व आताच भानावर आले नाही तर आणखी काही फुटतील.