14 August 2020

News Flash

मार्क्‍सला मूठमाती!

देशाला ‘पुन्हा महासत्ता’ बनवण्याचे स्वप्न, अस्मिता व राष्ट्रवाद ही पुतिन यांच्या यशाची त्रिसूत्री.

संग्रहित छायाचित्र

 

रशियातील तथाकथित ‘सार्वमता’ने अपेक्षेप्रमाणे पुतिन यांना २०३६ पर्यंत सत्ता दिलीच; पण त्या देशाच्या घटनेतील आणखीही बदलांना मंजुरी या मतदानातून मिळाली..

देशाला ‘पुन्हा महासत्ता’ बनवण्याचे स्वप्न, अस्मिता व राष्ट्रवाद ही पुतिन यांच्या यशाची त्रिसूत्री. लहान कृतींमधून लोकांची मने जिंकण्याचे कसबही त्यांच्याकडे आहे. आज पुतिन हे अनेक राज्यकर्त्यांचे प्रारूप आहे.

‘‘सर्वोच्च पदावर कोणाही व्यक्तीस दोनपेक्षा अधिक वेळा राहण्यास मनाई हवी. त्या पदावरील व्यक्ती नियमितपणे बदलली जायला हवी. सत्ता व्यक्तिकेंद्रित नसावी. एकाच व्यक्तीच्या हाती सर्व अधिकार नसावेत. पण आपल्या देशाच्या स्थैर्यास देशांतर्गत आणि बाहेरून असलेले आव्हान लक्षात घेता सध्या असे करणे शक्य होणार नाही,’’ असे उद्गार व्लादिमीर पुतिन यांनी मार्च महिन्यात रशियन लोकप्रतिनिधीगृहात जनप्रतिनिधींना उद्देशून काढले आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पुतिन यांना २०३६ सालापर्यंत अध्यक्षपदी राहता येईल यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती याच सभागृहात कोणत्याही विसंवादी स्वराशिवाय मंजूर झाली. सध्याच्या घटनेप्रमाणे पुतिन यांचा कार्यकाळ २०२४ साली संपुष्टात येणे अपेक्षित होते. आता त्यानंतरही आणखी १२ वर्षे ते रशियाचे सर्वेसर्वा म्हणून देश हाकू शकतील. आपल्या त्या भाषणात पुतिन यांनी संबंधित घटनादुरुस्ती न्यायपालिकेत आणि जनतेच्या न्यायालयात मंजूर होणे कसे आवश्यक आहे हे सांगितले. वरवर ऐकणाऱ्यास या दोन ठिकाणी या घटनादुरुस्तीस विरोध होऊ शकतो असे वाटायची शक्यता आहे. तसे काहीही नाही. रशियाच्या घटनापीठात ही दुरुस्ती विनासायास मंजूर झाली आणि आता जनतेच्या न्यायालयानेही आपल्या या लाडक्या नेत्यास आजन्म सत्ता उपभोगता यावी यासाठी बहुमताचा कौल दिला.

करोनाच्या ऐन बहरकाळात रशियात या घटनादुरुस्तीसाठी सार्वमत झाले. जास्तीतजास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी अनेक प्रलोभने दाखवली गेली. काही ठिकाणी तर रोख रक्कमदेखील मतदारांना दिली गेली आणि खासगी कंपन्यांनी आपली सर्व आर्थिक ताकद मतदानासाठी ओतली. हे मतदान गेले आठवडाभर सुरू होते आणि मतदारांना ऑनलाइन मत देण्याचीही सुविधा होती. रशियातील आतापर्यंतच्या निवडणुकांशी परिचित असणाऱ्यांना याबाबत काही वेगळे सांगावयास नको. मतपत्रिका, निवडणूक अधिकारी वगैरेंचे पावित्र्य राखण्यासाठी या निवडणुका ओळखल्या जात नाहीत. ताजे सार्वमतही यास अपवाद नव्हते. करोनाचा कहर रशियात सुरू असताना आणि दिवसागणिक त्यात भरमसाट वाढ होत असतानाही या ‘महत्त्वाच्या’ मतदानासाठी सर्व काही निर्बंध शिथिल केले गेले. खुद्द पुतिन मतदान केंद्रात आले तेदेखील आपला नेहमीचा झोकदारपणा मिरवत. किमान दाखवण्यापुरती तरी मुखपट्टी बांधण्याची गरज त्यांना वाटली नाही. अर्थात मतदान कशासाठी आहे आणि त्याचा निकाल काय असणार आहे याचा पूर्ण अंदाज असल्याने पुतिन यांना कशाचीच फिकीर करण्याचे कारण नाही. या घटनादुरुस्तीसाठीच्या मतदानास ‘सार्वमत’ म्हटले जात असले तरी ते शास्त्रीयदृष्टय़ा सार्वमत किंवा जनमत नाही. केवळ पुतिन यांना वाटले म्हणून घेतले गेलेले मतदान आहे. तेव्हा या ‘मतमोजणी’चा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला.

त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो विद्यमान अध्यक्षांनी- म्हणजे पुतिन यांनी-  आता वा याआधी किती काळ अध्यक्षपद भूषवले आहे किंवा होते हा मुद्दा निकालात निघेल. म्हणजे पुतिन हे आतापर्यंत कधी अध्यक्षपदावर नव्हतेच असे मानून त्यांना नव्याने या रिंगणात उतरता येईल. तसेच यामुळे इच्छा असेल तर ते २०३६ नंतरही अध्यक्षपदी राहू शकतील. याआधीचे अध्यक्ष बोरीस येल्तसिन यांच्या काळात आणि त्याआधी केजीबी या गुप्तहेर यंत्रणेत असलेले पुतिन १९९९ साली पंतप्रधान झाले तेव्हा ते ४६ वर्षांचे होते. २०३६ साली ८३ वर्षांचे असतील. ताज्या घटनादुरुस्तीमुळे त्यांना त्यानंतरही अध्यक्षपदी राहता येईल. या घटनादुरुस्तीत त्यांनी अन्य काही मुद्दय़ांबाबतही जनमताचा कौल मिळवला. उदाहरणार्थ रशियन मजुरांच्या किमान वेतनात वाढ करणे, एखाद्याने अल्पावधीकरताही परदेशी नागरिकत्व मिळवलेले असेल तर त्या व्यक्तीस उच्चपदासाठी मनाई करणे, उच्चपदासाठी काही एक किमान रशियन वास्तव्याची मुदत नक्की करणे आदी मुद्दय़ांनाही या घटनादुरुस्तीने मंजुरी दिली. तसेच रशियात यापुढे विवाह ‘एक पुरुष’ आणि ‘एक स्त्री’ यांच्यातच होऊ शकतो, असे या घटनादुरुस्तीने जाहीर केले. म्हणजे समलिंगी विवाह यापुढे त्या देशात बेकायदा ठरतील. पारंपराप्रेमी, धर्मश्रद्धाळू मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी नेत्यांस असे काही करावे लागते. तिकडे आधुनिक अमेरिकेतही ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष हा गर्भपात आणि स्तंभ पेशी संशोधन (स्टेम सेल रिसर्च) यास विरोध करणारी अवैज्ञानिक भूमिका घेत असेल तर पुतिन यांच्या समलैंगिकता अमान्य ठरवणाऱ्या प्रतिगामी भूमिकेमागील राजकारण समजून घेता येईल. असे अनेक बारीकसारीक बदल या घटनादुरुस्तीने होणार असले तरी तिचे वर्णन ‘पुतिन यांची घटना’ असे होऊ लागले आहे. याचे कारण ही सर्व कारणे म्हणजे देखावा आहे. या घटनादुरुस्तीचे खरे प्रयोजन पुतिन यांना आजन्म सत्ताधीश राहता यावे, हेच आहे, असे अनेकांचे मत आहे आणि ते अस्थायी नाही.

गेली वीस वर्षे पुतिन सलग अध्यक्षपदी वा सत्ताकेंद्री आहेत. मध्ये एक सहा वर्षांचा काळ त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. पण त्या वेळी अध्यक्षपद आपल्याच हातातील प्यादे मेदवेदेव यांच्याकडेच राहील याची व्यवस्था त्यांनी केली होती. म्हणजे अध्यक्ष मेदवेदेव नामधारी आणि खरा अधिकार पंतप्रधान पुतिन यांच्याकडेच, अशी ती व्यवस्था. याचा अर्थ गेली दोन दशके पुतिन यांच्या हाती अनिर्बंध अधिकार आहेत आणि त्यांची सत्ता निरंकुश आहे. या काळात विरोध करणाऱ्या आपल्या अनेक प्रतिस्पध्र्याना त्यांनी देशातून किंवा जगातूनही दूर केले. जे तसे झाले नाहीत त्यांना परदेशात गाठून रशियन गुप्तहेर यंत्रणांनी परलोकास धाडले. इतक्या नृशंस राजवटीनंतरही पुतिन यांच्या समोर राजकीय आव्हान नाही. रशियास पुन्हा महासत्ता बनवणे, रशियन अस्मिता आणि त्यासाठी कठोर राष्ट्रवाद ही त्यांच्या यशाची त्रिसूत्री. याच राष्ट्रप्रेमी भावनांना हात घालण्याचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय मंचावरही पुतिन रशियन भाषेतच बोलतात. एकदा एका देशांतर्गत समारंभात पुतिन यांच्या साक्षीने एक वक्ता इंग्रजीत संभाषण करू लागला असता पुतिन यांनी त्याचा जाहीर अपमान केला होता. अशा अनेक लहान लहान मुद्दय़ांवर पुतिन यांनी रशियन मानस कायम आपल्यामागे राहील असेच राजकारण केले आणि माध्यमांवरील कमालीच्या नियंत्रणामुळे त्यांना त्याची फळे मिळाली. आपले विरोधक हे पाश्चात्त्य देशांचे वा रशियास अस्थिर करू पाहणाऱ्या ताकदींचे हस्तक हे ठरवण्यात त्यांना उत्तम यश आले. त्यामुळेही सत्ताधीश म्हणून खुंटा अधिकाधिक बळकट होत गेला.

आज पुतिन हे अनेक राज्यकर्त्यांचे प्रारूप आहे. टर्कीचे एर्दोगान हे त्याचे उदाहरण. त्यांनी तर स्वत:साठी आपल्या राजधानीत पुतिन यांच्याप्रमाणे भव्य प्रासादही बांधून घेतला आहे. हंगेरीचे व्हिक्टर ओर्बान हे आणखी एक प्रतिपुतिन. त्यांनीही पुतिन यांच्याप्रमाणे सत्तेवर तहहयात राहता येईल अशी व्यवस्था केली. चीनचे क्षी जिनपिंगदेखील याच मालिकेतील. त्यांनी स्वत:स माओच्या बरोबरीने महान नेत्याचा दर्जा स्वहस्ते घेतला असून तेदेखील पायउतार होण्याची चिन्हे नाहीत. इतकेच काय पण अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हेदेखील पुतिन प्रारूपाचे चाहते. अलीकडे ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्या समोर त्यांच्यासारखी कायम अध्यक्ष राहण्याची इच्छा व्यक्त केली.

पुतिन यांनी या मतदानात देशाच्या घटनेत ‘परमेश्वरावरील श्रद्धा’ अंतर्भूत करण्याचाही जनादेश मिळवला. ज्या देशाने मार्क्‍स-एंगल्स यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित लेनिनप्रणीत क्रांती अनुभवली आणि एक नवा बुद्धिगम्य विचार जगास दिला, त्या देशाच्या घटनेत पुतिन यांनी परमेश्वराचा अंतर्भाव केला. म्हणून ही घटनादुरुस्ती म्हणजे एका अर्थी मार्क्‍सला पुतिन यांनी दिलेली कायमची मूठमाती ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:04 am

Web Title: editorial on russian sovereignty voters agree to let putin seek 2 more terms abn 97
Next Stories
1 ड्रॅगनची कोंडी!
2 अधिकाराचा विषाणू!
3 ‘टाळेबंदी’ आवडे सर्वाना..
Just Now!
X