आपणासारख्या विकसनशील, गरीब आदी देशांनी पुतळ्यांचे स्वागत करावयास हवे. कारण माणसांपेक्षा पुतळे असणे हे सर्वार्थाने फायदेशीर असते. पुतळे कधी कशाचीही तक्रार करीत नाहीत. पुतळ्यांचे आपापसातील संबंध अत्यंत सौहार्दाचे असतात. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पुतळे कधीही विचार करीत नाहीत. त्यामुळे कोणाच्याही डोक्याला तापच नाही.

अब्राहम लिंकन नामक थोर विभूती भारतात जन्मली असती तर तिने लोकशाहीची व्याख्या खासच बदलली असती. तो अमेरिकेत जन्मल्यामुळे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही असे म्हणून गेला. भारतात त्याची पदास झाली असती तर त्याने ही लोकशाहीची व्याख्या बदलून काही लोकांनी प्राधान्याने पुतळ्यांसाठी चालवलेले पुतळ्यांचे राज्य अशी निश्चितच केली असती, याबाबत आमच्या मनात.. आम्ही (दुर्दैवाने) पुतळा नसल्यामुळे.. तिळमात्रही शंका नाही. बुधवारी या पुतळ्यांच्या साम्राज्यात एका दैवी योगायोगाने जन्मास आलेल्या सर्वात उंच माणसाच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ होणार होता. त्याची महती माध्यमांपुढे सादर केली जाणार होती. पुतळ्यांच्या साम्राज्यात हे असे करावे लागते. माध्यमांना तेथे फार महत्त्व असते. कारण ते दिले नाही तर अथांग वाचक/ प्रेक्षक पुतळ्यांपर्यंत पुतळ्यांच्या बातम्या जाणार कशा? आणि पुतळ्यांपर्यंत पुतळ्यांच्या बातम्याच गेल्या नाहीत तर काही थोडय़ाफार उरलेल्या माणसांपेक्षा पुतळ्यांचेच कसे बरे चालले आहे, हे कळणार कसे? आणि हेच कळले नाही तर पुतळ्यांचे महत्त्व पुतळे न झालेल्यांच्या मनावर बिंबणार कसे? आणि हे महत्त्वच जर बिंबले नाही तर पुतळ्यांची पदास वाढणार तरी कशी? तेव्हा हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी काही उत्साही पुतळा कार्यकत्रे, सरकारी अधिकारी माध्यमांतील मंडळींसमवेत समुद्रात उभ्या राहणाऱ्या एका युगपुरुषाच्या पुतळेदर्शनासाठी निघाले असता एक तरुण मरण पावला. तो उच्चशिक्षाविभूषित होता आणि नुकताच त्याचा विवाह झाला होता. असेना का. पण त्याचे मरण वाया जाणार नाही.

mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?

म्हणून आपणासारख्या विकसनशील, गरीब आदी देशांनी पुतळ्यांचे स्वागत करावयास हवे. याचे प्रमुख कारण म्हणजे माणसांपेक्षा पुतळे असणे हे सर्वार्थाने फायदेशीर असते. त्याची अनेक कारणे. एक म्हणजे पुतळे नेमून दिलेल्या जागीच उभे राहतात. किंवा बसून असतात. ते उगाच हिंडत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बोंब, रस्त्यातील खड्डे वगरेंबाबत ते कधीही तक्रार करीत नाहीत. पुण्यात वेडय़ावाकडय़ा रिक्षा चालवल्या म्हणून पुतळ्याने कधी चकार शब्द काढल्याचे आमच्यातरी ऐकिवात नाही. किरकिर करतात ती माणसे. पुतळे नव्हेत. त्यामुळे इंधन तेलाचे भाव वाढले, कमी झाले, प्रवासखर्च वाढला वगैरे क्षुद्र मुद्दय़ांचा विचार पुतळ्यांबाबत करावाच लागत नाही.

दुसरे म्हणजे एकदा उभारले की त्यांच्यावर फारसा खर्चच नाही. कबुतराच्या दक्षिणद्वारातून पडलेल्या अवशेषांच्या खाणाखुणा वर्षांतून एखाद दिवशी पुसल्या म्हणजे झाले. वाटल्यास दोनपाच हारांचा काय तो खर्च. पुतळ्यांचे माणसांसारखे नाही. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यावर खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे याची टंचाई, त्याची अनुपलब्धता वगैरे काही प्रश्न पुतळ्यांच्याबाबत येत नाहीत. उपासमारीने पुतळ्याचा मृत्यू असे ऐकले का कोणी? सुतराम शक्यता नाही. असली संकटे भेडसावतात ती क्षुद्र माणसांना. म्हणून या आघाडीवरही पुतळे माणसांपेक्षा सरस असतात.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा. पुतळ्यांच्या आपापसातील संबंधांचा. ते अत्यंत सौहार्दाचे असतात. पुतळ्यांनी अन्य कोणा पुतळ्यांचा निषेध केल्याचे, त्यास आक्षेप घेतल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. त्या उलट माणसांचे. त्यास सहकारी/शेजारी/आप्त हा आपल्या धर्माचा/ज्ञातीतला/ जातीतला/गावचा/गोरा/ स्त्री वा पुल्लिंगी यापैकीकाही ना काही हवा. पुतळे अशी कोणतीही पूर्वअट घालत नाहीत. त्यांना कोणीही सहकारी म्हणून चालू शकतो. या त्यांच्यातील दुर्मीळ गुणामुळे पुतळ्यांत जातीयवादाची समस्याच नाही. त्यामुळेदेखील माणसांपेक्षा पुतळे असणे अधिक सोयीचे असते.

याउप्परही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुतळे विचार करीत नाहीत. त्यामुळे डोक्याला तापच नाही. त्यांच्याही आणि आसपासच्यांच्याही. कारण जगात सर्वाधिक समस्या ज्या कशाने तयार झाल्या असतील तर त्या विचार करण्याच्या माणसाच्या घाणेरडय़ा, निंदनीय आणि अश्लाघ्य सवयीमुळे. याचाच अर्थ असा की विचार करणे बंद केल्याखेरीज या समस्या सुटण्यास सुरुवात होणार नाही. हे बंद करायचे तर जास्तीत जास्त पुतळे असणे आवश्यक ठरते. आपल्या मायबाप सरकारचा प्रयत्न सुरू आहे तो यासाठीच. याच उदात्त हेतूने अलीकडे पुतळ्यांत क्लोिनग तंत्राच्या साह्य़ाने आमूलाग्र सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे तर सर्वच सामाजिक/ राजकीय/आर्थिक समस्या नष्टच होणार आहेत. अलीकडे पुतळे हुबेहूब माणसांसारखेच हलता बोलताना दिसतात ते या सुधारणेमुळेच. समस्त मानवजातीस संकटात पाडणारा विचार करण्याचा अवगुण तेवढा दूर करण्यात आला असून त्यामुळे माणसे पुतळ्यांप्रमाणे आणि पुतळे माणसांप्रमाणे दिसू लागले आहेत. पुतळ्यांचे असे माणसाळणे आणि माणसांचे पुतळेकरण होणे भविष्यासाठी आश्वासक आहे.

तेव्हा जास्तीत जास्त पुतळे बसवणे सध्या सुरू आहे ते याच विचाराने. त्या मागील उदात्त हेतू आपल्यासारख्या पुतळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. तो घेतला जात नाही म्हणून विनायक मेटे किंवा तत्सम वंदनीय पुरुषांवर टीका केली जाते. हे पुतळ्याचे उदात्त उद्दिष्ट नसते तर विवेकी, अभ्यासू इत्यादी असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेटे यांच्यासारख्यांची गरज का पडली असती बरे? आधीच्या पृथ्वीराज चव्हाण सरकारातील अनेकांनाही ही गरज ध्यानात आली होती आणि आता फडणवीस यांना ती जाणवली. हे सोपे नाही. काँग्रेस, जवळजवळ काँग्रेस असलेला राष्ट्रवादी आणि थेट भगवा वस्त्रांकित भाजप या तिघांनाही हे कळले यातच पुतळ्याचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय हा काही रस्त्याच्या कडेस, एखाद्या कोपऱ्यात गुमान उभ्या राहणाऱ्या अन्य सामान्य पुतळ्यांसारखा पुतळा नाही. तो जगातील सर्वात मोठा पुतळा. आता माणसाची उंची पुतळ्यांच्या आकारात मोजत नाहीत. ती पद्धत गेली. हा पुतळ्याच्या आकारावरून माणसाचे लहानमोठेपण मोजायचा काळ. तेव्हा या काळास शोभेल असाच पुतळा व्हायला हवा. अन्य पुतळे शोधत हिंडावे लागते. म्हणजे कोणा माणसाला तशी गरज वाटलीच तर. (आणि पुतळ्यांना तशी गरज कधीच वाटत नाही. असो.) पण हा पुतळा तसा नाही. तो इतका मोठा की थोडय़ाफार शिल्लक माणसांना आणि बहुतांश पुतळ्यांना तो कोठूनही दिसेल. इतका मोठा पुतळा, तोदेखील सागरात, उभा राहणार असल्याने थोडीफार धुगधुगी शिल्लक असणाऱ्या माणसांचा ऊरही अभिमानाने भरून येईल, हे काय सांगावयास हवे? त्या आनंदासाठीच तर हा सगळा प्रयास. तो आनंद याच आठवडय़ात शेजारील गुर्जर बांधवांना मिळेल. नर्मदेकडे पाहत उभ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. त्या वेळी शेजारील कोरडय़ा पडलेल्या नर्मदेकडे पाहून होणारे दु:ख मोजकीच उरलेली माणसे भव्य पुतळ्याकडे पाहून विसरतील.

अशा अनेक तऱ्हेने पुतळे आपणास आनंद देतात. म्हणूनच अलीकडे अनेकांना घरात छत्रपती शिवाजी वा सरदार पटेल जन्मास येण्याऐवजी एखादा पुतळाच जन्मास यावा असे वाटू लागले आहे. ती इच्छा पूर्ण होताना आपण पाहतच आहोत. आता एखाद्या भव्य पुतळ्याच्या उभारणीत अपघात होऊन एखाद्या जिवंत तरुणाचे प्राण गेलेच, त्या दु:खाने त्याच्या कुटुंबीयांचे बधिरतेने थिजून पुतळ्यांत रूपांतर झालेच तर त्यात काय एवढे? पुतळ्यांच्या प्रदेशात यात नवीन काही नाही. गेल्याच आठवडय़ात अत्यंत्र पवित्र मुहूर्त मानल्या जाणाऱ्या विजयादशमी दिनोत्तर सोहोळ्यात रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना ६१ जिवंत माणसांचे पुतळ्यांत रूपांतर झाले. हे असे होतेच. ते तसे झाले नाही तर आपण पुतळा प्रजासत्ताक आहोत हे जगास कळणार कसे?