शरद पवार, राधाकृष्ण विखे-पाटील आणि राज ठाकरे यांच्याविषयीच्या ताज्या घटनांमध्ये एक समान धागा आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी उमेदवारीचा विचार मागे घेतला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुत्रास भाजपने प्रवेश दिला, तर मनसे लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार, हे गुलदस्त्यातच आहे..

महाभारतात युद्धभूमीवर अवसानघात झालेल्या पार्थास पुन्हा युद्धास उभे करण्यासाठी कृष्णाने प्रयत्न केल्याचा इतिहास आहे. तथापि वर्तमानातील महाभारतात लोकशाही युद्धात उतरण्यासाठी फुरफुरत असलेल्या ‘पार्था’स आवरण्यासाठी साक्षात ‘कृष्णा’वरच माघार घेण्याची वेळ यावी यास दैवदुर्वलिास म्हणावे की काळाचा महिमा याचे उत्तर देणे अवघड. पण हे महाभारत महाराष्ट्रापुरते आणि एकाच पक्षापुरतेही मर्यादित नाही.

सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून. या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बऱ्याच भवती न भवतीनंतर निवडणुकीच्या रिंगणातून काढता पाय घेतला. आपण यापुढे लोकसभा निवडणुकीच्या रणमदानात उतरणार नाही, ही त्यांची भूमिका वास्तविक गेली काही वर्षे आहे. परंतु या वेळी ते माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाले आणि एकच चर्चा सुरू झाली. पवार यांची एक कृती आणि एकच अर्थ असे कधीही नसते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने अनेक चर्चाना पालवी फुटली. तिकडे त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबीयही हवालदिल झाले. त्या कुटुंबाची पुढची पाती असलेले रणजितसिंग सध्या दिङ्मूढ अवस्थेत आहेत. राष्ट्रवादीत राहावत नाही आणि भाजपत जाववत नाही, अशी त्यांची अवस्था. त्यात घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाच्या तंबूत शरद पवारांच्या उमेदवारीचा उंट एकदा का आत शिरला की आपल्यालाच बाहेर जावे लागणार याची खात्री असल्याने मोहिते पाटील कुटुंबीयांवर तशी चिंतेची काजळीच पसरली होती. आता ती दूर होईल. कारण निवडणुकीच्या रिंगणातून आपली उमेदवारी मागे घेण्याचा पवार यांचा निर्णय.

आपला नातू पार्थ याच्या निवडणूक लढवण्याच्या आग्रहामुळे आपण माघार घेत असल्याचे पवार यांनी सूचित केले. पार्थ हा शरदरावांचा पुतण्या अजित यांचा पुत्र. २०१४ साली भाजपची सरशी झाल्यापासून अजित पवार यांचे निखारे तसे शांतच होते. पाटबंधारे घोटाळ्याची तलवार डोक्यावर टांगती असल्यामुळे असेल पण अजितदादा तसे पडद्यामागे राहिले. आगामी सहा महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजतील. त्या वेळी कदाचित ते पुन्हा जोमाने पुढे येण्याचा प्रयत्न करतीलही. पण काकांमुळे आपल्याला दूर राहिलेली दिल्ली आपल्या चिरंजीवांसाठी तरी तशी राहायला नको, असे अजित पवार यांना वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा त्यांनी पार्थासाठी आग्रह धरला आणि काकांवरच लोकसभेच्या समरांगणातून माघार घ्यायची वेळ आली. एकाच कुटुंबातील किती जणांनी एकाच वेळी निवडणूक लढवायची असे कारण पवार यांनी आपल्या माघारीसाठी दिले. ते तत्त्वत बरोबर असेलही. पण राजकारण थोडेच तत्त्वावर चालते? तेव्हा पवार यांनी दिलेल्या कारणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.

परंतु विखे पाटील कुटुंबीयांची जी काही दशा झाली आहे ती पाहून तरी पवारांना आपले निश्चितच बरे चालले आहे, असे वाटून दिलासा मिळेल. सध्या देशात सर्वच राजकीय पक्षांतील भटक्या आणि विमुक्तांना हमखास निवाऱ्याचे एक केंद्र तयार झाले आहे. ते म्हणजे भाजप. पश्चिम बंगालातील कट्टर काँग्रेसी प्रियरंजन दासमुन्शी यांची पत्नी म्हणू नका, बोगस चकमकींसाठी ओळखले जाणारे पोलीस अधिकारी म्हणू नका, बदनाम कंत्राटदार म्हणू नका, बारा पक्षांचे पाणी जोखलेले म्हणू नका.. जरा कोणी पैसे, नाव अथवा निवडून येण्याच्या क्षमतेचा संशय जरी असलेले इतस्तत भटकताना दिसले रे दिसले की भाजपचे धुरीण त्यांना आपल्या पक्षात घेऊन टाकतात. अलीकडे असे पक्षांत घेणेही तसे सोपेच. एखादे उपरणे खांद्यावर चढवायचे, झेंडा हाती द्यायचा अथवा महाराष्ट्रापुरताच मामला असेल तर कोणते तरी गंडाबंधन केले की झाले. नेता सदेह आणि स-मन नव्या पक्षाच्या तुताऱ्या फुंकण्यास तयार. त्याच न्यायाने गेल्या चारपाच वर्षांत भाजपने अगणित गणंगांना भगवे करून घेतले.

अहमदनगर जिल्ह्य़ातील तालेवार विखे पाटील घराण्याची पुढची पाती सुजय हे यातील ताजे. कर्तृत्व म्हणाल तर सांगावे असे काही नाही. थोरल्या विखे पाटलांच्या थोरल्या लेकाचा हा थोरला मुलगा इतकीच काय ती त्याची ओळख. विखेंच्या घराण्यात कर्तृत्वाच्या शिडीची तशी उतरंडच म्हणायची. थोरल्या विखेंचे वडील विठ्ठलराव विखे पाटील हे राज्यातील सहकार चळवळीचे अध्वर्यू. त्यांची हयात सहकार चळवळ रुजवण्यात गेली. त्यांचे चिरंजीव म्हणजे बाळासाहेब विखे. ते जन्मजात काँग्रेसी. पण तरी शिवसेनेच्या मार्गाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात अर्थ राज्यमंत्र्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण. तूर्त ते काँग्रेसमध्ये आणि विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी असले तरी त्यांनीही सेना-भाजपच्या काळात राज्यात मंत्रिपदाची चव घेतलेली आहे. तेव्हा राजकीय बाह्य़उद्योगाच्या चोरटय़ा वाटा विखे कुटुंबास माहीत नाहीत, असे नाही. आताही काँग्रेसचे नेते असले तरी राधाकृष्ण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याऐवजी मौन पाळणेच पसंत केले. त्यामागे अर्थात देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षांत गुंतवणूक करण्याचे कौशल्य आहे, हे मान्य. पण त्याच वेळी अशा गुंतवणुकीची संधी देणारे विरोधी नेतेही आहेत, हेदेखील तितकेच खरे. त्यामुळे राधाकृष्ण यांच्या चिरंजीवाने भाजपत प्रवेश केला यात अजिबात धक्का नाही. धक्का असलाच तर राधाकृष्ण इतके दिवस काँग्रेसमध्ये का आणि कसे राहिले याचा असेल. खरे म्हणजे फडणवीस सरकारने या कुटुंबात केलेली गुंतवणूक लक्षात घेता काँग्रेसने उमेदवारी दिली असती तरी ती घेणे राधाकृष्णपुत्रास शक्य झाले नसते, इतके भाजपचे ‘ओझे’ त्यांच्या खांद्यावर आहे.

गोंधळलेला तिसरा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्या पक्षाच्या उरल्यासुरल्या आमदारानेही शिवसेनेत प्रवेश केला. म्हणजे यानिमित्ताने त्या पक्षाची विधानसभेतील शेवटची निशाणीही पुसली गेली, असे म्हणता येईल. मुंबई महानगरपालिकेत नावापुरते काही नगरसेवक त्या पक्षाकडे असतीलही. पण ते पक्ष हयात असल्याचा पुरावा देण्याइतपतच. ते काही चतन्याचे निदर्शक म्हणता येणार नाही. पक्षासाठी असा काही चतन्यदायी कार्यक्रम पक्षाध्यक्ष राज ठाकरे देतील अशी आशा अनेकांना त्या पक्षाच्या गेल्या आठवडय़ात साजरा झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात होती. राज ठाकरे यांनी ती फोल ठरवली. लोकसभा निवडणुकांत आपण काय करणार त्याची घोषणा नंतर करू असे राज ठाकरे यांनी निवडणुका जाहीर व्हायच्या आदल्या दिवशी सांगितले. नंतर हा शब्द भविष्यकाल दर्शवतो खरा. पण तो नजीकचा की अनादिअनंत हे काही त्यातून कळत नाही. ते कळू न देणे हाच बहुधा राज ठाकरे यांचा इरादा असावा.

या तीन घटना आणि हे तीन पक्ष यांत एक समान धागा आहे. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत अंगी वीरश्री चेतवून मदान मारायची वेळ आली असता या तीनही पक्षांचे धुरीण गोंधळलेले दिसतात. आपला नातू काय करू इच्छितो, हे पवार यांना आधीच कळायला हवे होते. तसेच आपल्या चिरंजीवाची पावले कोणत्या रस्त्याला लागली आहेत याचा अंदाज राधाकृष्ण विखेंना हवा होता आणि आपण नक्की काय करू शकणार- किंबहुना काय शकणार नाही-  इतपत कल्पना तरी राज ठाकरे यांना हवी होती. या तिघांच्याही कृतीतून हे दिसले नाही. हे महाभारतास साजेसेच म्हणायचे. महाभारताचा नायक कृष्ण द्वारका परिसरात रणछोडदास या नावानेही ओळखला जातो. या तीन पक्षांतील परिस्थितीचे वर्णन यातून चपखल ठरावे.